Home > मॅक्स व्हिडीओ > स्मशान भूमीने त्याला दिला दोन दिवस आसरा!

स्मशान भूमीने त्याला दिला दोन दिवस आसरा!

स्मशान भूमीने त्याला दिला दोन दिवस आसरा!
X

'स्मशानातील सोनं' ही अण्णा भाऊ साठे यांची प्रसिद्ध कथा आहे. या कथेचा नायक भीमा त्याच्या एका संवादात म्हणतो, "खरी भूत स्मशानात नाही तर माणसात राहतात". याची प्रचिती विटा शहरातील एका हातमाग कामगाराला आली. हा कामगार इचलकरंजी येथे काम करत होता.

लॉकडाउन झाल्यानंतर काही दिवस कसे बसे त्याने काढले. उपासमार होत असल्याने त्याने गाव जवळ करायचं ठरवलं. पण गावी जायला काही साधन नव्हते. इचलकरंजी येथून रेल्वे च्या ट्रॅक वरून चालत चालत तो किर्लोस्कर वाडीला आला. रात्री तेथे मुक्काम केला. तेथील कर्मचाऱ्यांनी त्याला जेवण दिले. रात्र काढल्यावर सकाळ पुन्हा त्याचा प्रवास सुरू झाला. आळसंद या गावातील शाळेत त्याने एक मुक्काम केला. तिथे एका घरातून जेवण मिळाले. यानंतर तो विटा शहरात पोहचला. मात्र, तिथे त्याला नातेवाईकांनी घरात घेण्यास नकार दिला. तो सांगतो

"तहसील कार्यालयात सांगितले नगरपरिषद येथे जा. तिथेही त्यावेळी दाद मिळाली नाही, यानंतर मी एक दिवस बाजार समितीतील स्मशानभूमीत झोपलो. दुसऱ्या दिवशी तिथेच झोपलो. तर स्मशानभूमीत येऊन तेथील हमालाने हाकलवून लावले. माणसे जवळ घेत नसल्याने मी दुसऱ्या स्मशानभूमीत जाऊन झोपलो.’’

स्वतः च्या घराच्या चार भिंतीत सुरक्षित वाटते. मात्र, घरातून नाकारल्याने या कामगाराला स्मशानभूमी सुरक्षित वाटली.

स्मशान भूमीत त्याची हातावर पोट असणारी बहीण त्याला डब्बा पोहचवत राहिली. दुसऱ्या दिवशी या घटनेची चर्चा सुरू झाल्याने तात्काळ त्याला एका शाळेत नेण्यात आले. या नंतर मॅक्स महाराष्ट्र बरोबर बोलताना त्याने शाळेत वीज पंखा पाणी याची सोय नसल्याने तिथेही त्याचे हाल सुरू आहेत असे सांगितले.

ज्या कामगारांच्या जीवावर शहरं उभी राहतात. त्या कामगाराला आज शहरं सामावून घेऊ शकत नाहीत. ही वस्तुस्थिती आहे.

Updated : 24 May 2020 3:51 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top