Home > मॅक्स ब्लॉग्ज > बा..ई..प..ण ( भाग १२ )

बा..ई..प..ण ( भाग १२ )

बा..ई..प..ण ( भाग १२ )
X

मनुष्य समाजात घृणा अथवा तिटकारा व्यक्त करण्याच्या अनेक पध्दती आहेत . मनुष्य व्यक्त होताना काही सामाजिक संकेत पाळेलच अस नाही . बहुतांशी वेळा तो सामाजिक नीतीमत्तेला धाब्यावर बसवूनच बरेच गोष्टी करत असतो. त्याच्या ह्या कृती इतक्या अंगवळणी पडून जातात की मग तीच कृती अत्यंत साधारण व कधीकधी नैसर्गिक वाटू लागते . यामधून सामाजिक वातावरण कलुषित होते याचे भान ठेवणे गरजेचे असते.

स्त्रीसमाज आणि शिव्या....शिवी हा शब्द महाराष्ट्रात अत्यंत प्रसिद्ध आहे. अगदी सहजपणे नजर टाकली तरी दोन मित्र अगदी मजेत एकमेकांना शिव्या देताना पाहतो. चुकून भांडण चालू असेल तर मग विचारायलाच नको. एकमेकांच्या कुळांचा उध्दार करता करता दोघांचीही जीभ घसरते ते एकमेकांच्या घरातील स्त्रीजातीवर. कुणी आईच्या नावाने तर कुणी बहिणीच्या नावे शिव्या घालतो. कुणी कुणाच्या पत्नीचा शिव्या देऊन अक्षरशः उध्वस्तकरण करतो. भांडण एका प्रकारचे असते आणि यात कळतनकळत आहूती पडत जाते ती घरातील स्त्री समाजाची. तिला चारित्र्यहिन ठरवताना नालायकपणाची चरमसिमा गाठली जाते. तिच्या शारीरिक अवयवाना लक्ष्य करून घाणेरडे हावभाव व्यक्त केले जातात. तिच्या विषयी अनेक खोट्या गोष्टी व अफवा रितसर बोलल्या जातात. यातून काय मिळते पुरुषांना ? फक्त दुसऱ्या घराण्याची निंदानालस्ती करण्याचे समाधान ? आणि या घाणेरड्या समाधानाकरता बळी मात्र स्त्रीचा ? कितपत योग्य ?? तुम्हीच ठरवा. शिव्या देणे हे निव्वळ असंस्कृतपणाचे लक्षण नसून ते आपल्यातील व्देषभावना उघड करणारे माध्यमही बनलेले असते. मनात साठलेला व्देष अथवा राग व्यक्त करताना आपण स्त्री समाजाला नाहक त्यामध्ये ओढतोय याचा विवेकच हरवून बसलेला असतो. या शिव्या मधूनच पुढे भांडण विस्तारते . कायमची दरी पडते. हे थांबायला हवे. याकरिता स्त्री समाजाचा सन्मान करण्याचा संस्कार लहानपणापासूनच अंगात मुरवायाला हवा. स्त्री म्हणजे या समाजातील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे व तो नित्य आदरास पात्र आहे याची जाणीव आपल्या मनात कायम बिंबली पाहिजे . आपण आपल्या आईचा , बहिणीचा , पत्नीचा व मुलीचा जसा आदर करु इच्छितो तसेच इतरानाही वाटत असते याचे भान सदैव असावे . शिव्या देणे या अत्यंत घाणेरड्या प्रकारापासून स्त्री समाजाची लौकर सुटका व्हावी हीच सदिच्छा .

माणसांनो..राग व्यक्त करण्याचा मार्ग हा विधायक असावा. कोणतेही भांडण हे मुद्दे सोडून नसावे. अकारण आपला राग व्यक्त करताना इतर कुणा घटकाला त्रास होऊ नये याची काळजी महत्त्वाची असते. स्त्री टार्गेट करून तुमचा राग कदाचित शमेल पण त्या स्त्रीच्या घरगुती लोकांचा राग वाढेल. मग ते आपल्या घरातील स्त्रीला शिव्या वाहतात. यात नुकसान केवळ दोन घरांचे नसते तर सामाजिक वातावरण कलुषीत बनते. याचकरता आपल्या जिभेला " स्त्री सन्मान " करण्याची सवय लावली पाहिजे .

!! स्त्री सन्मान ....करण्याची सवय लागलीच पाहिजे !!

उमेशसूर्यवंशी ९९२२७८४०६५

Updated : 1 Dec 2018 10:57 AM GMT
Next Story
Share it
Top