Home > मॅक्स वूमन > गैरवापर सोशल मीडियाचा!

गैरवापर सोशल मीडियाचा!

गैरवापर सोशल मीडियाचा!
X

अनेक माध्यमांप्रमाणेच सोशल मीडिया हे देखील एक माध्यम आहे. इतर माध्यमांपेक्षा याचा वेग आणि आवाका अतिशय मोठा आहे. हे जरी खरे असले तरी माध्यमांना दुषणे देऊन काही उपयोग नाही. माध्यमाचा वापर कसा करावा, हे ज्यांना माहीत आहे ते अधिक प्रभावीपणे योग्य कामांसाठी त्याचा वापर करून घेतात. व्यक्ती तितक्या प्रकृती या उक्तीप्रमाणे असंख्य प्रकृती या सोशल मीडियावर कार्यरत आहेत.

सोशल मीडिया ही आजच्या तरुणांसाठी अन्नपाण्याइतकी अत्यावश्यक गोष्ट झाली आहे. सतत उठता बसता, कोठेही जा, यांचा आपला तो मोबाइलशी चाळा सुरूच! या सोशल मीडियामुळे अनेकांच्या वैवाहिक आयुष्यात तेढ निर्माण होत आहेत. बिनु अशीच एक मध्यमवयीन तरुणी. लग्नाला चार वर्ष झाली आणि नवऱ्याला परदेशी नोकरीत उत्तम संधी आली. ही संधी सोडायची नाही, असं जरी तिच्या नवऱ्यानं ठरवलं असलं तरी दोन वर्षांचं लहान मूल, आजारी सासू सासरे या जबाबदाऱ्या सोडून बिनुला नवऱ्यासोबत परदेशी जाणं शक्य नव्हतं. त्यामुळे बिनु भारतातच राहिली आणि नवऱ्याच्या प्रगतीत कुठलीही आडकाठी नको म्हणून तिने या सगळ्या जबाबदाऱ्या आपल्या अंगावर घेत नवऱ्याला परदेशी जाण्यासाठी मार्ग मोकळा करून दिला.

घरात सासू सासरे आणि लहान मुलं यामुळे सुरवातीला बिनुचा वेळ जात असे. नवरा सहा महिन्यांतून कधीतरी आठवडाभरासाठी घरी येत. तेवढ्यातच तिला समाधान मानावे लागे. दिवसभर काम असल्याने ती थकून जात असे. मात्र जबाबदारीच्या ओझ्याने तिला कोणासोबत मैत्री करण्यासाठी वेळच मिळत नसे. मग मन आणि त्या बरोबर शरीरही थकत असे. हे सगळं जेव्हा तिच्या नवऱ्याला समजलं तेव्हा त्याने बिनुचा त्याच्याशी सहज संवाद व्हावा म्हणून तिला सोशल मीडियाची तोंडओळख करून दिली. स्काइपवरून तिचा नवऱ्याशी संवाद होऊ लागला. दूर असला तरी घरातल्या रोजच्या रोज होणाऱ्या घटना बिनुला नवऱ्याला सांगता येऊ लागल्या. सहज आणि सोप्या पद्धतीने होणाऱ्या या संवादाने बिनू अतिशय खूष होती. एका सोशल मीडियाची तिला ओळख झाली. पुढे हळूहळू ती इतर सोशल मीडियाचाही वापर करू लागली. वेळेचे नियोजन दर वेळेस बसत असे, असे नाही. इकडे रात्र तर तिकडे दिवस यामुळे बिनुला वेळ मिळाला तर तिच्या नवऱ्याला मिळत नसे आणि नवऱ्याला वेळ असेल, तेव्हा बिनुला वेळ मिळत नसे. यामुळे अनेकदा बिनु नाराज होत असे. मात्र हे करताना तिचा अनेक सोशल मीडियावर हात बसत चालला होता.

