News Update
Home > मॅक्स वूमन > स्वस्थ समाज

स्वस्थ समाज

स्वस्थ समाज
X

काही तरी गूढ अनैसर्गिक असं काहीतरी स्वरुप या सेक्सला आपण दिलं आहे. सेक्सविषयी खुलेपणाने काहीही बोललं जात नाही अथवा विचारलं जात नाही, तो सभ्यपणा नाही, असा एक गोड समज समाजाने आपल्याला करुन दिला आहे आणि तोच आपण पुढच्या पिढीला देत आहोत. या समजामुळेच अनेक प्रश्न विचारण्याचं त्यांचं स्वातंत्र्यच आपण हिरावून घेतले आहे. त्यातून अनेक गैरसमजांचा जन्म झाला आहे.

नॅशनल क्राईम रेकॉर्डस् ब्युरो आणि मुंबई पोलीस आयुक्तालयातील उपलब्ध आकडेवारीनुसार महाराष्ट्रात महिलांवर झालेल्या अत्याचारांचे प्रमाण धक्कादायक आहे. महिलांवरील अत्याचाराविरोधात काम करणाऱ्या संघटनांकडून अल्पवयीन मुली पुरुषी अत्याचाराच्या बळी ठरत असल्याची खंत वेळोवेळी व्यक्त केली जात असली, तरी त्यावर नियंत्रण आणण्यात पोलीस खात्याला यश आलेले नाही. महाराष्ट्रात अल्पवयीन मुलींवर मोठ्या प्रमाणात अत्याचार होत असल्याची खंत व्यक्त केली जात असतानाच मुंबईतील आकडे तर मती गुंग करणारे आहेत.

अल्पवयीन मुलींचे अज्ञान तसेच काहीशा परिचित व्यक्तीवर त्या टाकत असलेल्या विश्वासामुळे बलात्काराचे प्रमाण वाढत असावे, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. गुन्हे दाखल झाल्यावर शिक्षा होण्याचे प्रमाण महाराष्ट्रात अत्यल्प आहे. महिलांसंबंधीच्या गुन्ह्यांचा तपास शेवटपर्यंत जाण्याचे प्रमाण महाराष्ट्रात चिंताजनक असल्याचे मत नोंदविले गेले आहे.

रोज वर्तमानपत्र उघडलं की, महिला अत्याचाराच्या अनेक बातम्या वाचायला मिळतात. महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या बातम्या थांबण्याचे नाव घेत नाहीत. पण, या बातम्या जर नीट बारकाईने पाहिल्या तर काही गोष्टी आपल्या लक्षात येतात. चार वर्षांपासून ते साठ वर्षांपर्यंतच्या कुठल्याच वयाची स्त्री या अत्याचारातून सुटलेली नाही. गरीब, श्रीमंत, शिक्षित, अडाणी अशा सर्वच प्रकारच्या स्त्रियांना अत्याचाराला सामोरे जावे लागले आहे. सुरवातीला या प्रकारच्या बातम्या कानावर आल्या की राग, संताप,किळस वाटते; मात्र, असे का होते, याचा किती जण विचार करतात? का होत असतील हे बलात्कार? सगळेच पुरूष असे वाईट असतात का? असे नाना प्रश्न मनात घोळायला लागतात. मात्र त्यांची उत्तरं काही सापडत नाहीत.

बलात्कार अथवा इतर काही गुन्हे हे "सेक्स" या विषयाच्या आजूबाजूलाच फिरताना आपल्याला दिसतात. एकतर्फी प्रेमातून हल्ले, संशयामुळे नवरा/बायकोचा खून, मुलीच्या प्रेम प्रकरणावरून खून, मारामारी असे अनेक प्रकारचे गुन्हे या शब्दाभोवती फिरत असतात. आपण गुन्हा करणाऱ्याला अथवा परिस्थितीला दोष देत मोकळे होतो; मात्र, हे असे का घडते? यावर काय उपाय करायला हवेत, याचा विचार करतो का? विषारी झाडाच्या फांद्या आपण छाटायचा केविलवाणा प्रयत्न करत असतो; मात्र या झाडाची मुळे कुठवर गेली आहेत, मुळासह झाड कसे काढून टाकता येईल, याचा विचार करत नाहीत.

