Home > मॅक्स ब्लॉग्ज > स्त्रीभ्रूण हत्या, डॉक्टर आणि आपण

स्त्रीभ्रूण हत्या, डॉक्टर आणि आपण

स्त्रीभ्रूण हत्या, डॉक्टर आणि आपण
X

आंतरराष्ट्रीय महिला दिन ८ मार्चला नुकताच साजरा झाला आहे. मागण्या, घोषणा करत मोर्चे निघाले, तंत्रज्ञानाच्या सगळ्या वाटा निदान या दिवशी, याच्याशी संबंधित अशा आविष्कारांनी भरून गेल्या. त्यात चेष्टाटवाळकीही होती आणि त्याखेरीज गांभीर्यही होतं. मीही यापैकी कशा कशात सहभागी झाले होते. पण मनात सतत येत की महाराष्ट्रातल्या लोकसंख्येत, स्त्रीपुरुषांच्या गुणोत्तरात, हजारभर पुरुषांच्या संख्येबरोबर स्त्रियांची संख्या सातत्याने ढासळते आहे. त्याचं काय? महिलादिन ज्यांच्यासाठी, त्या महिलांचं महत्व, राज्यकर्त्यांना, डॉक्टरमंडळींना आणि एकूणच समाजाला उमजलं आहे की नाही?

सावित्रीबाई आणि जोतिबा फुल्यांनी मुलींसाठी पहिली शाळा १८४८ साली काढली. त्यांना वाटलं-स्त्रियांना आज माणसासारखं जगता येत नाही, म्हणून त्यांना शिक्षणाची संधी हवी. शिकल्यावर त्या माणसासारखा विचार करून जगू लागतील. म. फुल्यांपासून डॉ. आंबेडकरांपर्यंत अनेकांनी याच ध्यासानं काम केलं. त्यामुळे स्त्रीपुरुष समतेच्या दिशेने काही प्रमाणात वाटचालीला सुरवात झाली खरी. पण गेल्या २०/२५ वर्षात जागतिकीकरणाच्या नव्या धोरणापायी, आधुनिक बाजार केंद्री व्यवस्थेत, स्त्रीचं वस्तूकरण झपाट्याने झालं आहे. त्यातच 'वंशाला दिवा हवा' हा पुरुषसत्ताक व्यवस्थेने स्त्रियांच्या पाटीवर गिरवलेला पारंपरिक धडाही अधिकाधिक ठळक आणि दृढ होऊन पुढे येतो आहे!

आश्र्चर्य म्हणजे, या बाबतीत अनेक पुरुष निर्लज्जपणे प्रश्न विचारतात, पण स्त्रीच जाते ना लिंगनिदान करून घ्यायला. आणि स्त्रीगर्भ असल्यास तो पाडून टाकायला? बरोबर आहे, गर्भ तिच्या पोटात असतो, त्यामुळे तीच जाणार! पुरुष कसे जाणार! पण ती फार खुषीत असते का लिंगनिदान चाचणीच्या वेळी? की तिच्या पोटात गोळा आलेला असतो, स्त्रीगर्भ तर नसेल ना या शंकेपोटी? सासरच्या घरात आपण वंशाचा दिवा लावू शकत नाही, आणि मुलीच जन्माला आल्या तर? यापायी सासरी किती अपमानास्पद आणि असुरक्षित वातावरणात जगावं लागत त्यांना! स्त्रीपुरुषाच्या शरीरसंबंधात, स्त्रीजवळ असणाऱ्या एक्स क्रोमोझोमला, पुरुषाकडून एक्स आणि वाय या दोन क्रोमोझोमपैकी वाय क्रोमोझोमची साथ मिळाली नाही तर मुलगीच जन्माला येते- हे शास्त्रीय सत्य पुरुषाला माहीत नसतं की तो अज्ञान पांघरतो? आणि तोच बोलला नाही, त्यानं मुलगी जन्माला येण्याची जबाबदारी स्वीकारली नाही तर स्त्री काय बिशाद बोलेल? पुरुष आपल्या आईशी याबाबत काही बोलतो? आणि अशा कोंडीत कुठली स्त्री, 'माझ्या शरीरावर माझा अधिकार यापुढे नाही मुलं जन्माला घालणार असं धीटपणे म्हणू शकेल?

