Home > मॅक्स वूमन > सुप्त इच्छा !

सुप्त इच्छा !

सुप्त इच्छा !
X

जर योग्य प्रकारे संवाद सुसंवादात रुपांतरीत होत असेल, तर ते जोडपे आपल्या वैवाहिक आयुष्याबरोबरच लैंगिक आयुष्याचाही आस्वाद घेऊ शकते. संवादातून एकमेकांच्या इच्छा समजण्यासाठी मदत होते, त्यातूनच एकमेकांप्रती सर्मपणाची भावना वाढीस लागते. हे सगळं एका रात्रीतून घडणारं नाही. 'जस्ट टू मिनिट्स' असं म्हणत तुमचा जोडीदार तुमच्याशी मनमोकळं बोलणार नाही. त्यासाठी काही जाणीवपूर्वक प्रयत्न करणं गरजेचं असतं.

काही वर्षांपूर्वी 'मुन्नाभाई एमबीबीएस' नावाचा चित्रपट आला होता. त्यात एक पात्र मरणाच्या दारात उभे असते. त्या तरुणाला ते समजताच तो अस्वस्थ होतो. अजून अनेक महत्वाची कामं करायची बाकी आहेत, त्यांची लांबलचक लिस्टच तो सांगतो. भावुक होऊन असंही म्हणतो की, ”मी असा कसा जाऊ शकतो? माझ्या कितीतरी इच्छा अद्याप अपुर्ण आहेत. माझे कितीतरी मित्र बारमधे जातात, दारू पितात, डान्स पाहतात, मलाही इच्छा होते, पण मी मनाला सावरतो. सांगतो स्वतःला समजावून- आताच हे करायला नको." हे सर्व ऐकल्यानंतर त्याचा एक मित्र हसत त्याला विचारतो, "तू खरंच, अजून कुठल्याही मुलीला हातही लावला नाहीस? काय सांगतोस.” त्याच्या या प्रश्नात काहीसा संशय आणि काहीसा अविश्वासही दिसून येतो. या प्रसंगावरुन आपल्या लक्षात येते की, सेक्सच्या बाबतीत प्रत्येकाच्या काही ना काही सुप्त इच्छा असतात. त्यात तरुणही आले. काही त्यांना प्रत्यक्षात आणता येतात, तर काही फक्त इच्छाच राहतात. मात्र या सुप्त इच्छा चारचौघात न बोलण्यासारख्या असतात. मात्र मनाच्या एका कोपऱ्यात त्या असतातच.

अशा अनेक सुप्त इच्छा आपल्या मानत घर करून असतात. लैंगिक जीवनही त्याला अपवाद नाही. मानवी जीवन हा अव्यक्ताकडून अव्यक्ताकडे होणारा एक व्यक्त प्रवास. या प्रवासात काही नाती निर्माण होतात, काही निर्माण केली जातात. मग त्यात गुंतागुंत होत जाते आणि ती सोडवण्यात बराचसा प्रवास होत राहतो. असेच एक महत्त्वाचे नाते मानवाने खास निर्माण केले, ज्याच्यामुळे त्याच्या संस्कृतीची बैठक बसली, ते नाते म्हणजे विवाह. निसर्गत: प्रत्येक प्राणिमात्राला त्याचे जीवन सुखकर व्हावे, म्हणून काही मूलभूत प्रेरणा त्याच्या मेंदूतील गाभाऱ्यात नोंदवल्या गेल्या आहेत, ज्यांना आपण कधीच नाकारू शकत नाही. सेक्स ही त्यातलीच एक मूलभूत प्रेरणा. फारच बलवान. स्वरक्षणाच्या खालोखाल, तहान, भुकेप्रमाणेच मरेपर्यंत पिच्छा न सोडणारी. या प्रेरणेला शिस्तबद्ध करण्यासाठी तसेच ती मानवी संस्कृतीला पोषक व्हावी म्हणून हे विवाहाचे नाते. दोन व्यक्तींमध्ये असे संबंध इतरांना मान्य असून त्यातून निर्माण होणारी प्रजा ही त्यांच्या धर्म आणि अर्थ परंपरेचा वारसा पुढे चालू ठेवण्यास कोणाचाच विरोध असणार नाही, अशा विचारांनी वैवाहिक नात्याची बैठक तयार झाली. हे नाते मानवनिर्मित असल्याने अनेक प्रकारच्या इच्छांना मूर्त रूप देण्याच्या शक्यता तयार होतात. इतर नाती ही जन्मजातच असतात, त्यामुळे त्यात इच्छा असणे वा नसणे, याला फार वाव नसतो. ते वैवाहिक नात्यात नसते. इच्छेला पुरेपर वाव असतो, केवळ इच्छेलाच नाही, तर ती इच्छा वास्तवात आणणेही शक्य असते.

