Home > मॅक्स वूमन > डोंट Tax माय ब्लड

डोंट Tax माय ब्लड

डोंट Tax माय ब्लड
X

सध्या जीएसटीचे वारे वाहु लागले आहेत. परंतु समाजातील आगदी शेवटच्या स्तरातील सामान्य व्यक्तीवर याचा काय परीणाम होईल याचा विचार केला नसल्याचं चित्र पहायला मिळतंय. सर्वात महत्वाची बाब म्हणजे अजूनही वाडी, वस्ती, तांड्यावरती सॅनिटरी नॅपकीन पोहचलंच नाही. त्यामुळे सरकार त्यावर 12 टक्के tax लावून महिलांच्या आरोग्याकडे गांभीर्यानं पहात नाहीय असं म्हणायला पाहिजे.

सध्या सोशल मीडियावरतीही lahukalagaan सारख्या बऱ्याच कँपेन तीव्र निषेध करताना दिसत आहेत. कोणी सिंदूर, टिकली सारखं सॉनिटरी नॅपकिन taxfree मिळावं याबददलच्या आपेक्षा व्यक्त करत आहेत. तेव्हा आता सरकारने सॅनिटरी नॅपकीन करमुक्त करून रेशनिंगच्या दुकानावरही ते सहज उपलब्ध करून देण्याची गरज आहे. सध्यस्थितीत जवळपास 88 टक्के महीला पाळीदरम्यान कपडा किंवा अन्य साधनं वापरत असल्याचं सर्वेच्या माध्यमातून लक्षात आलंय. फक्त 35 टक्के पॅड्स आपल्या भारतात बनतात. तेव्हा बचत गटांनी सॅनिटरी नॅपकीन तयार केले तर त्यांना रोजगाराच्या संधी नक्कीच मिळतील. त्यामुळे महीलांच्या आरोग्याचाही प्रश्न काही प्रमाणात का होईना नक्कीच मिटेल. मासीक पाळीच्या वेळी योग्य शारिरीक स्वच्छता न ठेवल्याने अनेक प्रकारचे संसर्ग होतात.

मुळात आपल्याकडे मासीकपाळीबद्दल बोलायला संकोच असल्यामुळे संसर्गाबद्दल बोलण्यास महीला धजावत नाहीत. त्यामुळे मोठी समस्या उभी राहते. आजार बळावतो आणि गर्भाशय काढून टाकण्यापर्यंतची वेळ वेळ येते. त्यामुळे मासीकपाळीत महीलांनी सॅनिटरी नॅपकीनचा वापर करणे आतिशय गरजेचे आहे. आनसरवाडा येथील गोपाळवस्तीत गेल्या आठ महिन्यांपासून आम्ही महीलांना आंघोळ करणे, मासिकपाळी शारिरीक स्वच्छता कशी राखावी याची माहिती देतोय. घरोघरी जावून पॅड्स मोफत वाटप करणे, आरोग्यदूतामार्फत पॅड्स कसे वापरावेत याचा प्रत्यक्ष डेमोही दाखवला जातोय. तरीही महीला फारसा प्रतीसाद देत नसल्याच चित्र आज वाडीवस्त्यांवर दिसतं.

असं असताना सरकारने यावर 12टक्के कर लावलेला आहे. तेव्हा मोफत देऊन ही परिस्थीती आहे तर कर लावल्यानंतर किती महीला सॅनिटरी नॅपकीन वापराच्या प्रवाहात येतील याबद्दल शंकाच आहे. आनसरवाड्यासारख्या वस्तीत एकही महीला आंतरवस्त्र वापरत नाही. हे निदर्शनास आल्यानंतर या वस्तीत मोफत आंतरवस्त्र आम्ही वाटप केले. आजही वाडी, वस्ती, तांड्यावरती आरोग्याच्या सुविधा कोसो दूर आहेत. संतती नियमनाची कंडोमसारखी साधनं मार्केट, पाणटपरी, सिव्हील हॉस्पिटलमध्ये मोफत वाटली जात आहेत. एच.आय.व्ही. सारखा कार्यक्रमही सरकर राबवतंय. एच.आय.व्ही रूग्णांना मोफत आरोग्य सुविधा दिल्या जात आहेत. मग सॅनिटरी नॅपकीनसाठीच दुजाभाव का? कर्करुग्ण फस्ट स्टेजमध्ये असलेल्या महीलांना मोफत सॅनिटरी नॅपकीन व आरोग्यसुविधा का मिळत नाहीत? या सुविधा मिळल्या तर एकही कर्करुग्ण महीला भारतात दिसनार नाही. सध्या ग्रामीण भागात जीएसटी बद्दल एकच चर्चा सुरू आहे. गावात आम्हाला आधी एसटीची सोय करा, मग जीएसटीचं काय ते बोलू. मैलोन मैल पायी चालत जावं लागतय कसलं आलय जीएसटी? अशा सामान्य नागरीकांच्या प्रतिक्रीया ऐकायला येत आहेत.

सिंदूर व सॅनिटरी नॅपकीन या दोन्ही बाबी महीलांसाठी आतिशय महत्वपुर्ण आसल्यामुळे सिंदूरसारखं सॅनिटरी नॅपकीनही करमुक्त, जीएसटीमुक्त करावं हीच एक आपेक्षा.

- छाया काकडे

सचिव, विचारधारा ग्रामीण विकास संस्था, लातुर

Updated : 30 May 2017 8:34 AM GMT
Next Story
Share it
Top