Home > मॅक्स रिपोर्ट > 'धन्यवाद जयंत पाटीलजी' ! - केशव उपाध्यय

'धन्यवाद जयंत पाटीलजी' ! - केशव उपाध्यय

धन्यवाद जयंत पाटीलजी ! - केशव उपाध्यय
X

काही दिवसांपुर्वी सोशल मीडिया वरती एक स्क्रिनशॉट खुप व्हायरल झाला होता. इ-सकाळची एक बातमी त्यांच्या फेसबुक पेज वर पोस्ट करण्यात आली होती. या पोस्ट खाली 'केशव उपाध्येजी, 2 वर्षांपूर्वी छापलेल्या बॅनरची उधारी जमा करा आधी' अशी कमेंट करण्यात होती. हा तरुण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता असल्याचे समोर आले. या समंधी भाजप प्रवक्ते केशव उपाध्यय यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सांगीतले असता जयंत पाटील यानी या तरुणाला आम्ही समज दिल्याचे सांगीतले. त्यामुळे या संदर्भात जयंत पाटील यांचे आभार मानणारे पत्र केशव उपाध्यय यांनी लिहीले आहे.

काय आहे या पत्रात ?

"राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे मी मनःपूर्वक आणि जाहीर आभार मानतो. भारतीय जनता पार्टीचा प्रदेश प्रवक्ता आणि प्रदेश माध्यमविभाग प्रमुखाने असे राष्ट्रवादीच्या नेत्याचे जाहीर आभार मानावे याला कारणही तसेच आहे. मा. जयंत पाटील आणि मी, आम्ही दोघेही वेगळ्या विचारसरणीचे, वेगळ्या राजकीय पक्षांमध्ये वाढलो, दोन्ही पक्ष एकमेकांचे प्रतिस्पर्धी तरीही मी त्यांचे आभार मानतो. कारण जयंतरावांनी महाराष्ट्रातील सुसंस्कृत राजकारणाच्या परंपरेचे जतन केले.

राफेलविषयी सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आल्यानंतर त्याविषयी माहिती देण्यासाठी मी जालना येथे नुकतीच पत्रकार परिषद घेतली. त्याची बातमी सरकारनामावर प्रसिद्ध झाली. ‘राफेलबाबत खोटे आरोप करून राहुल गांधींकडून देशाच्या सुरक्षिततेला धोका : केशव उपाध्ये’, अशा शीर्षकाची बातमी आठवत असेल. ही बातमी ई सकाळने फेसबुकवर टाकली. फेसबुकवर कॉमेंट लिहिताना अक्षय शिंदे नावाच्या कोण्या व्यक्तीने ‘केशव उपाध्येजी, 2 वर्षांपूर्वी छापलेल्या बॅनरची उधारी जमा करा आधी’ अशी धादांत असत्य आणि बदनामीकारक पोस्ट केली. काही उत्साही लोकांनी त्याचा स्क्रीन शॉट व्हायरल करून माझ्या बदनामीचा प्रयत्न केला. मी आजपर्यंत माझा एकही बॅनर छापून घेतलेला नाही मग त्याची उधारी जमा करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. शिवाय या कोण्या अक्षय शिंदेना मी ओळखतही नाही. फेसबुकवरच अक्षय शिंदेंची चौकशी केली आणि दिसले की, हे महाशय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सोशल मीडियाचे मुख्य समन्वयक आहेत. हे ध्यानात आल्यावर धक्काच बसला. राष्ट्रवादीच्या वतीने सोशल मीडियासाठी काम करताना भाजपाच्या प्रवक्त्यावर टीका टिप्पणी करणे समजू शकते, पण मुद्दे सुचत नाहीत तर असे मूर्खासारखे लिहिणे आश्चर्यकारक होते. महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीनुसार पोलीसांकडे तक्रार करण्यापूर्वी आधी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना फोनवर कळवले. त्यांनी म्हणणे ऐकून घेतले, कोणतीही सहमती दर्शवली नाही पण चौकशी करतो म्हणाले. तासाभराने त्यांचा फोन आला. त्यांनी या विषयाची माहिती घेऊन स्वतः खातरजमा केली होती. जयंतरावांनी मला सांगितले की, त्यांनी या अक्षय शिंदे यांना समज दिली आहे आणि परत अशी चूक करू नको म्हणून बजावले आहे. झाल्या प्रकाराबद्दल त्यांनी दिलगिरीही व्यक्त केली. जयंतरावांनी पक्षाच्या वतीने दिलगिरी व्यक्त करणे हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. माझी वैयक्तिक जयंतरावांबद्दल काहीच तक्रार नव्हती. मलाच कसेतरी वाटले. मी त्यांना स्पष्ट सांगितले की, आपण दिलगिरी व्यक्त करण्याची आवश्यकता नाही. त्या कार्यकर्त्याला समज दिली हे पुरेसे आहे. धन्यवाद. मलाही या अक्षय शिंदे यांना समज दिली जावी, एवढेच अपेक्षित होते. या बदनामीबद्दल थेट पोलिसात तक्रार करून शिंदे यांना धडा शिकविण्यापेक्षा आधी त्यांच्या नेत्यांना सांगावे, असे वाटले. जयंतरावांनीही राजकीय शिष्टाचार पाळून दखल घेतली. म्हणून मी राजकीय विरोधक असलो तरीही जयंत पाटील यांचे जाहीर आभार मानत आहे. महाराष्ट्रात राजकीय विरोध असला तरी त्याचे रुपांतर कधीही वैयक्तिक दुष्मनीत होऊ दिले जात नाही आणि सुसंस्कृतपणा राखला जातो. टीका टिप्पणी करताना पातळी राखली जाते. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे महाराष्ट्राच्या राजकारणात सुसंस्कृतपणा राखण्यात मोठे योगदान आहे. त्यांची परंपरा जयंतरावांनी राखली. धन्यवाद."

Updated : 26 Dec 2018 5:52 AM GMT
Next Story
Share it
Top