Home > मॅक्स ब्लॉग्ज > स्त्री आणि माध्यमं

स्त्री आणि माध्यमं

स्त्री आणि माध्यमं
X

अमेरिकेमध्ये मानवी हक्कांच्या लढ्यासाठी प्रसिद्ध असलेल्या माल्कम एक्सचं एक वाक्य प्रसिद्ध आहे. त्यानं म्हटलं होतं की, “माध्यमं ही संपूर्ण पृथ्वीवरची एक शक्तीशाली गोष्ट आहे. माध्यमांमध्ये एवढी ताकद आहे की निरपराध माणसाला ते गुन्हेगार ठरवू शकतात आणि गुन्हेगाराला निरपराध. कारण ही माध्यमं लोकांच्या मनावर ताबा मिळवतात.”

माल्कम एक्सच्या म्हणण्याप्रमाणे माध्यमांचा लोकांच्या मनावर असणारा प्रचंड प्रभाव हा मान्य करावाच लागेल. टीव्ही, रेडिओ, सोशल मिडीया, वृत्तपत्र, इंटरनेट, वेबसाइट, चित्रपट अशी माध्यमांची विविध रूपं माणासाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाली आहेत. माध्यमांशिवाय जगणारा माणूस क्वचितच असेल. माध्यमांचा वापर हा माणसाला काही नवीन नाही. आधुनिक जगामध्ये फक्त त्याचं स्वरुप बदलतं. समाज जसा असतो त्याचं प्रतिबिंब या माध्यमांमध्ये पहायला मिळतं. पण त्याचबरोबर मूठभर सत्ताधाऱ्यांना समाज कसा बनवायचा आहे तेही याच माध्यमांमधून बिंबवलं जातं. सातत्याने एखादी गोष्ट माध्यमांमधून दाखवत राहिलं की लोकांना ती खरी वाटायला लागते.

भारतातल्या नॅशनल कौन्सिल ऑफ अप्लाइड इकॉनॉमिक रिसर्चने २००९ मध्ये एक सर्वेक्षण केलं होतं. त्यानुसार, देशातले शिक्षत तरुण रोज ९८ मिनिटं टीव्ही पाहतात, ६१ मिनिटं रेडिओ ऐेकतात, ७० मिनिटं इंटरनेट सर्फिंगवर खर्च करतात, ४४ मिनिटं मॅगेझीन चाळतात तर ३२मिनिटं वर्तमानपत्र वाचण्यावर वाचतात. याचाच अर्थ तरुणांचे दिवसभरातले किमान पाच तास तरी विविध माध्यमांवर खर्च होतात.

ब्रॉडकास्टींग ऑॉडियन्स रिसर्च अॅन्ड कौन्सिलचे चीफ एक्सिक्युटीव्ह ऑॉफिसर पार्थो दासगुप्ता यांची गेल्या वर्षी काही वृत्तपत्रांमध्ये मुलाखत आली होती. त्यांच्या म्हणण्यानुसार भारतातमध्ये सर्वसाधारणपणे रोज सव्वातीन तास टिव्ही बघितला जातो. या आकडेवारीवरून हेच स्पष्ट होतं की आपल्या रोजच्या जगण्यातून माध्यमं वेगळी काढली जाऊ शकत नाहीत.

त्यातही माध्यमांमधली स्त्रिची प्रतिमा ही कायम वादातीत राहिली आहे. एकीकडे भारतीय संस्कृती जपणारी, कुटुंबाची काळजी घेणारी, प्रत्येकाला आधार देणारी आणि प्रसंगी दुर्गा होणारी अशी स्त्री दाखवली जाते तर दुसरीकडे त्याच स्त्रिच्या देहाचे उत्तान प्रदर्शन सौंदर्याच्या नावाखाली केलं जातं. माध्यमांचा एवढा पगडा आपल्या मनावर इतका जबरदस्त आहे की या दोन टोकाच्या भूमिकांमध्ये आपली भारतीय स्त्री अडकली आहे. या सगळ्याचा परिणाम तिच्या वैयक्तिक आणि सामाजिक आयुष्यावर होत असतो. या खोट्या स्त्रीप्रतिमेला भेदून बाहेर पडलेलीच स्त्री आयुष्यामध्ये काही करू शकते. पण हा लढा तेवढा सोपा नसतो आणि असे संघर्ष माध्यमं कधीच दाखवत नाहीत.

