विवाह स्वास्थ्य
X
विवाह केवळ पुनरुत्पादनासाठी होतो, असा गैरसमज आपण करून घेतलेला आहे. त्यातूनच अनेक वैवाहिक समस्या तयार होत आहेत. दोन भिन्नलिंगी व्यक्तींचं एकत्र येणं ही त्यांची मानसिक गरजही आहे. एकमेकांच्या व्यक्तिमत्वाला आधार देणं, आकार देणं, परस्परांना सुखदुःखात साथ देणं, काळजी घेणं, आपलं मानणं, प्रेम, जिव्हाळा इत्यादी भावनांनी एकमेकांना फुलवणं ही मानसिक व जीवशास्त्रीय गरज आहे.
साधारण २०- २२ वर्षांपूर्वी सेक्ससंबंधी ज्ञानाचा प्रसार व्हावा, या हेतूने एका महिला सेक्सॉलॉजिस्ट व्याख्यानासाठी जात होत्या. एकदा बसने प्रवास करत असताना एका मध्यमवयीन जोडप्याशी त्यांची ओळख झाली. गप्पा सुरु असताना त्यांच्या कामाबाबत चौकशी केल्यावर ते जोडपे जरा बिचकले. काही वेळाने त्या जोडप्यातील पुरुषाने महिला सेक्सॉलॉजिस्टला विचारले, “तुम्ही अशा विषयावर व्याख्याने देता. कशी देता हो? म्हणजे काही वाटत नाही का?” या प्रश्नावर जरा आश्चर्याचा सूर लावत त्या महिला सेक्सॉलॉजिस्टने विचारले, “काही वाटत नाही का म्हणजे? मी समजले नाही?” काही तरी गैरसमज होतो आहे, हे ओळखून त्या भल्या गृहस्थाने त्वरित स्पस्ष्टीकरण दिले, “तुम्ही लैंगिक मार्गदर्शन करता हे उत्तम आहे. पण मला वाटते,वैवाहिक स्वास्थ हा विषय स्टेजवरून बोलण्याचा नाही, असं माझं मत आहे.” “यात न बोलण्यासारख काय आहे? निषिद्ध गोष्ट आहे का ती?” डॉक्टरच्या या प्रश्नावर जरा नरमाईने उत्तर देत ते गृहस्थ म्हणाले, “विवाह स्वास्थ्य म्हणजे तुम्ही पती-पत्नीने संबंध कसा ठेवावा, त्यातली आसनं, या सगळ्याबद्दलच सांगणार ना?” डॉक्टरला काय उत्तर द्यावे, हेच समजेनासे झाले.
त्या गृह्स्थाप्रमाणेच आपल्यातील अनेक जण गैरसमजाचे बळी असतात. अगदी पन्नास वर्षे एकमेकांसोबत संसार केलेली मंडळीही या गैरसमजातून सुटलेली नाहीत. वैवाहिक स्वास्थ म्हणजे लैंगिक संबंधांची किंवा लैंगिक शिक्षण म्हणजे स्त्रीपुरुष समागम तसेच संभोगाची माहिती देणे, त्या संबंधांमधील अडचणी अथवा शंकांचे निवारण करणे, इतका मर्यादित समज भले भले लोक करून घेतात. मुळात विवाह स्वास्थ्यासाठी सेक्सच्या बाबतीत तृप्त असणे, हे सुखी संसारासाठी गरजेचेच आहे. मात्र केवळ समागम म्हणजे तृप्ती, आणि ते म्हणजेच विवाह स्वास्थ्य असे नाही. हवी ती तृप्ती मिळवणं, हे पती पत्नीच्या हातात असतं. आणि खास करून हे शारीरिक क्रियेवर कमी आणि पती पत्नीच्या वृत्तीवर जास्त अवलंबून असतं, संभोगाच्या प्रकारांवर नाही.
विवाहाने पती पत्नी काम संबंध, अपत्य संबंध आणि त्यांचे संगोपन यासाठीच एकत्र येतात, असे नाही. खरे तर विवाह केवळ पुनरुत्पादनासाठी होतो,असा गैरसमज आपण करून घेतलेला आहे. त्यातूनच अनेक वैवाहिक समस्या तयार होत आहेत. दोन भिन्नलिंगी व्यक्तींचं एकत्र येणं ही त्यांची मानसिक गरजही आहे. एकमेकांच्या व्यक्तिमत्वाला आधार देणं, आकार देणं, परस्परांना सुखदुःखात साथ देणं, काळजी घेणं, आपलं मानणं, प्रेम,जिव्हाळा इत्यादी भावनांनी एकमेकांना फुलवणं ही मानसिक व जीवशास्त्रीय गरज आहे. ही गरज वयात आल्यावरच तयार होते, असे काही नाही. तर जन्मल्यापासून ती असतेच आणि अगदी मृत्यच्या दारात उभे असेपर्यंत ती गरज राहतेच. नुसत्या दुधापेक्षा आईच्या शरीराची ऊब अर्भकाच्या सर्वांगीण पोषणाला हातभार लावते आणि हे शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झालेलं आहे. कुठल्याही वयातील व्यक्तीला एकटेपणा सहन होत नसतो. तिला इतरांच्या मानसिक, शारीरिक आधाराची गरज असते. तिचं अस्तित्व इतरांनी मान्य करण्याची ही गरज असते. त्यातूनच सुरक्षिततेची भावना निर्माण होण्यास मदत मिळते. मात्र हा आधार तुटला अथवा ही सुरक्षिततेची गरज भागवली गेली नाही तर माणूस हिंसेच्या मार्गाला लागण्याची शक्यता वाढते. माणसाच्या याच गरजेतून विवाह संस्था अस्तित्वात आली. मात्र काळाच्या ओघात आपण मानवाच्या गरजांकडे काणाडोळा करून, समाजाच्या दबावाचा जास्त विचार करू लागलो. त्यातूनच अनेक गैरसमज आणि त्याच गैरसमजातून अनेक समस्या तयार होण्यास सुरवात झाली.
