नात्यांचे अवघडलेपण व कामजीवन
Max Maharashtra | 19 May 2017 12:14 AM IST
X
X
कामजीवनातील लोप पावणारं समाधान ही ताणाचीच देण आहे. विवाह जीवन विस्कळीत होण्यात लैंगिक सुखात कमतरता अथवा अभाव, हे महत्त्वाचे कारण ठरते. लैंगिक सुख अथवा शरीर संभोग/ संबंध याबद्दलच्या योग्य व शास्त्रशुद्ध माहिती अभावी अनेक विवाहित जोडपी कोंडमारा करून जगत राहतात. प्रत्यक्षात अनेक वेळा अनेक समस्यांवर शास्त्रीय/ वैद्यकीय मार्गही उपलब्ध असतात; पण, संबंधित व्यक्ती योग्य मदत घेण्यास कचरतात.
प्रतीक्षा आणि अरुप सुमारे २७/२८ वर्षांचे होते. अजून लग्नाला एक वर्षही झाले नव्हते. त्यांच्यात आत्ताच भांडणे सुरू झाली होती. दोघेही उच्चशिक्षित होते. आयटी क्षेत्रात भरपूर पगाराची नोकरी होती. पैशाची सुबत्ता होती. वरवर पाहता भांडणासाठी काहीच कारण दिसत नव्हते. त्यांच्या कामाच्या वेळा मात्र अगदी विरुद्ध होत्या. अरुपला परदेशातील वेळापत्रकाप्रमाणे रात्री काम करावे लागे. प्रतीक्षाला सकाळी आठ वाजता घर सोडावे लागे. रात्री घरी येण्यास उशीर होत असे. संसार राजा-राणीचा होता; पण, संसारात शांतता-समाधान नव्हते. घरी येईपर्यंत प्रतीक्षा थकून जात असे. तिला त्यानंतर घरातली कामे करणे कठीण होत असे. नेमक्या त्याच वेळेला अरुप त्याच्या कामात गर्क असे. तो रात्रभर काम करत असे. दोघांमध्ये मोकळ्या संवादाचा नव्हे; तर, संवादाचाच अभाव होता. घराबाहेरील जबाबदाऱ्या सांभाळताना दोघांचे सांसारिक आयुष्य मर्यादित राहिले. खरे तर घरच्यांच्या संमतीने हा विवाह झाला होता. जोडीदार निवडून पारखून केलेल्या या विवाहात सौख्य मात्र राहिले नव्हते.
नवीन जुळलेल्या नात्यांमध्ये एकमेकांच्या सहवासाचा, मोकळ्या संवादाचा पूर्ण अभाव असला की ते एक प्रकारचे यांत्रिक आयुष्य जगत राहतात. शारीरिक व मानसिक अतिदमणुकीमुळे लैंगिक सुखात एकमेकांना साथ देणे त्यांना मग जड जाते. यातून समज-गैरसमज वाढीला लागतात. त्यामुळे जोडप्यांमध्ये परस्परांना नाकारल्याची भावना तयार होते. अनेक अडचणींना तोंड देताना संवादाअभावी दोघांत वितुष्ट येते. त्याचे खरे कारण अनेकदा, दोघे एकमेकांना वेळ देण्यात कमी पडणे, हेच असते. आयुष्यात कोणत्या वेळी कशाला प्राधान्य द्यायचे याविषयी दांपत्यांमध्ये मतभेद असता कामा नयेत. खरे तर विवाहाच्या सुरुवातीचा हा काळ एकमेकांना जास्तीत जास्त समजून घेण्यासाठी उपयोगात आणायचा असतो, पण दोघांनाही त्याची जाणीव असावी लागते. नवीन जुळलेल्या नात्यांमध्ये एकमेकांच्या सहवासाचा, मोकळ्या संवादाचा पूर्ण अभाव नसावा. दोघांतली भीडसुद्धा चेपली नव्हती. ते एक प्रकारचे यांत्रिक आयुष्य जगत होते. त्यांच्या जीवनात वैफल्याची भावना येऊ लागली आणि ती भावना विसरण्यासाठी दोघेजण आपापल्या कामात मन रमवत होते. दोघेही एका दुष्टचक्रात अडकले होते. विवाहाच्या सुरुवातीच्या काळातच त्यांचे नाते तुटायची वेळ आली होती. इतर नातेवाईक यथाशक्ती ही परिस्थिती बिघडवण्यास हातभार लावतच होते. जोडप्यामधील दुरावा वाढवण्यास तेही कारणीभूत होते. ही परिस्थिती आज अनेक घरांतून मोठय़ा प्रमाणात आढळते आहे.