२०११ मध्ये अमेरिकन अभिनेत्री, दिग्दर्शक जेनिफर सिबेल न्यूसोम हिची ‘मिस रिप्रेझेंटेशन’ नावाची एक डॉक्युमेंटरी आली होती. अमेरिकेतल्या माध्यमांमध्ये महिलांना कशा पद्धतीने दाखवलं जातं, त्यांचं शरीर म्हणजे केवळ एक उपभोग्य वस्तू असल्याचं भासवलं जातं, अगदी उच्च पदावर असणाऱ्या महिलांच्या कामापेक्षा त्यांच्या दिसण्यावर, कपडे घालण्यावर आणि मेकअपवर चर्चा अधिक केली जाते, असं या डॉक्युमेंटरीमध्ये दाखवलं आहे. साधारण १८ ते ३४ वयोगटातल्या मुलांना-पुरुषांना आणि मोठ्या प्रमाणात स्त्री वर्गाला विविध उत्पादनांकडे आकर्षित करण्यासाठी अमेरिका या माध्यमांचा कसा वापर करते असंही डॉक्युमेंटरी दाखवते.

भारतामध्येही परिस्थिती यापेक्षा वेगळी नाही. प्रत्येक माध्यमांचा स्वतंत्रपणे विचार केला तरी स्त्रियांचं केलं जाणारं चित्रण आक्षेपार्हच वाटतं. चाकोरी सोडून स्त्रिचं वेगळं अस्तित्व मान्य करण्याचं धाडस माध्यमं फारच कमी करतात. कारण त्यात बहुसंख्य माध्यमांचा फायदा नसतो. पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये स्त्रियांच्या दुय्यम स्थानाबद्दल अनेकदा बोललं जातं, लिहिलं जातं. अगदी या विषयावर चित्रपटही आले आहेत. पण त्यांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्याइतकी असेल. जे सातत्याने लोकांच्या मनात बिंबवलं जातं ते स्त्रियांबद्दल गैरसमज पसरवणारं, त्यांची चुकीची प्रतिमा दाखवणारंच असतं. त्याचा परिणाम स्त्री मनावर एवढा खोलवर होतो की त्या चुकीच्या प्रतिमेत बसण्याची धडपड काही बायका आयुष्यभर करत राहतात आणि स्वतःचं खरं अस्तित्व हरवून बसतात.

