Home > मॅक्स वूमन > शक्ती शृंगाराची!

शक्ती शृंगाराची!

शक्ती शृंगाराची!
X

अनेक वर्षं संसार करूनही कितीतरी जोडप्यांना श्रृंगार म्हणजे काय, हेच माहीत नसते. केवळ समागम म्हणजेच श्रृंगार या प्रकारचं अज्ञान अनेक सुदृढ जोडप्यांतही दिसून येते. चित्रपटात, कवितेत शृंगाराची बरसात अनुभवणं वेगळे आणि प्रत्यक्षात आपल्या जोडीदाराबरोबर श्रृंगार फुलवणं वेगळं. पतीपत्नीने एकमेकांबरोबर निःसंकोच वृत्ती दाखवायची नाही तर कोणासोबत दाखवायची?

दहा वर्षं संसार केल्यानंतर मिताली आणि राजेशमध्ये जरा कुरबुरी सुरू झाल्या. त्या कुरबुरींना दोघांनी फारसं मनावर घेतलं नाही. मिताली सतत कुरकुर करते, म्हणून राजेश सुट्टी बाहेरच घालवायचा. आठवड्याचे इतर वार तर कामातच जायचे, घरी यायच्या- जायच्या वेळा ठरलेल्या नव्हत्या. मिताली घरात मुलाचं आनंदाने करायची. उच्च शिक्षित तरीही मुलांकडे लक्ष राहावं म्हणून चांगल्या पगाराची नोकरी सोडली तिने. हळूहळू मुलगा मोठा होत गेला, तशी ती जरा रिकामी होत गेली, तेव्हा राजेशमागे ती कुरकुर करायची की तो वेळ देत नाही, कुठे घेऊन जात नाही फिरायला, असं काही बाही बोलत असायची. राजेशनं तिचं फार काही मनावर घेतलं नाही. पुढे मितालीही हे विसरून गेली. फार कंटाळा आला की, ती मैत्रिणीकडे जायची. कधी तिथेच राहणं, फिरणं असं होत असे. असं चालू असतानच एक दिवस राजेशने मीतालीकडं घटस्फोटाची मागणी केली. मितालीच्या तर पायाखालची जमीनच सरकली. काय झाले, तिला काहीच कळेना? काय चुकले ते तिला उमगेना. सैरभैर झाली ती. शेवटी तिच्या एका मैत्रीणीने दोघांनाही एका समुपदेशकासमोर आणून बसवलं. या समुपदेशकाशी चर्चा करताना राजेशने सांगितले की मिताली ही सेक्सच्या बाबतीत पहिल्यापासून थंडच होती आणि आता मात्र ती सेक्सला काही ना काही कारण देऊन टाळते. तिच्यासोबत मिळणाऱ्या शय्यासुखावर राजेश फारसा समाधानी नव्हता. हे जेव्हा मितालीला कळले तेव्हा ती बिथरलीच. जे हवं ते, हव्या त्या वेळेला करतो आणि आता म्हणतो की मी सुख दिलं नाही म्हणून. यावर राजेशचं म्हणणं होतं- दिलं, पण काय? त्यातून ती सुखाची अनुभूती आलीच नाही आणि तेच मितालीचंही म्हणणं होतं. सुखाचा अनुभव तिनेही घेतला नाही. त्यांच्या आरोप प्रत्यारोपात समुपदेशकांनी प्रश्न केला, ‘तुमच्यापैकी कोण श्रृंगारिक आहे? कुणाला चांगला श्रृंगार करता येतो?' यावर दोघेही बुचकळ्यात पडले आणि काही तरी विचित्र प्रश्न विचारला गेला आहे, असे भाव त्या दोघांच्याही चेहऱ्यावर आले. काय डॉक्टर थट्टा करता का? अहो, लग्नाला इतकी वर्षं झाली, मुलगाही झाला, तो काय श्रृंगाराशिवाय? यावर समुपदेशक हसत म्हणाले, 'अहो, श्रृंगाराने मुले होत नसतात. आणि श्रृंगारासाठी मुले झाली पाहिजेत, असेही नाही. दोघेही मनमोकळे हसले. आपल्या प्रश्नाचा रोख कळावा, म्हणून समुपदेशकाने काही प्रश्न विचारले, 'मिताली, इतक्या वर्षांच्या सहवासात तू तुझ्या नवऱ्याला झोपेतून कसं उठवलंस?' या प्रश्नाने मिताली गोंधळून गेली आणि कावरी बावरी होत म्हणाली, 'कस्सं म्हणजे? जसे सगळे उठवतात साधारण तसंच हाका मारून...' तेव्हाच समुपदेशकांनी त्यांच्या वैवाहिक जीवनात शृंगाराची कमी आहे, हे ओळखले.

