Home > मॅक्स वूमन > मासिक पाळीवर कर ; सरकार भिकारी !

मासिक पाळीवर कर ; सरकार भिकारी !

मासिक पाळीवर कर ; सरकार भिकारी !
X

एकीकडे इस्रोच्या माध्यमातून अवकाशात एकाचवेळी ढिगानं उपग्रह पाठवणारे आपण आणि दुसरीकडे त्याच श्रीहरिकोटापासून अवघ्या काही शे किलोमीटरच्या गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात मासिक पाळीदरम्यान पॅड म्हणून मातीचा लेप लावून दिवस काढणाऱ्या महिला. कदाचित हे विदारक सत्य आपल्याच देशात असू शकतं. मात्र तरीही ही 'विविधता' मान्य करत आपण पुढे जात राहिलो. विशेषतः महिला सक्षमीकरण या गोंडस नावाखाली वेगवेगळे प्रयोग राबलेले गेले. जे शासकीय, संस्थात्मक आणि वैयक्तीक पातळीवर होते. त्यात अलीकडच्या काळात तर सॅनटरी नॅपकिनसाठी बघता-बघता चळवळ सुरू झाली. महिलांमध्ये जागृती झाली आणि सॅनिटरी नॅपकिनची विक्री कैक पटीनं वाढली. याला जागृती जितकी कारणीभूत होती, तितकीच महत्वाची बाब होती ती गरजेची. पण असं असताना काल-परवा बातमी आणि अनेकांच्या मनात सरकारच्या भुमिकेविषयी प्रश्नांचं काहूर माजलं. महिला सक्षमीकरणाच्या गप्पा ठोकणाऱ्या सरकारचा हा दांभिकपणा खटकणारा असाच होता.

प्रस्तावित GST कर प्रणालीमध्ये १२ टक्के कर लावण्याचं नियोजन पुढे आल्यावर महिला वर्गातून प्रतिक्रिया उमटणं ही अगदी स्वाभाविक बाब होती. प्रत्यक्ष कर लागू झाल्यावर याचा फारसा मोठा परिणाम किमतीत होणार नसला तरी इतक्या संवेदनशील विषयात सरकार इतकं सर्रास निर्णय कसं घेऊ शकतं, हा प्रश्न प्रत्येक महिलेला सतावणारा आहे. 'मासिक पाळी महागली' या हेड लाईन टिव्हीच्या स्क्रीनवर पाहिली आणि डोक्यात विचारांची सैर कुठच्या कुठे गेली. कारण तसं सरळ होतं, पण चॅनेलवाल्यांनी 'असं' हेडिंग देणं पटलं नाही. पण अभिव्यक्तीच्या आणि सृजनशीलतेच्या आड कोण येणार? सॅनिटरी पॅड ही चैनेची बाब नाही तर ती महिलांच्या मूलभूत गरजेची आहे, हे सरकारच्या लक्षात न येणं, हे कोणत्या मानसिकतेचं लक्षण?

आज 28 मे World Menstrual Hygiene Day. 2014 साली याची सुरुवात एका जर्मन एन जी ओ (WASH United) ने केली. या मागे मासिक पाळीच्या काळात स्वच्छतेचे भान निर्माण करणे, पाळीचे चांगले व्यवस्थापन व्हावे म्हणून सोयी सवलती निर्माण करणे अशी उद्दिष्ट्ये होती. मे म्हणजे मेंस्ट्रुएशन, 28 का, तर साधारण पाळीचा महिना 28 दिवसांचा असतो म्हणून. मे महिना वर्षाचा पाचवा महिना, साधारण पाळी पाच दिवसांची म्हणून. या दिवसाच्या नावाचे मराठी भाषांतर 'जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिन' असे केले आहे आणि तसे होणे स्वाभाविक आहे. याचे काही अर्थ आहेत.

एक सरळ साधा आणि वैज्ञानिक अर्थ असा की मासिक पाळीच्या काळातील स्वच्छता महत्वाची आहे. पाळीचे रक्त टिपून घेण्यासाठी चांगली, सोयीची साधने प्रत्येकीला मिळायला हवीत. हा तिचा मूलभूत हक्क आहे. नाही तर प्रजनन मार्गामध्ये जंतू संसर्ग होऊ शकतो. हे ठीकच.

दुसरा एक लपलेला अर्थ असाही असू शकतो आणि तो तसा खूप आतवर आपण दीर्घ काळ साचवलेला आहे. तो असा की, मासिक पाळी म्हणजे स्त्रीशरीर आपली स्वच्छता करते. साचलेले अशुद्ध अस्वच्छ रक्त बाहेर टाकते. ते अपवित्रही असते.