९० च्या दशकामध्ये टीव्हीची लोकप्रियता वाढल्यावर आणि भरमसाठ चॅनेल सुरू झाल्यावर कौटुंबिक मालिकांची एक लाटच आली. ती अजूनही कायम आहे. त्या सगळ्याची एक थीम कायम असते की, एक स्त्री अत्यंत सज्जन, गुणी, सुस्वभावी आणि तिला त्रास देणारी दुसरी बाई कारस्थानी, कपटी, दुष्ट अशी. या थीमभोवती मग घरातली भांडणं, रुसवे फुगवे, लग्नं-कार्य अशा गोष्टी येत रहातात. या सगळ्यामध्ये बायकांचा भर हा चांगलं दिसणं त्यासाठी खूपसारा मेकअप करणं, भरजरी साड्या नेसणं, यावर अधिक असतो. अगदी स्वयंपाक करताना आणि झोपतानाही मेकअप आणि भरजरी साडीशिवाय बायका दिसत नाहीत. तसंच त्या दिवसभर स्वयंपाक करतात, कारस्थानं करतात किंवा अन्याय सहन करतात. एखादी आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र नोकरी करणारी महिला असेल तर तिची चांगली प्रतिमा दाखवण्याऐवजी तिला कारस्थानी दाखवण्यावर भर असतो. महिलांची सहनशक्ती हाच अर्ध्याहून अधिक मालिकांचा विषय असतो. नवरा दारू पिणारा, मारझोड करणारा, दुस-या बाईशी संबंध ठेवणारा, काम-धंदा न करणारा, गुन्हेगार असा कसाही असला तरी चालेल. बाईने हे सहन करायचं आणि त्या नवऱ्याच्या मागे उभं राहायचं. मग ‘सब्र का फल मिठा होता है’ प्रमाणे काही वर्षांनी तो सुधारतो आणि चांगला होतो. केवळ बायको, मुलगी, आई या पलीकडे जाऊन तिला एक माणूस म्हणून दर्जा देण्यामध्ये या मालिका कमी पडतात. या मालिकांना टीआरपी मोठा असला आणि त्यांचा चाहता वर्गही मोठा असला, तरी महिलांची प्रतिमा काही बदलत नाही. खरं आयुष्य जगताना महिलांना करावा लागणारा संघर्ष त्यात जवळजवळ नसतोच. एखादी स्त्रिप्रधान मालिका असलीच तर त्यातही ती बाई पुरुषांचं अनुकरण करत इतरांवर दादागिरी करणं, एककल्ली निर्णय घेऊन ते इतरांवर लादणं, चुका करणाऱ्यांना शिक्षा देणं अशाच गोष्टी करताना दाखवतात. स्त्री म्हणून आपलं वेगळं अस्तित्व तिला दिलचं जात नाही. केवळ कौटुंबिक आणि भावनिक जाळ्यात अडकलेल्या, तोच तोच पणा असणा-या या मालिकांमध्ये क्वचितच मानवी मूल्यांची जपणूक केली जाते. स्त्रियांच्या चित्रिकरणातही दुजाभाव असतो. मध्यमवर्गीय, उच्चमध्यमवर्गीय महिलांच्या भूमिका जास्त दिसतात. गरिब, कष्टकरी महिलांना त्यामध्ये अगदीच कमी स्थान दिलं जातं. आभासी जग सगळ्यांना आवडतं, स्वप्नंही प्रत्येक जण बघतो. पण केवळ अशक्यप्राय असलेल्या गोष्टीच सातत्याने दाखवल्या तर त्याही ख-या वाटयला लागतात. भारतीय टीव्ही मालिकांचं तसं काहीसं आहे. आभासी जगाला खरं भासवण्याचा अटोकाट प्रयत्न केला जातो आणि त्यात भरडली मात्र बाई जाते. थोडक्यात काय तर यातून एकच संदेश मिळतो की प्रत्येक बाईने घराच्या चौकटीत रहावं, नव-याचं, वडिलधाऱ्याचं ऐेकावं आणि आपली बुद्धी मात्र वापरू नये. तिला खायला-प्यायला मिळेल, उत्तम दागिने-कपडे मिळतील. पण तिने स्वतःचं अस्तित्व शोधायच्या भानगडीत पडू नये.

