एकतेचं आव्हान नाही सोपं
X
‘आपला हा समाज उत्सवप्रिय आहे’ असं म्हणत लोकांना गुंगवणं नि त्यांना ते आणि तेवढंच करत ठेवणं... हे सत्तेच्या चाव्या हातात असलेल्यांचं जुनं अस्त्र. मीडिया, शिक्षणव्यवस्था त्यांच्या हातातल्या कठपुतळ्या. त्यामुळे सणा-उत्सवांच्या मोसमात दिसतात भिन्नधर्मीयांनी एकमेकांच्या उत्सवात घेतलेल्या सक्रिय सहभागाच्या बातम्या. शालेय पुस्तकातल्या धड्यांत मुलामुलींचा ग्रुप असेल तर त्यात दिसतात सर्व धर्मीय नावं.
राष्ट्रध्वजाबद्दल मान अभिमान आहेच. पण तो फार जाणीवपूर्वकच तयार करण्यात आला आहे, हे कोण नाकारेल? खंडप्राय देशात एकता राखणं हे इतकं मोठं आव्हान आहे की ते पेलण्यात सत्ताधारी वेळोवेळी अपयशी झालेले दिसतात. (दंगलींची, कत्तलींची आणि अत्याचारांची, द्वेषतून करण्यात आलेल्या कृत्यांची वारंवारता पाहावी) त्यामुळेच ‘धर्मनिरपेक्ष’ धोरणाचं रिफ्लेक्शन सामान्य लोकांच्या वर्तनात दिसणं कठीण आहे, हे उत्तरोत्तर मान्य करत राज्यकर्त्यांनी चातुर्याने त्याचं रूपांतर ‘सर्वधर्मसमभावा’मध्ये केलं. शालेय पातळीवरही हा भाव पचवता येतो. चित्रपटांनाही हा विषय सोसतो नि भाबड्या नागरिकांनाही निरागसपणा टिकवायला तो बरा पडतो. रॅशनल होणं नको असलेल्यांना उत्सवप्रियता आवडते. बालपणी केक कापून वाढदिवस साजरं करण्यात आनंद घेतलेला असतो व ही प्रथा दुसऱ्या धर्माच्या लोकांकडून उचलली, हे कळल्यानंतरही त्या आनंदाला मुकायचा नसतं म्हणून मग आपण सर्व धर्मांबाबत समान भाव बाळगतो, असं व्यक्ती स्वत:ला समजावते. आपल्यातलं हे बाल्य सामान्य माणसाला जपायचं असतं. अशांना संत गाडगे महाराज खडसावायचे... ‘दत्ताला नैवेद्य दाखवता नं...? पीराला नवस करता नं...? विरोबाला भजता नं...?’
पण गाडगे महाराज पचवायला कठीण. त्यामुळे ते आपल्याला नकोत. मनातून परका वाटणारा वरवर आपला भासवून घ्यायचा असेल तर वरवरच्या गोष्टी करता येतीलच की. हा सोपा मार्ग आहे. तो आपण अनुसरतो आहोत. लोकशाही देशात लोकशाहीची मूल्यं जपण्यासाठी शालेय पातळीवरच सर्वधर्मसमभाव रुजवला जातो. मग काय करतात की दहीहंडीचं सेलिब्रेशन, इफ्तारचं सेलिब्रेशन वगैरे प्राथमिक वर्गातल्या मुलांकरिता निवडलं जातं. शहरांमध्ये शाळकरी मुलं ही सरकारी अधिकाऱ्यांची मुलं असतात, सरकारी कर्मचाऱ्यांची मुलं किंवा परंपरागत व्यवसाय सोडून अन्य अनुत्पादक सेवा करणाऱ्यांची मुलं असतात. थोडक्यात मध्यमवर्गीय. त्यांना अशा उत्सवांतून आपण एकतेचा संदेश पाळतोय असं वाटून स्वत:बद्दल, शाळेबद्दल नि समाजाबद्दल भारी वाटतं. पण खरोखरच विविधतेचे परिणाम ज्यांच्या वाट्याला येतात, त्यांना हे असं भारी वाटत असेल का? उत्सवांचं उदात्तीकरण करणाऱ्यांनी याचा विचार करावा.
सामान्य माणसांमध्ये लोकप्रिय पंतप्रधान म्हणून राजीव गांधी यांचं नाव घेतलं जातं. गावखेड्यातल्या माणसांच्या या लोकप्रियता त्यांनाही हवीशी वाटली असावी. त्यामुळे जिथे जिथे जातील, तिथला वेष, पगडी ते धारण करायचे. लोक खूश. नेता खूश. पण हे करून खरोखर एकता साधते का? ‘विविधतेतली एकता’ हेही असंच एक फसवं स्लोगन. ऐकायला गोड वाटतं पण अमलात आणायला कठिण. ही विविधता खरोखरच जगा, असं आवाहन केलं तर किती जणांना ते आवडेल?
मुस्लीम व्यक्तीनं गणपती बसवला किंवा देवी घरी आणली म्हणून त्या व्यक्तीला हिंदू धर्माचा संदेश मान्य आहे, असं म्हणता येतं का? किंवा हिंदू व्यक्ती इफ्तारमध्ये सहभागी झाली म्हणून तिला इस्लामचा संदेश मान्य असतोच, असं म्हणता येतं का? याचाच अर्थ अशा बाबींना बातमीचं मूल्य देणं म्हणजे निव्वळ उदात्तीकरण होय.
धर्मनिरपेक्षता ही यापेक्षा वेगळी आहे. एवढ्या मोठ्या देशाचा गाडा हाकायसाठी लोकशाही निवडण्यात आली. संविधानाला प्रमाण मानलं तर धर्मनिरपेक्षता बाणवणं कठीण नाही हे जाणवतं. ज्यांनी हा मार्ग निवडला त्यांनी शाळेत प्रवेशाच्या वेळी मुलांच्या फॉर्ममध्ये फक्त राष्ट्रीयत्व लिहिलेलं असतं. धर्म या सदरात काही लिहिलेलं नसतं. गेल्या जनगणनेच्या वेळी धर्म या सदारात निधर्मी असं लिहिण्याचं प्रमाणही वाढलेलं आढळलं होतं. हा बुद्धिप्रामाण्यवाद मीडिया आकर्षक पद्धतीने सादर करता येणार नाही कदाचित, पण तो समाजाला खऱ्या अर्थाने विकासाच्या दिशेने नेणारा आहे.
अलीकडेच लंडनस्थित मित्रानं सांगितलेला अनुभव येथे सांगितल्याशिवाय राहवत नाही. कामावर जाण्याच्या रोजच्या रस्त्यावर एक चर्च दिसत असे. काही दिवस हा मित्र अन्य ठिकाणी गेला होता. तिथून परतल्यावर त्याच रस्त्यानं निघाला असता चर्च नाहीसं झालेलं नि एक अन्य वास्तू त्या ठिकाणी उभी राहिलेली दिसली. चौकशी करता कळलं की ही जागा अन्य कामासाठी योग्य वाटल्यामुळे प्रशासनानं चर्च थोड्या अंतरावर हलवलं आहे. प्रार्थना करू इच्छिणारे तिथे जाऊन प्रार्थना करतात. कोणतीही बातमी न होता, शांतपणे प्रार्थनास्थळाविषयीचे निर्णय प्रगत देशांत घेतले जातात. त्यांचा आदर्श समोर ठेवायचा तर हा बुद्धिवाद आधी अंगिकारायला हवा.
सुलेखा नलिनी नागेश