जम्मु-काश्मीर : जखमी महिलेने दिला बाळाला जन्म
X
जम्मू- काश्मीर मधील सुंजवान लष्करी तळावरील दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेल्या एका महिलेनं गोंडस चिमुकलीला जन्म दिला आहे. दहशतवाद्यांच्या हल्ल्यात गर्भवती महिलेला पाठीत गोळी लागली होती. याचवेळी तिला प्रसूतीकळा सुरु झाल्या. तात्काळ या महिलेला हेलिकॉप्टरने श्रीनगरमधील लष्करी रुग्णालयात हलवण्यात आले. यावेळी तिच्यावर शस्त्रक्रिया करणं गरजेचं होते, डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करत तिच्यावर शस्त्रक्रिया केली असून यात महिला आणि बाळ दोन्ही सुखरुप बचावले आहे. या हल्ल्यात रायफलमन नाझिर अहमद खान आणि त्यांनी पत्नी शाहजदा हे जखमी झाले होते. शाहजदा ही २८आठवड्यांच्या गर्भवती होती.
महिलेला प्रसूती कळा सुरु झाल्याने तिच्यावर शस्त्रक्रिया करणे गरजेचे होते. गोळी लागल्याने महिला गंभीर जखमी झाली होती. तर दुसरीकडे बाळाच्या प्रकृतीलाही धोका निर्माण झाला होता. त्यामुळे ही शस्त्रक्रिया करणे डॉक्टरांसाठी मोठं आव्हानच होते. महिलेच्या पाठीतील गोळी काढतानाच बाळालाही जन्म देण्याचे आव्हान होते, असे डॉक्टरांनी सांगितले. शेवटी ही आव्हानात्मक शस्त्रक्रिया सैन्याच्या डॉक्टरांनी यशस्वीरित्या पार पाडली आणि महिलेने एका गोंडस चिमुकलीला जन्म दिला. सध्या दोघांची प्रकृती स्थिर आहे.