दुस-या बाजूला टीव्ही मालिकांच्या खालोखाल जाहिराती दाखवल्या जातात आणि त्याही तितक्याच लोकप्रिय होतात. पण त्यात दाखवली जाणारी स्त्रिची प्रतिमा मला आणखी भयानक वाटते. एका जाहिरातीत घरातली आई सकाळी प्रत्येकाच्या आवडीचा चार ते पाच प्रकारचा नाश्ता बनवून देताना दाखवली आहे त्यासाठी तिला सहा हात दाखवले आहेत. प्रत्यक्षात प्रत्येकाच्या आवडीचे पदार्थ रोज बनवत राहिले तर ती आई स्वयंपाक घराच्या कधी बाहेर पडूच शकत नाही. कपड्यांच्या पावडरच्या बहुसंख्य जाहिरातींमध्ये महिला हाताने घासून घासून कपडे धुताना दाखवतात जेव्हा आज बहुतेक मध्यमवर्गीय घरांमध्ये मशीन असतं. औषधांच्या अनेक जाहिरातींमध्ये कितीही डोकं दुखलं, अंग दुखलं तब्येक बिघडली तरी केवळ एक औषधाची गोळी घेऊन ती बाई एकदम ठणठणीत होते आणि लगेच घरच्या कामाला लागते. नोकरी करणारी एखादी स्त्री असली तरी ती गृहकृत्यदक्ष असायला हवी हे जाहिराती वारंवार समाजाच्या मनावर बिंबवतात. घर, नोकरी, मूलं, सासू-सासरे, नवरा यांच्या प्रत्येकाच्या गरजा पूर्ण करणारी ‘सुपर वुमन’ या जाहिरातींमधून दाखवतात. प्रत्यक्षात सुपर वुमन नसतात त्या केवळ एक माणूस असतात. पण या जाहिरातींच्या प्रभावाखाली आलेल्या प्रत्येकाला आपली आई, बायको, मुलगी अशीच असावी असं वाटतं. कुटुंबाच्या प्रेमापोटी त्या त्याग करतात, मेहनत करतात, आवड म्हणूनही अनेक गोष्टी करतात. पण त्यांच्यावर अमानवी अपेक्षा लादणं अत्यंत चुकीचं आहे. कारण त्या अपेक्षा पूर्ण न झाल्याने अनेक महिलांना आलेलं नैराश्य हे भयंकर असतं.

जाहिरातींमध्ये आणखी एक मोठा भाग हा सौंदर्यप्रसाधनांचा असतो. गोरं दिसणारी, दाट-मऊ आणि काळे केस असणारी, बारीक बांधा असणारीच मुलगी सौंदर्यवान समजली जाते. गोरा रंग मिळवण्यासाठी फेअरनेस क्रीम्स, जाडी कमी करण्यासाठी कसली कसली औषधं-गोळ्या आणि डाएट, केस लांबसडक मऊ दिसण्यासाठी वेगवेगळे शॅम्पू या गोष्टी स्त्रियांच्या जीवनाचा अविभाज्य भाग झाल्या आहेत. वाढत्या वयानुसार शरिरात, चेहऱ्यात होणारे बदल स्वीकारण्याऐेवजी जाहिराती बघून प्रत्येक बाईने तरुणच राहिलं पाहिजे अशी सातत्याने अपेक्षा केली जाते. या सौंदर्याच्या ओझ्याखाली ती एवढी दबून गेली आहे की जाहिरातीतल्या मॉडेलप्रमाणे दिसण्यासाठी ती जीवाचा आटापिटा करते. सध्या विशिष्ट दिसण्यासाठी कॉस्मॅटिक सर्जरीचा धंदा जोरात सुरू आहे. भारतामध्ये कॉस्मेटिक सर्जरी करून घेणारे मोकळंपणाने बोलत नसले तरी पाश्चिमात्य जगामध्ये मात्र मॉडेल्स, अभिनेत्री याबद्दल बिनधास्तपणे बोलून टाकतात. कदाचित तोही त्यांच्या व्यवसायाची लोकप्रियता वाढवण्याचा भाग असेल. पण एका टप्प्यावर येऊन काहीजणी हे नक्कीच मान्य करतात की, त्या सौंदर्याच्या खोट्या व्याख्याने प्रभावित झाल्या होत्या.

ब्रिटनमधली सिलेब्रटी मॉडेल आणि पेज ३ वर सातत्याने टॉप राहणारी कॅटी पेरीने २००४ मध्ये आत्मचरित्र लिहिलं. ‘बीइंग जॉर्डन’ असं त्या पुस्तकाचं नाव आहे. जॉर्डन हे तिचं अर्थात टोपण नाव. त्या पुस्तकात आपले स्तन मोठे करण्यासाठी तिने दोन वेळा केलेल्या सर्जरीचं वर्णन आहे. याचं कारण ती सांगते की आपल्या व्यवसायाची गरज. अमेरिकन टीव्हीवरील आणखी एक लोकप्रिय व्यक्तीमत्व म्हणजे जोन रिव्हर्स. तिनेसुद्धा सौंदर्याच्या व्याख्येत बसण्यासाठी अनेकदा प्लॅस्टिक सर्जरी केली आहे. आता वयाच्या ८० व्या वर्षी मात्र ती आपली चूक खूप हसत खेळत कबूल करते. ती म्हणते की, “मी माझ्यावर एवढ्या प्लॅस्टिक सर्जरी केल्या आहेत की मी मेल्यावर माझा देह टप्पर वेअरला दान करण्यात येईल.”

