Home > मॅक्स रिपोर्ट > आईजनहावर ते डोनाल्ड ट्रम्प, भारत दौरा करणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष

आईजनहावर ते डोनाल्ड ट्रम्प, भारत दौरा करणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष

आईजनहावर ते डोनाल्ड ट्रम्प, भारत दौरा करणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष
X

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सध्या भारत दौऱ्यावर आहेत. अमेरिका आणि भारताचे संबंध आज बऱ्यापैकी चांगले झाले आहेत. हे संबंध गेल्या 73 वर्षात टप्याटप्याने सुधारले गेले असल्याचं दिसून येतं. भारत देशाचा दौरा करणारे डोनाल्ड ड्रम्प हे अमेरिकेचे 7 वे राष्ट्रपती आहेत.

भारत अमेरिका मैत्रींवर 1991 साली भारताने स्वीकारलेल्या खाऊजा (खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकरण) धोरणाचा परिणाम दिसून येतो. या 73 वर्षात कसे सुधारले अमेरिका आणि भारताचे संबध? भारत दौऱ्यावर आलेले पहिले अमेरिकन राष्ट्रपती कोण होते? कोणत्या राष्ट्रपतीच्या काळात भारत आणि अमेरिका सबंध सुधारले? यावर आत्तापर्यंतच्या राष्ट्रपतींच्या दौऱ्यावर नजर टाकल्यास आपल्याला ही बाब लक्षात येते.

पंडीत नेहरु आणि आईजनहावर

भारत दौऱ्यावर येणारे पहिले राष्ट्राध्यक्ष आईजनहावर. त्यावेळी पंडीत जवाहरलाल नेहरु हे भारताचे पंतप्रधान होते. आईजनहावर यांनी भारत आणि अमेरिकेच्या मैत्रीला सुरुवात केली. ते 9 डिसेंबर ते 14 डिसेंबर 1959 असे पाच दिवसीय भारत दौऱ्यावर होते. यावेळी जग शीत युद्धाच्या छायेत असताना जग रशिया आणि अमेरिका या दोन महासत्तामध्ये विभागले होते. कधीही तिसरे युद्ध होईल अशी एकंदरीत परिस्थिती होती. मात्र, अशा परिस्थिती पंडीत नेहरु यांनी अलिप्तवादी धोरण (non aligned movement) स्वीकारत दोन ही गटात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला. मात्र, भारतासोबतच स्वतंत्र झालेल्या पाकिस्तानने अमेरिका गटात सहभागी होण्याचा निर्णय घेतला होता. अशा परिस्थितीत भारत दौऱ्यावर आलेल्या आईजनहावर यांनी ‘पाकिस्तान सोबत आपलं ह्रद्याचं नात आहे, तर भारतासोबत आपलं बौद्धिक नातं आहे’ असं विधान केलं.

आईजनहावर यांनी संसदेच्या संयुक्त सत्राला संबोधित केले होते. त्याचबरोबर दिल्ली येथे रामलीला मैदानावर जमलेल्या जनतेला संबोधित केले. आईजनहावर जेव्हा भारत दौऱ्यावर आले तेव्हा भारताची परिस्थिती फारशी चांगली नव्हती. भारतात 1957 ते 1958 या काळात दुष्काळ पडला होता. औद्योगिक उत्पन्न घटलं होतं. अशा परिस्थितीत आईजनहावर भारत दौऱ्यावर आले होते.

आईजनहावर भारतात येण्यापुर्वी पंडीत नेहरु यांनी 1956 साली त्यांची मुलगी इंदिरा गांधी यांच्या सोबत अमेरिकेचा दौरा केला होता.

आईजनहावर यांच्यानंतर रिचर्ड निक्सन 1969 मध्ये भारत दौऱ्यावर आले. यावेळी निक्सन यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची सुत्र हाती घेऊन अवघे सहा महिने झाले होते. भारत देशाचा दौरा करणारे निक्सन हे दुसरे राष्ट्रपती होत. निक्सन हे 5 दिवसासाठी आशिया खंडाच्या दौऱ्यावर आले होते. ते 31 जुलै ते 1 ऑगस्ट 1969 रोजी भारतात आले. ते अवघे 22 तासच भारतात राहिले.

सौजन्य : ब्रिटीश पाथ वे

पंडीत नेहरु यांचा अमेरिका दौरा, दौऱ्यात इंदिरा गांधी सोबत दिसत आहेत (1956)

निक्सन आणि इंदिरा गांधी यांचे खास काही पटत नसल्याचं एका संभाषणात समोर आलं आहे. निक्सन 1969 ते 1974 पर्यंत अमेरिकेचे राष्ट्रपती होते. निक्सन यांनी 1971 च्या युद्धा मध्ये पाक ची मदत केल्याचं बोललं जातं. 10 वर्षानंतर रिचर्ड निक्सन पुन्हा एकदा भारत दौऱ्यावर आले होते. मात्र, ते यावेळी अमेरिकेचे राष्ट्रपती नव्हते. निक्सन यांच्या भारत भेटीतून विशेष असे काही साध्य झालं नाही.

