पॉर्न,काम जीवन आणि ग्रमीण महाराष्ट्र

इंटरनेट सर्वाधिक वापरलं जातं ते पोर्न व्हिडीओ पाहण्यासाठी. पोर्न व्हिडीओ पाहण्याचा सर्वात स्वस्त आणि सोपा मार्ग आहे इंटरनेटचा. आधी हे लोण केवळ शहरापुरतं आहे, असा समज होता, मात्र हा समज प्रत्यक्षात गैरसमज ठरतो आहे. हे पोर्न व्हिडीओचं लोण गावागावात पसरतं आहे. केवळ पसरतच नाहीये तर त्याबरोबर अनेक गैरसमजुती आणि गुन्ह्यांना खतपाणी घालत आहे. नको त्या वयात चुकीची माहिती अशा प्रकारे मिळाल्यानं अनेक जण गुन्ह्यांचे बळी ठरत आहेत.

एक कार्यक्रमा दरम्यान महिला पोलीस कक्षात काम करणाऱ्या महिलेशी, तसंच महिलांच्या प्रश्नांवर काम करणाऱ्या महिला वकिलांशी बोलणं झालं. त्या दरम्यान महिलांवर होणाऱ्या अनेक प्रकारच्या अत्याचारांची धक्कादायक माहिती मिळाली. त्या सांगत होत्या “दहापैकी नऊ केसेसमध्ये नवरा-बायकोच्या शारिरीक संबंधांमध्ये मारहाण झालेली असते. आणि ही मारहाण केवळ इंटरनेटवर फिरणारे पोर्न व्हिडिओ पाहण्यासाठी केली जाते.” जिथे पिण्याचे पाणी आणण्यासाठी सात किलोमीटर चालावे लागते, अशा एका खेड्यात नवऱ्याने पशुसारखा सेक्स केल्याने, त्या बाईला दवाखान्यात दाखल करावे लागले. या सगळ्या प्रकाराने तिला किती शारीरिक यातना झाल्या असतील, हे तिला घातलेल्या टाक्यांवरून समजते. दुर्गम भागात पोर्न व्हिडिओ पोहोचू शकत नाहीत, असा आपला भ्रम खोटा ठरवणाऱ्या आणखी काही अशाच प्रकारच्या घटना याच गावात उघडकीस आल्या. केवळ नवरा असं काही करतो, हे सांगायचं कसं आणि कुणाला, या संकोचामुळे या घटना समोर आल्या नाहीत. अशा अनेक घटना आजही अतिशय मागास समजल्या जाणाऱ्या भागातही घडताहेत. नांदेडमधल्या एका छोट्या खेड्यात एका अशिक्षित महिलेसोबत पतीने अनैसर्गिक सेक्स केल्यामुळे तिला अनेक महिने हॉस्पिटलमध्येच उपचारांसाठी राहावं लागलं. तिच्याकडे चौकशी केल्यावर समजले की पोर्न व्हिडीओत पाहूनच तिचा पती तिच्याशी अनैसर्गिक सेक्स करीत असे. त्यात दाखवतात म्हणजे त्यांना जमतं तर, आपल्यालाही जमेल, असा त्याचा समज. पत्नीनं अनेकदा शारिरीक त्रासाची तक्रार वारंवार करुनही केवळ आनंदप्राप्तीच्या हव्यासापायी त्यानं आपल्याच पत्नीला शारिरीक त्रासाच्या खाईत लोटलं. हे पोर्न व्हिडिओ पाहून आपणही अशा प्रकारे आनंद प्राप्ती करायला काय हरकत आहे, हा विचार डोकावतो; मात्र यासर्वांचे मूळ कशात आहे, हेच मुळी माहित नसल्याने अनेक प्रश्न अक्राळविक्राळ स्वरुप घेऊन समोर येतात.

इंटरनेट माहितीचा खजिना असला, तरी या खजिन्यातून काय घ्यायचं हे ज्याचं त्यांनी ठरवायचं असतं. असं जरी असलं तरी इंटरनेट सर्वाधिक वापरलं जातं ते पोर्न व्हिडीओ पाहण्यासाठी. पोर्न व्हिडीओ पाहण्याचा सर्वात स्वस्त आणि सोपा मार्ग आहे इंटरनेटचा. आधी हे लोण केवळ शहरापुरतं आहे, असा समज होता, मात्र हा समज प्रत्यक्षात गैरसमज ठरतो आहे. हे पोर्न व्हिडीओचं लोण गावागावात पसरतं आहे. केवळ पसरतच नाहीये तर त्याबरोबर अनेक गैरसमजुती आणि गुन्ह्यांना खतपाणी घालत आहे. नको त्या वयात चुकीची माहिती अशा प्रकारे मिळाल्यानं अनेक जण गुन्ह्यांचे बळी ठरत आहेत.

प्रियदर्शनी हिंगे