यातील गंमतीचा भाग सोडून द्या पण, या खोट्या सौंदर्याच्या मापात बसण्यासाठी स्त्रियांचा प्रचंड अट्टहास चालतो की अनेकदा त्यांच्या तब्येतीवर त्याचा परिणाम होऊ शकतो. प्रत्येक माणूस हा दुसऱ्यापेक्षा वेगळा असतो. त्याचं दिसणं, बोलणं, वागणं, त्याच्याकडची कौशल्यं ही वेगळीच असतात. जैव विविधता ही नैसर्गिक आहे. पण भांडवलशाही कंपन्यांना आपली उत्पादनं खपवण्यासाठी ही जैवविविधता मान्य करायची नाहीये आणि एकाच प्रकारचा रंग, उंची, जाडी महिलांच्या माथी मारायची आहे. कारण नफा हा एकच उद्देश डोळ्यासमोर ठेवून या कंपन्या भारतीय बाजारपेठेत उतरल्या आहेत. साऊथ आफ्रिकेमध्ये ८०च्या दशकामध्ये मरियम मकेबा म्हणून एक अत्यंत हुशार गायिका होऊन गेली. तिला ‘ममा आफ्रिका’ म्हणूनही ओळखलं जातं. ‘काळे गाणे’ या तिच्या मराठीतून प्रसिद्ध असलेल्या आत्मचरित्रामध्ये सौंदर्याबद्दल तिने खूप वेगळं निरीक्षण नोंदवलं आहे. तिने जेव्हा पहिल्यांदा अमेरिकेमध्ये आपल्या गाण्याचे कार्यक्रम ठेवले तेव्हा ती इतर गोऱ्या गायिका बघून थक्क झाली होती. त्यांचे कपडे, मेकअप, स्टाइल याने मरियम खूप प्रभावित झाली आणि त्यांच्यासारखं दिसण्यासाठी हट्टहास करू लागली. खूप सारा मेकअप करणं, लाल ओठ आणि गुलाबी गाल दिसण्यासाठी मेकअपचे थरच्याथर लावणं हे तिने सातत्याने करून पाहिलं. पण शेवटी तिला लक्षात आलं की गोऱ्या लोकांची सौदर्याची कल्पना वेगळी आहे आणि काळ्या लोकांची वेगळी आहे. बहुतेक सौंदर्यप्रसाधनं ही गोऱ्या लोकांसाठी बनवलेली असतात. त्याचा कितीही वापर केला तरी मूळात काळी त्वचा असणारा माणूस गोरा होऊच शकत नाही. त्यानंतर तिने गोऱ्या गायिकांप्रमाणे सुंदर दिसण्याचा अट्टहास सोडून दिला आणि केवळ आपल्या कलेवर प्रेम केलं. असाच काहीसा अनुभव आफ्रिकन वंशाच्या अमेरिकन लेखक अॅलेक्स हेलीने आपल्या ‘रूट्स’ या प्रचंड गाजलेल्या पुस्तकात दिला आहे. आफ्रिकेतल्या एका मुलाची अमेरिकेमध्ये गुलाम म्हणून विक्री होते अशा आशयाची ही कथा आहे. यामध्ये लेखक सांगतो की, गर्द काळा रंग हाच आफ्रिकन लोक खरं सौंदर्याचं लक्षण मानतात. त्या काळ्या रंगात जराही हलका रंग असेल तर तो सुंदर मानत नाहीत. हे दोन प्रसंग सांगण्याचा उद्देश हाच की जगभरामध्ये भौगोलिक परिस्थितीनुसार सौंदर्य बदलतं. पण अमेरिकन, पाश्चिमात्य सौंदर्याचे निकष परदेशी कंपन्या भारतासारख्या विकसनशील देशांच्या गळी उतरवतात आणि गोरा रंग हेच खरं सौंदर्य असं आपल्याला वाटायला लागतं.

