Home > मॅक्स रिपोर्ट > अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील हल्ल्याची नवी पद्धत

अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील हल्ल्याची नवी पद्धत

अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील हल्ल्याची नवी पद्धत
X

एबीपी माझा या मराठीतल्या आघाडीच्या वृत्तवाहिनी विरोधात सध्या सोशल मीडियावर जोरदार प्रचार केला जात आहे. #bjpmajha अशा प्रकारचा हॅश टॅग वापरून ही वाहिनी भाजपधार्जिणी असल्याचा आरोप केला जात आहे. गेल्या २ दिवसांपासून हे कॅम्पेन जोरात सुरू आहे. महत्त्वाचं म्हणजे ट्रोल करणाऱ्यांनी एपीबी माझाचा फॉन्ट, लोगो आणि त्यांच्या रंगाचा एवढा हुबेहूब वापर केला आहे की एका क्षणाला पाहणाऱ्याचं नक्कीच कन्फ्युजन होईल.

हे कॅम्पेन कोण चालवत आहे हे मात्र अजून स्पष्ट झालेलं नाही. पण, त्यामागे एखादा राजकीय पक्ष असल्याची सध्या चर्चा आहे. एवढं मात्र नक्की आहे की हे कॅम्पेन सहज सुरू करण्यात आलेलं नाही. ज्या पद्धतीनं त्याच्या पोस्ट डिझाईन केल्या आहेत त्यावरून तरी त्यामागे खूप मोठी रणनिती असल्याचं दिसून येतं. तसंच या मागे मोठी आर्थिक ताकद सुद्धा लावल्याचं स्पष्ट होतंय. कारण ट्रोल करण्यासाठी बनवण्यात आलेल्या प्लेट्सची क्वालिटीच त्याचं उत्तर देत आहे. मी स्वतः काही वृत्तवाहिन्यांमध्ये काम केलं आहे. ग्राफिक्स प्लेट तयार करण्यासाठी वृत्त वाहिन्यांचे रंग आणि लोगो मॅच करणं हे कुठल्याही येरागबाळ्याचं काम नव्हे. त्यासाठी उत्तम प्रशिक्षित मनुष्यबळ आणि चांगल्या प्रतीच्या मशिन्सची आवश्यकता असते. ज्याचा खर्च हा बऱ्यापैकी असतो.

[huge_it_slider id="3"]

या ट्रोल प्लेट्समध्ये एबीपी या वाहिनीबद्दल बदनामीकारक मजकूर लिहीण्यात आला आहे. याच वाहिनीच्या भाजप बीट कव्हर करणाऱ्या महिला पत्रकार रश्मी पुराणिक यांना सुद्धा ट्रोल करण्यात आलं. त्याच्यावर टीका करतांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका कार्यकर्त्यानं तर कमरेखालची भाषा वापरली. तक्रारीनंतर त्यानं रितसर माफी सुद्धा मागितली.

एबीपीच्या या ट्रोल कॅम्पेनमध्ये अफवेला सुद्धा उत आला आहे. “एबीपीच्या राज्यभरातल्या सर्व प्रतिनिधींचा सध्या पाठलाग केला जात आहे. त्यांच्यावर करडी नजर ठेवली जात आहे. ते कुठे जातात. काय करतात, कुणाला भेटतात, कुणाशी बोलतात यावर लक्ष ठेवून लवकरच प्रत्येकाचं बिंग फोडलं जाणार आहे.” अशा प्रकारचे मेसेज सुद्धा व्हायरल आहेत.

एबीपी माझानं मात्र या संपूर्ण प्रकरणावर कुठलीही प्रतिक्रीया द्यायची नाही असं ठरवलं आहे. या वृत्तवाहिनीला आधी सुद्धा अशाच प्रकारे ट्रोल करण्यात आलं होतं. मराठा मोर्चाच्या वेळी सुद्धा वाहिनीवर जोरदार टीका करण्यात आली होती. मुंबई महापालिका निवडणुकांच्या काळात हे शिवसेनेचं चॅनेल आहे असा सुद्धा आरोप झाला होता. “चॅनेलनं कायमच अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार केला आहे. तसंच ते इतरांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा सुद्धा आदर करतं. लोकांच्या भावना अशा पद्धतीनं व्यक्त होणार असतील तर त्याला काहीच हरकत नाही” असं एबीपी माझाने मॅक्स महाराष्ट्रला सांगितलं आहे.

- नीलेश धोत्रे

Updated : 3 April 2017 1:28 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top