Home > मॅक्स ब्लॉग्ज > समाधान – नक्की कशात आहे ?

समाधान – नक्की कशात आहे ?

समाधान – नक्की कशात आहे ?
X

आज एक 'समाधानी' माणूस भेटला.

नाही, आजकाल "मी समाधानी आहे" असे म्हणणारी माणसे भेटतात कुठे?

त्याचे असे झाले... वेळ संध्याकाळी सातची, पंढरपूर हून कूर्डूवाडीला जाताना शेजारी एक आजोबा बसले होते. वय नक्कीच सत्तरीच्या घरात. बार्शीला निघाले होते.

मीच सुरुवात केली. काय आजोबा बार्शीचे राहणारे का?

"हो"

"मग आज इकडे दर्शनाला का?"

"हो"

"परवा तर झाली एकादशी. गर्दी होती का? झाले का दर्शन?"

"गर्दी तर होती. भरपूर लोक होते. पण, जरा हुशारी केली. एका पोलिसाला 20 रुपये दिले. मग त्याने मध्ये कुठेतरी नेउन सोडले आणि म्हणाला आता बघा तुमचे तुम्ही. ठिकाय. पण त्यामुळे लवकर झाले दर्शन"

(आज काल देवाच्या दारात सुद्धा असे शोर्टकट्स राजरोसपणे मारले जातात )

"हम्म.. मग नेहमी येता का?"

"नाही, तसा वारीला म्हणून कधी येत नाही. असेच मनाला वाटले की टाकतो चक्कर. पण महिन्यातून एकदा तरी फेरी होते."

"बर.."

मग थोङी माझी चौकशी करतात.. तू कशी काय आली..?

"मी इकडे नोकरी करते.. गाव सांगलीकडचे माझे। "

मग एकदा त्यांना सुरक्षित वाटायला लागले की खूप बोलू लागले. माझे एक निरिक्षण आहे. सगळ्याच लोकांना स्वतःबद्दल बोलायला फार आवडते. फ़क्त थोड़ा विश्वास आपण टाकायचा आणि थोडा मिळवायचा!

मग सांगू लागले.

" बार्शीत माझी मुलगी आणि जावई दोघे डॉक्टर आहेत. त्यांचे हॉस्पिटल आहे. दोघेही MD आहेत. माझा थोडासा प्रॉब्लम आहे. मेंदूला रक्तपुरवठा जरा कमी होतो. त्यामुळे मुलांनीच ठरवले की आम्ही बार्शीला राहायचे. म्हणजे तसा मी मूळचा लातूरचा. तिथे कॉन्ट्रेक्टर होतो. बरीच वर्षे धंदा केला. तिथे बंगला होता. एकदा अचानक बेशुद्ध पडलो. मग दुसऱ्या दिवशी सकाळी 'होश' आला (इकडचे लोक साधारण जास्त हिंदी शब्द वापरतात बरं). मग सगळ्यांनी निर्णय घेतला की आता आम्ही बार्शीत राहायचे. मग लातुरची सगळी प्रॉपर्टी विकली आणि इकडे आलो.

तशी आमची जमीन आहे वडीलोपार्जित 40 एकर (हो! इकडे लोकांना साधारण एवढ़्या जमीनी असतात। आमच्या सांगलीकड़े एवढे म्हणजे डोक्यावरुन पाणी ) ती नाही विकली. बागायत नाही. थोडे पाणी एका तळ्यातून उचलून आणले आहे पण पुरत नाही.

दोन गडी आहेत तेच बघतात सगळे. मी जमेल तसे जातो.

"गड़ी मिळाले तुम्हाला?? आमच्याकडे चांगली माणसेच मिळत नाहीत शेतीच्या कामाला.. "

"इथे पण नाहीत मिळत पण त्याना पगार देतो चांगला. शिवाय लाख भर रुपये उचल दिली आहे दोघांना. आणि वरुन काही मदत लागली तर करत असतो. शिवाय त्यातला एक माणूस लहानपणा पासून आमच्याकडे आहे. मग राहिला।

मुले नाहीत बघत शेती. 3 मुले आहेत पण त्यांना त्यांचे त्यांचे business आणि नोकऱ्या आहेत. त्याना इंटरेस्ट नाही. मलाही म्हणतात नका त्रास करून घेऊ. तसे जास्त काही पिकत नाही. वर्षाचे एक चार पाच लाख सुटतात खर्च जाऊन. पण मला गप्प बसवत नाही"

मी पुढे विचारले "काय करतात मुले?"

