हिचं हे.. तर त्याचं ते..!
(प्रामाणिकपणे केलेलं प्रेमही फसतं!)
विश्वामध्ये निसर्गाने जो 'कामभाव' निर्माण केला, त्यातून प्राण्यांमध्ये भिन्नलिंगी आकर्षण तयार होत असते आणि मानवामध्ये त्यातूनच हा शृंगारिक 'प्रेमभाव'ही जन्माला येतो. म्हणून कुठलेही विरुद्धलिंगी शृंगारिक प्रेम हे निष्काम असूच शकत नाही. प्रेमाविषयी काहीही सांगणे आतापर्यंत कवी, लेखक, तत्त्वज्ञानी इत्यादींचे क्षेत्र मानले गेले होते. पण खरं सांगायचं तर, या प्रेमाच्या पण काही गरजा असतात. हे प्रेम व्यक्त करण्याच्या काही भाषाही असतात.
नुकत्याच जन्मलेल्या मैत्रिणीच्या भाच्याला बघायला आम्हा मैत्रिणींचा घोळका हॉस्पिटलवर जाऊन धडकला. त्या लुकलुकत्या डोळ्यांना बघण्यासाठी आम्ही सर्वच उत्सुक होतो. आमचा उत्साह जरा ओसरला आणि हॉस्पिटलमध्ये जेव्हा इकडे तिकडे पाहिलं तेव्हा सगळी रूमच या लहान लहान बाळांची होती, असं वाटावं इतकी त्यांची संख्या होती. या नवीन पाहुण्यांचं स्वागत आणि कौतुक त्या त्या घरातील सर्व जण आपआपल्या परीनं करत होते. त्याच रुममध्ये असलेल्या एका मळकट साडीतल्या बाईवर नजर थांबली. तीही नुकतीच आई झालेली असावी. तिचं बाळ शेजारीच ठेवलेल्या पाळण्यात शांत झोपलेलं होतं. तिच्याजवळ कोणीच नव्हतं. गप्पांच्या ओघात कळलं की तिला तिसरी मुलगीच झाली म्हणून घरचे नाराज आहेत. सासरचे तर नाहीच; पण, माहेरचेही कुणी तिला भेटायला, काळजी घ्यायला आले नव्हते. इतक्यात ते बाळ रडत उठलं, तशी ती माऊली कासावीस झाली. तिला उठता येत नव्हते. शेजारीच उभ्या असलेल्या नर्सने ते मूल पाळण्यातून उचलून तिच्या हातात दिलं. "तुझ्या घरचे अजून कोणीच कसं आलं नाही?” नर्सच्या या प्रश्नावर, आपल्या तान्हुलीची भूक भागवत ती म्हणाली, “येतील हो, वेळ मिळेल तसे.” यावर त्रासिक मुद्रा करत नर्स म्हणाली, “ नवरा तरी प्रेम करतो का तुझ्यावर? का तोही असाच?” या प्रश्नावर गोंधळून ती म्हणाली, “हो करतो तर! मुलगा पाहिजे म्हणून करतो ना.” तिचं हे निरागस उत्तर ऐकून सारेच निःशब्द झाले...
या घटनेला अनेक वर्षं लोटली; मात्र, या वर्षांत हे लक्षात आलं की प्रेमाच्या कन्सेप्टबद्दल एकंदरीतच खूप गोंधळ आहे, सर्वांच्याच मनात. याला सुक्षिशित, उच्चशिक्षितही अपवाद नाहीत. "प्रेम म्हणजे, प्रेम म्हणजे, प्रेम असतं. तुमचं आमचं सेम असतं..." या कवितेच्या ओळी मनाला कितीही छान वाटल्या तरीही प्रेम म्हणजे काय? हे आपण शब्दांत नाही सांगू शकत. ती एक सुंदर भावना आहे, असंच सामान्य माणूस सांगेल. ते खरंही आहे. प्रेम ही एक भावनाच आहे. अनेक कवी या भावनेला शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न करतात; मात्र नेहमीच ते यशस्वी होतात, असे नाही. विश्वामध्ये निसर्गाने जो 'कामभाव' निर्माण केला, त्यातून प्राण्यांमध्ये भिन्नलिंगी आकर्षण तयार होत असते आणि मानवामध्ये त्यातूनच हा शृंगारिक 'प्रेमभाव'ही जन्माला येतो. म्हणून कुठलेही विरुद्धलिंगी शृंगारिक प्रेम हे निष्काम असूच शकत नाही. प्रेमाविषयी काहीही सांगणे आतापर्यंत कवी, लेखक, तत्त्वज्ञानी इत्यादींचे क्षेत्र मानले गेले होते. पण खरं सांगायचं तर, या प्रेमाच्या पण काही गरजा असतात. हे प्रेम व्यक्त करण्याच्या काही भाषाही असतात. आता काय काय शिकायचं, या प्रेमासाठी? असा प्रश्न अनेक पुरुष मंडळींच्या मनात येईल. त्याला पुरुष दोषी नाहीत, अपराधी वाटून घेऊ नका. तुम्ही असेच आहात! पण या स्त्रियांच्या मनात काय चाललंय? हे आम्हाला कधीच का कळत नाही? अशी गोड तक्रार जेव्हा तुम्ही करता ना?
