Home > मॅक्स वूमन > 'हे' वादळ आपणंच थांबवायला हवं

'हे' वादळ आपणंच थांबवायला हवं

हे वादळ आपणंच थांबवायला हवं
X

असे व्हिडीयो अथवा घटना समोर आल्या की हे काहीतरी विचीत्रच आहे. आपला अश्या घटनांशी संबंधच नाही अशा थाटात आपण जरी वावरत असलो तरी या घटना आपल्या दाराशी येऊन धडकलेल्या आहेत. हे वास्तव स्विकारले तरच काही उपाय योजनाची शक्यता संभवते. खरं तर मुळात धक्का कुठल्या कारणांने बसतो यावरही खुप गोष्टी अवलंबुन आहेत. अनेकांना हा संस्कृतीचा मुद्दा वाटतो तर, काही पोरी अतिशहाण्या झाल्यात, ही पिढीच बेजबाबदार आहे असे शिक्के मारायला मागे पुढे पाहीले जात नाही. ज्या पालकांची मुलं वयात येत असलेल्या टप्प्यावर असतात त्यांचा तर काळजाचा ठोकाच चुकतो. या वातारणात आपली मुलं वाढतायत याची काळजी त्यांना नक्कीच वाटणं स्वाभाविक आहे. या सगळ्या मतांचा आदर जरी आपण सर्व करत असलो तरी संस्कृती आणि जबाबदारी या ओझ्यांना जरा दूर सारलं तर या मुलांकडे आपल्याला माणुस म्हणून बघता येईल.

"जे झाकुन ठेवायचे तेच ही पोर सार्वजनिक करत आहेत" हा आक्षेप लक्षात घेतला, तरी डोकं शांत ठेवुन विचार केला की, आपल्या लक्षात येते. पौगंडावस्थेत येताना होणारे शारारिक बदल आणि विरुद्धलिंगी व्यक्तीचं आकर्षण हे अत्यंत स्वाभाविक आहे. मात्र नेमकी लैंगिक अवयवांबद्दल पाळली जाणारी कमालीची गुप्तता आणि शांतता ही अनेक विकृतींना आमंत्रण देते. त्यातच ईंटरनेट, सोशल मिडीया यांनी माहितीचा खजिना उघडा केला असला तरी यातुन पाझरणाऱ्या विकृतीही कमी नाहीत. स्मार्टफोन मुलांच्या हाती पडले की, यातील कुठल्या विकृतीला आपली मुलं बळी ठरतील हे सांगताच येत नाही.

या व्हिडीयोत त्या मुलांची आणि मुलींची जी सहजता आहे, ती पाहीली की जाणवते लैंगिक अवयवांच्या आकर्षणाबरोबर असं काही करणं म्हणजे खुपच मोठा पराक्रम आहे ही भावना आहे. ही भावना कशी तयार होते? या प्रश्नाचे उत्तर शोधले, तर याला जबाबदार पालक आणी पालकांनी तयार केलेला हा समाज आहे हे जाणवते. लैंगिकतेविषयी पाळली जाणारी कमालीची शांतता याला नक्कीच जबाबदार आहे. मुलं लहान असताना योनी, शिश्न, स्तन याबद्ल अगदी सहजतेनं प्रश्न करतात आणि आपण त्या प्रश्नांना अगदी मारुनच पाडतो. याविषयी बोलायचं नाही अासा संदेश जेव्हा जातो तेव्हाच आपण अनेक प्रश्न तयार करत असतो. मात्र, या प्रश्नांची उत्तरं मुलं बाहेर शोधायचा प्रयत्न करतात. आणि तेही लपुन छपुन. मग याला कधी संस्कृतीचं लेबल लावण्याचा प्रयत्न होतो तर कधी हे प्रश्न विचारणारे मुल वाईटच ठरतात.

लैंगिक शिक्षण म्हणजे अजुन काय आहे ते केवळ शाळेत देणे शक्य नाही. मुलं लहान असतांनाच या लैंगिक शिक्षणाची सुरवात व्हायला हवी मात्र असे होत नाही. लैंगिक शिक्षणाच्या नावावर केवळ लैंगिक अवयवांची माहिती मुलांना पुरवली जाते. तिही काही ठरावीक शाळांतुनच. मात्र, या विषयी असलेली आहार, सामाजिक भान, जबाबदारीची जाणिव आणि मुख्य म्हणजे प्रश्न विचारण्याच्या स्वातंत्र्याचे काय? हे प्रश्न जो प्रयत्न अनुत्तरीत राहतील तो पर्यंत या अशा घटना होत राहतील. कधी कोणाचा बळी जाईल तर कोणाचे शोषण होईल. आपण मात्र शोषणरुपी फांद्याच छाटणायातच व्यस्त राहू. मुळापर्यंत पोहोचायचे की फांद्या मोडायच्यात हे पालक, शिक्षक आणि समाजाचा भाग म्हणून आपल्यालाच ठरवायचे आहे. केवळ या मुलांना दोष देणं निरर्थक आहे.

Updated : 7 July 2017 11:06 AM GMT
Next Story
Share it
Top