"थोरला सिविल इंजीनियर आहे। तो आणि त्याची बायको दोघेही सिडकोमध्ये चांगल्या हुद्द्यावर आहेत. माझा कॉन्ट्रेक्टरचा व्यवसाय होता म्हणून त्याला इंजीनियर केला. तर म्हणाला मला नोकरी करायची आहे. मग आधी मुंबईला गेला. तिथून दिल्लीला गेला. पण तो दिल्लीला असल्यामुळे त्याला मुलगी द्यायला कुणी तयार होईना. मग मी गेलो तिकडे आणि समजावला. महाराष्ट्रात कुठे राहायचे ते रहा. तुला वाटल्यास सरकारी नोकरी लावून देतो.. मग आमच्या भागातल्या एका नेत्याला भेटलो 15 लाख रुपये भरले त्याच्या नोकरीसाठी. आणि पुन्हा लग्न झाल्यावर त्याच्या बायकोच्या नोकरीसाठी पुन्हा 10 लाख दिले.

(आजोबांनी हुशारी करून तसे बरेच मार्ग काढले होते म्हणायचे)

तशी माझी मुलगी खूप हुशार होती. ती सगळ्यात मोठी. ती अभ्यासू निघाली म्हणून बाकीची मुले शिकली. तिला पण डॉक्टर केली. डॉक्टर नवरा बघून दिला. आता चांगल चालल आहे त्यांचं हॉस्पिटल. 40 बेडचं आहे. वर्षाला 15 लाखांची उलाढाल आहे त्यांची!

एक मुलगा साताऱ्यात असतो. त्याची पण नोकरी चांगली आहे. आणि एक नाशिकला असतो. हे शेवटचे दोघे जूळे आहेत.

नाशिक च्या मुलाने लवमॅरेज केले.. इंटेरकास्ट.. मला मान्य नव्हते.. पण हे दोघे लग्न करुनच घरात आले. आधी सगळ्यांना माहिती होते. फ़क्त मला सांगितले नाही त्यानी. मी एवढा चिडलेलो. मी खूप विरोध केला. त्याला घरात घ्यायलाच तयार नव्हतो. पण शेवटी मुलीने समजावले. आता लग्न तर झाले आहे. तुम्ही विरोध केला तरी काही होणार नाही. तरी मी त्याच्याशी चारपाच वर्षे बोलत नव्हतो.

पण, पुढे त्याला व्यवसाय काढायाचा होता. नाशिक त्याची सासुरवाड़ी. तर तिकडच्या लोकांनी त्याला तिकडेच ओढून नेला. आता elf oil चा नाशिक आणि धुळे अशा दोन जिल्ह्याचा तो मुख्य डीलर आहे. त्याची बायको पण हुशार् आहे. सगळे काम ऑफिस मध्ये बसून कंप्यूटरवर बघते. आणि हा फिरती वर असतो. 10- 12 लोक कामाला आहेत. ऑफिस आहे.

तर व्यवसाय सुरु करायच्या आधी त्याला भांडवल पाहिजे होते. एक कोट रुपये. मी तर म्हणालो एवढे पैसे कधी आयुष्यात ऐकले नाहीत. एवढे कसे उभे करायचे. तर मुलगी म्हणाली. सगळ्यानी मिळून केले तर होतील. मग तिने 25 दिले. मुम्बैच्याने थोड़े दीले. आणि त्याच्या सासरकड़ची पार्टी पण जबर आहे. सराफ आहेत ते. त्यानी काही दिले. आणि उरलेले सगळे सातारच्या मुलाने दिले. त्याचे ज़रा चांगले चालले आहे. म्हणजे (ज़रा दोन नंबर चा पैसा असतो हे अगदी हळू आवाजात) जुळे भाऊ असल्यामुळे ते नेहमी एक असतात.

चारी पोराना एक एक मुलगा आहे. मुलगी कुणालाच नाही. सगळे म्हणाले एकच बास.

त्यामुळे ते पण आहे. (चारही मुलाना एकाच मुलगा. हे statistically किती प्रोबब्ले आहे? नाही म्हणजे गर्भलिंग निदानची शक्यता असण्याचा संशय मला विनाकारण का यावा? अर्थात तो बिनबुडाचा असण्याची सुद्धा शक्यता होतीच.)

सातारच्या मुलाची बायको पण लेक्चरर होती. पण तिला आम्ही सगळ्यानी नोकरी

सोडायला लावली. सांगितले की बाई आता तुला काय कमी आहे? तरी ती तयार नव्हती. पण पुन्हा आम्ही तयार केली तिला. नोकारीची गराजच नव्हती ना! (काय हो बायका फक्त पैश्यांची गरज म्हणून नोकरी करतात की काय?? ) मुंबईतल्या मुलाच्या मुलाला सांभाळायला बाई ठेवली आहे. तिला 4000 पगार आहे. सगळ्यांची जिथल्या तिथे घरे आहेत, चार चाकी गाड्या आहेत. कशाची कमी नाही "

"आजोबा तुमचे शिक्षण किती?"

