Home > मॅक्स वूमन > बाल बलात्कार

बाल बलात्कार

बाल बलात्कार
X

कुठल्याही बालकातला बदल पालक अथवा शिक्षक यांनी नजरेआड करू नये. पालकांनी आपल्या बालकासमवेत वेळोवेळी संवाद साधत राह्यला हवे, जेणे करून त्याच्या मनात आपल्या पालकांबद्दल विश्वास निर्माण होईल. जर अशी अप्रिय घटना घडलीच, तर त्यावेळी बालक आपल्या पालकांना घटनेविषयी मनमोकळेपणाने सांगेल. त्यामुळे निदान समुपदेशन करून त्या बालकाच्या मनावर होणारे अनिष्ट परिणाम टाळता येतील.

रोज वर्तमानपत्र उघडले की कमीत कमी चार ते पाच बलात्काराच्या बातम्या वाचायला मिळतात. यातील अनेक घटना बाल बलात्काराच्या असतात. सर्वसामान्यपणे जर विचार केला तर बलात्कारापेक्षा बाल-बलात्कार अधिक गंभीर स्वरूपाचा असतो. याचा सामाजिक धोकाही मोठ्या प्रमाणावर आहे. हे गुन्हे त्याच व्यक्तीवर वांरवार घडण्याचे शक्यताही अधिक असते. त्यामुळे वारंवार गुन्हे झाल्याने गुन्ह्याची तीव्रता आपोआपच वाढते. अतिशय कोवळ्या वयात जेव्हा शारीरिक परिपक्वता तर नसतेच; मात्र, कुठल्याही प्रकारे लैगिक वर्तणूक प्रक्षोभक रुपात प्रकट व्हावी, अशी वर्तणूक करण्याची कुठलीही शक्यता नसताना असे अतिप्रसंग होणे हे अतिशारीरिक क्रौर्याचे द्योतक आहे.

राजश्री २८ वर्षांची. दूर गावावरून तिची आई अतिशय त्रासिक अवस्थेत तिला एका समुपदेशकाकडे घेऊन आली. या माउलीसमोर केवळ एकच समस्या होती, ती म्हणजे राजश्रीचा लग्नासाठीचा सातत्याने नकार. इतर सर्व बाबींमध्ये घरच्यांच सारं काही ऐकणारी, शिक्षणात उत्तम प्रगती करणारी आणि लहानपणा पासून शहाणं बाळ असणारी राजश्री लग्नाच्या बाबतीत मात्र कुणाचंच ऐकून घेत नव्हती. विशीपासूनच घरचे तिच्यासाठी स्थळं बघत होते, पण राजश्री काही तयार होत नव्हती. ती सुशिक्षित होती. तिला तिच्या अपेक्षा विचारल्या, प्रेम आहे का कोणावर?, हेही विचारून झालं, तरी राजश्री सर्व नाकारून लग्न टाळत होती. आणि आता तर लग्नाचं वयही उलटून चाललं होतं. आजवर हा विषय घरच्यांनी तिच्या कलानंच घेतला होता, पण आता ते काळजीत पडणं स्वाभाविक होतं. त्यांच्या फॅमिली डॉक्टरला यामागं काही लैंगिकतेचे कारण तर नाही ना, याची शंका आली. मात्र तसंही काही नव्हतं. आता अखेरचा पर्याय म्हणून तिची आई समुपदेशकाकडं आली होती.

राजश्री तशी व्यवस्थितच दिसत होती. पण चिंताग्रस्त होती. तिच्या आईनं थोडक्यात माहिती देऊन त्यांची समस्या सांगितली. आईला बाहेर बसवून समुपदेशकांनी राजश्रीला बोलतं करण्याचा प्रयत्न केला. तिनं लग्न करायचं नाही असंच ठरवलं होतं. या निर्णयावर काहीही न बोलता समुपदेशकांनी तिच्या बालपणाबद्दल जाणून घेतलं. तेव्हा ती जरा अवघडली, दडपणाखाली उत्तरं देत होती. मात्र काही कालावधीनंतर मोकळी होत ती सांगू लागली. तिनं जी माहिती दिली, ती धक्कादायक होती. आपल्या मनाचा चोरकप्पा हळूहळू उघडत राजश्री बोलती झाली.