आजचं जग खूप स्पर्धात्मक आहे. छोट्या छोट्या गोष्टी साध्य करण्यासाठी सुद्धा बराच संघर्ष करावा लागतो. ध्येय गाठण्यासाठीच्या या स्पर्धेत आपण निश्चयाने सहभागी होतो खरे, पण हिच स्पर्धा आपल्याच एका शत्रूला आमंत्रित करते- तो शत्रू म्हणजे ताण. आपल्या इच्छेविरुद्ध उद्भवणारा हा ताण आपल्या जीवनात न इच्छिलेले बदल घडवून आणतो. राहणीमानातल्या या बदलांमध्ये जेवणाच्या अनियमित वेळा, मधला आहार टाळणं, धान्ये, फळे, भाज्या, व्यायाम यांचा दैनंदिनीतला अंतर्भाव अतिशय कमी असणं किंवा अजिबात नसणं, आदींचा समावेश असतो. या अनियमिततेमुळे सध्याच्या एका अशा बहुचर्चित आजाराला आमंत्रण मिळतं, जो महिलांमध्ये आढळतो; तो आजार म्हणजे पीसीओएस म्हणजेच पॉलिसिस्टिक ओव्हरिअन सिण्ड्रोम. महिलांच्या सेक्स हार्मोन्समध्ये असंतुलन निर्माण झाल्याने मासिक पाळी अनियमित बनते, अंडाशयामध्ये गाठी निर्माण होतात, तर काही दुर्दैवी केसेसमध्ये वंध्यत्वही येते. पीसीओएस हा विकार आजकाल विशीतल्या तसंच तिशीतल्या तरुण महिलांमध्येही सर्रास आढळू लागला आहे. पीसीओएसशी संबंधित एक सर्वसाधारण कॉमन कारण म्हणजे वजन वाढणं आणि स्थूलपणा. या सगळ्या बरोबरच कामजीवनातील लोप पावणारं समाधान हे ही याच ताणाची देण आहे. विवाह जीवन विस्कळीत होण्यात लैंगिक सुखात कमतरता अथवा अभाव, हे महत्त्वाचे कारण ठरते.
लैंगिक संबंधांविषयी आपल्या कुटुंबातून, शाळांतून शास्त्रीय माहिती मिळविण्यात अनेक अडथळे असतात. लैंगिक सुख अथवा शरीर संभोग/ संबंध याबद्दलच्या योग्य व शास्त्रशुद्ध माहितीअभावी अनेक विवाहित जोडपी कोंडमारा करून जगत राहतात. प्रत्यक्षात अनेक वेळा अनेक समस्यांवर शास्त्रीय/ वैद्यकीय मार्गही उपलब्ध असतात; पण, संबंधित व्यक्ती योग्य मदत घेण्यास कचरतात. या विषयात स्वत:बद्दल व जोडीदाराबद्दल अवास्तव अपेक्षा असणे, अनैसर्गिक वागणे, विकृत वागणे, असे प्रकारही घडत असतात.