मुळात अनेक वर्षं संसार करूनही कितीतरी जोडप्यांना श्रृंगार म्हणजे काय, हेच माहीत नसते. केवळ समागम म्हणजेच श्रृंगार या प्रकारचं अज्ञान अनेक सुदृढ जोडप्यांतही दिसून येते. चित्रपटात, कवितेत शृंगाराची बरसात अनुभवणं वेगळे आणि प्रत्यक्षात आपल्या जोडीदाराबरोबर श्रृंगार फुलवणं वेगळं. पतीपत्नीने एकमेकांबरोबर निःसंकोच वृत्ती दाखवायची नाही तर कोणासोबत दाखवायची? हे जरी खरे असले तरी या सोबत आत्मीयता, ओढ हवीच असते. खरी ओढ असते, तिथेच एकमेकांसाठी ही भावना असतेच, शृंगाराची ही खरे तर प्राथमिक गरजच असते. श्रृंगार केवळ समागमाच्या वेळी घडायला हवा, असे नाही अथवा त्यातच दिवसभर डुंबावे असेही नाही. मात्र, थोडी कल्पनारम्यता वापरून दिवसभरात पती पत्नीला मिळणाऱ्या किरकोळ एकांताचे क्षण देखील शृंगारिक बनवता येतात. निःसंकोचपणे ओढ व्यक्त करणारे, परस्पर कौतुकाची आस पुरविणारे हे प्रकार रोजच घडले पाहिजेत, असेही नाही.

सेक्स ही फक्त शारीरिक क्रिया नाही; तर तो एक एकत्रित केलेला बंध आहे. शारीरिक, मानसिक आणि भावनिक बंध. सेक्स ही निसर्गाने निर्माण केलेली शृंगारिक पण तरीही एक शक्ती आहे. यात आपण नेहमी शक्तिकडे लक्ष देतो आणि शृंगाराला नकळतपणे विसरतो. सेक्सला लढाईचं स्वरूप देऊन शक्तीला मोठं स्थानच लैंगिक क्रियेत देतो. कितीतरी पुरुष आणि स्त्रिया अशी तक्रार करतात की समागमानंतरही हवं असलेलं सुख वाट्याला येत नाही. लग्नाच्या तीन महिन्यातच बायकोचा माझ्यातला रस संपला आणि त्यामुळे मी नकळत माझ्या मैत्रिणीकडे आकर्षित झालो. या तक्रारीच मूळ वर सांगितल्याप्रमाणे आपल्या चुकीच्या कल्पनांमध्ये आहे. शृंगार ही फक्त तरुणांची मक्तेदारी असल्याचा आणखी एक मोठा गैरसमज आपण करुन घेतला आहे.