ती साधारणपणे सात-आठ वर्षांची असताना तिच्याच नात्यातील एका मोठ्या पुरुष व्यक्तीनं तिला जबरदस्तीनं अनेक लैंगिक कुकर्म करायला लावले होते. जेव्हा जेव्हा ती व्यक्ती घरी यायची, तेव्हा तेव्हा ती व्यक्ती हा अत्याचार करत राहिली- अगदी राजश्री बारा वर्षांची होईपर्यंत. नंतर ती व्यक्ती दुसऱ्या गावी गेल्यानं राजश्रीची सुटका झाली. बालवयाच्या राजश्रीला हे काय चाललं आहे, याची काडीमात्र कल्पना नव्हती. तिला गप्प बसवण्यासाठी सुरुवातीला भीती दाखवली गेली आणि नंतर चॉकलेटचे आमिष. मात्र राजश्रीला या सगळ्याचा त्रास होत होता. किळस वाटत होती. ती व्यक्ती घरातल्यांच्या अतिशय जवळची असल्याने आपल्यावर कोणी विश्वास ठेवेल की नाही, याची तिला शाश्वती नव्हती.

सततच्या अत्याचाराने राजश्री गप्प गप्प राहू लागली. त्या व्यक्तीचीच नव्हे; तर, सर्व पुरुष जमातीचीच तिला भीती वाटत राहिली आणि लैंगिक गोष्टींबद्दल घृणा. राजश्रीनं तोंड न उघडल्यानं तिच्या घरच्यांना याची कसलीही कल्पना आली नव्हती आणि अजूनही नव्हती. राजश्रीनं मात्र घेतलेल्या धसक्यानं लग्न हा विषयच बाजूला सारला होता. समुपदेशन हेच तिचं औषध होतं. त्याची तिला सातत्याने गरज लागणार होती. हळूहळू तिच्या मनातली भीती घालवली. त्यानंतर राजश्री बदलत गेली आणि एका तरुणाच्या प्रेमात पडत त्याच्याशी तिनं लग्नही केलं.

राजश्री आता सुखा-समाधानानं संसार करत आहे. मात्र सगळ्याच राजश्रींना समुपदेशन मिळतेच, असं नाही. लहानपणातच अशा लैंगिक वर्तणुकीला सामोरं जावं लागल्यानं मुलांच्या पुढच्या आयुष्यावर गहिरे परिणाम होतात. त्यामुळे काही तर स्वतःच गुरफटून शांत शांत रहातात, काही जण आत्मविश्वासच हरवून बसतात.

बळाचा वापर करून जबरदस्तीनं केलेला संभोग म्हणजे बलात्कार. शारीरिक संपर्क अथवा कामोद्दीपक चेष्टा, प्रणय सौख्याची मागणी अथवा विनंती अथवा लैंगिक वासना प्रेरित करणारे कुठलेही साहित्य दर्शवणे म्हणजेच लैगिक शोषण. यात महिला, पुरुष तसेच बालके यांचाही समावेश होतो. या शोषणाचा बळी पाच वर्षांपर्यंतच्या बालिकासुद्धा ठरतात आणि दोन-तीन वर्षांची शिशुही? प्रश्न सामाजिक गांभीर्याचा तर आहेच, परंतु या विषयी समाज-जागृती करण्यासाठीही महत्त्वाचा बनला आहे. सर्वसाधारण बलात्काराची लैंगिक मानसिकता व बाल-बलात्काराची विशेष मनोलैंगिकता समाजानंही जाणून घेतली पाहिजे.

त्या बळी पडलेल्या बालिकांमध्ये कुठल्याही तारुण्यसुलभ भावना विकसितच झालेल्या नसतात. त्यामुळं 'हे काय चाललं आहे?' याचा त्यांना थांगपत्ताही नसतो. अशा प्रसंगातून जीव वाचलेल्या बालिकांच्या मनावर शरीरावरील जखमांपेक्षाही कधीही भरून न येणाऱ्या जखमा होत असतात. विशेष म्हणजे बहुतांशी घटनांशी माहितीतली, ओळखीची व्यक्तीच संबंधित असते! असे बाललैंगिक गुन्हे घडण्याची महत्त्वाची कारणे म्हणजे बालकांविषयी मुळातच गुन्हेगारी लैंगिक आकर्षण असणे, बालकांकडून विरोध व प्रतिकाराचा धोका न वाटणे, सावज सहजगत्या मिळणे व गुन्ह्य़ानंतरही त्याची वाच्यता अशा बळींकडून होण्याची शक्यता अत्यंत कमी असणे, ही असतात. लहान मुलांपासून आपल्याला काहीही धोका नाही, त्याना घाबरवणे तसेच आमिष देऊन भुलवणे सोपे असते. मात्र असे लैंगिक गुन्हे करणाऱ्यांना त्याच्या या कर्माचा त्या कोवळ्या मनावर, त्यांच्या कोवळ्या आयुष्यावर किती वाईट आणि गंभीर परिणाम होणार असतो, याची जराही जाणीव नसते.