चित्रपटांचीही गत फारशी वेगळी नाही. स्मिता पाटीलचा ‘उंबरठा’, तब्बूचा ‘असित्त्व’, तेलुगू चित्रपट ‘रुद्रम्मादेवी’ अलीकडच्या काळामध्ये कंगना रानौतचा ‘क्वीन’, श्रीदेवीचा ‘इंग्लिश विंग्लिश’, विद्या बालनचा ‘कहानी’ असे महिला प्रमुख भूमिकेत असलेले काही चित्रपट सोडले तर बहुसंख्य चित्रपटात हिरो हाच महत्त्वाचा असतो. अभिनेत्री कायम दुय्यम भूमिकेमध्ये असते. त्यातही हिरोईनला अभिनय आला नाही तरी चालेल तिने सुंदर दिसणं जास्त गरजेचं असतं. त्यातूनच मग ३६-२४-३६ किंवा झिरो फिगर या गोष्टी मॉडेल्स, अभिनेत्री यांच्यावर लादल्या जातात. अनेक अभिनेते अगदी वयाची पन्नाशी ओलांडली तरी हिरो म्हणून चित्रपटात काम करतात. त्यांना चाहतेही डोक्यावर घेतात. पण अभिनेत्री मात्र २५-३० वर्षांचीच असावी लागते. विशेषतः कमर्शिअल चित्रपटांमध्ये लग्नं झाल्यानंतर हिरोईन म्हणून कमबॅक करणाऱ्या अभिनेत्रींची संख्या कमी आहे. त्याला कारणीभूत समाजाची मानसिकता आहे. हिंदी चित्रपटांनी महिलांचं चित्रिकरण करताना इतका विरोधाभास दाखवला आहे की त्याला तोडच नाही. आई ही सर्वश्रेष्ठ आहे. ती कायम कुटुंबासाठी खस्ता खाणारीच असते. प्रसंग आल्यास ही साधी-सोज्वळ बाई कशी दुर्गा बनू शकते असंही दाखवलं जातं. निरुपमा रॉयने केलेल्या अनेक भूमिकांमधून ती अशा प्रकारची आई उभी करते. त्याचवेळी बलात्काराच्या सीनशिवाय किंवा आयटम सॉंगशिवाय चित्रपट चालत नाही अशी मानसिकता बाळगूनही चित्रपट बनवले जातात. विद्या बालनच्या ‘डर्टी पिक्चर’मध्ये सिल्क या दाक्षिणात्य अभिनेत्रीची केलेली भूमिका स्त्रियांबद्दल चित्रपटसृष्टीचा असलेला दृष्टीकोन उलगडून दाखवते. एक स्ट्रगलिंग अभिनेत्री म्हणून काम करताना सिल्कला केवळ उत्तान अंगप्रदर्शनाच्या जोरावर फिल्म इंडस्ट्री डोक्यावर घेते. जेव्हा तिची गरज संपते तेव्हा तिची जागा घ्यायला दुसरी आणखी तरुण नायिका इंडस्ट्रीमध्ये आलेली असते. एकूणच अनेक अभिनेत्रींना अंगप्रदर्शन करायला भाग पाडलं जातं आणि त्याची कॉन्ट्रोवर्सी झाली की चित्रपट बॉक्स ऑॉफिसवर हिट होतो असं समजलं जातं.

