Home > मॅक्स वूमन > सेकंड हनिमून

सेकंड हनिमून

सेकंड हनिमून
X

साधारणतः चाळीशीत येता येता दांपत्ये दोन प्रकारे आपलं सहजीवन पाहतात. एक तर सोबत असूनही दोघेही स्वतः एकाकी राहतात. साथ निभावत राहतात, पण सहजीवनाला मुकतात. जीवनात उणेपण जाणवत राहतं. अथवा ऐन तारुण्यात मी किती भाग्यवान म्हणून मला अशी बायको मिळाली, असा विचार करणारी मंडळी चाळीशीला आली की ही असली बायको आपण कशी निवडली?, याचं आश्चर्य वाटून घेत राहतात. हा फार मोठा पेच आहे, जो बहुतेक पुरुष मंडळींसमोर चाळीशीत येतो. या पेचावर खरंतर एकच कारण आहे आणि ते म्हणजे सतत घडणारा विसंवाद.

चौघुले परिवार म्हणजे एक त्रिकोणी कुटुंब. काका अतिशय हळवे आणि बोलके; तर, काकू शांत आणि कामाशी काम ठेवणाऱ्या. अनेक वर्षं घरातली कामं सांभाळून दोघांनीही नेटानं संसार केलेला. कशात तसं काही कमी नाही. मुलगा शिकून नीट नोकरीलाही नुकताच लागलेला. एके दिवशी भाचीनं आग्रह केला म्हणून काकू तिच्यासोबत घरातली कामं आटोपून पिक्चर बघायला बसल्या. अनेक वर्षांनी त्या असं घरात शांत बसून सलग पिक्चर बघत होत्या, याची त्यांना जरा गंमतच वाटली. भाचीचा आग्रह मोडवत नव्हता म्हणून त्या तयार झाल्या. "मामी आधीच सांगते, भाजी चिरायची, चहा करायचं, असं काही बाही सांगून मधूनच अजिबात उठायचं नाही हं. तुला नक्की आवडेल हा सिनेमा..." असं तिनं बजावूनच ठेवलं होतं. तिचा हट्ट म्हणून काकूंनी पूर्ण सिनेमा पाहिला. सिनेमा होता "तू तिथे मी".

सिनेमा संपला आणि काकूंच्या डोक्यात विचारचक्र सुरु झालं. या सिनेमात आयुष्याच्या उत्तरार्धात घरगुती कारणानं एकमेकांपासून दूर गेलेले नवरा बायको कासावीस होतात. त्यांना एकमेकांचा सहवास हवा असतो. काकुंच्या डोक्यात अनेक विचारांनी थैमान घातलं. आपला नवरा तसा खूप चांगला आहे. काही किरकोळ भांडणं झाली, पण कधी खूप मोठे वाद झाले नाहीत. पण मग आता उतारवयात आपल्याला त्यांचा सहवास हवाहवासा वाटतो का? या प्रश्नानं त्यांच्या मनात खळबळ माजली. खरं तर 'सहवास' म्हणजे काय? आपण एकमेकांना हवेहवेसे वाटतो का खरंच? आपल्या मुलाने आपल्याला ''सोबत चल'', असं सांगितलं तर, दोघेही 'त्या दोघां' इतकं कासावीस होऊ का? उत्तर त्यांचं त्यांना माहिती होतं. आपण फक्त एकमेकांसोबत आहोत. सहवास नव्हताच त्यांचा अनेक वर्षं. स्वत:ला मिळालेल्या उत्तरामुळे त्या सैरभैर झाल्या. असं का झालं? हे त्यांचं त्यांनाच कळेना. आपण घरात असलो तरी एकमेकांशी कामापुरती चार वाक्य सोडली तर फारसं काहीच बोलत नाही. ठरलेली कामं करण्यात दिवस जातो. इतकी वर्षं मग काय करत होतो आपण? आपल्या लक्षात आलं नाही कधी. काय मग एकमेकांवर आमचं प्रेमच नव्हतं का कधी? की कमी होत गेलं. अशा अनेक प्रश्नांचं युद्धच सुरु झालं. अनेक दाम्पत्यांचं होतं, तेच या काका-काकूंचं झालं होतं. मात्र ही गोष्ट त्यांच्या लक्षात आल्यामुळं त्या सैरभैर झाल्या होत्या इतकंच. संसाराच्या रहाटगाडग्याला स्वतःला अजाणतेपणी या काकुंनी जुंपून घेतलं होतं. हा गाडा हाकता हाकता आपल्या जोडीदाराला सोबत करायची राहूनच गेली, हे त्यांच्या लक्षात आलं होतं. वाद नको म्हणून, परिस्थिती आहे, तशी स्वीकारत गेल्या, त्यातून मार्ग काढत राहिल्या. हे करत असताना त्यांनी जोडीदाराच्या मनाजवळ जाण्याचा आणि जोडीदाराला आपल्याजवळ येऊ देण्याचा रस्ताच जणू बंद करून टाकला होता. या सगळ्यांचा परिणाम म्हणजे एकमेकांना केवळ सोबत झाली, साथ नाही.