अनेक प्रसंगांत पतीच्या असंवेदनशील वागण्यातून उतावीळपणामुळे पत्नीला अनेक प्रकाराने शारीरिक हिंसाचारालाही बळी पडावे लागते. वैवाहिक जीवनाच्या नाजूक नात्यामध्ये उतावीळपणा क्लेशकारक ठरू शकतो. हे क्लेश स्त्रीला होऊ शकतात; तसेच पुरुषालाही होऊ शकतात. क्लेशकारक अनुभवामुळे भविष्यकाळातही त्याचे पडसाद उमटतात. आयुष्यातील अत्युच्च आनंदाच्या अनुभवाला अनेक जोडपी मुकतात. त्याचे विपरित परिणाम जोडप्याच्या भावजीवनावरही उमटतात. पत्नीने कामजीवन नाकारले तर, पतीचा छळ झाला असे मानून घटस्फोट मंजूर केला जातो. पतीच्या विपरीत अनैसर्गिक वागण्यामुळे पत्नीच्या अर्जाचाही न्यायालयात विचार होतो. अर्थातच न्यायालयीन प्रक्रिया त्रासदायक ठरते. अगोदरच उपाययोजना केली असेल तर अशी जाहीर मानहानी टळते.
कामजीवन हे निरामय असू शकते, आनंददायी असू शकते. याबद्दलच्या काल्पनिक ऐकीव कथा आणि वस्तुस्थिती यांमध्ये खूप तफावत असू शकते. असे प्रसंग टाळण्यासाठी विवाहाआधी जोडप्याने एकत्रित अथवा एकट्याने वैद्यकीय सल्ला घेणे योग्य असते. कुटुंब नियोजनाच्या विविध पद्धती जाणून घेणे जबाबदारीचे असते.
या प्रकारच्या अडचणी समाजातील प्रत्येक थरात असतात, पण उघडपणे त्याबद्दल बोलले जात नाही. विवाहित जोडपीसुद्धा याविषयी उपाययोजना करण्यासाठी उदासीन असतात.
विवाहेच्छुक स्त्री-पुरुष यांनी स्वत:चे आणि जोडीने व्यतित करण्याचे आयुष्य निरामय होण्यासाठी या विषयात शास्त्रशुद्ध माहिती घेणे, शंकानिरसन करून घेणे शहाणपणाचे ठरते.
वैयक्तिक स्वच्छता, नेटकेपणा, रसिकता याबद्दलची सजगता कामजीवन अधिक निरामय व आनंददायी करते.
अनेकदा जोडप्यांत जागेची कमतरता, घरातील वृद्ध तसेच मुले यांमुळेही कामजीवनात व भावनिक जवळीक साधण्यास अडथळे येतात. हळूहळू कामजीवनाला एक प्रकारे कंटाळवाणा सूर येतो व वागण्यातही यांत्रिकपणा येतो. खास करून स्त्रियांचे प्राधान्यक्रम बदलत जातात व ते अनेकदा त्यांच्या पतीच्या प्राधान्यक्रमाशी न जुळाल्याने दांपत्यात विसंवाद तयार होतो. विसंवाद जरी झाला नाही तरी अस्वस्थता राहते आणि ही अस्वस्थता कामजीवनात एक यांत्रिकता निर्माण करते. या यांत्रिकतेला अनेकदा पुरुष कंटाळतात व आपली सहचारिणी आपल्याला साथ देत नाही, या भावनेने ग्रस्त होत जातात.