रिचर्ड निक्सन आणि इंदिरा गांधी

त्यानंतर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना भारतात येण्यास साधारण 10 वर्षाचा काळ जावा लागला. 1978 मध्ये नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच 1 ते 3 जानेवारी ला तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जीमी कार्टर भारत दौऱ्यावर आले होते. यावेळी देशात पहिल्यांदाच गैर कॉंग्रेसी सरकार सत्तेवर होतं. आणीबाणी मुळे इंदिरा गांधी यांचा पराभव झाला होता. इंदिरा गांधी यांच्या पराभवानंतर मोरारजी देसाई हे देशाचे पंतप्रधान झाले होते. ही भेट भारतासाठी महत्वपूर्ण ठरली. कारण 1971 ला पाकिस्तान सोबत झालेल्या युद्धाने आणि 1974 ला इंदिरा गांधी यांनी केलेल्या अणुचाचणीमुळे दोन देशाच्या संबंधात दुरावा निर्माण झाला होता. या भेटीनंतर हा दुरावा दूर झाला.

जीमी कार्टर आणि मोरारजी देसाई, सोबत अटलबिहारी वाजपेयी

जीमी कार्टर यांनी यावेळी संसदेच्या दोनही सभागृहाला संबोधीत केलं. तसंच गुडगावच्या एका गावाचा दौरा केला. त्यानंतर या गावाचं नाव कार्टरपुरी असं करण्यात आलं. कार्टर यांनी भारताने परमाणू बॉम्ब बनवू नये म्हणून नेहमी आग्रह धरला होता. मात्र, इंदिरा गांधी पंतप्रधान असताना भारताने अणुचाचणी केली. त्यामुळे कार्टर नाराज होते.

जीमी कार्टरच्या भारत दौऱ्यानंतर तब्बल 22 वर्षानंतर मार्च 2000 मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन भारत दौऱ्यावर आले. यावेळी अटलबिहारी वाजपेयी हे भारताचे पंतप्रधान होते. बिल क्लिंटन हे त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळाच्या शेवटच्या महिन्यात भारतात आले. बिल क्लिंटन 21 मार्चे ते 25 मार्च भारत दौऱ्यावर होते. तेव्हा भारताने पोखरण 2 मध्ये अणू बॉम्ब ची चाचणी केल्याचा मुद्दा तापलेला होता.

अमेरिकेने या चाचणी नंतर भारतावर कडक निर्बंध लादले होते. यावेळी भारताबरोबरच पाकिस्तानने अणुचाचणी केली म्हणून पाकिस्तानवर देखील आर्थिक निर्बंध लादले होते. त्यामुळे 5 दिवसीय भारत दौऱ्यावर आलेल्या बिल क्लिंटन यांनी पाकिस्तानचा देखील दौरा केला होता. 5 दिवसाचा भारत दौरा करणाऱ्या क्लिंटन यांनी पाकिस्तानचा अवघ्या 5 तासांचा दौरा केला होता. यावरुन अमेरिकेसाठी भारत किती महत्वाचा देश आहे. हे यावेळी दिसून आलं होतं. त्याचबरोबर अमेरिकेने पाकिस्तानला पहिल्यादाच इतकं कमी महत्व दिल्याचं दिसून आलं. बिल क्लिंटन यांच्या या भारत दौऱ्यामध्ये त्यांनी संसदेच्या दोनही सभागृहाला संबोधित केलं. या दौऱ्याच्या वेळी त्यांची मुलगी चेल्सिया देखील क्लिंटन यांच्या सोबत भारत दौऱ्यावर आली होती. क्लिंटन यांच्या या भेटीनंतर दोन्ही देशांमध्ये राजकीय आणि आर्थिक घडामोडीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली.

क्लिंटन चं भारताला झुकतं माप...

पाकिस्तान आणि भारत यांच्यामध्ये आत्तापर्यंत झालेल्या सर्व युद्धामध्ये अमेरिका पाकिस्तानच्या बाजूनं उभा राहिला होता. मात्र, कारगील युद्धात क्लिंटन हे भारताच्या बाजूनं उभे होते. या युद्धात पाकिस्तानला खडे बोल सुनावत भारताला Strategically महत्त्वाचे स्थान दिले.

सन 2000 नंतर अमेरिकेचे प्रत्येक राष्ट्रपती भारताला महत्वाचं स्थान देऊ लागले. भारतात 1991 ला भारताने स्वीकारलेल्या आर्थिक उदारीकरणामुळे अमेरिकेतील उद्योजक भारतात गुंतवणूक करु लागले. भारताच्या आर्थिक उदारीकरणाच्या धोरणामुळे भारताने मोठी प्रगती केली.

