Home > मॅक्स रिपोर्ट > येरळा नदीवरील मृत्यूचा पूल

येरळा नदीवरील मृत्यूचा पूल

येरळा नदीवरील मृत्यूचा पूल
X

सरकारचा ‘सबका साथ, सबका विकास’ पाहायचा असेल तर सांगली (sangli) जिल्ह्यातील रामापूर कमळापुर येथील या तुटक्या पुलावर या! अशी संतप्त प्रतिक्रिया या पुलाच्या कृतीसमितीचे निमंत्रक दिपक लाड यांनी दिली. किमान समान कार्यक्रमावर सरकार बनवण्यात गुंग असणारे नेते हे लोणी वाटून घेण्यात गुंग आहेत. या नेत्यांनी नागरिकांच्या प्रश्नाकडे साफ दुर्लक्ष केले असून इंग्रजांना सळो की पळो करून सोडणाऱ्या या भूमीत लोक आता या प्रश्नावर तीव्र लढा उभारणार असल्याचे त्यांनी सांगितले.

खानापूर आटपाडी या मतदार संघातील कमळापुर हे शेवटचे गाव तर पलूस आटपाडी तालुक्यातील रामपूर हे शेवटचे गाव. या गावांना जोडणारा येरळा नदीवरील (yerala river) या पुलाची समस्या दोन दशकांपासून अधिक काळाची आहे. नव्वद सालापासून आजपर्यंत या पुलावरून पावसाळ्यात पाणी वाहते. आतापर्यंत प्रवास करताना कित्येक लोकांना जीव गमावावा लागला आहे. त्यामुळे वारंवार मागणी करूनही या पुलाच्या बांधनीकडे आत्तापर्यंत दुर्लक्ष करण्यात आलेले आहे. कमळापुर हे छोटे गाव असून दैनंदिन गरजांसाठी या गावाला रामापूर या गावावरती अवलंबून राहावे लागते. तसंच रामापूर येथील लोकांची बहुतांश शेती ही कमळापुर येथे आहे.

या गावांच्या पश्चिमेला देशाचे माजी उपपंतप्रधान दिवंगत यशवंतराव चव्हाण (Yashwantrao Chavan) यांचे जन्म गाव देवराष्ट्रे आहे. विटा ते इस्लामपूर (Islampur) जाणारा हा प्रमुख मार्ग आहे. आतापर्यंत अनेक मंत्री महाराष्ट्राला (Maharashtra) देणाऱ्या या भागाच्या या समस्येकडे पूर्णतः दुर्लक्ष झाल्याचे चित्र आहे. या गावापासून अनेक माजी मंत्र्यांची गावं विद्यमान आमदारांची गावे काही किमी च्या अंतरावर आहेत. तसेच सध्या असलेल्या दोन्ही आमदारांची ही सलग दुसरी टर्म सुरू आहे. या आमदारांना आजपर्यंत पुलाची ही समस्या दिसली नाही का? हा प्रश्न उभा राहतो. या सगळ्या कालावधीत या सर्वच पक्षांनी या पुलाच्या कामाकडे दुर्लक्ष केल्याचे वास्तव येथील ग्रामस्थ सांगत आहेत.

कमळापुर येथे माध्यमिक शाळा नसल्याने विद्यार्थी रामापुर येथील शाळेत जातात. तीन वर्षांपूर्वी या पुलावरील पाण्यातून जाताना एका संस्थेची दहा मुले पाण्यात पडलेली होती. गावकऱ्यांच्या सतर्कतेमुळे ती वाचली.

या गावांमधून फिरताना जुने वयस्कर लोक सांगतात की,

"आपली नदी घातकी आ.हे दरवर्षी कुणाचा तरी जीव घेती" इथल्या प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या नदीवर दरवर्षी कुणी तरी मरणारच हे सत्य लोकांनीही स्वीकारलेले दिसत आहे.

या पुलाच्या वरच्या बाजूला बंधारा बांधण्यात आला आहे. पर्यायी मार्ग म्हणून येथील विद्यार्थी शेतकरी या मार्गाचा अवलंब करत आहेत. हा अतिशय रुंद बंधारा असून तो वाहतुकीसाठी नाही. या बंधाऱ्यावरून दोन टू व्हीलर एकावेळी जाऊ शकत नाहीत. तरी लोक जीवावर उदार होऊन जनावरांना जगवण्यासाठी येथून वैरण नेताना दिसतात. यामध्ये अपघात घडण्याची शक्यता जास्त आहे. या बंधाऱ्याच्या पश्चिम टोकावर विजेच्या खुल्या तारा अगदी डोक्याच्या वर काही अंतरावर आहेत.

कमळापुर येथील माजी सरपंच अरविंद गायकवाड सांगतात की, सरकार आमच्याशी अतिशय क्रूर वागले आहे. या पुलावरून वाहून गेलेल्या लोकांच्या अंत्यविधीसाठी त्यांची प्रेत सुद्धा सापडली नाहीत. हे आजवर आम्ही सहन केलं पण इथून पुढे जीवावर उदार होऊन आम्ही या पुलाच्या बांधकामासाठी रस्त्यावर उतरणार आहोत.

या गावांतील ग्रामस्थ संतप्त प्रतिक्रिया देत आहेत. या असंतोषातून या लोकांनी कायदा हातात घेतला आणि भविष्यात कायदा व्यवस्थेची समस्या निर्माण झाली. तर या उपेक्षित गावातील नागरिकांच्या भावना सरकारने समजून घेणे महत्त्वाचे आहे.

या दोन्ही गावातील उत्पादीत ऊस याच पुलावरून सोनाहिरा आणि क्रांती या कारखान्यांना जात असतो. पावसाळ्यात लोक मेली तरी ढुंकूनही न बघणारे हे कारखानदार स्वतःच्या ऊसाच्या वाहतुकीचा खर्च कमी व्हावा. म्हणून या पुलावर तात्पुरती मुरूम टाकून डागडुजी करतात. या कारखान्यांनी त्यांचा सी एस आर निधी जरी या पुलाला वापरला तरी हा पूल दिमाखात उभा राहील.

हे ही वाचा...

Maha Political Twist LIVE: सर्वोच्च न्यायालयानं निकाल राखून ठेवला, उद्या निकाल…

अडीच वर्षे मुख्यमंत्री पद मागीतलं होतं – शरद पवार

राणेजी, महाराष्ट्रात आमदारांचा बाजार भरला आहे का?

ग्रामस्थांचा तात्पुरत्या मालमपट्टीला तीव्र विरोध असून जखम मांडीला आणि मलम शेंडीला ही उपाययोजना आम्हाला नको. असं अरविंद गायकवाड सांगतात. तुम्हाला माणसांपेक्षा ऊस जास्त गरजेचा असेल तर आम्ही या पुलाची तात्पुरती दुरुस्ती करू देणार नसल्याचा पवित्रा कृती समितीने घेतला आहे. या पुलाची उंची वीस फूट करून त्याचे नव्याने बांधकाम करण्यासाठी उद्या विटा येथे बांधकाम कार्यालयावर रक्तदान करून कृती समिती आंदोलन करणार आहे.

गावकऱ्यांचे रक्त पुलात वाहूनही आक्रमक न होता, कायदा सुव्यवस्थेला बाधा येऊ नये. यासाठी शासनाचे लक्ष वेधावे म्हणून रक्तदान करणाऱ्या या ग्रामस्थांच्या मागण्या मान्य होणार का ? हे पाहणं औत्सूक्याचे ठरेल.

Updated : 25 Nov 2019 9:10 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top