data-href="https://www.facebook.com/MaxMaharashtra/"

data-width="380"

data-hide-cover="false"

data-show-facepile="false"

data-show-posts="false">

काकुंच्या बाबतीत जे झालं, तेच अनेक दाम्पत्यांच्या बाबतीत होतं. साधारणतः चाळीशीत येता येता दांपत्ये दोन प्रकारे आपलं सहजीवन पाहतात. एक तर सोबत असूनही दोघेही स्वतः एकाकी राहतात. साथ निभावत राहतात, पण सहजीवनाला मुकतात. जीवनात उणेपण जाणवत राहतं. अथवा ऐन तारुण्यात मी किती भाग्यवान म्हणून मला अशी बायको मिळाली, असा विचार करणारी मंडळी चाळीशीला आली की ही असली बायको आपण कशी निवडली?, याचं आश्चर्य वाटून घेत राहतात. हा फार मोठा पेच आहे. जो बहुतेक पुरुष मंडळींसमोर चाळीशीत येतो. या पेचावर खरं तर एकच उत्तर आहे आणि ते म्हणजे सतत घडणारा विसंवाद.

आपल्याकडे लग्नं कशीही होवोत, प्रेमात पडून अथवा रितसर पारंपरिक पद्धतीनं. चाळीशीच्या आसपास आलं की आता रोमँटिक प्रवास आपला नाही, असं अनेक जोडप्यांचं मत होतं. कुटुंबाच्या इतर जबाबदाऱ्या पेलता पेलता दोघंही स्वतःच्या रोमँटिक सहजीवनाकडं अथवा नात्याकडं खरं तर दुर्लक्षच करतात.

चाळीशी हा तसा आयुष्यातील महत्वाचा टप्पा असतो. या वयात तारुण्याची झळाळी जरा कमी होते. रोजच्या जीवनात स्थैर्य आलेलं असतं; मात्र, रोज त्याच त्याच गोष्टींचा उबग आलेला असतो. पती-पत्नीच्या नात्यातील नाविन्याला ओहोटी लागलेली असते. वास्तविक हा काळच नात्यातील रोमान्स शोधण्याचा असतो, मात्र असे न होता आपल्याला केवळ काटेच मिळाले, अशी भावना मनात घट्ट होत जाते. चाळीशीनंतरही नात्यातील रोमांचकता टिकवणे शक्य असते. खरे तर दांपत्य जीवनासाठी ते गरजेचेच असते. प्रेमाचा ओलावा हळूहळू कमी झाल्याने चाळीशीपर्यंत अनेक दांपत्यांचं जीवन निरस बनतं. या सर्वांना कारणीभूत असतो तो पती-पत्नी यांच्यातला विसंवाद. जोडीदार मनासारखा न वागल्याने तयार होतो तो राग, संताप अनेकदा संपूर्ण आयुष्यभर मनात वागवला जातो आणि त्यामुळे हाती येते निराशा आणि निरस आयुष्य. राग कुठपर्यंत ताणायचा, हे देखील दांपत्याला समजले पाहिजे. रुसवा काढताही आला पाहिजे आणि काही काळाने सोडूनही देता आला पाहिजे. असे झाले नाही तर, नात्यातील ओलावा हळूहळू कमी होत जातो. वादविवाद हा वैवाहिक आयुष्याचा एक भाग मानला तरी तो किती टोकाला न्यायचा, हे ज्याचं त्याला ठरवता आलं पाहिजे. वैवाहिक जीवनातील नव्वद टक्के वाद हे अतिशय क्षुल्लक कारणांवरून होत असतात.

सततच्या सहवासानं जोडीदाराचे न आवडणारे दोषच समोर दिसत राहतात. त्याच्याशी जुळवून घेताना मन उद्विग्न होतं आणि मग पुढं त्याचं रुपांतर संतापात होतं. असं असलं तरीही नकारात्मक भावनांचा वेळच्या वेळी निचरा करता येतो. त्यासाठी आवश्यकता असते ती परिपक्वतेची ! नकारात्मक भावना दांपत्याने जाणीवपूर्वक नियंत्रित केल्या पाहिजेत. संवादानं दोन मनं आपोआप जुळली जातात. ती संवादाची कलाही जोपासता आली पाहिजे. पती-पत्नीचे नाते हे केवळ अस्तित्वापुरते मर्यादित राहू नये. ते सहजीवन असावे. तेही चैतन्यमयी. अशा सहवासातून आपापसातील प्रेमच बहरते. आपापसातील मैत्रीचा धागा जर घट्ट पकडून ठेवलेला असेल आणि तो जोपासलेला असेल, तर एकमेकांना समजून घेणे सोपे जाते. आपले म्हणणे कोणी तरी ऐकणारे असावे, आपल्याला समजून घेणारे असावे, अशी भावना स्त्री आणि पुरुष दोघांचीही असते. जर चाळीशीपर्यंत पती-पत्नीमध्ये मैत्रीपूर्ण नाते निर्माण करता आले नसेल, तर ते चाळीशीतही करता येते. पारंपरिक पद्धतीने केलेल्या विवाहात अनेकदा संकोच व प्रेमविवाहात अपेक्षाभंगाचे दुःख यामुळे दाम्पत्यांत वादविवादाला सुरवात होते. त्यामुळे मैत्रीचे बंध निर्माण होऊच शकत नाहीत. त्यात आपल्याकडे जोडीदाराशी मैत्री करावी लागते, हेच मुळी दांपत्याला समजत नाही. त्याचे परिणाम चाळीशीत दिसायला सुरवात होते.