आता थोडासा सोशल मिडीयाचा विचार करूया. स्मार्टफोनच्या वापरामुळे सोशल मिडीयाचा वापर प्रचंड वाढला आहे. माहितीची देवाणघेवाण ही केवळ काही सेकंदांवर आली आहे. पण त्याचवेळी सोशल मिडीयाच्या वाढत्या वापरानंतर स्त्रियांचं चित्रण हे अनेकदा खालच्या पातळीवर गेलेलं दिसतं. बायका किती मूर्ख आहेत याचे जोक्स तर सर्रास एकमेकांना फॉरवर्ड केले जातात. विशेषतः राजकारणातल्या महिला, सामाजिक क्षेत्रामध्ये असणाऱ्या महिला यांच्यावर खूपच खालच्या पातळीवर उतरून टीका केली जाते, त्यांचे फोटो मॉर्फ करून फिरवले जातात. पॉर्नोग्राफिक चित्रफीती तर खूप सहज उपलब्ध झाल्याने स्त्रियांचं विकृत चित्रण करण्याचे प्रकार अधिक वाढले आहेत. या सगळ्याच्या मागे केवळ पुरुषप्रधान संस्कृती नाही तर आणखीही काही राजकारण आहे. अमेरिकन लेखिका, पत्रकार नाओमी वुल्फच्या ‘द ब्युटी मिथ’ या पुस्तकाने १९९१ साली जगभर खळबळ माजवून दिली होती. स्त्रियांवर सौंदर्याचे नियम का लादले जातात याची चर्चा तिने पुस्तकात केली आहे. तिच्या मते, १८४० च्या सुमारास झालेल्या भांडवलशाहीच्या उदयानंतर स्त्रियांकडे एक वस्तू म्हणून बघितलं जाऊ लागलं. त्याच सुमारास स्त्रियांचे नग्नं फोटो जाहिरातींमधून छापून यायला सुरुवात झाली. तिच्या मते, जगामध्ये असलेली ३३ बिलियन डॉलर एवढी डाएट इंडस्ट्री, २० बिलियन डॉलर एवढी कॉस्मेटिक इंडस्ट्री, ३०० मिलियन डॉलर एवढी कॉस्मेटिक सर्जरी इंडस्ट्री आणि सात बिलियन डॉलर एवढी पॉर्न इंडस्ट्री स्त्रियांच्या ओंगळवाण्या चित्रणाला कारणीभूत आहे.

पारंपारिक माध्यम म्हणून वर्तमानपत्राचा आणि आधुनिक अशा न्यूज चॅनेलचा विचार केला तरी तिथेही बातम्यांमध्ये महिलांना दुय्यम स्थानच असतं. महिला-महिलांमध्येही त्यांच्या सामाजिक, आर्थिक स्तरावरून भेदभाव केला जातो. बलात्काराची एखादी घटना शहरी भागात घडली तर त्याच्या बातम्या मोठ्या असतात. पण ग्रामीण भागामध्ये अशी घटना घडली तर मात्र तिला बातम्यांमध्ये स्थान मिळेल याची खात्री नसते. खरंतर बलात्कार हा बलात्कार असतो पण परिस्थितीनुसार त्याचं स्वरुप बदलतं. तसंच बलात्कारासारख्या घटनेमधूनही काही माध्यमं आंबट मनोरंजन करण्यावर भर देतात. काही वर्षांपूर्वी एका मुंबईतल्या टॅब्लॉइड वर्तमानपत्राने बलात्काराची बातमी देताना तो कसा झाला याचं सविस्तर वर्णन दिलं होतं. बलात्कारासारखी घटना ही संवेदनशीलपणे हाताळ्याचे नियम असतानाही त्या वर्तमानपत्राने बलातत्कारित महिलेने पोलिसांना दिलेलं स्टेटमेंटच छापलं होतं. त्यावेळी त्या सर्व प्रकारावर टीकेची झोड उठली. पण, परिस्थिती फारशी बदलली नाही. एखादी महिला उच्च पदावर गेली, पायलट झाली, एखाद्या कंपनीमध्ये सीईओ झाली तर त्याची बातमी होते. माध्यमांच्या मते ही स्त्रियांची अचिव्हमेंट आहे. पण ग्रामीण भागातली एखादी अर्धशिक्षित महिला गावची सरपंच झाली तर ती बातमी होत नाही. त्या अर्धशिक्षित महिलेसाठी पुरुषी राजकारणामध्ये सरपंच बनणं ही सोप्पी गोष्ट नसते. याकडे दुर्लक्ष केलं जातं. पेज थ्री प्रकारातल्या बातम्यांमध्ये तर सेलिब्रिटी महिलांच्या खाजगी आयुष्याला अक्षरशः नको तेवढी प्रसिद्धी दिली जाते. मनोरंजनाच्या नावाखाली प्रसिद्ध महिलांच्या खाजगी गोष्टींचं गॉसिप चघळलं जातं. ब्रिटनची सर्वाधिक लोकप्रिय असलेली प्रिन्सेस डायना माध्यमांच्या याच गॉसिपच्या भूकेचा बळी ठरली होती. तिच्या खाजगी जीवनाचे फोटो मिळवण्याच्या नादात एका फोटोग्राफरने तिच्या गाडीचा पाठलाग केला होता आणि त्यातच तिचा अपघात होऊन ती गेली.

