Home > News Update > बिहारमध्ये लोकजनशक्ती पक्षाचा धक्का: स्वबळावर लढणार, केंद्रात भाजपशी आघाडी कायम

बिहारमध्ये लोकजनशक्ती पक्षाचा धक्का: स्वबळावर लढणार, केंद्रात भाजपशी आघाडी कायम

बिहारमध्ये लोकजनशक्ती पक्षाचा धक्का: स्वबळावर लढणार, केंद्रात भाजपशी आघाडी कायम
X

मुंबई: संपूर्ण देशाच्या राजकारणाचे लक्ष लागून राहीलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या आधीचे राजकीय नाट्य सुरु झाले आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) सलग तिसरा मोठा धक्का देत मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याशी वैचारिक मतभेद असल्याने बिहार विधानसभा निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा लोकजनशक्ती पक्षाने केली. मात्र, भाजपशी कोणतीही कटुता नसून, निकालानंतर भाजपबरोबरच हातमिळवणी करणार असल्याचे पक्षाने अधिकृतपणे जाहीर केले आहे.

वर्षभरापूर्वी एनडीएमधील सर्वात मोठा सहकारी पक्ष असलेला शिवसेना बाहेर पडल्यानंतर अलिकडेच कृषी कायद्यांचा विरोध करत अकाली दल देखील सत्तेबाहेर पडले आहे. बिहारमधील स्थानिक राजकारण पाहता

लोकजनशक्ती पक्षाने या खेळीतून नितीशकुमार यांना शह देण्याचा प्रयत्न असून, निवडणुकीनंतर भाजप-लोकजनशक्ती पक्ष यांचे सत्तासमीकरण जुळवण्याचा पासवान यांचा प्रयत्न असल्याचे मानले जात आहे.

लोकजनशक्ती पक्षाचे नेते आणि केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांची प्रकृती बिघडली असून त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या अनुपस्थितीत त्यांचे पुत्र आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष चिराग पासवान यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पक्षाच्या बैठकीत स्वबळावर लढण्याची घोषणा करण्यात आली. पासवान यांचा पक्ष भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील घटक पक्ष असून, बिहारमध्ये जनता दल-भाजप युतीत भागीदार होता. नितीशकुमार यांचे नेतृत्व मान्य नसल्यानेच पासवान यांच्या पक्षाने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला असला, तरी राष्ट्रीय लोकशाही आघाडीत कायम राहणार असल्याचे स्पष्ट केले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

हे ही वाचा

हाथरस: अत्याचाराचे एक नवीन पान….

…तर मी भाजपमध्ये प्रवेश करेन- बच्चू कडू

स्वबळावर लढण्याची घोषणा करणाऱ्या निर्णयाची माहिती देण्यासाठी लोकजनशक्ती पक्षाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात भाजपबरोबर कोणत्याही प्रकारे कटुता नसल्याचे स्पष्ट केले. निकालानंतर राज्यात भाजप आणि लोकजनशक्ती पक्षाच्या युतीचे सरकार स्थापन होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. केंद्राच्या धर्तीवरच बिहारमध्येही भाजपच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन व्हावे, असा आशावाद व्यक्त करण्यात आला.

लोकजनशक्ती पक्षाने ‘बिहार फर्स्ट आणि बिहारी फस्र्ट’ अशी घोषणा के ली आहे. तसेच काही मतदारसंघांमध्ये जनता दल आणि लोकजनशक्ती पक्षाच्या उमेदवारांमध्ये लढत होऊ शकते. अशा वेळी बिहारच्या हितासाठी कोण सक्षम आहे याचा मतदारांनी विचार करावा, अशी भूमिका पक्षाने मांडली आहे.

बिहार निवडणुकीसाठी लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दल-काँग्रेस-डावे पक्ष यांची आघाडी झाली आहे. भाजप-जनता दलात जागावाटपाचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. पासवान यांच्या खेळीने काही मतदारसंघांत तिरंगी लढती होतील व त्याचा फटका जनता दलाला बसू शकतो, असा राजकीय विश्लेषकांचा अंदाज आहे.

’पासवान यांच्या पक्षाच्या खेळीमागे भाजपची फूस असल्याचा आरोप यापूर्वीच जनता दलाच्या नेत्यांकडून करण्यात आला होता. पासवान यांच्या पक्षाने भाजप उमेदवारांच्या विरोधात उमेदवार उभे केले जाणार नाहीत, असे आधीच जाहीर केले होते. नितीशकुमार यांच्या जनता दलाच्या विरोधातच पासवान यांच्या पक्षाचे उमेदवार रिंगणात असतील. यामुळे नितीशकुमार यांच्या पक्षाच्या उमेदवारांना राष्ट्रीय जनता दल-काँग्रेस-डाव्या पक्षांची आघाडी तसेच लोकजनशक्ती पक्षाच्या उमेदवारांचा सामना करावा लागेल असे चित्र आहे. ’मतांचे विभाजन होणे हे जनता दलासाठी तापदायक ठरू शकते. यातूनच भाजपच्या जागा वाढाव्यात व मुख्यमंत्रिपदावर दावा करण्याची संधी मिळावी, अशी भाजपची योजना असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जाते. तर बिहारमध्ये भाजप आणि लोकजनशक्ती पक्ष यांचे सरकार यावे, असे पासवान यांचे प्रयत्न आहेत.

बिहार विधानसभा निवडणुकीचे चित्र:

राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) घटक पक्ष (बिहार)

जनता दल युनायटेड (JDU)

भारतीय जनता पक्ष (BJP)

लोक जनशक्ति पार्टी (LJP)

हिंदुस्तान अवाम मोर्चा (हम)

विकासशील इनसान पार्टी (VIP)

इतर

महाआघाडी (महागठबंधन) घटक पक्ष (बिहार)

राष्ट्रीय जनता दल (RJD)

काँग्रेस (Congress)

सीपीएम-

सीपीआय

सीपीआय(माले)

इतर

महाआघाडी (महागटबंधन) जागावापट

राष्ट्रीय जनता दल – 144

काँग्रेस – 70

सीपीएम-04

सीपीआय 06

सीपीआय(माले) -01

Updated : 5 Oct 2020 10:54 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top