एकदा का ते रक्त घाण आहे म्हणून बाहेर टाकले जाते असे म्हटले की गर्भाशय ही एक 'उत्सर्जन संस्था' होते. (याच रक्तावर गर्भ नऊ महिने पोसला जातो.असो) एखादी जागा घाण, अपवित्र, निषिद्ध , अस्पर्श मानली की त्या जागेची स्वच्छता करण्याचे कारण नाही, ती जणू कचरा कुंडी आहे, ती अधिक घाण झाली तरी काय हरकत आहे असे म्हणून तिच्या कडे पिढ्यान पिढ्या दुर्लक्ष केले गेले. उल्लेख सुद्द्धा नाही करायचा. केलाच तर सरळ नाहीच, कावळा शिवला वगैरे म्हणायचे. आंघोळ इत्यादी नाहीच. ज्याने पाळी निर्माण केली त्या देवाला सुद्धा हिची सावली चालत नाही, इतका धाक! रक्त थांबले की मग "शुद्ध" व्हायचे ! चौथ्या पाचव्या दिवशी ! आणि हे ज्ञान कोणी सांगितले? तर धर्मग्रंथांनी !! (पहा धर्मसिंधू आणि जगातील बहुतेक सर्व धर्मग्रंथ, 'कौमारभृत्यतंत्र' जे आजही आयुर्वेद पाठयपुस्तक आहे). ही सारी साहित्य संपदा पुरुषांनी जन्माला घातली हा इतिहास आहे. म्हणजे स्वच्छता कुठे करायला हवी? कोणी करायला हवी? स्त्रीशरीराची तर नक्कीच करायला हवी. पण मनाची देखील करायला हवी. एकदा का मासिक पाळीचा स्वीकार सन्मानाने केला की आपोआप स्वच्छता होणार. शरीराचीही. - डॉ. मोहन देस, सामाजिक कार्यकर्ते

कुमारावस्थेमध्ये मुलींमध्ये शारीरिक आणि मानसिक बदल होतात आणि त्यातील सर्वात मोठा आणि चांगला बदल म्हणजे मुली 'वयात येणं', यालाच रजस्त्राव होणं म्हणतात. पाळीबद्दल अनेक गैरसमज आहेत, जे की पाळीमध्ये होणारा रक्तस्त्राव चांगला अथवा वाईट? पाळी ही नवनिर्मितीची द्योतक आहे. त्यानं नवा जीव जन्माला येण्याची प्रकिया आहे, तर ती वाईट तरी कशी? थोडक्यात मासिक पाळी बाईचं स्त्रीत्व सिद्ध करते. अवतीभवती होणाऱ्या बदलामुळे कुमारवस्थेतील मुलामुलींमध्ये मानसिक-शारीरिक बदल होत असल्याची चर्चा आपण वेगवेगळ्या माध्यमातून ऐकतो आहोत. या बदलामध्ये मुली अगदी बाराव्या वर्षी वयात येण्याचा म्हणजे मासिक पाळी सुरू होण्याचा टक्का वाढल्याचं एका संशोधनात पुढे आले. पण सहाव्या इयत्तेमध्ये शिकणाऱ्या मुलीला मासिक पाळी येणं अनेक प्रश्न निर्माण करत. मासिक पाळीशिवाय बाईचा जन्म परिपुर्ण नाही, असं 'जुन्या' बायका म्हणतात. पण सद्यस्थितीमध्ये मुलींना पाळी त्रासदायक वाटतेय कारण त्यांच्या विहारावर अडथळा बनते, हो खरं आहे. कारण तरुणीच्या जबाबदाऱ्या वाढतायत, शाळा, कॉलेज, नोकरी ठिकाणचे युनिफॉर्म आणि 'त्या' दिवसांमध्ये घ्यावे लागणारे पॅड किंवा नॅपकीन, यामुळे कमी होणारा आत्मविश्वास हा न्यूनगंड मासिक पाळीला कमी लेखण्यास जेरीस आणतो. मुली शिकण्यासाठी कामानिमित्त बाहेर पडतायत. कौतुकास्पद प्रगतीची बाब आहे, पण त्यांनी तितकंच मासिक पाळीला सकारात्मकरित्या पाहणं गरजेजचं आहे. त्या वेदना ना सकारत्मकतेच्या जोडीची किंबहुना मासिक पाळीला पवित्र मानण्याची गरज आहे.