मुळात कोणत्याही स्त्रीला फुलून येण्यासाठी काही कालावधी जाण्याची आवश्यकता असते. प्रापंचिक जबाबदाऱ्यांमध्ये गुंतलेलं तिचं मन लैंगिक क्रियेशी लगेच समरस होत नाही. त्यात जागांचा छोटा आकार, वयाने वाढलेली मुलं, घरातील वृद्ध सदस्य यांचंही दडपण असतं. याउलट पुरुष चटकन उद्दिपित होतात. त्यांच्या भावना लैंगिक क्रियेच्या केवळ विचारानेच अनावर होऊन, जननेंद्रियात ताठरता येते. लैंगिक क्रियेतील आनंद उपभोगल्यानंतर ते कर्तव्यपूर्तीच्या समाधानात चटकन झोपी जातात; परंतु स्त्रियांनाही कामक्रीडेचा परमोच्चबिंदू गाठून कामपूर्तीचं समाधान मिळणं आवश्यक असतं, या बाबीकडे पुरुष लक्ष देत नाहीत. कामकलेत प्रवीण असणारी काही जोडपी लैंगिक क्रियेनंतरच्या या महत्त्वाच्या क्षणांचा पुरेपूर वापर करतात. यावेळी दोन्ही जोडीदारांचा अहंगंड शून्य पातळीवर असल्याने उत्कृष्ट संवाद घडून येतो. दिवसभरातील चिंता, कटकटी काही वेळ दूर सारून ही जोडपी अनोख्या विश्वात रमतात. अशा क्षणांमुळे वैवाहिक जीवन खऱ्या अर्थाने समृद्ध होतं. वैद्यकशास्त्राने केलेल्या पाहणीनुसार पुरुषांना लैंगिक क्रियेतून शारीरिक आनंद मिळवायचा असतो; तर, स्त्रियांना सहवास, जवळीक साधून भावनिक सुख प्राप्त करायचं असतं. काही स्त्रियांना पन्नाशी ओलांडल्यानंतर खऱ्या अर्थाने लैंगिक सुखाचा प्रत्यय येतो. या वयोगटातील पुरुषांचा शारीरिक जोम कमी असल्याने ते लैंगिक क्रियेच्या शारीरिक बाजूऐवजी भावनिक बाजूकडे नव्याने लक्ष केंद्रित करतात. त्यामुळे लैंगिक क्रियेचा उपचार पार पाडण्याऐवजी पत्नीशी होत असलेल्या भावनिक जवळीकीकडे लक्ष द्यावंसं वाटू लागतं. स्त्रियांनाही लैंगिक क्रियेतील याच भागाचं आकर्षण असल्याने त्यांना कामक्रीडेमध्ये आनंद वाटू लागतो. लैंगिक क्रियेतील ‘फोर प्ले’ हा पहिला टप्पा प्रत्यक्ष लैंगिक क्रियेकडे नेणारा असतो. तर कामक्रीडेतील ‘आफ्टर प्ले’ हा शेवटचा टप्पा लैंगिक क्रिया कशी होती, या प्रश्नाचं सार असतो. अनेक पुरुषांना कामक्रीडेतील या तिसऱ्या टप्प्याची सुरुवात कशी करावी, याची माहिती नसते. वीर्यस्खलन झालं म्हणजे लैंगिक क्रिया आटोपली, अशी त्यांची धारणा असते. वैद्यकीय दृष्टिकोनानुसार पुरुषांची शारीरिक ठेवण, त्यांचे स्नायू, त्यांच्या शरीरातील रक्ताभिसरण यांची रचना स्त्रियांच्या शरीरापेक्षा भिन्न असल्याने लैंगिक क्रिया पूर्ण होताच त्यांना सुखद थकवा किंवा ग्लानी जाणवते. या ग्लानीमुळे आणि लैंगिक सुख प्राप्त झाल्याच्या आनंदात सहज झोप लागते. परंतु स्त्रिया कामपूर्ती न झाल्याच्या दुःखाने तळमळत पडून राहतात. यामुळे वैवाहिक सुखात असंतोष निर्माण होऊ लागतो. संसारात भौतिक सुखं हजर असली तरी हा कळीचा प्रश्न अधांतरी राहिल्याने स्त्रियांना संसार बेचव वाटू लागतो. त्यामुळे आपल्या सहचारीणीच्या सुखाकडेही लक्ष दिले गेले पाहिजे. एकमेकांचे प्राधान्यक्रम लक्षात घेऊन, एकमेकांना आनंद देता आला पाहिजे. स्पर्धा, पैसा, धकाधकीचे जीवन विसरून काही काळ का होईना, पण एकमेकांत रमता येणं अधिक महत्वाचं. विवाह टिकण्यासाठी परस्परांत मोकळेपणाने संवाद हवा, हेच अंतिमतः खरे!
प्रियदर्शिनी हिंगे
Updated : 19 May 2017 12:14 AM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire