एकाच घरातील जोड्या
X
एकाच घरात अनेक व्यक्तिगत आयुष्ये असतात आणि त्यांनी ते केवळ आपले व्यक्तिगत आयुष्य म्हणुनच जपले पाहिजे. ते इतरांसारखे असावे, असा आग्रह तर मुळीच धरू नये व तसा प्रयत्नही करू नये. प्रत्येक जोडप्याची आपापली एक प्रेमाची भाषा असते. त्या भाषेतच ते रागावतात, एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करतात आणि एकमेकांना समजूनही घेतात. अनेकदा ही भाषा त्या दोघांना सोडून इतरांना समजतही नाही. अथवा समजली आहे, असे इतरांना वाटते; मात्र, तसे नसते. ही त्या दोघांची व्यक्तिगत भाषा असते आणि ती तशीच असावी.
आजकाल अनेक ठिकाणी लहान कुटुंबे बघण्यास मिळतात. एकत्र कुटुंब पद्धत हळूहळू लोप पावत आहे. परिणामी, आई वडीलांसोबत राहणे यालाच तरुण-तरुणी एकत्र कुटुंब समजतात. पूर्वी अगदी चार-पाच भावंडांचे संसार आई वडिलांसोबत आजी-आजोबांबरोबर बहरत असत. असे जर अजून काही काळानंतर तरुणांना सांगितले तर त्यांना ती काल्पनिक किंवा एक अशक्य गोष्टच वाटेल, इतकी लहान कुटुंब पद्धत आता मुरली आहे. मुळातच एक किंवा दोन यावर मुले नसतात, आणि ती एकाच घरात राहतील, अशी खात्रीही कोणी देऊ शकत नाही. असे असले तरी काही ठिकाणी गरज म्हणून काही जोड्या एकत्र संसार करताना दिसतात. व्यवसायाची गरज म्हणून तर, नोकरी करत असल्याने घरात आधार हवा म्हणून अथवा आई वडिलांपैकी कोणी अतिशय गंभीर आजारी असल्याने सुश्रुषा करण्यासाठी अशा काही कारणाने काही जोड्या एकत्र संसार करताना दिसतात. या जोड्या एकत्र असल्या तरी त्यांचे त्यांचे व्यक्तिगत आयुष्य असतेच. एका जोडीच्या व्यक्तिगत आयुष्यावर दुसऱ्या जोडीच्या व्यक्तिगत आयुष्याचा परिणाम झालेला दिसून येतो. अनेकदा यातून काही गंभीर समस्याही उभ्या रहातात.
अशाच कुटुंबांपैकी एक कुटुंब जांभळे कुटुंब. या कुटुंबात राजेश्वरी आणि राजकिरण संसार करत होते. आईवडिल आणि हे दोघे, असा काही काळ एकत्र घालवल्यानंतर राजकिरणच्या भावाचं लग्न झालं आणि त्याची बायको घरात आली. सुरुवातीचे काही दिवस अतिशय छान गेले; मात्र काही महिन्यांतच कुरबुरी सुरू झाल्या. राजकिरणच्या एक बाब लक्षात आली की, इतकी वर्षं अगदी समंजसपणानं संसार करणारी राजेश्वरी अचानक बदलली आहे. मग काय छोटया छोटया गोष्टीवरुन दोघांत खटके उडण्यास सुरवात झाली. सुरवातीला होईल सगळे नीट, असे वाटून दुर्लक्ष झाले; मात्र, या खटक्यांचे रुपांतर भांडणात होण्यास सुरवात झाली. हळूहळू दोघेही अस्वस्थ झाले. मुळात प्रश्न काय, हेच दोघांना समजेनासं झालं होतं.