आपण स्वतःला कितीही प्रगत म्हणवत असलो, तरीही मानवाची मुलभूत गरज लक्षात न घेता आपण विवाह संस्था पुढे नेतो आहोत. पैसा, रुप, रंग यांच्या आधारे विवाह करण्यात आजही समाजाचा जोर आहे. त्यामळे अनेक तरुण मंडळी विवाहासाठी नकाराचा सूर लावताना दिसतात. सर्व काही इन्स्टंट मिळत असलेल्या या जमान्यात कुठल्याही गोष्टीसाठी वेळ देण्याची तयारी नाही. तरुणांना सर्व काही फास्ट हवं आहे. मात्र कुठलेही नाते संबंध फुलवायला, रुजवायला वेळ हवा असतो. ग्लोबलायझेशनच्या जमान्यात सर्व काही रेडीमेड मिळते. त्यानुसार “जर आयतं दूध मिळत असेल, तर गाय विकत घ्यायची कटकट कशाला करायची?” अशी मानसिकता तयार होते आहे. याला जबाबदार आहेत आपले झालेले गैरसमज आणि तेच गैसमज पुढच्या पिढीने जसेच्या तसे उचलले आहेत. त्याला बऱ्याच अंशी तरुणांच्या भोवतालची परिस्थितीही जबाबदार आहे. त्यामुळेच लग्नसंबंध दृढ करण्यासाठी लागणारा वेळ तसेच त्यासोबत येणारी जबबदारी तरुणांना नकोशी झाली आहे. कारण विवाह म्हणजे शारीरिक गरज भागवणारे साधन असा समज दृढ करून घेतला गेलेला आहे. मात्र कितीही नकारात्मक सूर लावला तरीही विवाह संस्था अजूनही अस्तित्वात आहे, यावरुन तिचे महत्व स्पषट होते. एका आंतरराष्ट्रीय पाहणीवरून असे लक्षात येते की जिथे जिथे लग्नसंस्था जवळजवळ नाहीशी होण्याच्या मार्गावर आहे, तिथे लग्न टिकवण्यासाठी सल्लागारांकडे जाणाऱ्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. याच पाहणीच्या अहवालावरून असे लक्षात येते की लग्न मोडू पाहणाऱ्यांच्या संख्येपेक्षा लग्न टिकवणाऱ्यांची संख्या जास्त आहे. यावरुन लग्नसंस्थेवर युरोपातही हळूहळू विश्वास वाढतो आहे, हे दिसते.
मनुष्य प्राणी म्हणून आपल्या काही नैसर्गिक गरजा आहेत. त्या गरजांची आवश्यकता लक्षात घेऊनच लग्नसंस्थेची आखणी करण्यात आली आहे. मनुष्याच्या सर्व वयातील गरजा पूर्ण करून भावी पिढी सुसंस्कारी व शारीरिक तसेच भावनिकरित्या सक्षम करण्याचे काम ही कुटुंब पर्यायाने लग्न संस्था करत असते. कुटुंबातच काहीशा सुरक्षित वातावरणात भावी पिढी संस्कार घेत असते. लग्नसंस्थेमुळे सामाजिक सुरक्षितता कुटुंबाला लाभते. त्यामुळे कुटुंबाचीही सामाजिक ओळख तयार होते. त्यामुळे समाजाचा एक प्रकारचा दबाब कुटुंबावर तयार होतो. या दबावामुळेच तरुणांचा लग्न, विवाह यासाठी नकाराचा सूर लागल्याचं जाणवतं.
