Home > मॅक्स वूमन > (दुर्गा) मातांनो! साडीस्वप्नातून जाग्या व्हा!!

(दुर्गा) मातांनो! साडीस्वप्नातून जाग्या व्हा!!

(दुर्गा) मातांनो! साडीस्वप्नातून जाग्या व्हा!!
X

नवरात्र हा देवीचा, स्त्रीशक्तीच्या पूजेचा उत्सव असल्यामुळे या दिवसांत महिला कर्तबगारीचे जे काही गोडवे गायले जातात, ते पाहिले की आपल्या समाजात स्त्रीला अतिशय उच्च स्थान आहे असेच कोणालाही वाटावे. खरी परिस्थिती जाणुन घेण्यासाठी घराबाहेरही पडायची गरज पडत नाही. मात्र गोड गैरसमजात खूश असणारे वस्तुस्थितीकडे काणाडोळा करतात. खासकरून आपली ध्येयं साध्य करण्यात महिलांचा वापर केला जातो, हे त्यांच्या लक्षातच येत नाही. अनेक इंडस्ट्री यावर उभ्या आहेत. जाहिरात हे त्यातलं एक क्षेत्र. ज्यात महिलांचा वापर एक वस्तू म्हणूनच केला जातो. हे झाले स्पष्टपणे दिसणारे चित्र. आपण जर टीव्हीवरच्या मालिका पाहिल्या तर प्रश्न पडतो की त्यातली महिला पात्रं हे खरेच रोजच्या महिलांसारख्या आहेत का? अनेकदा ‘नाही’ असं उत्तर आलं तरी या मालिका पाहणारा मोठा वर्गही महिलांचाच आहे.

याच इंडस्ट्रीने तयार केलेला ट्रेन्ड म्हणजे साड्या! या साड्यांचं जे काही मार्केट तयार झालंय, ते केवळ या मालिकांच्या मदतीने. अंगाला घासतात, ओढतात, लागतात... तरीही मालिकांचा ट्रेन्ड म्हणू याच प्रकारच्या साड्या नेसणारा मोठा महिलावर्गही आहे. नवरात्रोत्सवात तर या सगळ्या ट्रेन्ड्सना उधाण येतं. या रंगांच्या साड्या नेसा आणि फोटो काढून पाठवा... असे आवाहन वर्तमानपत्रं करतात. यात महिला उत्साहाने सहभागीही होतात.

काहीसा विरंगुळा, रोजच्या दिनक्रमातून जरा वेगळेपणा असं म्हणत, याकडे लाइटली पाहिलं जातं. यात काय वाईट? असं जरी वरवर वाटत असलं तरी मुळात यात स्त्री सक्षमीकरणाचा काही विचार आहे का हे पाहिलं, तर या सगळ्यामागचा 'वेगळा' विचारच आपल्याला दिसतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्याला महिला सक्षमीकरणाचं रूप दिलं जाणं घातक आहे. वरवर पाहता हे रूप जरी सक्षमीकरणाचं वाटत असलं तरी फिरून भोपळे गल्लीच असते. ज्या व्यवस्थेच्या विरोधात उभं रहायची गरज असते त्याच व्यवस्थेजवळ येऊन थांबवले जाते. यातच नवीन भर घातली आहे लोकमतच्या नव्या उपक्रमाने! काय तर 'बांगड्या' हे काही दुर्बलतेचं प्रतीक नाही. म्हणून बांगड्या घालून फोटो काढा आणि पाठवा! मग त्यातले काही फोटो लोकमत प्रसिद्ध करणार. त्यातल्या काही ओळी वाचल्यावर आधी गोंधळायला होतं. त्या ओळी अशा- 'मी शिक्षण देते, मी संरक्षण देते'आता शांतपणे विचार केला की कळतं, बांगड्या काय शिक्षण देतात? काय संरक्षण देतात? बांगड्या घालणं म्हणजे दुर्बलतेच प्रतिक नक्कीच नाही, तसेच ते सबलतेचेही प्रतिक नाहीच ना? मग बांगड्यांना सबलतेच प्रतीक म्हणून तरी का तयार करायचं?

स्त्री असल्याबद्दल मनात दुय्यमता जशी मानू नये, तसंच स्त्री असल्याबद्दल कट्टर अभिमानही बाळगण्याची गरज नाही ना. कदाचित या उपक्रमानंतर पुरूषही बांगड्या घालू लागतील... जसे आता कानात बाळी घालतात तसेच! पण म्हणून बाईला सन्मान मिळणार आहे का? तिचे अधिकार तिला दिले जाणार आहेत का? की बायकांनी अभिमानाने बांगड्या घालाव्या यासाठी असे उपक्रम... की आणखी कसला नवीन बाजार?

केवळ महिला सक्षमीकरणाचा चांदीचा दिसणारा हा वर्ख खोटा आहे, आणि तो वेळेतच फाडायला हवा. स्वत:च्या बाजारात बायकांना वापरणं थांबवा, हे खरतर बायकांनीच ठणकावून सांगण्याची वेळ आली आहे. अश्या खोट्या भूलथापांना बळी पडू नका, मग आपोआपच हे बाजार बंद होतील. ठामपणे नाही म्हणायला शिका. प्रश्न विचारा की बायकांना बाजारात वापरणं थांबवणार कधी?

प्रियदर्शिनी हिंगे

Updated : 26 Sep 2017 12:29 PM GMT
Next Story
Share it
Top