Home > मॅक्स वूमन > मुलांना कसं वाचवणार अत्याचारापासून...

मुलांना कसं वाचवणार अत्याचारापासून...

मुलांना कसं वाचवणार अत्याचारापासून...
X

गुडगावच्या शाळातील घटनेनंतर पालकवर्ग प्रचंड अस्वस्थ असल्याचे दिसत आहे. एका मुलाचा जीव गेला आणि लैंगिक शोषणाच्या दिवसन दिवस वाढणाऱ्या घटना हे खरोखरीच अस्वस्थ करणारे असले तरी या प्रकरणांना किमान वाचा फुटत आहे ही एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला विसरून चालणार नाही. आपलं मूल सुरक्षित असावं अशी भावना सर्वच पालकांची असते. मात्र त्यासाठी काही गोष्टी समजून घेणे गरजेचे आहे. केवळ बलात्कार म्हणजेच लैंगिक शोषण हा एक मोठा गैरसमज आहे. लैंगिक शोषण विविध मार्गांनी होते. त्यात अश्लील चित्रे अथवा चित्रफित दाखवणे, अश्लील चित्रे काढावयास सांगणे, शारीरिक खाजगी जागेवर स्पर्श करणे अथवा मुलांना करावयास लावणे, लैंगिक कृत्य तयार करण्यासाठी मुलांचा वापर करणे, मुलांना आपापसात लैंगिक चाळे करावयास लावणे तसेच मुलांच्या खाजगी जागेत अवयवांचा अथवा इतर कुठल्याही वस्तूचा प्रवेश. अश्या प्रकारच्या सर्व शोषणांचा समावेश लैंगिक शोषणात होतो. यातील एखादी घटनाही लैंगिक शोषणात मोडते. अश्या प्रकारच्या शोषणापासून मुलांना वाचवण्यासाठी चांगला व वाईट स्पर्श याबद्दल मुलांना सहज सांगितले गेले पाहिजे.

"लोक आपल्याला अनेक प्रकारे स्पर्श करत असतात. काही वेळा ते आपल्याला आवडतात तर काही वेळा आवडत नाही. काही स्पर्शामुळे आपल्याला आनंद वाटतो. तर काही स्पर्शामुळे भीती,किळस वाटते, संताप येतो,निराशा वाटते. काय चांगलं वाटतं आणि काय वाईट हे प्रत्येक व्यक्तीवर अवलंबून असते. आपल शरीर हे आपलं स्वत:चं आहे. एखाद्या व्यक्तीने तुम्हाला न आवडणारा स्पर्श केला तर ते चूक आहे. तुम्हाला लैंगिकतेबद्दल पुरेशी माहिती असो वा नसो, तुम्ही जोपर्यंत लहान आहात तोपर्यंत, तुमच्या सोबत लैंगिक क्रिया करण्याचा अधिकार कोणाही नाही. अशा कृत्यांनाच लैंगिक शोषण म्हणतात." ही माहिती मुलांपर्यंत अगदी सहज भाषेत गेली पाहिजे.

काही वेळा रस्त्याने चालताना एखादा पुरुष स्वत:चे शिश्न दाखवतो असा अनुभव काही जणांना येतो. काही वेळा आवडत नसतानाही एखादी मोठी व्यक्ती मुलाला मांडीवर बसण्याची, किंवा मिठीत घेण्याची जबरदस्ती करते. हे अयोग्य वर्तन आहे, ही माहिती मुलांना असायला हवी.

कुणाचंही लैंगिक शोषण होऊ शकतं. मुलगे आणि मुली दोघांनाही सारखाच धोका असतो. लहान मुलांवर असे लैंगिक अत्याचार करणारे लोक बऱ्याचदा शेजारी, नातलग, ड्रायव्हर, कुटुंबातील व्यक्ती, नोकर यांसारखे जवळचे किंवा ओळखीचेच असतात. लैंगिक छळ अनेक प्रकारे होतो, प्रत्येक वेळी शारीरिक संबंध यायलाच पाहिजे असं नाही. एखाद्या व्यक्तीच्या इच्छेविरुध्द लैंगिक संबध करण्याची जबरदस्ती त्या व्यक्तीवर केली तर त्याला बलात्कार म्हटले जाते. छळ होणाऱ्या व्यक्तीचा यात काही दोष नसतो. अश्या कृत्यामुळे छळ झालेलं मूल मोठ्या प्रमाणात घाबरतं, त्याच्या मनात चीड, संताप आणि भीच्या भावना निर्माण होतात. कहीतरी भयानक वाटू लागतं आणि मुख्य म्हणजे छळ करणाऱ्या व्यक्तीवरील विश्वासाला तडा हातो.

