Home > मॅक्स वूमन > वेश्यागमन

वेश्यागमन

वेश्यागमन
X

सेक्स ही फक्त शारीरिक क्रिया नाही. तर तो एक एकत्रित केलेला बंध आहे. शारीरिक, मानसिक आणि भावनिक बंध. हा बंध वेश्यागमन केल्याने तयार होईलच, असे नाही. वेश्यागमन म्हणजे केवळ एक शारीरिक क्रियाच आहे. त्यात कुठलाही मानसिक व भावनिक बंध नसतोच. त्यामुळे वेश्येकडे शारीरिक क्रियाच होऊ शकते. मात्र या शारीरिक क्रियेची शरीराला सवय लागून नंतर नंतर कुठलीही भावनिक व मानसिक गुंतवणुक नसल्याने शरीरही नकार देण्यास सुरवात करते.

एक तरुण मुलगा विविध डॉक्टरांकडे जाऊन, निरनिराळे सल्ले व औषधे घेऊन, निराश व हताश मनाने एका सेक्सॉलॉजिस्टकडे गेला. आपली तक्रार सांगत तो निराशेच्या स्वरात म्हणाला, "माझे आई बाबा, माझ्या लग्नाचा विचार करत आहेत." "अरे वा! मग लाडू कधी खायला यायचं आम्ही. एवढी चांगली बातमी तू अशा काळजीच्या स्वरात काय सांगतो आहेस? तू स्वतः कोणी पसंत केली आहेस का?" डॉक्टरांनी खोचकपणे विचारले. तसा तो पटकन उत्तरत म्हणाला "नाही हो डॉक्टर, तसे नाही. पण कसे सांगू. जरा थांबत तो हळुच म्हणाला, ”माझ्या लिंगात ताठरताच येत नाही हो.” “ तुला हे कधी कळले रे?” डॉक्टरांनी विचारलं, “वयात आलो, तेव्हा ताठरता जाणवायची, फार त्रास झाला मला त्याचा. नंतर मित्रांच्या सांगण्यावरुन वेश्येकडे जाणं सुरु केलं. सुरवातीला ते ताठरत होतं, नंतर नंतर कमी होत गेलं आणि आता तर ताठरतंच नाही. ” रात्र-रात्र एका खोलीत अशीच घालवतो वेश्येसोबत. काहीही न करता ! काय करणार? आज होईल; काही तरी करता येईल, अशी आशा सारखी वाटत रहाते. पण काही केल्या लिंगात ताठरता येतच नाही. आता घरचे लग्न करायचे म्हणताहेत. मला खूप भिती वाटते आहे." तो बोलत राहिला. “मला कुठला तरी रोग झाला असेल का?” “घरच्यांना कस सांगू? हे कळतच नाही. या विचाराने मला रात्र रात्र झोप येत नाही.” मला कुणाचं आयुष्य खराब नाही करायचं, त्या मुलीशी मी कसं लग्न करू?” अस म्हणत तो खरोखरच रडण्याच्या बेतात आला होता.

परिस्थिती ओळखून डॉक्टरांनी खोलात जाऊन चौकशी केल्यावर कळलं, की मुलगा अगदी नॉर्मल होता. दोष होता तो त्याच्या ज्ञानाच्या कमतरतेत. वयात येत असताना जे शारीरिक बदल होत असतात, तेच बदल याही मुलात झाले. त्यामुळे लिंग ताठरता त्याला जाणवत होती. मात्र हळूहळू शरीराने हे बदल स्विकारले व त्याची लिंग उत्तेजना कमी झाली. माञ लिंग उत्तेजनेसाठी या महाराजांनी वेश्यागमन केले. हे सर्व करत असतांना मात्र त्याच्या कामज्ञानात फारशी भर पडली नाही. एक साधं सत्य या तरुणाला माहिती नव्हतं की, मनावर कुठलाही ताण किंवा चिंता असेल तर लैंगिक उत्तेजना मेंदुकडून फुलवल्या जात नाहीत. बहुसंख्य लोक करतात तीच चूक याने केली. लिंग ताठरता हवी तेव्हा यावी, अशी त्याची इच्छा होती. मात्र या सर्वांसाठी मानसिक, शारीरिक तसेच भावनिक गुंफण लागते, हे त्याच्या गावीच नव्ह्ते. त्यामुळे त्याला भितीने ग्रासले होते.