याच इच्छांचा आधार घेत वैवाहिक जीवनाची सुरवात होते; मात्र, काही गैरसमजुती भक्कम केल्याने, जोडीदाराशी मनमोकळा संवाद साधता येत नाही, त्यामुळे मनातल्या इच्छांना सुप्त इच्छेचं स्वरुप हळूहळू प्राप्त होत जातं. या इच्छांमध्ये खास करून सेक्सच्या इच्छांचा समावेश असतो. सेक्सबद्दलच्या सुप्त इच्छा केवळ सेक्सचा अनुभव न घेणाऱ्यांच्याच असतात, असे काही नाही. अशा इच्छा सेक्सचा अनुभव घेत असलेल्यांव्यतिरिक्त अशा सर्वांच्याच असतात. अशा सुप्त इच्छा असण्यात काहीही गैर नाही, परंतु जोपर्यंत या इच्छा सुप्त किंवा लपवलेल्या अवस्थेत असतात, तोपर्यंत सर्व काही ठिक असते. या इच्छा जर उफाळून वर आल्या किंवा वारंवार त्या इच्छांना मुर्त स्वरुप देण्याची इच्छा होऊ लागली तर बलात्कारासारख्या वाईट घटना घडण्याचा दाट संभव असतो.

'कामातुराणाम् न भयं न लज्जा!' हे प्रसिध्द संस्कृत वचन तुम्हाला माहीत असेलच.याचा अर्थ असा की, कामभोगाला अतिउत्सुक वा कामधुंद असलेल्या स्त्री-पुरुषांना, थोडाफार आडोसा शोधून कामक्रीडा करण्यात कोणतेही भय किंवा लाज वाटत नाही. असे प्रणयातुर तरुण तरुणी आपल्याला कित्येक बागेत दिसतात. "काय ही आज कालची ही पिढी!" असं म्हणत आपणच लाजत तेथून निघून जातो. एकमेकांच्या शरीराशी चाळा करणारे तरुण तरूणी पाहिले की नाक मुरडणाऱ्यांपैकी कित्येकांना त्यांचा हेवा वाटतो; मात्र चारचौघांत तो हेवा कधी बोलून दाखवला जात नाही. तो वेगळ्या वाटेने बाहेर पडतो. "आमच्या ह्यांना एकदा मी म्हटलं, बघा ते रिया आणि राजू कसे मस्त हातात हात घालून फिरायला जातात रोज रात्री जेवणानंतर. आपण पण जाऊ या ना कधीतरी असेच! त्या वर आमचे हे, त्या फोनमध्ये डोक खुपसत म्हणाले, 'अगं, जेवणानंतर फिरायला जाणे पचनासाठी चांगले असते, हवं तर तू ही जात जा त्यांच्या बरोबर!' यावर काय बोलणार? कपाळावर हात मारुन घेण्यापलीकडे मी काय करणार?" या दोन मैत्रिणींमधील संवादावरुन आपल्या लक्षात येईल की, एकमेकांच्या हातात हात घालून फिरण्याची या महिलेची मनिषा आहे. त्यात काहीही गैर नाही, यात ती कुठेही प्रणयातुर आहे, असेही दिसत नाही. मात्र ती इच्छा अपूर्णच राहिली.

