कोरोनाच्या भीतीनं गावबंदी कराल तर जेलमध्ये जाल!

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य व केंद्र सरकारने प्रतिबंधात्मक उपाययोजना व खबरदारी घेतली आहे. सर्व जिल्ह्यांच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. असं जरी असलं तरी रायगड जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये कोरोनाच्या भीतीने बाहेरील व्यक्तींना गावबंदी करण्यात आली आहे.

ग्रामस्थांनी गावाच्या वेशीवर आणि प्रवेशद्वाराजवळ कुंपण करून, बांबूचे अडथळे तयार करून किंवा दगड ठेवून गावचा रस्ता अडवून धरला आहे. काही गावांच्या वेशीवर गावातील लोक आळीपाळीने पहारा देत आहेत. गावात बाहेरील व्यक्तीला येऊ दिले जात नाही. त्यामुळे कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण झालाय.

 

अशावेळी गावबंदी करणाऱ्यांवर कारवाईचा ईशारा रायगडचे पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांनी दिलाय. गावचे सरपंच, पोलीस पाटील यांना गावाचे रस्ते मोकळे करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जे कोणी आदेशाचे पालन करणार नाही त्यांना जेलची हवा खावी लागणार असल्याने सर्वांचेच धाबे दणाणले आहेत.