"सेक्स ही नैसर्गिक गरज आहे माणसाची!" हे खुलेपणाने मान्य न करण्याची सर्वात मोठी चूक आपण करतो. त्यामुळेच निरनिराळ्या समस्या तयार होतात. काही तरी गूढ अनैसर्गिक असं काहीतरी स्वरुप या सेक्सला आपण दिलं आहे. सेक्सविषयी खुलेपणाने काहीही बोललं जात नाही अथवा विचारलं जात नाही, तो सभ्यपणा नाही, असा एक गोड समज समाजाने आपल्याला करुन दिला आहे आणि तोच आपण पुढच्या पिढीला देत आहोत. या समजामुळेच अनेक प्रश्न विचारण्याचं त्यांचं स्वातंत्र्यच आपण हिरावून घेतले आहे. त्यातून अनेक गैरसमजांचा जन्म झाला आहे. चार वर्षांची मुलगी शारिरीक दृष्टिने संबंधांसाठी अपरिपक्व असते, हे समजण्यासाठी डॉक्टर असण्याची गरज नाही; पण, तरीही अशा मुलीवर बलात्कार होतात. काय शोधत असेल हा बलात्कार करणारा? या प्रश्नाचा पाठपुरावा केला की आपल्या लक्षात येतं की लहान वयातील मुलींबरोबर लैंगिक संबंध ठेवले की लैंगिक शक्ती वाढते, असा खुळचट गैरसमज काही लोकांमध्ये आहे. आणि तो नसला तरी विकृत वासना त्यामागे असतेच. त्याची परिणती पुढे अशा गुन्ह्यात होते.

सर्वसाधारणपणे पुरूष हा एकाच वेळी अनेक स्त्रियांबद्दल लैंगिक आकर्षण वाटण्याच्या निसर्गदत्त प्रवृत्तीत मोडतो. मात्र त्याच्या या आकर्षणाला जर आणखी कशाची जोड मिळाली (उदा. अंधश्रध्दा किंवा भावना चाळवल्या गेल्या) तर मात्र त्यांच्या नैसर्गिक भावना विकृत स्वरुपात समोर येतात. भावना मग मनाबरोबरच बुद्धीचाही ताबा घेतात. विकृत कामे करणाऱ्याला दंड, शिक्षा झालीच पाहिजे; मात्र, आपली नैसर्गिक इच्छा ज्याला मारावी लागते (कुठल्याही कारणाने!) त्या कारणांचे काय? लग़्न ठरवताना याचा विचार होतो का? माणसाच्या मुलभूत गरजांचा विचार होतो का? पालकांनी मुलांना समजावून न घेताच आपली मते लादत मुलांचे विवाह ठरवणे आजच्या काळाला अनुसरुन नक्कीच नाही. मुलांना कुठलेही लैंगिक शिक्षण न देता त्याच्या "त्या" आयुष्याविषयी निर्णय घेणे योग्य नाही. आपल्या मुलामुलींना विवाहासाठी केवळ विवाह मंडपात नेण्याव्यतिरिक्तही त्यांना कसे तयार करावे, याचा पालकांनी निश्चित विचार करायला हवा. (मुलामुलींना केवळ भिन्नलिंगी व्यक्तींची शारीरिक माहितीच नाही तर ते कसा विचार करतात, भावनिक गरजा, समजावून घेण्याची प्रक्रिया इत्यादींविषयी अवश्य माहिती करुन द्यावी. )

