Home > मॅक्स वूमन > आता तरी धर्माचं सोवळं झुगारणार का?

आता तरी धर्माचं सोवळं झुगारणार का?

आता तरी धर्माचं सोवळं झुगारणार का?
X

पुण्यात राहणाऱ्या हवामान खात्याच्या माजी संचालिका डॉ. मेधा खोलेंनी आपल्या घरी स्वयंपाक करणाऱ्या निर्मला यादव या मराठा जातीच्या महिलेविरोधात जात व वैधव्य लपवून सोवळे मोडल्याची फिर्याद दिली आहे. या निमित्ताने खोले यांच्या तसेच समाजाच्या ब्राह्मणी मानसिकतेवर राज्यव्यापी चर्चा सुरू झाली आहे. या चर्चेत मेधा खोले टीकेचे लक्ष्य बनल्या आहेतच; पण त्याचबरोबर ब्राह्मणी मानसिकतेने ग्रस्त असलेले ब्राह्मणही टीकेचे लक्ष्य आहेत.

या घटनेमुळे तसेच त्या घटनेवर आलेल्या प्रतिक्रियांमुळे आपल्यासमोर काही प्रश्न उपस्थित होतात. अशा प्रकारची तक्रार दाखल करून घेताना पोलिसांनी राज्यघटनेतील समतेच्या तत्त्वाशी छेडछाड होत असल्याचा मुद्दा विचारात घेतला होता का? स्त्रीचे पावित्र्य तिचा नवरा जिवंत असण्या/नसण्यावरून का ठरवले जावे? इतर वर्ण/जातींच्या तुलनेत ब्राह्मण श्रेष्ठ आहेत असे मानणार्‍या खोले एकट्याच आहेत का? हे व असे इतर अनेक प्रश्न आहेत; परंतु या लेखाच्या मर्यादेत आपण केवळ यांचाच विचार करू. सुरुवातीला पोलिसांनी फिर्याद तांत्रिकदृष्ट्या चुकीची असल्यामुळे नोंदवून घेता येणार नाही, असे स्पष्ट सांगूनही खोले बाई फिर्याद नोंदविण्यावर ठाम होत्या. त्यांच्या दबावाखाली येऊन पोलिसांनी फसवणूक, धमकी व हल्ला करणे या कलमांखाली गुन्हा दाखल केला. या प्रकरणी झालेले नुकसान आर्थिक नसून धार्मिक भावनेचे आहे.

खोले बाईंच्या मते यादव बाईंनी जात व वैधव्य लपवणे ही फसवणूक आहे. परंतु कायदा असे मानत नाही. त्यामुळे हे कलम चुकीचे लावले गेले आहे. येथे धार्मिक भावना दुखावल्याचे कलम लावणे तांत्रिकदृष्ट्या सयुक्तिक आहे. परंतु तसे केल्यास धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थळ या आधारे शासनाला नागरिकांमध्ये भेद करता येणार नाही, या घटनेतील मुलभूत अधिकारांशी संबंधित (१४) कलमाचे उल्लंघन होईल! त्यामुळे तसे करता येणार नाही. परंतु या निमित्ताने नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचे हनन करणाऱ्या चालीरिती व धर्म परंपरा यांचे काय करायचे, हा प्रश्न सोडवण्याची संधी सरकार व न्यायव्यवस्था यांच्याकडे चालून आली आहे. ते ती साधणार का, हा त्याहून मोठा प्रश्न आहे! ते काहीही करोत; पण आपण ज्या धर्माला आपला समजतो तो आपल्याला माणूस म्हणून प्रतिष्ठा देत नसेल, अवमान करत असेल तर त्याचे काय करायचे हे ठरविण्याची वेळ आली आहे की नाही, याचे उत्तर त्या धर्माचे पालन करणार्‍यांनीच द्यायचे आहे. यातला दुसरा मुद्दा असा आहे की डॉ. खोले या उच्चपदस्थ सरकारी अधिकारी असून त्यांनी जातिभेद केल्याचा तसेच विधवा महिलांना कमी लेखल्याचा लेखी पुरावा त्यांनीच उपलब्ध करून दिला आहे. यावर सरकार व न्यायालय काय कारवाई करते त्यावर त्यांची निष्पक्षता ठरणार आहे.

