Home > मॅक्स किसान > हॅट्स ऑफ टू “बिजमाता” राहीबाई पोपेरे

हॅट्स ऑफ टू “बिजमाता” राहीबाई पोपेरे

हॅट्स ऑफ टू “बिजमाता” राहीबाई पोपेरे
X

शेतीसंबंधित परंपरागत ज्ञान, शहाणपण व मुख्य म्हणजे पुढील पिढ्यांबद्दल आत्मीयता बाळगून राहीबाई पोपेरे

नगर जिल्ह्यात दुर्गम भागात विविध धान्ये, कडधान्ये, रानभाज्या यांच्या देशी वाणाची “बँक” चालवत आहे.

काल एबीपी माझ्याच्या कट्ट्यावर त्यांची मुलाखत झाली.

पुण्यातील “बायफ” (BAIF Research Institute) त्यांना या कामात मदत करीत आहे. त्यांनी २५००० शेतकरी स्त्रियांना, स्वयं सहायता गटासारख्या माध्यमातून संघटित करीत जवळपास ५० पिकांची २०० देशी वाण पुनर्जीवित करून, त्यांचा प्रसार चालवला आहे. लाकडे जाळून तयार झालेली राख, माती, शेणखत, गांडूळखत ! बस एव्हढीच स्थानिक साधनसामुग्री. बिना भांडवलाची. पर्यावरण स्नेही. स्थानिक उत्पन्नाची साधने तयार करणारी.

या देशी वाणांमध्ये असणारी पोषणमूल्ये, मार्केटमधून कॉर्पोरेटनी उत्पादित केलेल्या व विकलेल्या बियाणांपेक्षा उच्च प्रतीची असतात असे म्हटले जाते. (मला भालचंद्र नेमाड्यानी “आधुनिकता व जागतिकता” या विषयावर मुंबईत ऑगस्ट २०१८ मध्ये केलेली विंदा करंदीकर स्मृती व्याख्यानातील मांडणी आठवली)

बहुराष्ट्रीय कंपन्याची मक्तेदारी, जागतिक अर्थव्यवस्थेवरील पकड, त्यांची नफेखोरी याबद्दल माझ्यसारखे बरेच काही लिहितात. यापुढेही लिहितील. त्याला मर्यादा आहेत. विशेषतः शासनव्यवस्था बहुराष्ट्रीय कंपन्यांनी खिशात टाकलेली असतांना. त्यासाठी स्थानिक पातळीवर त्यांना पर्यायी मॉडेल्स उभी करणे, ती चालवणे महत्वाचे आहे. तेथे राहीबाई पोपोरे यांचे कार्य मोठे ठरते. अन्नधान्याचा व बी बियाणांच्या जागतिक बाजारावर, फक्त मूठभर बहुराष्ट्रीय कंपन्यांची पकड आहे. कॉर्पोरेट भांडवलाला “इकोनॉमीज ऑफ स्केल” ची गरज असते. हे स्केल त्याला तेव्हाच हासील होऊ शकते ज्यावेळी तो आपल्या प्रॉडक्ट्स चे “प्रमाणीकरण” (Standardization) करतो. त्यामुळे महाकाय कॉर्पोरेट्स नेहमीच, छोट्या स्केलवर केलेली उत्पादने व कोणत्याही वैविध्याच्या विरोधी असणार आहेत.

आपल्या आधीच्या पिढ्यानी पुढच्या पिढयांना सुपूर्द केलेली विविध प्रकारची बी बियाणे लाखो शेतकरी आपल्या मुठीत घट्ट धरून आहेत. महाकाय कोर्पोरेट्स त्यांना आपल्या मार्गातील अडथळा मानते.आज जे काही सुरु आहे त्याचे परिणाम पन्नास व शंभर वर्षांनी ठळक पणे दिसू लागतील. त्यावेळी या साऱ्या चर्चा करणारे आपण जिवंत देखील नसू. मानवी समाजाच्या हजारो वर्षाच्या सिव्हिलायझेशन मधून, पिढ्यांपिढ्यांच्या अथक प्रयत्नांनी व प्रयोगशीलतेने विकसित केलेली श्रीमंत जैविक विविधता हळू हळू नष्ट होऊ शकते. सगळ्यात मोठी शोकांतिका हि असणार आहे कि शंभर वर्षानंतरच्या तरुण पिढयांना त्यांनी नक्की काय गमावले हेच माहित नसेल. आणि कॉर्पोरेट भांडवलासाठी ती सुखांतिका असणार आहे!आपल्या देशात अशा लाखो राहीबाई पोपोरे तयार होऊ शकतात हा विश्वास नगरच्या राहीबाई पोपोरे देतात हे मात्र नक्की.

Updated : 23 Dec 2018 6:31 AM GMT
Next Story
Share it
Top