पुरुषप्रधान समाजामध्ये असलेलं स्त्रिचं दुय्यम स्थान हे नवीन नाही. त्याचचं प्रतिबिंब माध्यमांमध्ये स्पष्टं दिसतं. ते बदलण्याचे प्रयत्न होतात, लढे होतात. मात्र आजच्या भांडवलशाही जगामध्ये पैशांच्या जोरावर हे स्त्रियांसाठीचे लढे दाबून टाकले जातात. नफा कमावण्याचा लोभ इतका प्रचंड मोठा आहे की स्त्रिकडेसुद्धा एक निर्जीव वस्तू म्हणून पाहिलं जातं. स्त्रियांचा माध्यमांमध्ये वावर वाढायला लागल्यावरही स्त्रिची प्रतिमा पाहिजे तेवढी बदललेली नाही. काही वेळा पुरुषी हस्तक्षेपामुळे किंवा काही वेळा पुरुषी मानसिकता स्वीकारल्यामुळे उच्चपदस्थ महिलाही परिस्थिती फारशी बदलू शकत नाहीत. यासाठी मूळात स्त्रियांना एक माणूस म्हणून स्वीकारायला हवं. त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलालयला हवा. स्त्रियांचा लढा केवळ स्त्रियांनीच नाही तर पुरुषांनाही लढायला हवा. अर्थात ही गोष्ट वाटते तेवढी सोपी नाही. वर्षानुवर्षाची बंधन झुगारून द्यायला ताकद लागते. पण बदल होतात आणि त्यामुळेच माणूस प्रगती करू शकतो.

शेवट करताना प्रसिद्ध अमेरिकन लेखिका, मानवी हक्कांची पुरस्कर्ती आणि वंशाने काळ्या असलेल्या माया अंजलौच्या ‘स्टिल आय राइज’ कविता आठवतेय. ही कविता तिने खरं तर गुलामांच्या संघर्षाविषयी लिहिली होता. मात्र स्त्रियांच्या लढ्यालाही ती तितकीच लागू पडते. त्या कवितेतील दोन कडव्यांचा स्वैर मराठी अनुवाद मी सांगते.

तू कदाचित माझ्या विरोधात कडवट आणि जहरी शब्दांत

इतिहास लिहिशील,

तू माझ्यावर चिखलफेक करशील,

पण तरीही मी धुळीप्रमाणे उफाळून उठेन.

तू मला तुझ्या शब्दांनी घायाळ करशील,

तुझ्या नजरेने जाळशील,

तू तुझ्या द्वेषाने मला कदाचित मारशील,

पण तरीही मी वाऱ्याप्रमाणे पुन्हा उठेन.

- श्रुति गणपत्ये

( श्रुति गणपत्ये यांच्या फेसबूक वॉलवरून )

Updated : 13 Feb 2017 7:49 AM GMT
Next Story
Share it
Top