लैंगिक शोषणाला बळी पडलेली बालके अनेकदा शांत होतात, सतत विचारात राहतात, अस्वस्थ राहतात. आपलंच काहीतरी चुकलं, अशी भावना त्यांच्यात बळावते. मुळातच काय झाले किंवा होते आहे, हे त्या कोवळ्या मनाला कळतच नसतं. मात्र तरीही काही तरी घाणेरडा प्रकार आहे, असं वाटून त्याविषयी तिरस्काराची भावना वाढत जाते. आई वडील तसंच शिक्षक यांच्या नजरेत बालकांमध्ये झालेला बदल लगेच येतो. अशा वेळेस त्या बालकास आधार देत, त्याला प्रेम देत, विश्वासानं विचारलं तर ते बालक त्याच्या विचित्र वागण्यामागचं कारण नक्कीच सांगतं. त्यामुळं कुठल्याही बालकातला बदल पालक अथवा शिक्षक यांनी नजरेआड करू नये. पालकांनी आपल्या बालकासमवेत वेळोवेळी संवाद साधत राह्यला हवे, जेणे करून त्याच्या मनात आपल्या पालकांबद्दल विश्वास निर्माण होईल. जर अशी अप्रिय घटना घडलीच, तर त्यावेळी बालक आपल्या पालकांना घटनेविषयी मनमोकळेपणाने सांगेल. त्यामुळे निदान समुपदेशन करून त्या बालकाच्या मनावर होणारे अनिष्ट परिणाम टाळता येतील.

पालक सावध असले तरी अशा घटना थांबतील, असे मानणे म्हणजे बालविचारच. कारण समाजात अशा प्रवृत्ती वावरत राहणारच. साधारण बलात्कार करणाऱ्यांमध्ये स्वकामपूर्ती करण्याची, स्वतःच स्वतःची कामोत्तेजना हाताळायला शिकण्याची प्रवृत्ती फारशी आढळत नाही. कामोत्तेजनेनंतर तिच्या पूर्ततेसाठी लगेचच दुसरीकडे शोध घेण्याची प्रवृत्ती बळावत असते. म्हणून अशा व्यक्तींना मानसिक ताण हाताळायला शिकवणे, वैवाहिक जीवनातील लैंगिकता समाधानकारक करणे, त्यासाठी वैवाहिक जोडीदारालाही तिच्या जबाबदारीची जाणीव करून देणे, अशा मार्गदर्शनातूनच गुन्हेगारीकडे वळणाऱ्या प्रवृत्तीलाच आळा घालता येऊ शकेल. त्यामुळे व्यक्तींकडून बाललैंगिक गुन्हेगारी टळू शकेल. परंतु न सुधारणाऱ्या किंवा तशी मानसिकताही न दाखवणाऱ्या व्यक्तींकडून समाजातील निरागस बालकांना धोका पोहोचू शकतो, हेही लक्षात घेणे आवश्यक आहे. असे गुन्हेगार मानसिक रोगी बनून मोकाट राहिले तर तो सामाजिक स्वास्थ्याला धोकाच आहे, हे निश्चित.

मुळातच कामभावनेचा उद्रेक कसा हाताळावा, याची व्यक्तिगत व सामाजिक जाणीव नसणे हा आपल्या समाजाला लैंगिक शिक्षणाच्या अभावी ग्रासलेला शापच आहे. बलात्काराच्या प्रसंगी अति कामभावनेचा जणु स्फोटच होत असतो, पण त्याच वेळेस या उत्पन्न झालेल्या कामभावनेचे शमन, कुठल्याही परिस्थितीत करायचेच, हा अविचारही पेटलेला असते. हा अविचार एकतर्फी असल्याने त्याच्या पूर्तीसाठी जबरदस्तीचा वापर करण्याची उचल जेव्हा मन तीव्रतेने घेते, तेव्हा लैंगिक गुन्हेगारी घडते. ही लैंगिक गुन्हेगारीची मनोवृत्ती मुळातच नष्ट करण्यासाठी लैंगिक शिक्षण आहे. हे शिक्षण म्हणजेच लैंगिकतेचे नागरिकशास्त्र शालेय जीवनापासून, पौगंडावस्थेत व विवाहपूर्व काळातही टप्प्याटप्प्याने देणे गरजेचे आहे. त्यामुळे निकोप लैंगिकतेचे भान असणारे सुजाण नागरिक निर्माण होऊन अशा कित्येक बालिकांचा व पर्यायाने समाजाचा 'बलात्कार' टळायला मदतच होईल.

प्रियदर्शिनी हिंगे

Updated : 23 Jun 2017 12:14 AM IST
Next Story
Share it
Top