आपण खरोखर पुरुष आहोत, हे सिद्ध करण्यासाठी त्याने वेश्यागमन केले, असे त्याचे म्हणणे होते. अनेक वयात येणारी तरुण मंडळी आपल्या मित्रांच्या सल्ल्याला बळी पडतात. आपण लैंगिकदृष्ट्या सक्षम आहोत, हे इतरांकडे सिद्ध करायचे असते, अशा वेळी वेश्यागमनचा मार्ग सोयीस्कररित्या निवडला जातो. बहुसंख्य पुरुषांना वयात आल्यावर लैंगिक उद्दीपन अभाव आणि म्हणून लैंगिक दुर्बलता असा ग्रह करून आपण कुठल्यातरी आजाराला बळी पडलो आहोत की काय असा समज करून घेतला जातो. अशावेळी कोणी सुजाण व्यक्तीने लैंगिक अवयवाच्या कार्यामागील कारण परंपरांची खरी माहिती सांगितली, तरी ती अनेकांना पटत नाही. लैंगिक अवयवाबद्दल साधा वास्तववादी विचार त्यांना सुचण्याचा प्रश्नच येत नाही. वयात येणारे तरुण आपल्या मित्रांच्या सल्ल्याला अथवा दबावाला बळी का पडतात? याचा जर आपण नीट विचार केला तर आपल्या लक्षात येते की, लैंगिक अवयवांबद्दलचं तोकडं ज्ञान, याबरोबरच काही सामाजिक कल्पनांचे बळीही हे तरुण ठरतात. लैंगिक क्षमतांवर तुम्ही पुरुष आहात की नाही हे ठरते, असा एक सामाजिक समज आहे. खरी मर्दत्वाची कसोटी लैंगिक क्षमतेवर व सेक्सवर आधारलेली आहे, हेच मनावर ठसवलेले असते.

वयात येताना असे अनेक समज आजुबाजूला वावरणारे समवयस्क पसरवत असतात. लैंगिक उत्तेजना वयात येताना तेवढ्याच तीव्रतेने उफाळून येत असतात. त्या कशा नियंत्रित करावयाच्या, याची कल्पना नसलेला तरुण मग सैरभैर होतो. आपण मर्दुमकीच्या कुठल्या पातळीवर आहोत, हा प्रश्न त्याला जास्त सतावत असतो. मी सेक्सद्वारे पुरुषी सामर्थ्य सिद्ध करू शकतो, ही कल्पना इतकी दृढ असते की ते सामर्थ्य जाणून घेण्यासाठी वेश्यागमन केले जाते. लैंगिक ताकद, लैंगिक सामर्थ्य वगैरे कल्पनांविषयी साधारण सर्वच पुरुष फारच हळवे असतात. तोच त्यांचा विक पॉइंट असतो. खरं तर तो कल्पनांतून तयार होतो.

लिंग ताठरता येणे ही एक शारीरिक प्रतिक्रिया आहे, जी मनाच्या अवस्थेवर, अनुभवांवर आधारित शिक्षण व समजूत करून घेण्यावर अवलंबून आहे. यातील सत्य पडताळून घेण्यापेक्षा जास्त महत्व पुरुष आपल्या मर्दुमकीच्या कल्पना रंगवण्यात आणि सिद्ध करण्यात व्यस्त असतात. त्यामुळेच तीच तीच क्रिया करून कंटाळा येतो, आपोआप मज्जासंस्था तेवढी उत्तेजित प्रतिक्रिया व्यक्त करत नाही. ही तारतम्याची साधी गोष्टही ते समजून घेण्यास असमर्थ ठरतात.

सेक्स ही फक्त शारीरिक क्रिया नाही. तर तो एक एकत्रित केलेला बंध आहे. शारीरिक, मानसिक आणि भावनिक बंध. हा बंध वेश्यागमन केल्याने तयार होईलच, असे नाही. वेश्यागमन म्हणजे केवळ एक शारीरिक क्रियाच आहे. त्यात कुठलाही मानसिक व भावनिक बंध नसतोच. त्यामुळे वेश्येकडे शारीरिक क्रियाच होऊ शकते. मात्र या शारीरिक क्रियेची शरीराला सवय लागून नंतर नंतर कुठलीही भावनिक व मानसिक गुंतवणुक नसल्याने शरीरही नकार देण्यास सुरवात करते. याचा अर्थ त्या पुरुषाची लैंगिक क्षमता नाही, असा होत नाही. त्यामुळे आपण पत्नीला संभोग सुख देऊ शकणार नाही, असा समज करून घेण्याचे कारणच नाही. वेश्यागमन व पत्नीशी होणारा सेक्स यात मुलभूत फरक असतो, तो भावनिक व मानसिक गुंतवणुकीचा आणि साम्य असते ते शारीरिक क्रियेचे; मात्र तरीही यात अंतर असते.

