Home > मॅक्स वूमन > गोष्ट स्कर्टची नाहीच !

गोष्ट स्कर्टची नाहीच !

गोष्ट स्कर्टची नाहीच !
X

एक ठळक प्रसंग डोळ्यासमोर उभा झाला, की तो निमायला काही काळ जावा लागतो. परवा असेच घडले. जे अजूनही हटता हटत नाही. त्या चित्रफितीने डोक्यात असे काही घर केले की, शरीर, मन बधिर झाले..

मोबाईलवर खेळत असताना माझ्या गॅलरीत अमुक एक व्हिडिओ येऊन पडला, तो बघून मी सुन्न झाले. वय हा मुद्दाच नाही. वास्तव पेच आणणारे आहे. पुढचे काही तास मी त्याच व्हिडिओबद्दल विचार करत होते. एरवी गॅलरीत आलेल्या एका 45 सेकंदाच्या व्हीडिओचा विचार केला नसता, आज मात्र सक्ती झाली होती विचार करण्याची ! मन पार विस्कटून गेले. विषण्ण झाले. चार-पाच मुलं आणि त्यांच्या मध्यात एक मुलगी, सगळे गणवेशात. साधारण शाळेतील वर्गातलं चित्रीकरण होतं. वर्गात सगळेच उभे राहतात असे, नाही का? मग यात सुन्न करणारं काय होतं? पराकोटीचे..! तर, या व्हिडिओत ही मुलगी स्वेच्छेने विवस्त्र होत होती, कॅमेऱ्यापुढे ! प्रत्येकाच्या हाती स्मार्ट मोबाईल आणि ते तिला रेकॉर्ड करण्यात मग्न. धक्कादायक प्रकार असा हे सगळं तिच्या संमतीने सुरू होतं. अनाकलनीय.. मला किळस आलीच पण अनेक प्रश्नसुद्धा पडले; ज्यांची उत्तरं शोधणं मला महत्वाचं वाटलं. त्या व्हीडिओमधलं तिचं आणि ह्या तिच्या मित्राचं वागणं चूक-बरोबर या दायऱ्यातून बघण्यापेक्षा, खंडन-मंडन करण्यापेक्षा मला ''हे आहे, असं आहे!'' याच दायऱ्यातून या विषयाकडे बघावसं वाटलं. (काही मुद्द्यांना पडताळून बघण्याच्या माझ्या इच्छेला मी आवर घालू शकले नाही. )

खूप आनंदाच्या क्षणी, अत्यंत दुःखात असताना, गेलाबाजार बऱ्याच दिवसांनी भेटल्यावर मी तडक जाऊन माझ्या मित्राला घट्ट मिठी मारते. तेव्हा त्या मिठीत आदर असतो, प्रेम असतं आणि नक्कीच मर्यादा असतात. ज्या असायला हव्या काही नात्यात. ज्या तो आणि मी बोलून दाखवत नाही. पण निर्विवाद पाळतो. मित्राला उघडपणे मिठी मारणे अथवा त्याच्या खांद्यावर हात ठेवणे हे सुद्धा अनेकांना पचनी पडत नसतांना व्हिडीओतील ही शाळकरी मुलगी त्यांना तिच्या स्कर्टला हात लावू देते? सर्वसाक्षी देव आणि सर्वसंमत दैवा पल्याड हे सगळे.. आणि हे असले कसले असतील मित्रं आणि ही कसली मैत्री?

किशोरवयीन मुला-मुलींना एकमेकांबद्दल मोठ्या प्रमाणात आकर्षण वाटतं. मग त्या 'अपोझिट सेक्स'च्या शरीराबद्दल जीज्ञासा वाटू लागते. आत्तापर्यंत शेंबड्या वाटणाऱ्या मुली लगेच मनाला सुंदर भासू लागतात. मानलं सगळं ठीक आहे, नैसर्गिक आहे. त्याचसाठी शाळांमध्ये शारीरिक शिक्षणाचे वर्ग घेतले जातात. जीज्ञासा वाटणं ठीक आहे पण परस्परांचा आदर वाटणं महत्वाचं आहे. अनेक गोष्टी अव्यक्त, लपवत असतांना हे असं वागणं, दिसणं आणि बिनभोभट सरावने कशाचं द्योतक आहे? पालक बोलतात का मुलांशी घरी या सगळ्या संदर्भात? आपण बोलतो का पालकांशी या संदर्भात? असे उलट सुलट प्रश्न मला याक्षणी पडले.

