घरी जाण्याची परवानगी मिळाल्याच्या आनंदात मजुराचा मृत्यू

5371

देशभरात स्थलांतरीत कामगारांचे हाल सुरू आहेत. कुणाचा रस्त्यात अपघाताने मृत्यू होतोय. तर कुणी भुकेने मरण पावत आहेत. गरोदर महिला रस्त्यातच बाळंत होण्याच्या घटना घडत आहेत.

रामसखा नावाचा एक उत्तर प्रदेशातून आलेला हातमाग कामगार सांगली जिल्ह्यातील विटा शहरात अनेक वर्षापासून राहत होता. त्याच्या मुलाचे लग्न 28 तारखेला होणार होते. अनेक दिवसापासून तो गावी जाण्यासाठी खटपट करत होता. त्याने केलेल्या अर्जाच्या उत्तराची आतुरतेने वाट पाहत होता. आज त्याला तहसील कार्यालयातून जाण्याची सोय केली असल्याचा फोन आला. या आनंदात तो घरातून पळत बाहेर आला. शेजारच्या दुकानात जाऊन तो म्हणाला की “मुझे फ्री मे घर जाणे के लिये फोन आया है, अब मैं इतने दिनो के बाद मेरे घर जा सकूंगा’’.

असं म्हणत तो इतर मित्रांना सांगायला पुढे गेला आणि तिथे रस्त्यावर असलेल्या आंब्याच्या झाडाखाली चक्कर येऊन पडला. लोकांनी डॉक्टरांना बोलवलं असता त्याचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले. प्रशासनाने त्याच्या कुटुंबीयांना याबाबत कळवले आहे. इतके दिवस घरी जाण्याची वाट पाहणाऱ्या मजुराचा मृत्यू परवानगी मिळाल्याच्या आनंदातच झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.