दुसरा प्रश्न आहे स्त्रीची पात्रता तिच्या स्वतःच्या गुणवत्तेवर अवलंबून नसून तिचा विवाह झाला आहे का आणि असेल तर तिचा नवरा जिवंत आहे का यावर आजही अवलंबून असावी का? डॉ. मेधा खोले स्वतः एक स्त्री आहेत. त्यांची स्वतःची पात्रता धार्मिक बाबतीत याच आधारावर ठरत असणार. म्हणजे त्या स्वतःच धार्मिक मान्यतांचा बळी आहेत. तरीही त्याच मान्यतांवर आधारलेल्या त्यांच्या धार्मिक भावना दुखावतात! याचा अर्थ त्या स्त्रियांना कमी लेखतात. स्वतः डॉक्टरेट मिळवलेली असूनही स्त्रियांना कमी लेखण्याची त्यांची धार्मिक मान्यता त्यांना स्वतःचा अपमान करण्यापासूनही रोखू शकत नसेल तर त्या स्वतःपासून किती दूर गेल्या आहेत यातून त्यांची परात्मतेची पातळी लक्षात येते.

दुसर्‍या बाजूला ब्राह्मणेतर समाजात स्त्रीला दुय्यम समजणारे, तिची पात्रता तिच्या गुणवत्तेऐवजी तिच्या नवर्‍याच्या जिवंत असण्या/नसण्यावरून ठरवणारे लोक नाहीत का? प्रचंड संख्येने आहेत! पण त्यांच्या चर्चेत क्वचितच हा मुद्दा येतो. हिंदु समाजात जवळपास सर्वच ठिकाणी महिलांशी संबंधित धार्मिक कार्यक्रमात केवळ सवाष्ण महिलांनाच आमंत्रित करण्यात येते. त्यामुळे स्त्रीची पात्रता या आधारावर ठरविणाऱ्या मेधा खोले या एकट्याच नाहीत. त्यांची संख्या प्रचंड आहे आणि ही प्रचंड संख्याच मेधा खोलेसारख्यांना आत्मविश्वास देते.

तिसरा प्रश्न आहे ब्राह्मण श्रेष्ठ आहेत असे मानणार्‍या खोले बाई एकट्याच आहेत का? तर नाही ब्राह्मण व ब्राह्मणेतर समाजात असे मानणार्‍या लोकांची संख्या प्रचंड आहे. हिंदु समाजात जन्मापासून मृत्यूपर्यंत जेवढे संस्कार व्यक्तीवर होतात त्या प्रत्येक वेळी ब्राह्मणेतर लोक पुरोहित म्हणून ब्राह्मण पुरुषांना बोलावतात. ज्यांनी ब्राह्मणाच्या हस्ते लग्न लावून घेतलेले आहे, घराची वास्तुशांती करून घेतली आहे, व्यवसायाच्या जागेची पूजा करून घेतलेली आहे, असे अनेक लोक मेधा खोलेंच्या जातीयवादी मानसिकतेवर टीका करण्यात सहभागी झाले होते. त्यांनी काही चुकीचे केले असे मी म्हणणार नाही. पण पूर्वी आपल्या धार्मिक कार्यक्रमात आपण ब्राह्मणाला विशेष दर्जा देऊन स्वतःसह इतर जातीच्या लोकांचा अवमान केला ही एक चूक होती आणि तिची पुनरावृत्ती होऊ देणार नाही, अशा जाणिवेतून ते खोले बाईंवर टीका करत असतील तर ती एक चांगली सुरुवात होऊ शकते. काही लोकांच्या बाबतीत हे खरे आहे पण बहुसंख्य लोक धर्माशी फारकत घेण्याची हिंमत करत नाहीत. त्याचे कारण धर्माला बाजूला सारल्यास वाट्याला येणारे सांस्कृतिक तुटलेपण. हे केवळ मोठ्या समुहाने केले तरच होऊ शकणारी गोष्ट आहे.

वेद, पुराणे हा आपला सांस्कृतिक ठेवा आहे आणि तो नाकारल्यास आपण सांस्कृतिकदृष्ट्या पोरके होऊ असे बहुसंख्य हिंदु ब्राह्मणेतरांना वाटते. हे धर्मग्रंथ आजच्या काळात थोतांड वाटतात. पण त्या त्या काळात माणसाला पडलेले प्रश्न व त्या काळात त्यांच्या कुवतीप्रमाणे त्यांनी शोधलेली उत्तरे, संकटे व शत्रू व त्या विषयीची मते यांचे ते संकलन आहे. ते काळाबरोबर अपडेट करत रहायला हवे होते. काही काळ ते झालेही. पण काही लोकांचे हितसंबंध या ग्रंथांच्या अपडेट होण्यामुळे दुखावले जाऊ लागले. मग त्यांनी संघटितपणे हे ग्रंथ अपडेट करायला विरोध केला. त्यावर कोणी प्रश्न उपस्थित करू नये म्हणून प्रश्नकर्त्यांचा बंदोबस्त करणारी यंत्रणा (धर्म, ईश्वराची भीती) उभी करून तेच तिचे अधिकारी (धर्माधिकारी) बनले.

हे ग्रंथ अपडेट होऊ दिले गेले असते तर आज भारताकडे स्वतःचे वैद्यकीय, अभियांत्रिकी, अवकाश, संगणक क्षेत्रातील अद्ययावत साहित्य उपलब्ध असते. बरं आता परदेशी ज्ञानावर का होईना या क्षेत्रात पदवी/पदव्युत्तर पदवी घेऊन सुद्धा आपण तेच अपडेट न केलेले ग्रंथ प्रमाण मानत असू तर अशा लोकांनाही अपडेट कसे करायचे हा एक प्रश्नच आहे. लोच्या असा आहे की औपचारिक दृष्ट्या जरी आपण विज्ञानाचे शिक्षण घेत असलो तरी अनौपचारिक दृष्ट्या, सांस्कृतिक दृष्ट्या आपण अपडेट न केलेल्या मागास प्रथा परंपरा पाळत असतो. कारण त्याला समाजमान्यता असते. त्या परंपरा नाकारायच्या म्हणजे येड्यात जमा व्हावे लागते. 2000 साली आजीच्या दहाव्यात मी गेलो नाही तर वडिलांनी बोलणे सोडले होते.

आपण शिकलेला वैज्ञानिक दृष्टिकोन प्रत्यक्ष आयुष्यात वापरावा तर नातेवाईकांपासून तुटणे, सांस्कृतिकदृष्ट्या समाजापासून तुटलेपण वाट्याला येते. यालाच बहुतेक लोक घाबरतात. आणि सामान्य माणसाने का घाबरू नये? पण उच्चशिक्षित लोकांसाठी सध्या वातावरण इतके भयावह नाही. आपल्याशी सहमत असणारे लोक आपल्याला भेटू शकतात. आपल्या सोबत कोणीतरी आहे. तुकाराम, कोपर्निकस, गॅलिलिओ यांच्या विरोधात आख्खी व्यवस्था होती. पण ते न घाबरता अपडेट करत राहिले. त्यासाठी जीव गमवावा लागला त्यांना.

आपण वैज्ञानिक दृष्टिकोन प्रत्यक्ष जीवनात उतरवायचे ठरवले तर लगेच कोणी मारायला येण्यासारखी परिस्थिती नाही. त्यामुळे विज्ञानाच्या सामान्य साधकांनी घाबरण्याचे कारण नाही. प्रचारकांच्या बाबतीत हत्या होण्याचा धोका संभवतो. मात्र त्यामुळे घाबरून जाऊन शांत बसलो तर ज्या दर्जाचा समाज अस्तित्वात येणार आहे त्यात धार्मिक दहशतवाद्यांची दहशत केवळ धर्म आणि देवळापुरती मर्यादित राहणार नाही. ती शिक्षणव्यवस्था, न्याय व्यवस्था आदी क्षेत्रांनाही गिळंकृत करणार आहे. त्यामुळे वेळीच सावध होऊन किमान व्यक्तिगत पातळीवर तरी वैज्ञानिक दृष्टिकोन प्रत्यक्ष जीवनात उतरवायचा निश्चय करावा लागणार आहे.

धनंजय कानगुडे

Updated : 9 Sep 2017 9:17 AM GMT
Next Story
Share it
Top