Home > मॅक्स ब्लॉग्ज > प्राचार्य बाई तुमची शाळा कुठली?

प्राचार्य बाई तुमची शाळा कुठली?

प्राचार्य बाई तुमची शाळा कुठली?
X

मुंबईतील एका कॉलेजनं अजब फतवा काढला आहे. मुलींना पुरूषांसारखे कपडे म्हणजेच जिन्स आणि टी-शर्ट घालण्यास बंदी घालण्यात आलीय. असे कपडे घातल्यानं मुलीचे विचार पुरूषांसारखे होतात, तसंच त्यांच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम होतो असा दावा कॉलेजच्या प्राचार्यांनी केला आहे. महत्त्वाचं म्हणजे या प्राचार्या स्वतः एक महिला आहेत. याविषयावर मत मांडत आहेत पोलीस अधिकारी रश्मी करंदीकर.

यापूर्वी कोणत्याही डॉक्टर किंवा स्त्रीरोग तज्ञांकडून असे काहीही ऐकल्याचे किंवा वाचल्याचे स्मरणात नाही. किंबहुना सर्व मेडीकल कॉलेमध्ये जीन्स टॉप हा सर्वमान्य ड्रेस आहे. आज देशा-विदेशात अनेक ठिकाणी शर्ट ट्राऊसर हा वर्कींग युन्हीफॉर्म समजला जातो. पोलीस, सेनादल, पायलट इतकेच नव्हे अगदी ट्रेन ड्रायव्हर म्हणून काम करताना कामाच्या ठिकाणी या सर्व क्षेत्रातील महिला युनीफॉर्ममध्ये वावरतात. कॉर्पोरेट सेक्टर, एमएनसीमध्ये, अगदी कोर्टात देखील शर्ट व ट्राऊजरमध्ये अतिशय आत्मविश्वासाने काम करताना महिला दिसतात. परदेशात तर हा जगमान्य पेहराव आहे. त्यामुळे कोणत्याही महिलेच्या मनात पुरुषी विचार(?) निर्माण होऊन त्याचा हॉर्मेनमध्ये बदल झाल्याचे दिसले नाही. मध्यंतरी अजून एका एफबी वॉलवर साडी घातल्याने शुभ वलय निर्माण होते. शर्ट पॅन्ट घातल्यामुळे अशुभ वलय तयार होते या आशयाचीही पोस्ट वाचली. हे सर्व असं वाचताना बरोबरच आजच्या कामकाजी महिला/कॉलेजमध्ये जाणाऱ्या युवती या सर्वांचा विचार ही लेखक/तज्ञ मंडळी करतात का? हा विचार मनात येतो. शिवाय प्रत्येक वेळी स्त्रियांनी कोणते कपडे घालावे किंवा घालू नये या करिता हे विचार मांडले जातात. पुरुषांनी काय पेहराव करावा किंवा पुरुषांनी शर्ट पॅन्ट/जीन्स घालू नये असे मी वाचल्याचे स्मरणात नाही. खरे तर कोणी काय पेहराव करावा हे प्रत्येकाने स्वतः ठरवावे. व्यक्ती स्वातंत्र्य आहे. ते प्रत्येक स्त्री व पुरुषाला समान आहे आणि त्याचा आदर केला जावा. पण दुर्देवाने एका उच्च विद्याविभुषीत महिलेकडून हे मत व्यक्त होते की "महिलांनी पुरुषी कपडे घातल्यामुळे त्यांचे विचार पुरुषी बनतात, त्यांचे हॉर्मोन्स बदलून पीसीओएस वलय आणि त्याचा त्यांच्या जनन क्षमतेवर परिणाम होत आहे" तेव्हा खूप खंत वाटते.

शिवाय 'पुरुषी' विचार म्हणजे काय वर्षानुवर्षे आपल्याला हे सांगितले गेलंय की रडणे हा स्त्रियांचा प्रांत आहे. त्याग करण्याती वृत्ती, सर्वांना जेवण दिल्यावर उर्वरित(?) खाणे?शिळे अन्न खाणे, सेवा करणे, स्वतःच्या आजाराकडे दुर्लक्ष करून कुटुंबाची काळजी घेणे, कुटुंब प्रमुखाने (पुरुषाने) जे मत व्यक्त केले आहे, ठरवले आहे त्याप्रमाणे वागणे (आता निवडणूकीच्या टीव्ही शोजमध्ये नवरा ज्याला मत देणार, त्याला मत देणार असे म्हणणा-या बायका देखील पाहिल्या)थोडक्याच त्याग बलिदान अबला, निर्णया करता सर्वस्वी पुरुषावर अवलंबून असणे हे वर्षानुवर्षे स्त्रियांचे वागणे ठरविले गेले. याविरूद्ध वागणे, आत्मविश्वासाने स्वतःचा निर्णय स्वतः घेणे, परिस्थितीला कणखरपणे सामोरे जाणे, न रडता परिस्थितीचा सामना करणे इत्यादी पुरुषांची मक्तेदारी समजली गेली आहे. जर एखादी स्त्री आत्मविश्वासाने स्वतःचे आयुष्यात निर्णय घेत असेल तर त्याला पुरुषी विचार का म्हणायचे? तो एक चांगला विचार आहे. स्त्री असो वा पुरुष दोघांसाठीही चांगला आहे.

जर पुरुषी पेहराव घातल्यामुळे प्रिंसीपल मॅडमच्या मताप्रमाणे स्त्रियांमध्ये पुरुषी विचार म्हणजे कणखरपणा येत असेल तर त्याचे स्वागतच करायला पाहिजे. (व्यत्कीशः माझ्या मते कोणताही पेहराव आणि विचार याचा काही सबंध नाही) या सर्व पेहराव, विचार यांचा संबंध स्त्री जनन क्षमतेशी जोडणे म्हणजे परत स्त्रियांच्या जन्माचे फलित केवळ तिच्या 'प्रजोत्पादन क्षमतेत' शी जोडणे आहे. चूल आणि मूल या पलिकडेही स्त्रीयांचे वेगळे विश्व आहे आणि प्रत्येक क्षेत्रात स्त्रीयांनी ते सिद्ध करून दाखवलंय. क्रांतीसूर्य सावित्री बाई फुलेनी स्त्रियांना शिक्षणाचा मार्ग दाखवण्यासाठी खूप यातना सहन केल्या. त्यांच्या डोळ्यासमोर नक्कीच एका कणखर आणि सक्षम स्त्रीचं स्वप्न असणार. आज दीड शतकानंतर प्रत्येक स्त्रीनं त्याचं स्वप्न खरं करून दाखवणे ही त्यांना खरी आदरांजली ठरेल. वैचारिक दृष्या कणखर आणि सक्षम बनण्याकरिता कोणत्या विशिष्ट पेहरावाची गरज नाही. गरज असेलच तर ती वैचारिक मशागतीची आहे.

Updated : 10 Feb 2017 11:14 AM GMT
Next Story
Share it
Top