'अमिबा' महासागरामध्ये जन्माला आला आणि 'अमिबा'पासूनच लैंगिकता जन्माला आली! म्हणजे सेक्सची प्रक्रिया सुमारे ३.५ अब्ज वर्षांपूर्वीपासूनच या पृथ्वीवर प्राणीजगतात सुरू झाली, असे म्हटले पाहिजे. म्हणजे लिंग-योनी संबंध उत्क्रांती ३० कोटी वर्षांपूर्वीपासून झाली. त्यातील कामानंदाची गोडी दोघांनाही असल्याने सेक्स केवळ प्रजोत्पादनासाठीच नव्हे तर त्यातील कामानंदासाठीही निसर्गात उत्क्रांत झाले. यावरुन सेक्स हा एक शृंगारिक नातेसंबंध झाला आणि मानवात 'लग्नसंस्था' रूपाने त्याचा कळस झाला. म्हणून समाजाचा घटक कुटुंब, कुटुंबाचा घटक पती-पत्नी, दांपत्यच बनले आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. म्हणजे 'सेक्स'च्या पायावर समाज बांधला जात असतो. सुरक्षितता तसेच शारीरिक, भावनिक गरज यातून कुटुंबं जन्माला आली.

लग्नांनंतर निरनिराळे प्रश्न तयार होतात, त्यांच काय? ते अनेक गुन्हेगारीत भरच घालतात, त्याचे काय? (बायकोची हत्या, संशयातून हत्या, पूर्ण कुटुंबाची हत्या करून मग आत्महत्या इ.) जसे अविवाहितांच्या लैंगिक समस्या आहेत तसेच विवाहितांनाही मार्गदर्शनाची गरज आहे. 'जबाबदार लैंगिक वर्तन' तसेच "भावनिक लैंगिक वर्तन' या दोन्ही प्रकारच्या शिक्षणाची गरज आहे. हे शिक्षण आपल्याला केवळ एका पिढीला देऊन चालणार नाही. दोन्ही पिढ्यांना (विवाहित तसेच अविवाहित) याबाबत साक्षर करण्याची गरज आहे.

अनेकदा बस, रिक्षा अशा सार्वजनिक ठिकाणी अथवा गणपती दर्शनासाठी लावलेल्या रांगेत किंवा अशा तथाकथित सार्वजनिक ठिकाणी स्त्रियांची होणारी घुसमट कधी जवळून पाहिली आहे का? जरा विश्वासात घेत स्त्रियांना विचारलं तर अनेक जणींनी अनुभवलेले हे विश्व सारखेच भासेल. अशा सार्वजनिक ठिकाणी उगीचच अंगचटीला येणे, अंगाला अंग घासणे, द्विअर्थी बोलणे, जाणूनबुजून सारखा सारखा स्पर्श करत राहणे, असे अनेक प्रकार घडत असतात. स्त्रिया हे सहन करत असतात; मात्र त्यामुळे प्रचंड प्रमाणात घुसमटही होत असते त्यांची. या उलट पुरुष मात्र या घटनेकडे 'मोठी कामगिरी' या अर्थाने बघतात (सर्वच पुरुष नाही.) आपल्या चार मित्रांमध्ये मोठ्या फुशारक्या मारत ही घटना सांगतात आणि इतर काय मोठा पराक्रम केला आहे, अशा आविर्भावाने त्याच्याकडे पाहतात. ते नुसते प्रभावितच होत नाहीत, तर प्रेरितही होतात. हे अधिक घातक आहे. आपण मोठमोठ्या घटनांचा निषेध करतो- तो झालाच पाहिजे. त्यात काही गैर नाही; मात्र त्याच वेळेस या घटना घडविण्यास जबाबदार असलेल्या जमिनीची आपण अजाणतेपणी का होईना, मशागत तर करत नाही ना? याकडे पाहिलं गेलं पाहिजे. तरच सेक्सची वाटचाल ही सेन्सीबल सेक्सकडे होऊ शकेल. परस्परांविषयी आदर, समान वागणूक आपल्याच वर्तनातून आपण इतरांना शिकवू शकतो. नुसती स्त्री अत्याचाराची आकडेवारी घसरून उपयोगाची नाही. ज्या खांबाचा आधार घेऊन ही आकडेवारी फुगते आहे, ते खांबच जमीनदोस्त करण्याची आपण तयारी केली पाहिजे, तरच आपण स्वस्थ समाजात आनंदाने जगू शकू!

  • प्रियदर्शिनी हिंगे

Updated : 21 April 2017 2:53 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top