वरवर पाहता हा काही मोठा प्रश्न किंवा मुद्दा नाही, असं आपल्याला वाटतं. मात्र अशा अनेक इच्छा जर दाबल्या गेल्या, तर त्या सुप्त अवस्थेत जातात, थंड होतात हळूह्ळू. मात्र पोषक वातावरण लाभताच पुन्हा उफाळून येतात. अशा वेळेस काहीतरी वाईट घटना घडण्याचा संभव नाकारता येत नाही. मग ती घटना गंभीर गुन्ह्याचीच असेल, असे नाही. मात्र या दाबलेल्या इच्छांमुळे संसारावर गदा येण्याचाही संभव असतो. असं होईलच, असं नाही; मात्र शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे प्रत्येक पती-पत्नीनं आपल्या जोडीदाराच्या सुप्त इच्छा जाणून घेण्याचा प्रयत्न करायला हवा. या विधानावर कित्येक लोक हसतील. "बायकोला फिरायला नेलं नाही तर, असं काय मोठं संकट कोसळेल? ती काय करणार? जाऊन जाऊन ती कुठे जाईल?" असं कुत्सितपणे म्हणतील. मात्र हेच लोक बायको हवी तशी संसारात व सेक्समध्ये साथ देत नाही, अशी तक्रार करणारे असतात. याचा अर्थ असा अजिबात नाही की, जोडीदाराच्या इच्छा पूर्ण केल्या नाहीत, तर जोडीदार साथ देत नाही. जोडीदाराच्या सर्वच इच्छा पूर्ण करता येतीलच, असंही नसतं. मात्र एकमेकांना त्याची माहिती असायला हवी. तशा इच्छा निदान जोडीदाराकडे मनमोकळेपणाने सांगता आल्या पाहिजेत. त्यामुळे त्या इच्छा पूर्ण होवोत अथवा न होवोत, मात्र त्याची तीव्रता नक्कीच कमी होते. अशा इच्छा बोलून दाखवण्यास व समजून घेण्यास आवश्यक आहे तो मनमोकळा संवाद. हा मनमोकळा संवाद पती पत्नीला वैवाहिक आयुष्यातही उपयोगी ठरतो. वैवाहिक नाते हे मानवनिर्मित असल्याने ते फुलवण्यासाठी, खुलवण्यासाठी काही प्रयत्न नेहमीच करावे लागतात, वयाच्या कुठलाही टप्यावर.

जर योग्य प्रकारे संवाद सुसंवादात रुपांतरीत होत असेल, तर ते जोडपे आपल्या वैवाहिक आयुष्याबरोबरच लैंगिक आयुष्याचाही आस्वाद घेऊ शकते. संवादातून एकमेकांच्या इच्छा समजण्यासाठी मदत होते, त्यातूनच एकमेकांप्रती सर्मपणाची भावना वाढीस लागते. हे सगळं एका रात्रीतून घडणारं नाही. 'जस्ट टू मिनिट्स' असं म्हणत तुमचा जोडीदार तुमच्याशी मनमोकळं बोलणार नाही. त्यासाठी काही जाणीवपूर्वक प्रयत्न करणं गरजेचं असतं. सुसंवादासाठी काही कौशल्येही आत्मसात करावी लागतात. ती कौशल्ये विवाहितांनी शिकून अंगिकारली पाहिजेत. या सर्वांमुळे हळूहळू सुसंवादास सुरवात होते आणि त्यातूनच दृढ होतो तो परस्परांवरील विश्वास, जो मदत करतो, मन स्थिर व तरल ठेवण्यासाठी! जेथे स्थिरता आणि तरलता असते तेथे प्रेमाची आर्द्रता आपोआप तयार होते आणि अशा प्रेमातून होणारा, सेक्सच "सेन्सिबल सेक्स ठरतो." कारण अशावेळी मज्जासंस्थाही पूर्णत्वाने काम करते. चित्ताची प्रसन्नता वाढत जाते, म्हणून परस्परांविषयीच्या प्रेमाने उचंबळून येऊन, एकमेकांत हरवून जाण्याच्या इच्छेने, जो सेक्स घडतो, तोच सुख देणारा असतो आणि फक्त असाच सेक्स तृप्ती देतो. संसार जेव्हा तृप्ती देणारा असतो, तेव्हा सुप्त इच्छांना मूर्त रूप देण्याचा आग्रहच गळून पडतो. उरते ते केवळ प्रेम आणि सुख. अशा प्रेमातून, सुखातून काही वाईट घटना घडण्याची सुतरामही शक्यता नसते

प्रियदर्शिनी हिंगे

Updated : 15 Jun 2017 7:11 PM GMT
Next Story
Share it
Top