भाषा, व्यक्त हा काय प्रकार आहे? तुमचा गोंधळ उडणं साहजिकच आहे. आपण जेव्हा अप्रतिम, सुंदर, छान असं म्हणतो, तेव्हा आपल्या मनात एकच भावना असते. मात्र ती व्यक्त करण्यासाठी आपण निरनिराळ्या शब्दांचा वापर करतो. तसंच काहीसं आहे या प्रेमाचं. 'प्रेमरोगा'चा उगम हा कामभावनेतून होत असल्याने व उत्तेजित कामभावना ही कुणालाही वेड लावणारी असल्यानेच शृंगारिक प्रेम हा वेडेपणा ठरला आहे. आणि ती निसर्गनिर्मित असल्याने कोणीही यातून मुक्त होत नाही. मात्र प्रेम म्हणजे नक्की काय, यात गफलत होते. पुरुषाला स्त्रीचे रूप, शारीरिक ठेवण यामुळे प्रामुख्याने ओढ निर्माण होते, तर स्त्रीमध्ये पुरुषाच्या शारीरिक गुणांपेक्षा इतर गुणांची भुरळ पडत असते. एखाद्या व्यक्तीची 'मोहिनी' पडण्याची कारणे शोधणे, पुरुषाच्या बाबतीत अवघड नसतात; पण स्त्रीच्या बाबतीत मात्र अनाकलनीय असू शकतात. कारण दोघांच्या मेंदूक्रियेतच निसर्गाने याबद्दल वेगळेपणा आणलेला आहे. स्त्रीची भावुकता तिला 'इंटिमसी'ची, जवळीकतेची ओढ निर्माण करते, आणि मग ज्याच्याकडून इंटिमसी मिळेल, असे तिला जाणवते- ती व्यक्ती तिचे मन काबीज करते. ही इंटिमसी वेगवेगळ्या कारणांनी वाटू शकते, ज्याचे कोणीही अनुमान करू शकत नाही. एवढेच नव्हे; तर, प्रत्येक स्त्रीमध्ये ही कारणे वेगवेगळी असल्याने 'कुठली स्त्री कुठल्या पुरुषाच्या प्रेमात का आणि कशी पडेल' याचं भाकीत करणं प्रत्यक्ष ब्रह्मदेवालाही शक्य होणार नाही. प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ व 'मनोविश्लेषणाचा जनक' डॉ. सिग्मंड फ्रॉईड यांनी प्रांजळपणे कबूल केले की, 'स्त्रीमनाच्या ३० वर्षांच्या माझ्या अभ्यासानंतरही मला एका गोष्टीचा थांगपत्ता लागला नाही की, स्त्रीला नेमके काय पाहिजे असते?' हे खरं असलं तरी सांसारिक दुनियेत ज्या प्रकारच्या प्रेमाची गरज असते, तेच प्रेम जर त्याच भाषेत दिलं, तरच ते जोडीदारापर्यंत पोहचतं. साधारणतः स्त्री पुरुषाच्या या प्रेमाच्या गरजा आणि भाषा या वेगवेगळ्या असतात.
स्त्रीला आस्था/ काळजी/ सुरक्षितता, समजूतदारपणा, आदर, निष्ठा, समर्थन/ खात्री, धीर/ दिलासा; तर पुरुषाला विश्वास, स्वीकार, कृतज्ञता, कौतुक/प्रशंसा, मान्यता आणि प्रोत्साहन यांची गरज भासत असते. याचा अर्थ मात्र असा होत नाही की, फक्त याच गोष्टींची गरज असते. पुरुषांना सुद्धा आस्था/ काळजी/ सुरक्षितता, समजूतदारपणा, आदर, निष्ठा, समर्थन/खात्री, धीर/ दिलासा हवा असतो आणि स्त्रीलाही विश्वास, स्वीकार, कृतज्ञता, कौतुक/ प्रशंसा, मान्यता आणि प्रोत्साहन यांची गरज असते. इतर प्रकारचे 'प्रेम' संपूर्णपणे व कृतज्ञतापूर्वक स्वीकारता येऊन त्याची अनुभूती घेता यावी, यासाठी या गरजांची परिपूर्ती होणं आवश्यक आहे. (जरा जास्तच जड झाल्यासारखं वाटत असेल. पण सगळंच हलकं असू नये. नाही तर वादळात उडून जाण्याची भिती असते. जरा अंतर्मुख होऊन विचार केला की लक्षात येईल, हे किती हलकं आणि सोपं आहे ते!) एकमेकांच्या या प्रेमाच्या भावनिक गरजांचा स्वीकार होण्याआधी स्वतःच्या भावनिक गरजांची परिपूर्ती होणे आवश्यक आहे. (आपलं पोट जर भरलेलं असेल तर, आपण दुसऱ्याच्या भुकेचा विचार करू शकतो असं काहीसं आहे. खरं आहे ना?) या वेगवेगळ्या प्रेमविषयक गरजा परस्परांशी संबंधित असतात. जेव्हा पुरुष तिच्याविषयी काळजी आणि समजूतदारपणा