मासिक पाळीमध्ये पॅड न वापरण्याचा सल्ला काही 'आज्या-आया' मुलींना देतात, कारण वापरलेले पॅड हे कोण्या प्राण्याने हूंगु नये, अशी अंधश्रद्धा आहे. या अंधश्रद्धेच्यापोटी अनेक महिला सुती कापड वापरतात, त्यामुळे त्यांना योनीमार्गाचे जंतुसंसर्ग होतात. या जतुसंसर्गावर नियंत्रण आणण्यासाठी बराच अवधी लागतो. त्याचबरोबर अत्यंत महत्वाची बाब म्हणजे महिलांमध्ये होणाऱ्या कर्करोगामध्ये साधारणतः पंचवीस टक्के कर्करोग हे योनीमार्ग आणि गर्भाशयाचे आहेत. यामध्ये अनेक महिला प्राण गमवतायत, कारण अवघड जागी होणारे बदल कोणाला सांगायचे? त्यामुळे जागरूक होऊन सॅनिटरी नॅपकिन (पॅड)चा वापर करणे तसेच मासिक धर्म सुरू असताना खाण्यापिण्याच्या खबरदारी घेत, तितकेच सैल कपडे परिधान करणं आणि पुरेशी झोप घेणं बंधनकारक करणं महत्वाचं. महिला सर्वक्षेत्रात सरस आहेत स्त्रियांनी प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवला, अगदी शास्त्रज्ञ होऊन अनेक शोध लावले. तरी मासिक पाळीबद्दल कामाच्या ठिकाणी बोलणं टाळलं. जर त्यावर वेळीच चर्चा झाली असती तर केव्हाच शाळा, कॉलेज, बस स्टॉप, रेल्वे स्टेशन आणि कामाच्या ठिकाणी सॅनिटरी व्हेंडर बॉक्स लावले असते किंवा सरकारने जरी असे बॉक्स बंधनकारक केले असते. कदाचित हीच मासिकपाळी लज्जा आणणारी बाब वाटली नसती. आज राज्यात केंद्रात अनेक महिला सभागृहात प्रतिनिधीत्व करतात, त्या का नाही पुढाकार घेत बायकांचे ते दिवस सुखकर जाण्यासाठी? का नाहीत शाळामध्ये सॅनिटरी व्हेंडर बॉक्सची सक्तीचे बील आपण? नुसत्या 'गाय'च्या मागे जाण्यापेक्षा सरकारानं मायचं दुखणं समजून घेतलं असतं, तर जास्ती बरं झालं असतं.

'बेटी बचाओ, बेटी पढाओ'चा नारा देत सॅनिटरी नॅपकिन(पॅड) १२ टक्के कर लादण्याचा प्रस्ताव येतो, हा कर मंजूर होतो, ही नंतरची बाब. पण इतका कर का लावावा? त्यामागची कारण पाहणं सद्यस्थीतीमध्ये महत्वाचं वाटतं. एकिकडे मेकअपच्या वस्तू स्वस्त होत असताना महिलांच्या आरोग्यदायी गोष्टींना कर हा कोणता न्याय? कोणते बेटी बचाओचे नारे? कुठे चाललं स्त्री आरोग्य? काही महिन्यापूर्वी सोशल मिडियावर तरुणींनी 'हॅप्पी टू ब्लीड'चे कॅम्पेन केलं, त्यामुळे कुठेतरी मुली मासिक पाळीवर बोलत्या झाल्या आणि शंका विचारू लागल्या. त्यात सरकार कुठे होते? सरकारमधल्या महिला मंत्री का बोलल्या नाहीत? किंवा त्यानंतर स्त्रियांच्या आरोग्यावर कोणता नवा कार्यक्रम योजला?जनजागृती लांबच, पण आता गरज आहे आपली मासिक पाळी निरोगी करण्याची. त्याबरोबरच तिला सामाजिक न्याय मिळवून देण्याची. सॅनिटरी नॅपकिन(पॅड) टॅक्स फ्री होवो किंवा न होवो. आता अगदी गिफ्ट म्हणून किंवा अथवा अगदी एखाद्या महिलेला 'ओटी'बरोबर सॅनिटरी पॅड नॅपकिन देऊन तिला 'त्या' दिवसामध्ये 'ट्रेस फ्री' करणं गरजेचं आहे.

Updated : 28 May 2017 6:23 AM GMT
Next Story
Share it
Top