त्याचाच परिणाम म्हणून 1 मार्च ते 3 मार्च 2006 मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बुश यांनी भारताचा दौरा केला. यावेळी डॉ. मनमोहन सिंह हे भारताचे पंतप्रधान होते. बुश हे दोन वेळा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष राहिले. मात्र, ते एकदाच भारताच्या दौऱ्यावर आले. तरीही भारतासाठी आत्तापर्यंतच्या सर्व राष्ट्राध्यक्ष दौऱ्यामध्ये बुश यांचा हा दौरा महत्वपूर्ण मानला गेला.

याच वेळी भारतासाठी महत्त्वाचा असलेल्या भारत अमेरिका असैनिक अणू करारावर दोन्ही देशांनी स्वाक्षऱ्या केल्या. एनपीटीवर (The Nuclear Nonproliferation Treaty) NPT स्वाक्षरी न करता अशा प्रकारे अणू करार करणारा भारत हा पहिलाच देश आहे. या करारामुळे जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या देशाबरोबर अमेरिकेचे राजकीय, आर्थिक सबंध पहिल्यादांच इतके घनिष्ठ झाले. डॉ. मनमोहन सिंह यांनी या करारासाठी स्वत:चं सरकार दावावर लावलं होतं. त्यांनी या कराराचं महत्व ओळखलं होतं.

डाव्या पक्षाच्या मदतीने सत्तेत आलेल्या मनमोहन सिंह यांनी डाव्या पक्षाचा विरोध पत्करुन या करारावर सही केली. या दौऱ्यात डाव्याच्या विरोधामुळे जॉर्ज बुश यांना संसदेच्या संयुक्त सत्राला संबोधित करता आले नाही. त्यानंतर त्यांना दिल्लीमध्ये काही लोकांना संबोधित करावं लागलं होतं. मात्र, बुश आणि मनमोहन सिंह यांच्या पुढाकाराने झालेल्या या कराराची फळ आता भारताला मिळायला सुरुवात झाली आहे.

बुश यांच्या या भेटीनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हे भारताच्या दौऱ्यावर आले. ओबामा हे दोनदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले आणि ते दोनही वेळेस भारत दौऱ्यावर आले. आपल्या दोनही काळात भारताच्या दौऱ्यावर येणारे ओबामा हे अमेरिकेचे पहिलेच राष्ट्राध्यक्ष आहेत. 6 ते 9 नोव्हेंबर 2010 ला ते पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर आले. यावेळी त्यांची पत्नी मिशेल ओबामा देखील त्यांच्या सोबत होती. त्यांनी मुंबईतील 26/11 च्या हल्ल्यातील पीडित झालेल्या लोकांशी बातचित केली. तसंच संसदेच्या संयुक्त सत्राला संबोधित केलं. तसंच युनायटेड नेशन मध्ये भारताला स्थायी सदस्यत्व मिळावं यासंदर्भात भाष्य केलं. या भेटी दरम्यान दोन्ही देशाच्या दरम्यान जवळ जवळ 15 अब्ज अमेरिकी डॉलर चा व्यापारी करार झाला.

दुसऱ्या वेळेस ओबामा मोदी सरकारच्या कार्यकाळात आले होते. त्यांचा हा दौरा 24 जानेवारी ते 27 जानेवारी 2015 पर्यंत होता. अमेरिकेला भारताचे जागतिक स्थान, भारताचे आर्थिक महत्त्व याची जाणीव झाली आहे. त्यामुळे अमेरिका भारताला आता खास महत्व देताना दिसत आहे.

सध्या अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प 24 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारी 2020 दरम्यान भारत दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्यामध्ये अद्यापर्यंत कोणताही आर्थिक, राजकीय करार झालेला नाही. मोदी यांच्या काळामध्ये डोनाल्ड ड्रम्प आणि मोदींची घनिष्ठ मैत्री झाल्याचं पाहायला मिळालं. मात्र, उभय देशाला या मैत्रीचा अद्यापपर्यंत म्हणावा असा फायदा झाल्याचं पाहायला मिळालेलं नाही.

भारत अमेरिका दरम्यान होणारा व्यापारी करार देखील या भेटीत होणार नसल्याचं ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळं ट्रम्प यांचा हा दौरा पुढील वर्षी अमेरिकेत होणाऱ्या निवडणुकीसाठी आहे का? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. अमेरिकेत मोठ्या प्रमाणात भारतीय लोक राहतात. विशेष म्हणजे हे लोक अमेरिकेच्या मोठ मोठ्या संस्थांमध्ये मोठमोठ्या पदावर काम करतात. त्यामुळे या लोकांच्या मताचा मोठा प्रभाव अमेरिकेच्या निवडणूकीवर होणार आहे. त्यामुळे ट्रम्प यांचा हा दौरा आहे का? असा सवाल या निमित्ताने उपस्थित होतो.

Updated : 25 Feb 2020 3:45 AM GMT
Next Story
Share it
Top