Home > मॅक्स ब्लॉग्ज > "हौसा म्हातारी"

"हौसा म्हातारी"

हौसा म्हातारी
X

दिवस उगवायच्या आधीच मारुतीला पाणी घालायला गेलेली पवाराची शांता गल्लीतनं ओरडतच आली, "हौसा म्हातारी कवा रातचीच अंथरुणात मरून पडलीया! बघा कि कसलं मराण म्हणायचं हि!" माझे कान गल्लीच्या दिशेने. शरीर अंथरुणात. डोळे नुसतेच सताड उघडे. क्षणात घड्याळ्याचे काटे जुन्या काळाकडे उलटे सरकू लागले. डोळ्यांच्या उघड्या स्क्रीनवर हौसा म्हातारीचा जीवनपट सुरू झाला. हौसा म्हातारी होतीच तशी. भले जिजाबाई सारखी ती आदर्श माता नसेलही. झाशीच्या राणीसारखी तलवार घेऊन रणांगणावर ती कधी लढली नसेलही. सावित्रीबाई सारखं संघर्ष करून तिनं शिक्षण घेतलं नसेलही. तरीही ती त्यांच्याइतकीच लढाऊ होती. जिद्दी होती. करारी होती. तिचं संपूर्ण नाही पण अर्धं संघर्षमय आयुष्य या डोळ्यांना पाहता आलं. क्षणात या साऱ्या गोष्टींच्या आठवणी बनून मेंदूच्या वाटेने खाली सरकत डोळ्याभोवती जमू लागल्या. हौसा म्हातारीच्या शेकडो आठवणी डोक्यात. लिहायला बसलो तर दिवस पुरणार नाही. पण सांगायलाच हवी तिची गोष्ट. नाहीतर माझं डोकं फोडून ती बाहेर येईल. त्याच्यावर बसून थयाथया नाचेल आणि म्हणेल, भाड्या इतक्या लवकर कसा यिसरलास?

सारं गाव म्हणायचं, हौसाबाईच्या लग्नाची हळद चार दिवस लागली. त्या काळात साऱ्या गावानं लाडू खाल्लं. पण डोक्यावरच्या मंडवळ्या उतरायच्या आधीच तिचं कपाळ देवानं भुंड केलं. मिलिट्रीत शिपाई बनलेला तिचा दादला असा कसा अचानक गेला असेल? त्या काळी त्याचं कणभर शरीर सुद्धा मृत्यूनंतर गावाच्या नजरेला पडलं नाही. कोण म्हणायचं, तिकडच आगीन दिलीय. तर कोण म्हणायचं, त्याचं शरीर आणाय सारखं राहिलं नव्हतं. खरं-खोटं कुणालाच माहीत नाही. अजूनही त्या दर्दभऱ्या आठवणी निघाल्या कि काळीज चिरून टाकतात. अक्षता पडल्यावर दुसऱ्या दिवशीच देशसेवेसाठी दूर निघून गेलेला नवरा असा एकाएकी गेलेला बघून कसं सोसलं असेल तिनं? कश्या सहन केल्या असतील त्या यातना? अक्खा जनम तिनं कसा काढला असेल नुसत्या त्याच्या आठवणीवर. माणसं नुसत्या आठवणींवर आयुष्यभर कशी काय जगत असतील. तिचं अकाली झालेलं भुंड कपाळ बघून कुणी म्हणालं, पोरीला माहेराकडं पाठवा. कुणी म्हणालं, कवळी पोर हाय दुसरं लगीन लावून द्यावं बापानं. सारा जनम विधवा बनून कसा काढावा एकटीनं? पण हौसाबाई सासरी राहिली. बिन नवऱ्याची नांदली. त्याच्या आठवणीवर जगत राहिली. दिवस ढकलत राहिली. दिर जावासोबत संसार केला. अखेरच्या काळात एकटीनच सासू-सासऱ्यांची सेवा केली. सगळं तिनं सोसलं. सहन केलं. शेतात माळात ऊन म्हटलं नाही कि पाऊस म्हटला नाही. हे सारं कशासाठी केलं असेल तिनं? कुणासाठी केलं असेल तिनं? काय असतील तिच्या जगण्याच्या प्रेरणा? कुणालाच माहीत नाही.

