कोरोनानंतरचे आरोग्य व्यवस्थापन कसे करणार? – कुमार केतकर

81

कोरोनामुळे जाहीर करण्यात आलेल्या ल़ॉकडाऊनचा तिसरा टप्पा आता सुरू होत आहे. १७ मेच्या पुढेही लॉकडाऊन काही ठिकाणी राहण्याची चर्चा आतापासून सुरू झाली आहे. अमेरिका, युरोपमध्ये लॉकडाऊन उठवण्याची मागणी तिथले नागरिक करु लागले आहेत. ल़ॉकडाऊनमुळे कोरोनाचा प्रसार कमी होतोय पण रोजगार, उद्योग बंद केल्याने अर्थव्यवस्थेवर परिणाम होत आहे. कोरोनाचा प्रसार होणार नाही असे सर्व नियम पाळून नागरिकांना आता कामावर जाता यावे अशी मागणी होत आहे.

भारतातही उद्योगपती राजीव बजाज, इन्फोसीसचे संस्थापक नारायण मूर्ती यांनी लॉकडाऊन उठवण्याची मागणी केली आहे. नारायण मूर्ती यांनी लॉकडाऊन वाढल्यास कोरोनापेक्षा जास्त मृत्यू हे उपासमारीने होतील अशी भीती व्यक्त केली आहे. लोकांना उत्पन्न मिळाले नाही तर ते खाणार काय, त्यांच्या जगण्याचा प्रश्न निर्माण होणार नाही. सातत्याने लॉकडाऊन केल्यानं प्रश्न सुटणार नाही. कोरोना हे काही अचानक आलेले संकट नाही. कोरोनासारख्या विषाणूच्या संकटाचा इशारा अमेरिकेच्या हेर खात्याने आधीच दिला होता.

हे ही वाचा…


लॉकडाऊनचे साइड इफेक्ट्स

कोरोनाचा शिरकाव होऊ न देणाऱ्या देशांकडून शिकण्याची गरज- कुमार केतकर

पर्यावरण आणि करोनाचा शाप – कुमार केतकर

ICMR चा इशारा, सरकार गांभीर्याने घेईल का? : कुमार केतकर

बराक ओबामा यांनीही त्यांच्या अध्यक्षपदाच्या काळात अशा विषाणूच्या संकटाची शक्यता गृहीत धरली होती. या संकटाला चीनला जबाबदार धरुन चीनवर हल्ले करुन संकट संपणार नाही. अमेरिका, युरोपातील देशही आता चीनसोबत व्यापार करु लागले आहेत चीनसोबत व्यापार वाढवण्याची तयारी भारत सरकारनं केली आहे. एकीकडे चीनवर टीका करायची आणि दुसरीकडे चीनसोबत व्यापार करायचा असे सरकारचे धोऱण दिसते.

गेल्या काही वर्षात जागतिक पातळीवरच आरोग्य व्यवस्था ढासळल्याचे दिसत आहे. जागतिकीकरणानंतर जगातली विषमता वाढत गेली आहे, असे एक तज्ज्ञ सांगतात. कोरोनाची बाधा जास्त प्रमाणात दारिद्र्यात जगणाऱ्या वर्गात झाली आहे. भारतात चाचण्या कमी असल्याने कोरोनाबाधीताची संख्या कमी दिसत आहे. पण या संकटामुळे आता भारतात आरोग्य व्यवस्था सुधारण्याची गरज पुन्हा एकदा प्रकर्षाने जाणवत आहे. देशभरात जिल्हा पातळीवर आरोग्य व्यवस्था सुधारणा गरजेचे आहे. विषाणू संकट पुन्हा आल्यास आरोग्य व्यवस्था सक्षम हवी आणि त्यासाठी सरकारने आता ठोस कृती करण्याची गरज आहे.