Exclusive: मुख्यमंत्र्यांच्या गाडीवर शाईफेक करणारी ‘स्वाभिमानी’ शर्मिला मॅक्समहाराष्ट्रवर

मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेच्या तिसऱ्या टप्प्यात आज अहमदनगरमधून सुरूवात झाली. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा नेत्या शर्मिला येवले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यावर शाई फेक केली.
“माननीय आमदार मधुकर पिचड आणि त्यांचे सुपुत्र वैभव पिचड यांनी जी काही कारणे देत भाजपात प्रवेश केला आहे ते अयोग्य आहे. पिचड घराण्याकडे गेल्या चाळीस वर्षांपासून सत्ता आहे आणि या काळात त्यांनी एकही विकासकाम केलेले दिसत नाही. विकासकामांसाठी मिळालेल्या अनुदानावर यांनी गेली चाळीस वर्षे लाखां-लाखांचे परदेश दौरे केले आहेत.” असे म्हणत त्यांनी पिचड घराण्यावर संताप व्यक्त केला.
मुख्यमंत्र्यांच्या गाडीवर शाईफेक हल्ला करण्यामागे तीन मुख्य कारणे असल्याचे शर्मिला येवले यांनी सांगितले.
– मुख्यमंत्र्यानी भाजपाची उमेदवारी वैभव पिचड यांना सोडून इतर कोणालाही द्यावी ही एक मतदार म्हणून माफक अपेक्षा आहे.
– युवती आणि महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आहे. मुख्यमंत्री साहेबांनी यात लक्ष घालून योग्य ती अंमलबजावणी करावी.
– MPSC आणि UPSC परीक्षांचे महापोर्टल थांबवावे अशी मागणी चारशेहून अधिक मुलींनी मुख्यमंत्री कार्यालयासमोर केली आहे. महापोर्टल बंद करा अथवा आम्हाला आत्महत्या करण्याची परवानगी द्या असे आवाहन करत रिझल्ट मध्ये होणारे गैरप्रकार रोखण्याची मागणी केली आहे.
मुख्यमंत्र्यांनी या तीनही मागण्यांवर लवकरात लवकर निर्णय द्यावा नाहीतर महाराष्ट्रातील कोणत्याही नेत्याला असे रस्त्यावरून फिरू देणार नाही असा इशारा शर्मिला येवले यांनी केला आहे.