“राजेश्वरी असं वागेल, असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं.” आपल्या मनाची उद्विग्नता त्याने पहिल्याच वाक्यात स्पष्ट केली. “सतत काहीतरी काढून भांडत असते. ते दादा आणि वाहिनी बघा! दादाने कसं प्रेझेंट आणलं. तुम्ही कधी तरी आणलं का माझ्यासाठी? तिच्या या कालच्या प्रश्नानं तर मला भोवळच आली. लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला मी पन्नास दुकानं फिरून हिच्या आवडत्या रंगाची साडी शोधली आणि घेऊन आलो; तर, त्यावेळेस हिला आनंद होण्याऐवजी रागच आला. इतक्या महागाची साडी कशाला आणली? ही साडी मी कधी घालणार? असलं काही आणत जाऊ नका, अस तिने मला बजावून सांगितले. तेव्हा जरा नाराजच झालो होतो मी. पण हिनेच मला समजावलं. म्हणाली, “इतक्या महागाची साडी मी काम करताना कशी वापरणार? वापरणार नाही, तर असे पैसे कशाला वाया घालवायचे? त्याच पैशात घरातील वापरायची वस्तू येऊ शकते.” तिचं म्हणणं मला पटलं. आणि तेव्हापासून ग्रिटींग्ज, फुलं, प्रेझेंट या सर्वांना आम्ही फाटा दिला. हा तिचाच हट्ट होता म्हणून आणि आज पंधरा वर्षांनी ही माझ्याशी भांडते आहे. का? तर तुम्ही मला प्रेझेंट का नाही आणलं म्हणून!” काय करावं, हे मलाच कळत नाही. माझ्या आईबाबांनी आयुष्यभर आमच्यासाठी खस्ता खाल्ल्या. कधी अर्धपोटी राहून आम्हाला शिकवलं. आज माझे चांगले दिवस आले आहेत, अर्थात, त्यात राजेश्वरीचाही मोठा वाटा आहे; पण, आई बाबांना मी फिरायला पाठवलं. तर, त्यावरूनही किरकिर म्हणे, ते काय नवीन लग्न झालेलं जोडपं आहे का? कसे गेले ते दोघे फिरायला.” बरं, मी कधी आम्हा दोघांनी फिरायला जायचं ठरवलं तर, ही नको म्हणायची सगळ्यांसोबत जायचं असेल, तर 'जाऊ' म्हणायची आणि आता असं. दादा-वहिनी रात्री बाहेर जेवायला जाणार म्हटलं की माझ्या अंगावर काटाच येतो, कारण त्यावरून पण रात्री बेडरुममध्ये काहीबाही ऐकावं लागणार, हे मला माहिती असतं. आधी राजेश्वरी अशी वागत नव्हती. आताच हिला काय झालंय, ते समजेनासं झालंय. मला जेव्हा हिचा सहवास हवा असायचा, तेव्हा काही कारण काढून ती ते टाळायची. माझी आजही त्याबाबत तक्रार नाही. तिच्या जागी ती योग्य असायची; पण, मग हे सगळं आताच का सुरू झालंय, ते समजत नाहीये. आताही एखाद्या दिवशी बाहेर जाऊ म्हटलं तर तिची कारणं तयार असतात. मग हिला नक्की काय हवंय, तेच कळत नाही. त्यासाठी मग ही रोज रात्री मी रुममध्ये गेल्यावर कुरकूर का बरं करते, हेच समजत नाही. वैतागलेला राजकिरण बोलत होता. निश्चितच या सर्वांचा त्यांच्या कामजीवनावरही परिणाम होत असणार.