ही झाली कौटुंबिक परिस्थिती! पण डॉक्टर मंडळी तर हुशार आणि सुरक्षित असतात ना? त्यांनी आपल्या व्यवसायात, रुग्णाचा जीव वाचवण्याच्या आटोकाट प्रयत्नांची हिपोक्रॅटिसची शपथ घेतलेली असते ना? ते सुद्धा कानावर हात ठेवत, सत्यव्रत असण्याचा देखावा करत बीडचे डॉ. मुंडे किंवा म्हैसाळचे डॉ. खिद्रापुरे यांच्याच पंक्तीत जाऊन बसतात? मी मान्य करते की सगळे डॉक्टर्स इतके माणुसकीहीन आणि पैशाच्या मोहाचे नक्कीच बळी नाहीत.तरीपण खूप मोठ्या संख्येनं, सोनोग्राफी मशीनने फेकलेल्या जाळ्यात या मंडळींचंही एक स्वतंत्र नेटवर्क आहेच आहे यात शंका नाही.

गरोदर स्त्री जेव्हा डॉक्टरकडे जाते आणि ती किंवा तिचे नातेवाईक डॉक्टरांकडून गर्भ मुलाचा की मुलीचा आहे हे समजून घेऊ इच्छितात, तेव्हा ते सांगण्याची डॉक्टरांवर सक्ती नाही! किंबहुना सोनोग्राफीचं तंत्र भारतात किंवा मुख्यतः भारताबाहेर उपयोगात आणलं जातं, ते गर्भ निर्दोष, निर्व्यंग आहे ना हे बघण्यासाठी. लिंगनिदानासाठी त्याच्या गैरवापराचा मुख्य गुन्हा डॉक्टरच करतात! तो गुन्हा करायचा नसेल तर ते निरपराध राहू शकतात. तसंच 'वंशाचा दिवा' या पारंपरिक कल्पनेची कास धरणारा गरोदर स्त्रीचा सासरचा परिवार हाही तेवढाच गुन्हेगार आहे. ही परंपरा तपासून तिला दूर ठेवण्याचं काम करू न शकणारेही स्त्रीभ्रूणहत्येला तेवढेच जबाबदार आहेत. त्यासाठीच स्त्रीभ्रूणहत्येला आळा घालणारा कायदा करण्यात आला. पण कायद्याची अंमलबजावणी करणारी यंत्रणाच पुरेशी सक्षम नाही! त्यामुळेच कधीकधी निरपराध डॉक्टरांचा बळी जातो तर बहुसंख्य वेळा गुन्हेगार डॉक्टर्स सहीसलामत सुटतात आणि अमाप संपत्ती गाठी बांधतात!

एकविसाव्या शतकातही, र. धों. कर्वे यांच्यासारख्या स्त्रीपुरुष संबंधाविषयी क्रांतिकारक विचार मांडणाऱ्या, त्यासाठी 'समाजस्वास्थ्य' सारखं मासिक चालवून, त्याच्या बरोबरीने सल्लाकेंद्र चालवणाऱ्या, समाजसुधारकाला नित्यनेमाने आठवण्याची, वाचण्याची आज गरज आहे. स्त्रीच्या सन्मानाचा आणि स्वातंत्र्याचा त्यांनी गंभीरपणे मांडलेला मुद्दा त्यांच्या हयातीतही समाजाने फारसा स्वीकाराला नाही. त्यांच्या मृत्यूनंतरही, मुळात एकूणच लोकसंख्येचा आणि आता तर स्त्रीभ्रूणहत्येचा प्रश्न एवढा उग्र स्वरूपात देशासमोर उभा आहे. ‘पण कोण लक्षात घेतो?’ र.धों.कर्व्यांचे विचार!

स्त्री ही पुरुषासारखीच एक माणूस आहे एवढंच नव्हे तर संपूर्ण मानवजातीच्या निर्मितीसाठी आणि अस्तित्वासाठी तिची नितांत गरज आहे. तिला गर्भातच मारून टाकून किंवा चुकून ती जन्माला आलीच तर मरतमरत जगणं किंवा अत्याचार, कुपोषण, बाळंतपण यांच्या फेऱ्यात अडकून ती मरून जाणं हे देशाला परवडणारं नाही. जन्मतः स्त्रीगर्भ पुरुषगर्भापेक्षा सबळ असतो हे जीवशास्त्रीय सत्य आहे. तरीसुद्धा, 'वंशाच्या दिव्याचा' वेडा हव्यास, डॉक्टरमंडळींची संपत्तीची अमानुष हाव आणि कायद्यातल्या आणि त्यांच्या आमंलबजावणी यंत्रणेतल्या त्रुटी यांच्या षड्यंत्रात 'स्त्री'चं हे जन्मजात बळ-काळाच्या पडद्याआड चाललं आहे! जिवंत असणाऱ्या स्त्रियांसाठी सबलीकरणाचं धोरण आणि कार्यवाही अनेक पातळ्यांवर सुरु आहे. पण मुळात या स्त्रियांना/ मुलींना जन्मण्याची संधी तर हवी ना?

- विद्या बाळ

Updated : 16 March 2017 6:40 PM GMT
Next Story
Share it
Top