अनेक सोशल साईटचे ऍप तिने आपल्या फोनवर डाऊनलोड करून घेतले होते. या साईटच्या माध्यमातून ती अनेक लोकांच्या ओळखीची होत चालली होती. माहिती असलेली आणि माहिती नसलेली अशी अनेक जगाच्या पाठीवरील विविध भागातील, लोकांशी आता ती जोडली जात होती. हे आपले मित्र आहेत, असं ती म्हणत असे. दिवसेंदिवस तिच्या या साईटवरील मित्रांच्या संख्येत वाढ होत चालली होती. अशा सगळ्या परिस्थितीतून जात असताना तिला बबन भेटला- याच आभासी दुनियेत. बबन नुकताच आपलं शिक्षण पूर्ण करून नोकरीला लागला होता. नवीन शहर आणि नवीन काम यामुळे तसा बबनलाही बराच रिकामा वेळ मिळत असे. तोही अनेक तास सोशल मिडीयावर घालवत असे. जुजबी माहितीच्या आधारे या दोघांची ओळख सोशल मोडीयावर झाली. हळूहळू अनेक खाजगी माहिती एकमेकांना सांगितली जाऊ लागली. तासन् तास मग दोघेही सतत एकमेकांशी बोलत असत सोशल मिडीयाच्या माध्यमातून. बिनुला तर जणू नवे पंखच मिळाले होते. रात्र रात्र जागून तच्याशी गप्पा मारत, घरात चालणाऱ्या कुरबुरी, मनाचा एकाकीपणा ती बबनशी बोलून घालवू लागली. सहज, साधी, सोपी वाटणारी ही मैत्री हळूहळू वेगळ्या वाटेने प्रवास करू लागली. “तुला एकट का वाटतं?” “मी आहे ना?” अशा अनेक वाक्यांतून आपल्या भावना हे दोघे प्रकट करत होते. सोशल माध्यमातून बिनुने बबनसारख्या अनेकांशी मैत्री करायला सुरवात केली. आभासी वाटणाऱ्या या दुनियेतून तिने मग आपल्या इच्छा पूर्ण करायला सुरवात केली. हळूहळू कामभावना ही चाळवत असे, तेही दोघांच्या नकळत, अनेक पुरुषांशी विविध वेळेला संवाद साधत, त्यातच आपल्या कामभावनांचं शमन या संवादांमार्फत ती करत असे. दुधाची तहान ताकावर भागवतात, त्याप्रमाणे ती अनेक पुरुषांची नग्न चित्रे मागवू लागली आणि स्वतःचीही पाठवू लागली. सुरवातीला केवळ मनाचा एकाकीपणा घालवण्यासाठी व विरंगुळा म्हणून वापरल्या जाणाऱ्या सोशल मीडियाचा वापर ती प्रणयासाठी करू लागली. या सगळ्यांतून तिला समाधान मिळत नव्हतं. मात्र क्षणिक सुखाची प्राप्ती तिला जाणवत होती. अशा प्रकारे केलेलं कामजीवन हे गुपित राहील, अस तिला मनोमन वाटत होतं. मात्र घडलं काहीतरी विपरीत. बबन तिला सतत भेटण्यासाठी आग्रह करत असे. ती काही ना काही कारण सांगून ते टाळत असे. बिनुला आपला संसार धोक्यात टाकायचा नव्हता. केवळ कामपूर्ती सहज होत होती म्हणून ती या पुरुषांना चाळवत होती. बबन मात्र हट्टाला पेटला होता. काहीही झालं तरी भेटायचंच, असं तो म्हणत होता. त्याची तिच्या घरीही येण्याची तयारी होती. बिनुने अनेक खोटी माहिती सांगितली होती आणि तिला कोणी आभासी दुनियेतील आपल्या खऱ्या जीवनात नको होते. ती त्याला टाळत राहिली. एके दिवशी सासऱ्यांचे मित्र व घरची सगळी मंडळी घरी जेवायला आली आणि बिनुच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांचा मुलगा दुसरा तिसरा कोणी नसून बबनच होता. आता त्याला बिनुबद्दल सर्व माहिती कळली होती. बिनुलाही कळालं होतं की बबननेही बरीच खोटी माहिती स्वतःविषयी सांगितली होती. असं असलं तरी बबन आता तिला सतत ब्लॅकमेल करत होता. सेक्सची मागणी करत होता. 'तयार हो, नाही तर तुझ्या घरच्यांना तुझे हे असले फोटो दाखवतो.' अशी धमकी देत होता. बिनुपुढे मात्र खूप मोठा प्रश्न आ वासून उभा होता. हे कसं टाळावं, काय करावं, हे काही केल्या बिनुला सुचतच नव्हतं.