मुलांना हे नक्की सांगा -

 • एखादी मोठी व्यक्ती (नातलग किंवा ओळखीची) तुम्हाला न आवडणारा स्पर्श करत असेल तर तुम्हाला हे आवडत नाहीय आणि तुम्ही याबद्दल कुणा मोठ्या व्यक्तीला सांगाल, हे ठामपणे त्या व्यक्तीला सांगा.
 • समोरील व्यक्ती जर जबरदस्ती करत असेल तर मोठ्याने ‘नाही’ म्हणून ओरडा.
 • तुमच्या मोठ्या भावा बहिणीला, आईवडिलांना अथवा कुणा मोठ्या माणसाला तुम्ही याबद्दल सांगा.
 • त्रास देणाऱ्या त्या व्यक्तीसोबत एकटं राहू नका.
 • त्रास देणाऱ्याच्या मनाप्रमाणे अजिबात वागायचं नाही. त्याला हवं तसं वागलं नाही तर तो धमक्या देतो, त्या धमक्यांना घाबरायचं नाही.
 • आपल्याला मनापासून काय योग्य काय अयोग्य वाटते यावरच नेहमी विश्वास ठेवायचा.

या गोष्टी मुलांना जरुर शिकवा

 • लैंगिक अत्याचारांना जोरात व ठामपणे नाही म्हणा.
 • लैंगिक अत्याचाराची शक्यता दिसल्यास तेथून लगेच निघून या.
 • तेथून निघण्यासाठी हवे तर काही बहाणा करा.
 • आरडा ओरडा करा.
 • स्पर्श न करता अथवा स्पर्श करून लैंगिक अत्याचार झाल्यास मोठ्या व विश्वासातील व्यक्तींना लगेच सांगा, मदत मिळेपर्यंत सांगत रहा.

दुर्दैवाने लैंगिक छळांचे प्रमाण फार जास्त आहे. हे तुमच्या बाबतीतही घडलं तर लक्षात ठेवा की यात तुमचा दोष नाही. त्रास देणाऱ्या व्यक्तीचं चुकलेलं आहे. यामुळे तुमच्या आयुष्याचं नुकसान करून घ्यायचं नाही. तुम्हाला गोंधळायला झालं तर कुणाची तरी मदत घ्या. एखाद्या ठिकाणी आपला लैंगिक छळ होण्याची शक्यता आहे, अशी जाणीव झाली तर आपल्या विश्वासातील एखाद्या व्यक्तीला याबद्दल सांगा. शक्यतो या परिस्थितीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करा. एखाद्या व्यक्तीचा जर लैंगिक छळ होत असेल तर त्या व्यक्तीला तुमच्या आधाराची गरज आहे. तिच्या इच्छांचा आदर करण्याची व तिने सांगितलेल्या गोष्टीबद्दल गुप्तता ठेवण्याची गरज असते. त्रास देणा ऱ्याला संरक्षण देऊ नका.

अत्याचार झाल्यावर काय करावे?

1) कोणतीही व्यक्ती, अत्याचार झालेले बालक किंवा सामाजिक संस्था पोलीस स्टेशनमध्ये जाऊन अत्याचाराबाबत सविस्तर माहिती देऊ शकतात.

2) गावात, परिसरात बाल लैंगिक अत्याचाराची घटना घडल्यास पीडित बालकास त्वरित पोलीस स्टेशनमध्ये न्यावे अथवा झालेल्या घटनेबद्दल जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये कळवावे. तसेच तातडीच्या मदतीच्या आवश्यकतेनुसार बालकाला जवळच्या सरकारी/खाजगी हॉस्पिटलमध्ये न्यावे.

3) जो कोणी तक्रार दाखल करेल त्याने एफ.आय.आर.ची प्रत मागून घ्यावी. त्यावर संबंधित पोलीस स्टेशनचा सही व शिक्का असावा.

4) लैंगिक अत्याचाराचा वैद्यकीय पुरावा बळकट करण्यासाठी रक्त, केस, वीर्याचे नमुने सरकारी/ खाजगी हॉस्पिटलमध्ये जमा करणे आवश्यक असते. त्यासाठी पीडित बालकाने लगेच आंघोळ करू नये व त्या वेळचे कपडे धुवून टाकू नयेत.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे संवाद! मुलांशी सतत बोलत रहायला हवे. मूल काही सांगत असेल, तर त्याच्याकडे लक्ष द्या. मुलांचा तुमच्यावर विश्वास असला तर ते प्रतेक गोष्ट तुम्हाला सांगेल आणि हा विश्वास अतिशय मोलाचा आहे. त्यामुळे वाईट घटनेची चिन्हे तुम्हाला आधीच दिसू शकतील आणि अशा घटना टाळता येऊ शकतील.

प्रियदर्शिनी हिंगे

९८८१८८८५०५

Updated : 15 Sep 2017 11:26 AM GMT
Next Story
Share it
Top