Home > मॅक्स वूमन > समाजासाठी मॅक्झिमम योगदान देणाऱ्या नऊ 'मॅक्स वूमन'चा गौरव

समाजासाठी मॅक्झिमम योगदान देणाऱ्या नऊ 'मॅक्स वूमन'चा गौरव

समाजासाठी मॅक्झिमम योगदान देणाऱ्या नऊ मॅक्स वूमनचा गौरव
X

मुंबई: समाज बदलासाठी मॅक्झिमम योगदान देणाऱ्या ९ विविध क्षेत्रातल्या महिलांना आज मॅक्स वूमन पुरस्कारानं गौरवण्यात आलं. मॅक्स महाराष्ट्र आणि राज्य महिला आयोगाद्वारे आयोजित हा सोहळा मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात पार पडला. स्वत: दोन्ही पायांनी अपंग असूनही शेकडो महिलांना पायावर उभ्या करणाऱ्या परभणीच्या आशालता गिरी, दारुबंदीसाठी प्रसंगी जीव धोक्यात घालणाऱ्या बीडच्या सत्यभामा सौंदरमल, बाह्यसौंदर्यापेक्षा स्त्रियांचे आंतरिक वैचारिक सौंदर्य वाढवण्यासाठी ब्युटी पार्लरच्या व्यवसायातून अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीत आलेल्या नंदिनी जाधव, नागपुरातील पहिली महिलांसाठीची बँक स्थापन करणाऱ्या नीलिमा बावणे, बांधकाम व्यवसायाची धुरा पेलताना पोटतिडकीने सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या उज्वला हावरे, पवारांच्या काटेवाडीला चकाचक करणाऱ्या गौरी काटे, स्वत: दृष्टिहीन असताना इतरांची आयुष्य प्रकाशमान करणाऱ्या धुळ्याच्या अरुणा बोळके, वैधव्यावर मात करत इतर विधवा-परित्यक्तांसाठी झटणाऱ्या लातूरच्या भाग्यश्री रणदिवे आणि आयुर्वेदाच्या प्रचार-प्रसारासाठी स्वत:ला वाहून घेतलेल्या ठाण्याच्या डॉ. मेधा मेहंदळे या महिलांना मॅक्स वूमन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.

महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर, वीरमाता आणि लेखिका अनुराधा गोरे आणि मॅक्स महाराष्ट्रचे संस्थापक रवींद्र आंबेकर यांच्या हस्ते या महिलांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. आयोगाच्या सदस्या आशाताई लांडगे, गयाताई कराड आणि सदस्य सचिव डॉ. मंजुषा मोळवणे यावेळी उपस्थित होत्या. महिला आयोगासाठी हा महत्वाचा क्षण असून विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा गौरव तर होतच आहे, सोबत आयोग या महिलांच्या कामाशी यानिमित्तानं घट्टपणे जोडला जात आहे अशी प्रतिक्रिया विजया रहाटकर यांनी यावेळी दिली. बँकिंगच्या माध्यमातून आर्थिक सक्षमीकरण, दारुबंदी, एकल महिलांना मदत, आयुर्वेदाचा प्रसार अशा प्रत्येक कामात आयोग भरीव योगदान देण्यास तयार आहे असे त्यांनी यावेळी सांगितले. या सर्व महिलांचे काम अत्यंत अभिमानास्पद असल्याची भावना अनुराधा गोरे यांनी व्यक्त केली. सैनिकांबाबत बोलताना त्यांनी वीरमाता, वीरपत्नी यांचा यथोचित सन्मान राखला जात नसल्याबद्दल खंत व्यक्त केली. हा पुरस्कार देण्यामागची भूमिका स्पष्ट करताना रवींद्र आंबेकरांनी सांगितले की प्रसिद्धीपासून दूर असलेल्या आणि प्रामाणिकपणे काम करणाऱ्या महिलांचा गौरव करून त्यांच्या कामाची पावती मिळवून देण्यासाठी मॅक्स वूमन पुरस्कार सुरू करण्यात आला आहे. हा पुरस्कार इतर महिलांनाही कामाची प्रेरणा देणारा ठरेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रद्धा बेलसरे आणि जगदीश ओहोळ यांनी केले.

Updated : 7 Oct 2017 2:04 PM GMT
Next Story
Share it
Top