Home > मॅक्स रिपोर्ट > भाजप शहराध्यक्षावर कारवाई करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याची तात्काळ बदली

भाजप शहराध्यक्षावर कारवाई करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याची तात्काळ बदली

भाजप शहराध्यक्षावर कारवाई करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याची तात्काळ बदली
X

जळगाव जिल्ह्यात भाजपच्या पदाधिकाऱ्यांची अरेरावी इतकी वाढली आहे की, प्रामाणिक अधिकाऱ्याची कॉलर पकडण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असलेल्या गृह खात्यातील एका पोलिस निरिक्षकासह पोलिस कर्मचाऱ्याला भाजपच्या शहराध्यक्षाकडून धक्काबुक्की केल्याचा प्रकार समोर आल्यानंतर या शहराध्यक्षावर कारवाई होण्याऐवजी पोलिस निरिक्षकाची तातडीने बदली केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चोपडा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांना भाजपाचे शहराध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी ६ डिसेंबरला धक्काबुकी केली होती. त्यानंतर या प्रकरणी नरेंद्र पाटील यांच्यासह तिघांवर चोपडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण?

भाजपाचे शहराध्यक्ष नरेंद्र साहेबराव पाटील यांची चार चाकी क्र. एमएच 19 सीएफ 3493 ही गाडी वाहतूक नियमन सदराखाली पोलीस कर्मचारी विजय निकम यांनी थांबवली. मात्र चालकाने गाडी न थांबविता तेथून पळ काढला. पोलिसांनी पाठलाग करुन ही गाडी कृषी उत्पन्न बाजार समितीजवळ अडवली. याचा राग आल्याने भाजप शहराध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी माजी शहराध्यक्ष राजू चिरंजीलाल शर्मा यांना त्या ठिकाणी बोलावले. दोघांनी मिळून पोलीस कर्मचाऱ्यांना दमदाटी केली. ही घटना माहीत झाल्यानंतर पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील हे तिथे पोहचले आणि दोघांना समजविण्याचा प्रयत्न केला. मात्र भाजपाच्या दोन्ही पदाधिकाऱ्यांनी पो.नि. नजनपाटील यांच्याशीच हुज्जत घातली. त्यांच्या अंगावर धावत जाऊन कॉलर पकडून धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली. यात पोलिस निरिक्षक नजन पाटील यांच्या उजव्या हातास दुखापत झाली आहे.

दरम्यान, या प्रकरणी वार्ताहरांशी बोलताना जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी पोलिसात गुंड अधिकारी असल्याचा दावा केला आहे.

[video width="640" height="352" mp4="http://maxmaharashtra.com/wp-content/uploads/2018/12/WhatsApp-Video-2018-12-08-at-5.38.23-PM.mp4"][/video]

एका तासात वर्दी उतरवतो…

या प्रकरणी भाजपाच्या दोन्ही पदाधिकाऱ्यांना चौकशी कामी पोलीस ठाण्यात आणत असताना पोलीस ठाण्याच्या गेटवर भाजप कार्यकर्ता मनिष पारिख याने देखील पोलिसांशी हुज्जत घालून ’तुमच्या बापाला फोन लावतो, एका तासात तुमची वर्दी उतरवितो’ अशा धमक्या दिल्या. यावरुन भाजप शहराध्यक्ष नरेंद्र पाटील, माजी शहराध्यक्ष राजु शर्मा व मनिष पारिख यांच्याविरुध्द शासकिय कामात अडथळा आणला म्हणून चोपडा शहर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान भाजपच्या आजी माजी शहराध्यक्षा विरुद्ध गुन्हा दाखल केल्याने पोलीस अधिकाऱ्याची तडका फडकी बदली केल्यानं शिवसेनेचे राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

[video width="640" height="352" mp4="http://maxmaharashtra.com/wp-content/uploads/2018/12/WhatsApp-Video-2018-12-08-at-5.37.17-PM.mp4"][/video]

दरम्यान, या प्रकरणानंतर स्वत: मुख्यमंत्र्यांकडे गृह खातं असताना राज्यातील पोलिसांनाच न्याय मिळत नसेल तर सर्वसामान्य नागरिकांना कधी न्याय मिळणार असा सवाल आता राज्यातील नागरिक करत आहे.

Updated : 8 Dec 2018 12:24 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top