मळ्यातल्या गव्हाळकीच्या रानात तिचं हातपाय बाराई महिने राबताना दिसायचं. काट्या कुट्यात रुतताना दिसायचं. मळ्याच्या वाटेनं गोळा केलेल्या शेणाच्या शेणी थापून ती शेणकुटाचा भला मोठा हुडवा रचायची. रोजगाऱ्या सोबत साऱ्या मळ्याची भांगलण करायची. मळ्यात गोट्याच्या पुढच्या अंगाला काळ्याशार पाण्यानं भरलेली विहीर. विहिरीच्या बाजूनं दाट कळकाचं बेट. धावं पुढच्या पाटाकडेनं रामफळ, आंबा, सिताफळीची हिरवीगार झाडं. ओढ्यांन गुरं चारता चारता विहिरीवर पाण्याला गेलं की रामफळीच्या झाडाकडं बघत हमखास हौसाबाई म्हणायची, चार तुला बी काढ अन चार आम्हांस्नी बी काढ. माझ्या पुतणीला लई आवडत्याती. तिचा एका पुतणीवर विषेश जीव होता. ती तिला भविष्याचा आधार मानत होती. अंधार पडायला मळ्याच्या वाटनं डोक्यावर चुंबळ ठेवून बुट्टीवर जळणाचा बिंडा घेऊन गावाच्या दिशेने तरातरा चालताना दिसायची. तिच्या मागं तिची शेरड करडं पळायची. घरात आली की चुलीला चिकटायची. तिच्या देहाला निवांतपणा असा नाहीच.

पण दोन्ही दिरांच्या भांडणात घराचं तीन तुकडं पडलं. तिचं दोन्ही दीर वेगळं राहिल्यावर वाटणीला आलेल्या खणभर सोफ्यात सासू सासऱ्या सोबत तिचा संसार चाललेला. तिच्या पेन्शनच्या पैशावर त्यांचं आजारपण बघायची. एका रात्री आई म्हणाली, हौसाबाईकडनं दही घेऊन ये जा. तिच्या दाराला गेलो तर हौसाबाई चुलीला लगडलेली. दोन्ही पायात काठवट धरून भाकरीचं पीठ घसाघसा मळत बसलेली. चुलीत निखारा साठलेला. वैलावर कालवण रटरट होतं. उंबऱ्यावर रॉकेलची चिमणी अंधाराला दाबत भगभगत होती. सोफ्याच्या कोपऱ्यात मेकंला धरून बसलेली शेरडं करडं मला बघून बावरली. आईनं दह्यासाठी पाठवलंय म्हणून सांगितलं तर म्हणाली, दिरांनी भांडणं काढलीवती आज! कुणाला उसनं पासनं करशील तर याद राख म्हणून सांगितलंय! आयला सांग उद्या मळ्यात जाता जाता हळूच दिवून जायीन म्हणून! अशा अनेक गोष्टीना तोंड देत ती दिवस ढकलत राहिली.

उन्हाळ्यात गावाबाहेर माळावर तामजाईची जत्रा भरायची. आजही ती तशीच भरते. सारा माळ माणसांनी फुलून जातो. तामजाईला नवसाची बकरी पडतात. घरोघरी एक कोंबडा तरी हमखास कापला जातोच. हौसाबाई डालग्यातला मोठा कोंबडा काढुन द्यायची. आम्ही तो घेऊन माळावर तामजाई समोर जायचो. म्हमद्या तामजाईला ओवाळून धारदार सुरीने कापायचा. चांगलं शेरभर मटन पडायचं. कापलेलं कोंबडं ती दिरांच्या हवाली करायची. इतकं सारं तिच्या आयुष्यात घडूनही देवा धर्मावर तिचा विश्वास होता. जीव होता. कुणी पंढरीला निघालेला दिसला की हमखास ती त्याला थांबवायची. हाताला लागल ती नोट काढायची. म्हणायची, माझ्या नावानं गरीबासनी प्रसाद वाट.

पण गावात कुणाच्या सण-समारंभात ती उभ्या आयुष्यात कधी दिसली नाही. तिला विधवा बाई म्हणून कधी कोणी सवाशीण सांगितलं नाही कि एखाद्या लग्नकार्यात कधी पुढ बोलविलं नाही. लहानपणी आम्हाला यातलं काहीच कळायचं नाही. पण नंतर नंतर समजत गेलं. अशा कार्यक्रमात तिच्याशी लोकं फारकून का वागता ते.