चाळीशीत नात्याला मैत्रीपूर्ण वळण देणे शक्य असते. मनात साचलेले मळभ दूर करून जोडीदाराशी आपलेपणाने वागत, नात्याची जबाबदारी स्वीकारत संवाद साधत हे सहज शक्य करता येते. तडजोडी वृत्तीतूनच पुढे संवादाची शक्यता असते. एकदा का दांपत्यात संवाद सुरू राहिला की तिथे वादविवादाला फारसा थारा राहात नाही. मात्र ही जबाबदारी पती आणि पत्नी दोघांचीही असते. त्यामुळे दोघांनीही जाणीवपूर्वक संवाद साधण्यासाठी, नाते मैत्रीपूर्ण करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.

मात्र अनेकदा हा संवाद सुरु कसा करावा? हे कळतच नाही. चाळीशीपर्यंत येता येता केलेल्या प्रवासात प्रापंचिक अथवा आवश्यक असलेल्या बाबीन वरच चर्चा केली जाते. मात्र जर मोकळे होणे अथवा भावनिक जपणूक झालेली नसेल तर हा संवाद सुरु कसा करायचा हा प्रश्न पडतो? एका खोलीत दांपत्याला बसवलं तर मुले आणि संसार सोडून आपण काहीच बोलू शकत नाही, हे त्यांच्या लक्षात येतं. सर्व जबाबदारी पार पाडताना दोघेही यात स्वतःला हरवून बसलेले असतात. अशा वेळेला सेकंड हनिमून हा रामबाण उपाय आहे. पहिल्यांदा हनिमूनला जाताना जोडप्यात उत्सुकता आणि त्याचबरोबर एकमेकांना समजावून घेण्याची ओढ असते, अगदी लव मॅरेजमध्येही. त्याच व्यक्तीबरोबर दुरऱ्यांदा हनिमून कशासाठी? हे अनेकांना हास्यास्पद वाटते. मात्र जोडप्यांच लग्नानंतरच आयुष्य पाहिलं तर आपल्याला जाणवतं, की माझा जोडीदार असं का वागतोय, हे मला कळतच नाहीये? असं संभ्रमित करणारे व्यक्तव्य करण्यास पुरुषही अपवाद नाहीत. अदृश्य स्वरूपात तयार झालेली भिंत पाडून नव्याने सुरवात करण्यासाठी सेकंड हनिमूनसारखी दुसरी उत्तम कल्पना नाही. या हनिमूनमध्ये शरीरापेक्षाही मनाची ओढ अधिक असेल. केवळ एकमेकांना जाणून घ्यायचे आहे आणि नव्याने पुन्हा सुरवात करायची आहे, इतके दोघांनी पक्के ठरवले, म्हणजे झाले. इतर वेळी एकमेकांशी काय बोलावे, हे न सुचणारी दांपत्ये एकमेकांच्या मागील आयुष्यातील चुका काढत एकमेकांना दोष देत बसतात. अशा वेळी नवीन सुरवात करणे अशक्य असते. दुसऱ्या हनिमूनला मागच्या चुकांचाही आढावा अवश्य घ्यावा, मात्र एकमेकांच्या साथीने.

चाळीशीनंतर लैंगिक आयुष्यात अर्थात सेक्स लाईफमध्ये शारीरिक समस्याही उद्भवण्यास सुरवात होते. या समस्यांचे मूळ जोडीदाराविषयी असलेल्या भावनांमध्येही अनेकदा असते. नात्यात जर संवाद असेल तर समाधान मिळवणं फारसं कठीण जात नाही. सुदृढ लैंगिक सहजीवनामुळे शरीराबरोबरच मनही प्रसन्न राहण्यास मदत मिळते, असे आपले आधुनिक वैद्यकशास्त्र सांगते. मात्र घाई-गडबडीत केलेला सेक्स हा मानसिक समाधान देऊ शकत नाही. रोमान्स टाळून केलेला सेक्स हा कधीही आनंददायी नसतो. त्यामुळे कामकलेला तुच्छ मानण्याची चूक कोणत्याही वयात न करणे, हेच उत्तम. उलट ही कला शिकण्यास व बहरवण्याचा प्रयत्न दोन्ही जोडीदारांनी जाणीवपूर्वक करायला हवा, त्याला वयाच बंधन नाही.

Updated : 6 Sep 2022 6:16 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top