व्यक्त करतो, तेव्हा स्त्री त्याला विश्वास आणि स्वीकार देऊ करते, ज्याची त्याला प्रथम गरज असते. जेव्हा स्त्री विश्वास दर्शवते तेव्हाही नेमकं हेच घडतं. पुरुष आपोआप तिला हवी असलेली सुरक्षितता तिला देऊ लागतो. (आहे की नाही गंमत. पाहा, निसर्गाची किमया!) पुरुषांच्या भावनिक गरजा न समजल्यामुळं ज्याप्रकारे स्त्रिया सहजपणे चुका करतात, तसेच पुरुषही करतात. पुरुषाच्या हे लक्षात येईल की ती दुःखी आहे, असमाधानी आहे. मात्र तो संभ्रमात असतो की नेमकी तिची भावनिक गरज काय आहे? तिला तुमच बोलणं भावनाशून्य का वाटतं? हे पुरूषांनी समजून घेतलं पाहिजे. राग-संताप न दर्शवता जेव्हा तो तिचं बोलणं अगदी आस्थेनं सहानुभूतीनं ऐकून घेतो, तेव्हा ती तिच्यासाठी अमूल्य भेट ठरते. त्यामुळे तिला अधिक सुरक्षित वाटतं. आपलं कुणीतरी ऐकून घेणारं आहे, समजून घेणारं आहे, या भावनेने ती समाधानी होते. मग ती पुरुषाला विश्वास, स्वीकार, कृतज्ञता, प्रशंसा, मान्यता व प्रोत्साहन देण्यात यशस्वी होते. मात्र ती जेव्हा बोलत असते, तेव्हा सर्वात मोठी अडचण म्हणजे दोघेही हे विसरतात की दोघांचीही संवाद साधण्याची पद्धत वेगवेगळी असते. त्यामुळे दोघेही राग, संताप यांच्या आहारी जातात आणि शेवटी आपला जोडीदार आपल्याला समजून घेत नाही, त्याचं/तिचं माझ्यावर प्रेमच नाही, या निष्कर्षाप्रत येऊन थांबतात. पुरुषाच्या भावनिक गरजा पुरवल्या गेल्या तर एकमेकांना मनस्ताप देणारी भांडणं, वादविवाद करीत राहण्याची त्यांची प्रवृती (ज्यासाठी ते स्त्रीवर्गात बदनाम आहेत.) आपोआप कमी होऊन आदरानं, समजुतीनं बोलणं त्याला शक्य होतं. त्यामुळे वादविवाद, मतभिन्नता व वाढत जाणाऱ्या नकारात्मक भावना या सुसंवाद, तडजोड यात सहजपणे विरुन जातात. तसेच एकमेकांना दुखवणारी भांडणंही टाळता येतात. खूप देण्यापेक्षा किंवा करण्यापेक्षा आवश्यक ते दिलं, तर नातं तुटत नाही. किती देतो, यापेक्षा काय देतो, हे महत्वाचं.
बरेचदा आपल्या वाट्याला प्रेम आले नाही, असे समजून अनेक जण हिंसेच्या मार्गावर जातात. हे केवळ प्रेमी युगुलांच्याच बाबती घडते, असे नाही; तर याला अनेक विवाहित जोडपीही अपवाद नाहीत. खरं तर परस्परांच्या प्रेमामुळे दोघांचे प्रेम एकत्र येऊन त्याची शक्ती तयार व्हावी. ज्यातून मानसिक खंबीरता वाढीस लागते. खरं प्रेम अगदी एकतर्फी असलं तरी त्यातून धडपड करण्याची शक्तीच निर्माण झाली पाहिजे. नैराश्य उत्पन्न होता कामा नये. खरं तर त्यावेळी प्रेमभावनेपेक्षाही समजाचा प्रभाव आपल्यावर जास्त असतो. आपल्याला वाटतं त्यापेक्षा जास्त प्रमाणात आपण समाजात इतरांच्या उक्तीने-कृतीने नकळत प्रभावित होत असतो. बऱ्याचदा त्यावरून आपण आपली वागणूक ठरवत असतो. एकच गोष्ट चार जणांनी केली की पाचवाही; आणि दहा जणांनी केली की अकरावाही तीच गोष्ट खरी मानू लागतो. मग ती खरी की खोटी याचा फारसा विचार केला जात नाही. सखोल विचार अशा वेळेस थंडावलेला असतो. 'सेक्स' ही समस्त प्राणीजगतातील 'मूलभूत' भावना असून 'शृंगारिक प्रेम' ही मानवामधील 'विकसित' भावना आहे. अर्थात 'प्रेम' आणि 'सेक्स' या वेगवेगळ्या गोष्टी असल्या, तरी एकमेकांमध्ये गुंफल्या गेल्याने, त्यांच्या संमिश्र भावांमुळे प्रेमात विविध छटा आढळतात. मात्र या सगळ्या तरल भावनांमध्ये हिंसेला कोठेही स्थान नाही.
- प्रियदर्शिनी हिंगे