वरवर पहाता आपल्याला राजेश्वरी विक्षिप्त वागते की काय, असं वाटतं? मात्र जरा मागे जाऊन विचार केला की आपल्याला राजेश्वरी असं का वागते, हे लक्षात येईल. राजेश्वरीचं लग्न होऊन जेव्हा ती घरी आली, त्या वेळेस स्वतः तिने संसार आणि घराची जबाबदारी व्यवस्थित सांभाळली. त्यामुळेच कदाचित पुढे आर्थिक सुबत्ता आली. मात्र संसाराच्या या तारेवरच्या कसरतीत ती आपल्या गरजांना विसरली. केवळ घराला तिने प्राधान्य दिले. हळूहळू सर्व स्थिरस्थावर झाल्यावर सर्वांनी आपापल्या व्यक्तिगत आयुष्यात त्याचा आनंद घेण्यास सुरवात केली; मात्र, राजेश्वरी तसं करू शकली नाही. कारण ती या सर्व गोष्टींत अडकून पडली आणि आपण जसे आपल्या गरजांना बाजूला सारून संसार केला, तसाच इतर जोड्यांनीही करावा, अशी तिची अपेक्षा. या अपेक्षेमुळे तिने आपलेच व्यक्तिगत आयुष्य अस्वस्थ करून घेतले.
प्रत्येक जोडप्याची आपापली एक प्रेमाची भाषा असते. त्या भाषेतच ते रागावतात, एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करतात आणि एकमेकांना समजूनही घेतात. अनेकदा ही भाषा त्या दोघांना सोडून इतरांना समजतही नाही. अथवा समजली आहे, असे इतरांना वाटते; मात्र, तसे नसते. ही त्या दोघांची व्यक्तिगत भाषा असते. त्यामुळे इतर कोणी ती समजावून घेण्याची गरजही नसते. ती व्यक्तिगत असल्याने त्याचे गुपित जपलेले केव्हाही उत्तमच. ती सर्वांची सारखीच असली पाहिजे, असा आग्रह धरणे मात्र चुकीचे आहे. आजूबाजूची परिस्थिती या भाषेला काही वेळा कारणीभूत ठरत असली, तरी एकाच घरात राहात असणाऱ्या जोडप्यांची प्रेमाची भाषा भिन्न असू शकते. त्या भाषेतच त्या जोडप्याचा संवाद होत असतो आणि त्यातूनच नाते बहरत असते. बहरणारे हे नाते कामजीवन अधिक सुखकर आणि समाधानकारक बनविते. आपल्या जोडीदाराच्या प्रेमाची भाषा कुठली, हे ओळखून त्या भाषेचा सराव करता आला पाहिजे. इतर जोडप्यांची भाषा आत्मसात करायचा प्रयत्न केला, तर संवादाऐवजी त्याचे रुपांतर विसंवादातच होते. या प्रेमाच्या भाषेला वयाचाही अडसर नसतो. अनेक जोडपी तरुण वयात एकमेकांचा हवा तसा सहवास अनुभवू शकत नाहीत. मात्र सर्व प्रापंचिक जबाबदाऱ्या संपल्यानंतर जर ते सहवास अनुभवू इच्छितात, तर त्याचे घरातील इतर तरुण जोडप्यांनी स्वागतच करायला हवे. एकाच घरात अनेक व्यक्तिगत आयुष्ये असतात आणि त्यांनी ते केवळ आपले व्यक्तिगत आयुष्य जपले पाहिजे. ते इतरांसारखे असावे, असा आग्रह तर मुळीच धरू नये व तसा प्रयत्नही करू नये. ज्येष्ठ मंडळींनीही आमच्या वेळेस असे नव्हते, हे पालुपद सतत लावू नये. जो नियम तरुणांना लागू पडतो, तोच ज्येष्ठांनाही लागू पडतो. कुठल्याही वयातल्या जोडप्यांच्या प्रेमाची भाषा एक असणार नाही, असे नाही. पण तसा आग्रह असणे अगदी चुकीचे आहे. व्यक्ती तितक्या प्रकृती, त्याप्रमाणे जितक्या जोड्या तितक्या त्यांच्या प्रेमाच्या भाषा. त्यामुळे आपली जोडी ही एकमेवाद्वितिय आहे, हे प्रत्येकाने ध्यानात घेतले पाहिजे
प्रियदर्शिनी हिंगे