वारीची परंपरा खंडीत होण्याची ही पहिलीच वेळ आहे का?

कोरोनाच्या संकटामुळे यंदा पायी वारी होणार नाहीये. पण असे पहिल्यांदाच झाले आहे, असे नाही. विशेषतः ब्रिटिशकाळात पंढरीच्या सामूहिक पायी वारी करण्यावर बंधने आली होती, अशा नोंदी आहेत. इतिहास अभ्यासक संजय सोनवणी सांगतात, “जेव्हा जेव्हा दुष्काळ पडले, तेव्हा तेव्हा वारीवर परिणाम झाला आहे. वारकरी हे मुख्यतः शेतकरी, पशुपालक असल्याने त्यांना दुष्काळामुळे वारीला जाता आलेले नाही. उदा. संत तुकाराम महाराजांच्याच काळात १६३०मध्ये दुर्गाडीचा प्रसिद्ध दुष्काळ पडला होता. इसवीसन १२९६ ते १३०७ या काळातही मोठा दुष्काळ वारकरी पंढरीला जाऊ शकले नसावेत.

१९४२-४५च्या दरम्यान पहिले महायुद्ध आणि चलेजाव चळवळ यामुळे ब्रिटिशांनीच सामूहिक वारीवर बंदी घातली होती. त्याचप्रमाणे प्लेगच्या साथीचाही मोठा तडाखा विशेषतः पुण्यातून जाणाऱ्या संत ज्ञानदेव, संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याला बसला होता. अर्थात विदर्भ, मराठवाड्यात त्यावेळी प्लेगचा प्रादुर्भाव फारसा नसल्याने त्या भागातील वारकरी पंढरपूरला वारीसाठी आले होते.”

संत तुकाराम महाराजांचे नववे वंशज आणि शेडगे दिंडी क्रमांक ३ चे प्रमुख जयसिंगदादा मोरे सांगतात, “१९१२मध्ये प्लेगच्या काळात संसर्गापासून वाचण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पालखी सोहळ्यावर बंदी घातली होती. १९४५ मध्ये दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ब्रिटिशांनी पालखी सोहळ्यावर बंदी घातली होती. त्या साली तानुबाई देशमुख, सदाशिव जाधव आणि रामभाऊ निकम यांनी अनुक्रमे १३ जून १९४५ आणि २५ जून १९४५ रोजी श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यासोबत दिंडी नेण्याची परवानगी मागितली होती. परंतु मुंबई सरकारने पालखी सोहळ्यावर बंदी घातल्याचे नमूद करून त्यांना परवानगी नाकारण्यात आली होती.” त्यावेळच्या प्रोसेडिंगमध्ये याबाबतची केलेली नोंद जयसिंगदादा यांच्याकडे आहे.

जयसिंगदादांचे चिरंजीव हभप ऋषिकेश महाराज म्हणाले, “१८३१मध्येही पालखी सोहळा पंढरपूरला गेला नव्हता. कारण त्यावेळी श्री ज्ञानोबा-तुकोबांची पालखी नेण्यावरून संत तुकारामांच्या वंशजांमध्ये वाद निर्माण झाला होता. या वर्षी सर्वत्र ‘कोरोना’ची साथ पसरली आहे. श्री ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळ्याला पंढरपूरला जाताना तीन जिल्हे आणि सहा तालुक्यांच्या सीमा ओलांडाव्या लागतात. शिवाय सोहळ्यासोबत लाखो वारकरी असतात. त्यातून त्यांना संसर्ग होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे शेडगे दिंडी क्रमांक ३ च्या वतीने आम्ही श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानकडे यंदा सामूहिक पायी वारी टाळावी, अशी लेखी विनंती केली.”

जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे विश्वस्त हभप माणिक महाराज मोरे म्हणाले, “दर शंभर वर्षांनी आपल्याकडे सध्याच्या कोरोनासारखी नैसर्गिक आपत्ती येत असल्याचा इतिहास आहे. १९२० ते १९४२ या दरम्यान आपल्याकडे प्लेगची साथ होती. यामुळे १९४२ मध्ये पालखी सोहळा पंढरपूरला गेलाच नाही. वारी प्रातिनिधिकरित्या तरी व्हावी म्हणून देहूतून पाच लोक संत तुकाराम महाराजांच्या पादुका घेऊन सायकलवर पंढरपूर वारीला गेले. त्यामध्ये बाबासाहेब इनामदार, गोविंद हरी मोरे, बबन कुंभार आदींचा समावेश होता. पंढरपूरला पोहोचण्यास त्यांना तीन दिवस लागले. तुकोबारायांच्या पादुकांना चंद्रभागा स्नान, एकादशीला पांडुरंगाचे दर्शन घडवून, द्वादशी सोडून ही मंडळी परतली.”