Home > News Update > राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्यानं उचलला उदयनराजेंना हरविण्याचा विडा...

राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्यानं उचलला उदयनराजेंना हरविण्याचा विडा...

राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्यानं उचलला उदयनराजेंना हरविण्याचा विडा...
X

राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे यांनी आज भाजप पक्षात जाहीर प्रवेश केल्यानंतर राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी त्यांच्या पक्षांतराविषयी तीव्र नाराजी व्यक्त करत उदयनराजेंचा राजकीय इतिहास सांगितला. सोबतच “आमच्या पक्षातुन खासदार झालेले उदयनराजे भोसले हे आज भाजप मध्ये गेले आहेत, परंतु जेव्हा येथील पोटनिवडणुक होईल तेव्हा आम्ही उदयनराजे यांचा पराभव करु” अशी प्रतिक्रिया त्यांनी आज मुंबई येथे पत्रकारांशी संवाद साधताना दिली आहे.

“उदयनराजे हे यापूर्वीही भाजपमध्ये होते, ते आमदार असताना १९९९ साली राष्ट्रवादीने त्यांचा पराभव केला होता. पाच वर्षानंतर त्यांच्या आईंसाहेबांच्या माध्यमातून पवार साहेबांकडे आग्रह करण्यात आला होता. ते पक्षात सामील झाले आणि पक्षाने त्यांना खासदार केले. आतापर्यंत उदयनराजे यांनी कायम पार्टीला कमजोर करण्याचे काम केले आहे. आम्ही पोटनिवडणूक पूर्ण ताकदीने लढू. राजे दिवसभर आणि रात्रीला काय करत असतात याची माहिती येथील मतदारांना आहे. मतदार त्यांना आपली जागा दाखवतील” अशी अपेक्षाही नवाब मलिक यांनी व्यक्त केली.

देशातील सर्व संस्थानिकांना मोदी भाजपामध्ये घेत आहेत. त्यांच्या कडे हजारो एकर जमिनी असून त्या विकण्याची परवानगी देणार असल्याची शंका त्यांनी व्यक्त केली मात्र सरकारने राज्यात शिवाजी महाराजांची एक इंच जरी जमीन विकायचा प्रयत्न केला तर आम्ही ते खपवून घेणार नाही असा इशारा मलिक यांनी दिला आहे.

“राज्यातील लोक डरपोक लोकांची साथ देणार नाहीत. आम्ही यापूर्वीही उदयनराजे आणि भास्कर जाधव यांना हरवले होते. राज्यात आम्हाला लोकसभेत ३८ टक्के मते मिळाली काहीं लोकांनी आमच्या १० टक्के मतांचे विभाजन केले. राज्यात आता ७० टक्के लोक मोदी आणि फडणवीस यांच्या विरोधात आहेत. विधानसभा निवडणुकीत आम्ही या मतदारांपर्यंत जाऊन आमची ताकद दाखवु” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Updated : 15 Sep 2019 2:30 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top