Home > News Update > लॉकडाऊनमुळे कुंभारवाड्यातील मजुरांचा रोजगार 'लॉक'

लॉकडाऊनमुळे कुंभारवाड्यातील मजुरांचा रोजगार 'लॉक'

लॉकडाऊनमुळे कुंभारवाड्यातील मजुरांचा रोजगार लॉक
X

करोना विषाणूमुळे वाढत्या मृत्युसंख्येबरोबरच तमाम अर्थव्यवस्थेला खीळ बसली असतानाच आता भारताच्या विकास दराबाबतचे घसरते अंदाजही व्यक्त होऊ लागले आहेत.

कोरोना वायरसने आधी चीनमधे धुमाकूळ घातला. आता माणसांच्या पेशी खाऊन जिवंत राहणारा हा वायरस जगभरात पसरतोय. माणसं मारणाऱ्या या वायरसमुळे चीनने आपला शेअर बाजार तात्पुरता बंद करण्याचा निर्णय घेतलाय. आता या वायरसने जगभरातल्या अर्थव्यवस्थांनाही पोखरायला सुरवात केलीय. कोरोना वायरसचे चीनच्या आणि जगाच्या अर्थव्यवस्थेवरही मोठे परिणाम होताहेत.

कोरोना विषाणूची झळ ही भारतालाही मोठ्या प्रमाणात बसली आहे. आतापर्यंत भारतात कोरोना विषाणूची लागण झालेल्यांची संख्या ही ९०० च्या वर गेली आहे आणि महाराष्ट्रत ही संख्या १८० वर आहे. महाराष्ट्र कोरोना रुग्णांच्या बाबतीत देशात आघाडीवर आहे. या सर्व परिस्थितीत भारताची अर्थव्यवस्थेची कंबरही मोडली गेली आहे त्यामुळे कित्येक व्यवसाय या सर्व काळात बंद झाले आहेत.

धारावी मधील कुंभारवाडा हा परिसर सर्वपरिचित आहे. इथे कुंभारांची वस्ती आहे आणि जवळपास ४ ते ५ हजार कुटुंब येथे राहतात. त्यांचा पिढ्यानपिढ्या मातीची मडकी घडवण्याचा व्यवसाय आहे. त्यांची मडकी संपूर्ण देशभरात जातात. कुंभारवाड्यातल्या या छोट्या छोट्या गल्ल्यांमध्ये खूप साऱ्या भट्ट्या आहेत. मात्र, या भट्ट्या सध्या बंद आहेत.

हातावर पोट असणारे अनेक मजूर येथे काम करत असतात. कोरोना व्हायरसच्या या परिस्थितीत कुंभरवाड्यात असणाऱ्या मजूर वर्गाशी 'मॅक्समहाराष्ट्र'ने संवाद साधला.

आम्ही बादल नावाच्या एका मजुराने आपल्या व्यथा मांडल्या. त्यांनी सांगितलं की, इथे सगळे हातावर पोट असणारे मजूर आहेत. दिवसाचे कधी ३०० तर कधी ४०० रुपये मिळतात. कुंभरवाड्यात मातीच्या पोत्यांची हमाली करतो. एका पोत्याचे ५-१० रुपये मिळतात. एकावेळी अनेक कुंभरांकडे काम सुरू असतं. पण या कोरोना विषाणूमुळे आमच्या व्यवसायाची खाट पडली आहे आणि खूप बिकट अशा परिस्थितीला सामोरे जावं लागत असल्याचं त्यांनी सांगितलं.

गावी कुटुंब राहतं. आताच्या परिस्थितीत आम्ही काय खायचं आणि गावी काय पाठवायचं असा प्रश्न पडलाय. लॉकडाऊनमुळे घराबाहेर पडणं कठीण झालंय. परंतु घरी बसून तरी आम्ही काय करणार, आम्हाला घरी बसून करमत नाही. त्यामुळे या कुंभरवाड्याच्या गल्लीमध्ये बसतो आणि वेळ घालवतो असं त्यांनी सांगितलं. आता ही परिस्थिती लवकरात लवकर सुधारावी आणि आमची रोजीरोटी पुन्हा सुरू व्हावी अशी ईच्छा त्यांनी व्यक्त केली.

Updated : 1 April 2020 11:34 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top