सेक्स म्हणजे पती पत्नीच्या परस्परांवरील प्रेमाचा सहजपणे, उत्स्फुर्तपणे लिंगाद्वारे व्यक्त झालेला आविष्कारच. प्रितीच्या, जिव्हाळ्याच्या भावनेनं, एकमेकांना सुख देण्याच्या उत्कट इच्छेनं, स्वतःला विसरून एकमेकांत मिसळून जाण्यासाठी पती-पत्नी जेव्हा एकांतात शरीरानं, मनानं जवळ येतात तेव्हा एकमेकांना शृंगाररसात न्हाऊ घालतात. आक्रमकतेला, हिंस्त्र भावनेला त्यात कुठेही स्थान नसते. नैराश्याचा, काळजीचा अडसर नसतो. दोघांनी एक होऊनच हे सुख अनुभवायचं असतं. एकाच वेळी एकच अनुभूती दोघांना येते. जर काही कारणाने एखाद्याला संभोगसुखाची इच्छा नसेल, तरीही दुसऱ्याला संभोग न करण्यातही समाधान मिळते. कारण मिलनाची ती तृप्ती आलेली असते. एकमेकांच्या सहकार्याशिवाय हे शक्य होत नाही. यात कुठेही सामर्थ्य सिद्ध करण्याच्या गोष्टी कल्पनांना थारा नसतो. अशा ज्ञानाच्या कमतरतेमुळे अनेक तरुण वेश्यागमन करतात.

वेश्यागमन ही खरं तर आपल्या समाजाला लागलेली कीडच आहे. या वेश्या व्यवसायामुळे केवळ वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्त्रियांचेच शोषण होते, असे नाही; तर, पुरुषत्वाच्या अनेक पोकळ कल्पना वेश्यागमनातून फोफावल्या व पसरवल्या जातात. सेक्स म्हणजे लैंगिक संबंध करत असतांना दम टिकवणे अथवा स्टॅमिना राखणे अशी पक्की समजूत केलेली असते आणि त्या स्टॅमिना राखण्याचा प्रयोग वेश्येवर केला जातो. स्टॅमिना, पॉवर, ताकद, सामर्थ्य असे शब्द सेक्सच्या बाबतीत, पुरुषाची लिंग ताठरता टिकवून धरण्याच्या संदर्भात वापरली जातात, तेच चुकीचं आहे. गैरसमज आहे. जो अर्थ या शब्दांमधून सुचवला जातो, त्याचा लिंग ताठरता कायम राहण्याशी काहीही संबंध नसतो. वेश्यागमनात स्त्री व पुरुष, अनोळखी तसेच अल्पपरिचित असतात. ते केवळ शारीरिक वासनापूर्तीसाठी एकत्र येतात, त्याठिकाणी नर-मादी म्हणून केवळ स्वतःपुरता व्यवहार पाहिला जातो. स्नेहबंध काहीच नसल्याने दुसऱ्या जोडीदाराचा स्वतःच्या मजेसाठी शोध घेतला जातो. केवळ शारीरिक क्रियेलाच तिथे महत्व असते. कामोत्तेजना येणं, टिकणं, त्यातून आनंद निर्मिती व समाधान मिळवणं हे केवळ प्रसन्न मन्नस्थिती असण्यावर, तसा मूड असण्यावरच अवलंबून असतं. अशी स्थितीत खात्री, विश्वास, श्रध्दा जागृत होतात. तरच मन स्थिर ठेवून आपोआप सुखाची मनसोक्त लयलूट करण्यास कारणीभूत ठरते. निव्वळ शरीर संवेदनेपेक्षा भावनांच्या भरामुळे येणाऱ्या तृप्तीच्या लाटा जास्त गाढ आनंद देतात, कारण हा आनंद दोघांचा सामायिक असतो.

प्रियदर्शिनी हिंगे

Updated : 27 April 2017 6:37 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top