कालमानानुसार तिच्या देहाचं हिरवं झाड वटून गेलं. हौसाबाईची हौसाम्हातारी बनली. सासू सासरे कधीच गेले. शेवटी आसरा म्हणून दिरांच्या पोरांच्या वळचणीला आली. मिळेल तो भाकरी तुकडा घेवून खाऊ लागली. मागच्या महिन्यात सांगाडा झालेली हौसा म्हातारी पिंपळाच्या पाराखाली एसटीची वाट बघत बसलेली दिसली. कुठे निघालीस तर म्हणाली, तालुक्याला. आता या वयात कशाला धरपडतीस? तर म्हणाली, काय करायचं बाबा दीराच्या पोरातनी भांडणं लागत्याती सारखी. पेन्शलीचं साठलेलं पैसं वाटून टाकते दोघांसनी बी. कोण हाय मागं माझं. बरं वाईट का हुईना आता तीच तुकडं करून घालत्याती. एक ना अनेक शेकडो आठवणी तिच्या...

...उन्हं ओसरीवर आलेली. कोणाच्या तरी आवाजाने तंद्रीतून जागा झालो. भानावर आलो. मागच्या गल्लीत आता जास्तच कालवा उसळलेला. बहुतेक तिची पुतणी आली असावी. तिच्याच रडण्याचा आवाज. आता मात्र अंथरुणातून उठलो. थेट तिच्या दारात पोहचलो. तर बाबूंच्या चार काट्यावर कडबा अंथरून तिरडी बांधायची माणसांची गडबड चाललेली. बाजूला पाणी तापवायच्या चुलीतनं शेणकूटाच्या धुराचा नुसता कोंब उठलेला. हौसा म्हातारी भोवती बायका माणसांचा गराडा पडलेला. पुतणी अधून मधून हुंदके काढून गाव हलवून सोडत होती. भिंतीला टेकवलेल्या सोशिक सांगाडयातली हौसा म्हातारी नेमकी कुठे निघाली होती? मृत्यूनंतर माणसाला जिथे जावं लागतं त्या ठिकाणी? कि आणखी कुठे? माहित नाही पण तिच्या जीवनाची नदी मृत्यूच्या सागराला मिळायला निघाली होती हे मात्र नक्की. पांढऱ्या कपड्यात गुंडाळलेली तिची तिरडी काही वेळातच नदीच्या दिशेने सरकू लागली. मी मान खाली घालून चालू लागलो. तर डोळ्यात जमिनीच्या पडद्यावरही तिचीच चित्रे पावलासोबत पुढे पुढे पळू लागलेली.

काही क्षणात स्मशानात फसफसत जळत निघालेला तिचा देह पाहून मी प्रचंड अस्वस्थ झालो. लाकडाच्या ढिगाखाली कित्येक नव्या जुन्या आठवणीना सोबत घेऊन जळणारा तिचा मेंदू पाहून, तिच्या मेंदूचं मेमरी कार्ड बनवून जुन्या आठवणी विकणारं दुकान या देशात टाकून द्यावं असं काही क्षण वाटून गेलं. का असं वाटून गेलं मला? नक्की नाही सांगता येणार. कदाचित आयुष्यभर तिच्या वाट्याला जे जगणं आलं, यातना आल्या, हालअपेष्टा आल्या, त्या तिनं कश्या पेलल्या असतील. झेलल्या असतील. दुनियेला माहित नसलेल्या अशा कोणत्या बळावर ती जगली असेल? यामुळेही असं वाटलं असावं.

पण डोक्यावर बांधलेल्या मंडवळ्या सुटायच्या आधीच मिलिटरीत गेलेला नवरा मेल्यावर त्याच्या अश्या कोणत्या आठवणीवर ती सत्तर वर्षे नांदली असेल? मला खरच माहित नाही. इथल्या गावगाडयातल्या नव्या डिजिटल पिढ्याना तर ते अजिबातच माहित नाही.काही वेळातच हौसा म्हातारीची कवटी फुटली. कवटीच्या आत असलेल्या असंख्य नव्या-जुन्या जीवघेण्या आठवणींची क्षणात राखरांगोळी झाली. माणसं जागची हलली. वाटंला लागली. पण पायच उचलेना. तिथेच घुटमळलो. आत खोल खोल कुठेतरी घुसळण होत गेली. डोक्यात अनेक प्रश्नांची खच्चून दाटी. मनात विचार आला. या देशात महापुरुषांचे हजारो फुटांचे गगनचुंबी पुतळे आकाशाला टेकायला निघालेत. मग आयुष्यभर पुरुष स्पर्श न झालेलं आणि म्हातारपणा पर्यंत तरुण राहिलेलं तिचं जिवंत गर्भाशय काढून, शहरातल्या एखादया चौकात कोल्ड स्टोरेज उभारून, नव्या वासनांध पिढ्याना त्याची सोशिकता दाखवता आली असती तर...

Updated : 23 Dec 2018 9:01 AM GMT
Next Story
Share it
Top