Home > मॅक्स ब्लॉग्ज > लोकांना त्यांच्या लायकीनुसार सरकार मिळते

लोकांना त्यांच्या लायकीनुसार सरकार मिळते

लोकांना त्यांच्या लायकीनुसार सरकार मिळते
X

5 राज्यांचे निवडणूक निकाल नुकतेच लागलेत. या सगळ्यात धक्कादायक निकाल जर कुठला असेल तर तो मणिपूरच्या आयर्न लेडीचा झालेला दारुण पराभव...या पराभवामुळे अनेक प्रश्न उपस्थित होतायत. सत्ता, पैसा अर्थात मसल आणि ‘money’ पावरच्या जोरापुढे ‘मनीची’ पॉवर हरली का? आयुष्याची 16 वर्षं तीही ऐन तारुण्यातली...जिने समाजासाठी अन्यायकारक ठरलेल्या एका कायद्याविरोधात लढण्यात घालवली, त्या आयर्न लेडीला तिथल्या लोकांनी का नाकारलं? मागच्या वर्षी उपोषण सोडतानाच इरोम शर्मिला यांनी आता राजकारणाच्या माध्यमातून अफ्स्पा कायद्याविरोधात समाजाच्या भल्यासाठी लढणार असल्याचं सांगितलं होतं. त्यावेळेपासूनच मणिपूरच्या जनतेने इरोम शर्मिला यांच्याकडे पाठ फिरवली होती. उपोषण करण्यासाठी जसं इरोम शर्मिला यांना कुणी सांगितलं नव्हतं किंवा त्या निर्णयाला तेव्हा कुणी आक्षेपही घेतला नव्हता. उलट आयर्न लेडी असा किताब तिला दिला होता. मग, तसाच जेव्हा राजकारणाच्या मार्गाने आपला लढा लढण्याचा निर्धार इरोम यांनी व्यक्त केला तेव्हा समाजाने, लोकांनी का नाकं मुरडली? लोकांनी लोकांसाठी चालवलेली व्यवस्था म्हणजे लोकशाही पद्धती...मग, याच लोकशाही मार्गाने निवडून येऊन इरोम यांना जनतेसाठी काम करायचं होतं, तर त्यात वाईट असं काय होतं? गायत्री प्रजापतीसारखे बलात्कारी, घोटाळे केलेले, भ्रष्टाचाराच्या मार्गाने पैसा जमवलेल्या लोकांना समाज लोकप्रतिनिधी म्हणून निवडून देतो, तर मग, इरोम शर्मिला यांच्यासारख्या स्वच्छ चारित्र्याच्या, नेक इराद्याने काम करणा-या व्यक्तीला एक संधी द्यायला काय हरकत होती? इरोम यांना राजकीय व्यवस्थेची जाण नाही, असं जरी गृहित धरून चाललं तरी...निदान चांगलं काहीतरी करून दाखवण्याची इच्छाशक्ती तर होती ना? राजकारण बरबटत चाललंय, चांगले लोकं इथे येत नाहीत, अशी ओरड आपणच करायची...मग, चांगल्या ध्येयाने प्रेरित झालेल्या इरोमसारख्या लोकांना राजकारणात येण्यापासून आपणच का रोखलं? इरोम यांच्या पराभवानंतर चांगली लोकं राजकारणात येण्याचा विचार तरी करतीला का? प्रश्नच आहे! People get the government they deserve…असं म्हणतात...मग, योग्य व्यक्तींना संधीही न देणाऱ्या लोकांना लोकप्रतिनिधीही भ्रष्टाचारी, घोटाळेबहाद्दर मिळाले तर नवल ते काय! इरोम शर्मिला यांचा पराभव झाला...आता त्या पुन्हा राजकारणाकडे वळणारही नाहीत...मात्र, त्यांचा पराभवाने समाज म्हणून आपण काय शिकलो आणि काय मिळवलं, हा विचार करणंही तितकंच गरजेचं आहे.

  • शिरीन सायगावकर

Updated : 16 March 2017 6:40 PM GMT
Next Story
Share it
Top