LockDown: उपचारासाठी वाहन न मिळाल्यानं 13 वर्षीय साक्षीचा मृत्यू

कोरोना चा सामना करण्यासाठी जग लॉकडाऊन झालं आहे. देशातही लॉकडाऊन असल्यामुळं लोकांना वाहन मिळत नाही. या परस्थितीत चाकूर तालुक्यातील नांदगाव या गावात एका १३ वर्षीय मुलीला वाहन न मिळाल्यानं जीव गमवावा लागला आहे. या मुलीला थालेसिमया हा आजार होता. या आजार वर उपचार करण्यासाठी साक्षीला लातूरला दवाखान्यात न्यायाचे होते. मात्र, वाहन न मिळाल्यानं दुर्घटना घडली आहे.

घरात आठराविश्व दारिद्र असतानाही कांबळे दांम्पत्य पडेल ते काम करून कुटूंबाचा गाडा हाकत आहे. दुर्देव म्हणजे मुलगा प्रतिक आणि मुलगी साक्षी या दोघांनाही थालेसिमया हा आजार झाला. त्यामुळे महिन्याकाठी या दोघांनाही रक्त चढवावे लागत होते. यातच काही वर्षापूर्वी प्रतिकच्या ऑपरेशनसाठी मोठा खर्च या कुटूंबियांना करावा लागला होता.

मात्र, कोरोनामुळे लॉकडाऊन झाले आणि कमावते नवरा-बायको घरातच बसून राहिले. कामाच्या बदल्यात धान्य मागण्याची नामुष्की त्यांच्यावर ओढावली आणि यातच साक्षीचा आजार बळावला. हाताला काम नाही. घरात पैसा नाही. याशिवाय रोजचा खर्च हा ठरलेलाच. त्यामुळे उपचार कसे करावेत? असा सवाल कांबळे दांम्पत्यासमोर होता.

मात्र, त्यांनी हातऊसने पैसे जमवून उपचार करण्याची तयारी केली. रविवारी रात्री साक्षीच्या पोटात दुखू लागल्याने तिला उपचारासाठी घेऊन जाण्याचे प्रयत्न सुरू झाले. मात्र, सध्याच्या लॉकडाऊनमुळे वाहनधारक लातूर येण्यास धजवेना. दरम्यान, बाहेरगावी असलेल्या सरपंच मारुती कांबळे यांनी वाहनाची सोय केली आणि साक्षीला घेऊन घरातील सर्वजण लातूरकडे निघाले. मात्र, शासकीय रुग्णालय चार किमी असताना साक्षीचा मृत्यू झाला.

लॉकडाऊन मुळे अनेकांचं पोट लॉकडाऊन झालं आहे. दोन पैसे मिळण्याचं साधन बंद झालं आहे. त्यामुळं अनेकांच्या रोजी रोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. घर कसं चालवावं? घरातील उपचार कसे करावे? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित केले जात आहे.