असीफा...
X
परवापर्यंत हे नाव आपल्याला माहित नव्हतं. हे नाव कोणाचं, ही मुलगी कोण, काही काही माहित नव्हतं. अचानक सोशल मीडियावर हे नाव आणि एका गोंडस मुलीचा चेहरा समोर आला आणि बघता बघता सगळेच या विषयी बोलू लागले. सगळे न्यूज चॅनल, बातमीदार, राजकारणी, विरोधक, ज्यांचं-ज्यांचं म्हणून सोशल नेटवर्क अकाऊंट आहे, ते सगळेच या विषयी बोलतात, न्याय मागतात. पण हे करत असताना एक साधा सेन्स कोणाला कसा नाही, हा प्रश्न राहून राहून माझ्या मनात येतो. एखाद्या मुलीचा बलात्कार झालाय, तिला मारुन टाकण्यात आलंय, असं जेव्हा तुम्ही म्हणता तेव्हा तिचा चेहरा आपण दाखवत नाही, फोटो असला, तरी त्याला ब्लर करुन ऑन एअर करतो किंवा छापतो किंवा पोस्ट करतो. पण असीफाच्या बाबतीत असं का घडत नाहीये? का तिचा चेहरा जगासमोर आणला जातोय? एक माणूस म्हणून आपण इतके निर्लज्ज झाले आहोत? की विरोधकांनीच हा मुद्दा ऐरणीवर आणलाय, त्यामुळे या गोष्टीला विरोध कोण करणार, हे म्हणून हा निष्काळजीपणा? की आता तिच्या घरच्यांचा पत्ता नाही, कोणी काही बोलायला समोर येत नाही, मग चालवा काय हवं ते?
संताप संताप होतोय नुसता.
एका पत्रकाराने तिचा चेहरा व्हॉट्सअप स्टेटस म्हणून ठेवला. त्याला विचारलं, की चेहरा ब्लर का नाही केला, तर म्हणाला “कळू दे लोकांना की किती निरागस मुलीचं आयुष्य बरबाद झालंय ते..” अरे पण एक तर ज्यांना खरंच धडा शिकवायची गरज आहे, त्यांना असं व्हॉट्सअप स्टेटसचा चेहरा बघून खरंच मनातून ढवळून निघणार आहे का? आणि ज्या लोकांना चेहरा दिसतोय, ज्यांना खरंच वाईट वाटतंय, त्यांना पुन्हा चेहरा दाखवून डिप्रेशनमध्ये ढकलण्यासारखंच आहे हे..
दुसरा मुद्दा असा, की ही गोष्ट घडलीये जानेवारीत आणि गळा काढला जातोय आत्ता.. या प्रकरणाचा थांगपत्ता तेव्हाच का नाही लागला? तेव्हाच या दोषींना बेड्या का नाही ठोकल्या गेल्या? विरोधक तब्बल तीन महिने काय करत होते? बर पहिल्यांदा हे प्रकरण कसं बाहेर आलं? आता तिच्या घरचे कुठे आहेत? सत्ताधारी का गप्प आहेत? एरवी बाईटसाठी कारच्या मागे धावणारे रिपोर्टर आत्ता सत्ताधाऱ्यांना प्रश्न का विचारत नाहीयेत? आणि प्रश्न न विचारताच, पुन्हा सत्ताधारी गप्प का, असा सवाल का करतायेत? हल्ली प्रत्येक मंत्री, आमदार, खासदार ट्वीट करत सुटतो.. मग पत्रकारांनी प्रश्न नाही विचारले, तरी तुम्ही टीव-टीव करु शकता की.. ते का नाही केलं?
असे अनेक प्रश्न सध्या डोकं भंजाळून सोडतायेत. एक आई म्हणून भिती आणखी वाढलीये. मी माझ्या मुलीला सकाळी शाळेत सोडायला जाते, तेव्हा रोज तिला प्रश्न विचारते. पिल्लू, तू सायकलवर आपापली शाळेत कधी जाणार गं? पण या प्रश्नाचं उत्तर माझ्या मनात पक्कं असतं- कधीच नाही. माझ्या लहानपणी मी आणि माझा भाऊ तीन-साडे तीन किमी लांब शाळेत सायकलवर जायचो. आज माझ्या मुलीची शाळा घरापासून साडे तीन मिनिटांवर आहे. पण तिला शाळेत एकटीने सोडायचं, ही कल्पनाच मी करु शकत नाही. तिला शाळेत सोडताना आणखी एक ऑब्सर्वेशन असं की सायकलवर शाळेत येणारी फक्त मुलंच आहेत, मुली नाही ! अगदी नववी- दहावीच्या मुलींना दोन मिनिटांच्या अंतरावर असलेल्या शाळेत सोडायलाही पालक स्वतः येतात किंवा त्यांच्यासाठी व्हॅन लावली जाते. आणि ही परिस्थिती मुंबईतली आहे.
ट्रेनमध्ये एक दारुडा महिलेचा जीव नकोसा करतो, आणि आपण तिला वाचवायचं सोडून व्हिडियो रेकॉर्ड करतो. "आपल्याला काय करायचंय?" ही मानसिकता आहे. एके दिवशी आपलं दार ठोठावलं जाईल, तेव्हाच आपल्याला जाग येईल. पण तोपर्यंत आपण एकटे पडलेले असू. आणि बाकीचे सगळे आपल्या परिस्थितीवर त्यांनी केलेल्या विश्लेषणाचा हॅशटॅग किती ‘भारी’ याचीच चर्चा करत राहतील ! एकंदरीतच आपण काय किंवा राजकारणी काय, सगळे एकाच माळेचे मणी.. पण त्यातही आपण मण्यांच्या हिरव्या-निळ्या-भगव्या रंगांवरुन भांडत बसू, हीच आजची क्लेशकारक, भयावह परिस्थिती.
- अर्पिता विद्वांस सौदत्ती