बिनुसारखीच अनेकांची स्थिती होत असल्याचं आपण रोज पेपरमध्ये येणाऱ्या बातम्यांत वाचतो आहोत. जागतिक लोकसंख्येच्या एक तृतीअंश इतक्या मोठ्या प्रमाणावर सोशल मिडीयावर लोक सक्रिय आहेत. इतक्या मोठ्या संख्येने सक्रिय असणाऱ्या या माध्यमाचा प्रभाव जितका मोठा असतो, त्याचप्रमाणे त्याचे दुष्परिणामही मोठे आहेत. बिनुसारख्या असंख्य महिला या सोशल मीडियाच्या माध्यमातून अत्याचाराच्या बळी ठरतात. दिवसेंदिवस अशा घटनेच्या संख्येत वाढच होत चाललेली आपल्याला दिसले. फेसबुकवर मैत्री झाली आणि भेटण्यासाठी गेलेल्या मुलींवर बलात्कार, सोशल मीडियाच्या माध्यमातून आक्षेपार्ह फोटोंचे आदान प्रदान आणि त्या फोटोमुळे धमक्या, सोशल मीडियामार्फत लैंगिक शोषण अशा एक ना दोन अनेक घटना वर्तमानपत्राचे मथळे बनून आपल्यासमोर येत असतात. हे मथळे वाचले की आपण माध्यमावर शिव्यांची बरसात करून रिकामे होतो. इतर अनेक माध्यमांप्रमाणेच सोशल मीडिया हे देखील एक माध्यम आहे, इतर माध्यमांपेक्षा याचा वेग आणि आवाका अतिशय मोठा आहे. हे जरी खरे असले तरी माध्यमांना दुषणे देऊन काही उपयोग नाही. माध्यमाचा वापर कसा करावा, हे ज्यांना माहीत आहे ते अधिक प्रभावीपणे योग्य कामांसाठी त्याचा वापर करून घेतात. व्यक्ती तितक्या प्रकृती या उक्तीप्रमाणे असंख्य प्रकृती या सोशल मिडीयावर कार्यरत आहेत. बिनुने इतर पुरुषांशी गप्पा मारत, वेगवेगळ्या पद्धतीने त्यांच्या भावना चाळवल्या. आपल्या वाट्याला आलेला एकाकीपणा तिला त्रास देत होता. मात्र त्यावर तिने शोधलेला उपाय अतिशय आत्मघातकी होता. आपल्या इच्छा, आपल्या जोडीदाराजवळ बोलून दाखवून जर सहजतेनं तिनं मार्ग काढला असता तर या सगळ्या प्रकरणाची सुरवातच झाली नसती.

एखादा निर्णय घेताना आपल्या जोडीदारावर त्याचा काय प्रभाव पडणार आहे, याचा विचार दोघांनीही केला पाहिजे. लैंगिक इच्छा होणे ही मानवाची नैसर्गिक गरज आहे. आपल्या जोडीदाराच्या या नैसर्गिक गरजांबद्दल स्त्री आणि पुरुष दोघांनीही जागृत राहायला हवं. त्याचबरोबर एकमेकांशी आपल्या इच्छा सहजतेनं बोलून दाखवण्याइतका मनमोकळा संवाद दांपत्यात असायला हवा. त्यामुळे जोडीदारत स्वीकाराची भावना आपोआपच बळावते. सेक्स ही जरी नैसर्गिक भावना असली तरी ती केवळ शारीरिक नसते, त्यामुळे या भावनेवर ताबा मिळवणं तसं फारसं अवघड नसतं. त्यासाठी हवा असतो, दांपत्यात विश्वासपूर्ण आणि मनमोकळा संवाद. आपल्या जोडीदाराला आपली काळजी आहे. आपल्या गरजा आणि इच्छा यांविषयी त्याला आस्था आहे, हा विश्वास जेव्हा दाम्पत्यात रुजतो, तेव्हा या नैसर्गिक इच्छेवर सहज विजय मिळवता येतो. दांपत्याने एकमेकांमध्ये विश्वास आणि मनमोकळा संवाद कसा साधायचा, हे एक कौशल्याचे काम आहे. मात्र हे कौशल्य प्रत्येक दाम्पत्याने आत्मसात करणे, त्यांच्या संसारासाठी हितावह ठरणारे आहे.

प्रियदर्शिनी हिंगे

Updated : 14 April 2017 12:23 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top