मी 70 साली बीए झालो. त्यावेळी शिकणारा घरात मी एकटाच होतो. आणि घरचे चांगले होते. त्यामुळे भरपूर लाड. 125 एकर जमीन होती आमच्या वडिलांची. आम्ही 3 भाऊ. प्रत्येकाला 40 एकर आली. आणि उरलेली आम्ही बहीणीला दिली. बहीणीचे लग्न पण आम्ही त्याकाळी चांगले करून दिले."

मी मधेच. हो तुमच्या भागात हुंड्याची फार पद्धत आहे बुवा!

ते "हो, खूपच!! आम्ही बहिणीला 50 तोळे सोने दिले" (मी तोंडात बोटे)

" तेव्हा लोक म्हणायचे आम्हाला. एवढे देतात का? चांगलं नाही हे वगैरे. पण तिचा नवरा डॉक्टर होता. हैदराबादमध्ये. आणि आमची बहीण कमी शिकलेली, सातवी पास. मग...?? आणि आता तिचे किती चांगले आहे?? !! तिथे मोठे हॉस्पिटल आहे. तिला कुठे जावे लागत नाही. सगळ्या कामाला नोकर आहेत. "

"आता आमची मंडळी आणि मी दोघेच राहतो इथे. तिला पण काही काम लागत नाही। सगळ्या कामाला बायका आहेत। आम्ही अधून मधून तिन्ही मुलांकडे जातो. मी चार दिवसांच्यावर राहत नाही. हिला सांगतो राहायचे असेल तर रहा. हिला नातवंडांचा लळा लागतो. मग ती राहते. मी एकटाच निघून येतो. इथे आलो तरी काही प्रॉब्लेम नसतो. स्वयंपाकाला साफसफाईला बाई आहे.

आमची मंडळी सोलापूरची. ती पण चांगली शिकलेली आहे. खरे म्हणजे तिच्यामुळेच मुले शिकली. हरिपाठ, काकड़ा वगैरे पाठ आहे. रोज म्हणते. पोथ्या वाचत असते. भगवद्गीता न काय काय..."

"तर काय सगळी कड़े समाधान आहे. आता मी जमेल तशी शेती करतो. सगळे फ़ोन वरुन सांगतो. 10 एकर सोयाबीन 10 एकर तूर अणि पाच एकर मूग मग बाकीचे घरी लागेल ते, भुईमूग वगैरे.., सगळ्या मुलाना घरचे सामान जाते. चारचाकी गाडी आहे मुलीची, घेऊन जातो पेट्रोल तेवढे मी टाकतो. काय दोन हजार रुपये खर्च येतो. पण मुलाना घरचे खायला मिळते"

"शेताची कामे असली की मी पहाटे साडेतीनला बाहेर पडायचो. आठला शेतात. दिवसभर कामे बघून संध्याकाळी परत. आता वयाने जमत नाही म्हणा. मग फोनवरुन सांगतो जमेल तसे"

"आता उद्या पेरणी करायची आहे. त्यासाठीच आलो होतो विठोबाला. आमचे वडील वारकरी होते. आता मोठा भाऊ करतो वारी. मला काही कामाने जमले नाही कधी. पण असाच वेळ मिळेल तेव्हा येतो. शक्यतो अमावस्येच्या आधीच्या एकादशीला येतो."

आमच्या फॅमिलीची एक गोष्ट चांगली आहे, सगळे मिळून आहेत. एकत्र जमतात. मोठे निर्णय एकत्र घेतात. एकमेकांना सपोर्ट करतात.

"पण सगळ्यांचे सगळे नीट चालू आहे 'समाधान'आहे"

मी विचार करत होते लाच, भ्रष्टाचार, short cuts, हुंडा अशानी कितीतरी गोष्टीना मुरड घालत सामान्य माणूस राजरोसपणे देवासमोर उभा राहू शकतो आणि मरण समोर दिसत असताना म्हणू शकतो की हो मी समाधानी आहे. म्हणजे समाधान हे यांनी त्यांच्या मुलांच्या सामात्तिक स्थितीत शोधले की अजून कशात. लाच दिल्याची हुंडा दिल्याची खंत नसेल का वाटत यांना? की शेवटी सगळी गोळाबेरीज आनंद अशी येत असेल तर ते समाधानाशी जोडून टाकतात सामान्य लोकं?

Updated : 24 Feb 2017 11:19 AM GMT
Next Story
Share it
Top