पारंपरिक लग्नसंस्थेत काहीसे बदल करून आणि मुख्यत्वे मानवाच्या मूळ भावनांशी जोडले राहून जर बदल केले तर, लग्नसंस्था अधिक सुसह्य करता येईल. आपल्या पूर्वजांनी अतिशय काळजीपूर्वक या लग्नसंस्थेची आखणी केली आहे. माणसाच्या सामाजिक, भावनिक व शारीरिक अशा विविध गरजांचा विचार करून ती निर्माण करण्यात आली आहे. काळानुसार ती हळूहळू मुलभूत गरजांपासून दूर होते आहे. त्यामुळे सामाजिक दबाव डावलून मानवांच्या गरजांच्या जवळ जाणारे बदल या लग्नसंस्थेत करणे गरजेचे आहे. मात्र जर लग्न संस्थाच नाकारली तर त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतील.
कुठल्याही गोष्टीला जर या काऴाच्या प्रवाहात टिकाव धरायचा असेल तर काळानुसार त्यात बदल करावे लागतात. अन्यथा ती गोष्ट नष्ट होण्यासाठी फार काळ लागत नाही. तसेच काहीसे आपल्या लग्नसंस्थेचे झाले आहे. आपण आता अश्मयुगातून तंञज्ञानाच्या युगात आलो आहोत, मनुष प्राण्याच्या जीवनाचा प्रवास हा अग्नीकडून तंत्रज्ञानाकडे झाला आहे. हा प्रवास होताना जसे मानवाच्या पेहराव, खानपान, जीवनात जसे आमुलाग्र बदल झाले, तसेच बदल कु़टुंबाच्या आर्थिक स्रोतांत झाले. नात्यांमध्येही विविध बदल झाले. मात्र नाती लोप पावली नाहीत, फक्त ती व्यक्त होण्याच्या तऱ्हा बदलल्या.
मात्र कुटुंबं कशी तयार झाली, याचा जर आपण इतिहास पाहिला तर, आपल्या असे लक्षात येईल की आधी मानव जात तयार झाली. प्राणीजगतामधे १ अब्ज वर्षांपूर्वी बहुपेशीय जीव तर ६० कोटी वर्षांपूर्वी साधे प्राणी (सिंपल ॲनिमल्स) उत्क्रांत झाले तर ५० कोटी वर्षांपूर्वी पृष्ठवंशीय मत्स्यजीव (फिश), ४७ कोटी वर्षांपूर्वी वनस्पती, ३६ कोटी वर्षांपूर्वी बेडकांसारखे (ॲम्फिबियन्स), ३० कोटी वर्षांपूर्वी सरपटणारे (रेप्टाइल्स) मग २० कोटी वर्षांपूर्वी सस्तन प्राणी (मॅमल्स), १५ कोटी वर्षांपूर्वी पक्षीजगत, ३० लाख वर्षांपूर्वी एप, २५ लाख वर्षांपूर्वी निअँडरथाल मनुष्यप्राणी, ५ लाख वर्षांपूर्वी सुधारित मनुष्यप्राणी आणि सर्वात शेवटी 2 लाख वर्षांपूर्वी आधुनिक मानवजात!
'अमिबा' महासागरामध्ये जन्माला आला आणि 'अमिबा'पासूनच लैंगिकता जन्माला आली! म्हणजे सेक्सची प्रक्रिया सुमारे ३.५ अब्ज वर्षांपूर्वीपासूनच या पृथ्वीवर प्राणीजगतात सुरू झाली, असे म्हटले पाहिजे. म्हणजे लिंग-योनी संबंध, उत्क्रांती ३० कोटी वर्षांपूर्वीपासून झाली. त्यातील कामानंदाची गोडी दोघांनाही असल्याने सेक्स केवळ प्रजोत्पादनासाठीच नव्हे, तर त्यातील कामानंदासाठीही निसर्गात उत्क्रांत झाले.
यावरुन सेक्स हा एक शृंगारिक नातेसंबंध झाला आणि मानवात 'लग्नसंस्था' रूपाने त्याचा कळस झाला. म्हणून समाजाचा घटक कुटुंब, कुटुंबाचा घटक पती-पत्नी दांपत्यच बनले आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. म्हणजे 'सेक्स'च्या पायावर समाज बांधला जात असतो. सुरक्षितता तसेच शारिरीक, भावनिक गरज यातून कुटुंबं जन्माला आली.
कुठल्याही नातेसंबंधाची जोपासना होते ती विश्वास आणि सहवासामुळे. विश्वास आणि सहवास वाढीस लावता येतो काही युक्त्या, क्लृप्त्या वापरुन. मात्र नाती नाकारणे म्हणजे आपल्या विनाशाला आमंत्रण दिल्यासारखे आहे. ‘नाती नकोत’ असे होणार नाही. ती हवी आणि राहणारच. इतर बदलांप्रमाणेच नात्यातही बदल हवेत, याची जाणीव ठेवणे सुखाचे ठरेल. कुटुंब दिनाच्या निमित्ताने चला आपण या कुटुंबांना कोमेजण्यापासून रोखू या. ते करायचे असेल तर कुटुंबाचा पाया असलेल्या सेक्स या विषयाकडे जरा गांभिर्याने पाहू या!
प्रियदर्शिनी हिंगे