आकर्षणासाठी कला, शक्ती व रूप यांचा संगम मादीला पटवण्यासाठी सर्व नर प्राण्यांमध्ये झालेला दिसतो. ही 'पटवण्याची' क्रिया मानवामध्ये जास्त जोमाने आलेली आहे, हे केवळ कॉलेजमधील मुलांकडे बघून आपल्याला जाणवते. मात्र विवाहित पुरुषांना हे प्रणयाराधन, पटवणे म्हणजे बायकोची विनवणी करत राहणे, असे वाटत असते. अशा वेळेला स्त्रिया व काही पुरुषही आपला साथीदार फारच आग्रह करतो म्हणून "काय कटकट आहे," म्हणत, ही कटकट थांबवण्यासाठी एखादे काम उरकून टाकावे, तशी समागमाची क्रिया उरकतात, अशा क्रियांमधून समाधान मिळत नाही. मिळते ते तात्कालिक शारिरीक समाधान. असे प्रसंग वारंवार घडायला लागले तर आपल्या जोडीदारात काहीतरी कमतरता आहे. त्याचे आपल्यावर प्रेमच नाही. आपला जोडीदार आपल्याला समाधान देऊ शकत नाही. असे कितीतरी सांसारिक सुखावर घाला घालणारे गौरसमज तयार होतात. याच गैरसमजातून पुढे आपणच अनेक प्रश्न तयार करतो.

मुळातच आपल्या समाजात ८५ टक्के लग्ने ठरवून झालेली असतात. अशा पती-पत्नींना आपण एकमेकांवर प्रेम करायचे असते, एकमेकांशी मैत्री करायची असते, हे माहीतच नसते. ते त्यांना अशक्यही वाटते. प्रेमविवाह करणाऱ्यांना लग्नानंतरच्या अपेक्षाभंगातून त्यांचे लैला-मजनू प्रेम कधी उडून गेले, हे लक्षातही येत नाही. पण हे प्रेम का उडाले? कसे उडाले? एकमेकांसाठी जीव देऊ म्हणणारे, एकमेकांच्या जीवावर का उठतात? याचा आपण कधी तारतम्याने विचार करत नाही. नवरा लवकर घरी येत नाही, म्हणून त्रागा करणारी बायको आणि घरी गेल्यावर बायको बडबड करते म्हणून उशीरा घरी जाणारे नवरे आपल्याला मोठ्या प्रमाणात आपल्या समाजात पाहायला मिळतील.

श्रृंगार फुलवायला, व्यक्तीला अंगी जरा कलात्मक वृत्तीच जागृत ठेवावी लागते. काही प्रयत्न जाणून बुजून करावे लागतात. त्यासाठी योग्य जागा, वेळ आणि परस्पर भावनांची गुंफणही होणे गरजेचे असते. कुठल्याही प्रकारचे लग्न असले तरी ते यशस्वी करण्यासाठी साहचर्य, प्रेमच महत्त्वाचे असते आणि हे प्रेम निर्माण करता येते. यासाठी आवश्यक असतो संवाद आणि तडजोड वृत्ती. निर्माण झालेले प्रेम टिकवण्यासाठीही जाणीवपूर्वक प्रयत्न व्हायला हवेत. असे प्रयत्न कमी पडत चालल्याचे आपल्याला दिसते आहे. नवरा-बायको, दोघांनीही मनमोकळा शृंगार करणे ही सेक्सची उमज आणि काळाची गरज आहे, हे समजून घ्यायला हवे. एक मात्र खरे, सेक्स आणि प्रणयाराधन या गोष्टी भिन्न होऊच शकत नाहीत. म्हणून शृंगाराचा जन्म झाला आणि त्याची सांगड सेक्सशी घालण्यात आली. अशा रीतीने सेक्स हा एक शृंगारिक नातेसंबंध झाला. साहचर्य प्रेम हे प्रत्येक पती-पत्नी दाम्पत्याला निर्माण करता येते. ते करता यायला हवं. सेक्स ही एक कला आहे, जी शिकावीच लागते, आत्मसात करावी लागते. उत्तेजना टिकवणं हे कौशल्य आहे. मन स्थिर ठेवून ते ह्ळूहळू आत्मसात करावं लागतं. कामुक वासना निर्मिती व्हायला मनाचा निवांतपणा लागतो. तो परस्परांचा निवांतपणा आपण जपतो का? त्यासाठी आपण आवर्जून काही करतो आहोत का? याची उत्तरं शोधायला हवीत.

  • प्रियदर्शिनी हिंगे

Updated : 7 April 2017 2:03 PM IST
Next Story
Share it
Top