कंसेन्ट - संमती ! ती नाही म्हणत नाही किंवा उघडपणे हसते म्हणजे संमती देत असे नाही, हे लक्षात घ्यायला हवं आणि लक्षात ठेवायला हवं. तिने या चित्रीकरणाला नाही म्हणू नये? अजबच आहे, अतर्कही.. आणि जरी तिने नाही म्हटलं नाही तरी हे त्यांनी लक्षात घेऊ नये? शरीर, आकर्षण, संमती याच पट्टीत महत्वाचं म्हणजे आत्मसन्मान. कोण कुठला मुलगा/मुलं (कितीही जवळचे मित्रं असले तरीही) येऊन तिचा स्कर्ट वर करतात, आणि ही करू देते? इतकी आणि असली कसली प्रगती म्हणावी ही? माकडाचे माणूस झालो खरे पण वास्तवात फक्त शेपूट गळून पडले, असेच जाणवते. कसले नैतिक शिक्षण?? आपण प्रगत होत होत अधोगतीला लागतो असे मला वाटले.

काही दिवसांपूर्वी एका तरुणीने तिच्या वर्गातील मुलाविरोधात विनयभंगाचा गुन्हा नोंदवला होता, ती कोणत्या निकषांवर तिच्या वर्गमित्राच्या वागणुकीला अश्लील मानत होती? आत्मसन्मानाच्या, संमतीच्या नक्की कोणत्या? तो व्हीडिओ बघितल्यावर मला वाटलं, जर अश्लील हालचालींमुळे त्या मुलाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला तर मग हा सविनयभंग समजावा का की आहे ? असेल तर मग हे सगळेच दोषी नाहीत का? व्हीडीओमध्ये वर्गात वर्दळ आहे हे जाणवतं, पण कोणीच तिथे उघडपणे सुरू असलेल्या या कृत्याबद्दल एक अवाक्षर बोलू नये? या मुलांच्या दृष्टीने नेमकं बरोबर काय आहे? विचारांची गती कुठल्या दिशेने आहे? परवा वादविवाद सुरू असताना कोण्या एका मित्राने मुद्दा मांडत म्हटले, 'टेक्नॉलॉजी खड्यात पोहचू शकते, सकारात्मकरीत्या स्वीकारली जाऊ शकते तर नवे विचार-आचार का नाही?' तेव्हा मला त्यात जरी तथ्य वाटत असलं आज वाटतंय, नवे आचार- विचार इतके उथळ असतील तर या प्रकारची प्रगती काय उपयोगाची? प्रश्नांचे जंजाळ नुसतेच.

लक्षपूर्वक तो व्हीडिओ बघितल्यावर लक्षात येतं की ती मुले भारतीय विद्यार्थी नाहीत. ते साधारण पूर्व-आशियाई भागातील कुठल्यातरी देशातील आहेत. कुठल्याही देशातली मुलं असली तरी त्यांच्या विचारांचा देशाच्या प्रगतीवर, रचनेवर प्रभाव पडतो, असं फार पूर्वी सांगितलं होतं. तेच इथेही लागू होतं.

जगभरात परिषदा, वादविवाद, कार्यक्रम, सर्व्हे होतात आहेत, स्त्री-पुरुष समानतेसाठी आणि हे सगळे कोणत्यातरी भलत्याच दुनियेत आहेत. विसंवाद नि विसंगती ! ही कुठल्या प्रकारची समानता रुढ करतात आहेत? एक आणखीन प्रश्न उपस्थित राहतो तो म्हणजे, पुढच्या पिढीला आपण कोणत्या आणि कशा विक्षिप्त जगात आणणार आहोत. हा वैचारिक जुगार आहे. खेळणाऱ्याला कळतच नाही, की जिंकले तरी अनैतिकच आहे हे सगळे. खरंय, आपण पुढारतोय पण जितके पाऊलं पुढे जातोय त्याहून दुप्पट पाऊलं मागे येतोय का? मती गुंग व्हावी असेच सारे. ती मुलं १५-१६ वर्षांची असतील, पण मग त्यांचं निरागसपण हरवलंय का? माझे भावंड त्याच वयोगटातील आहेत, त्यांच्या मनात होणारी तगमग आणि ह्या मुलांच्या मनातली तगमग इतकी कशी वेगळी? कुठल्या अमुक एका भावनेचं नावीन्य उरलंच नाही का? आणि ते का नाही उरलंय? एक मात्र खरं; सखोल, खऱ्या संवादाची गरज निर्माण झाली आहे...डोके सुन्न झालंय. शालेय मानसशास्त्रात याचे उत्तर नक्कीच नसेल.

- भार्गवी पांडे

Updated : 7 July 2017 1:47 PM GMT
Next Story
Share it
Top