ग्राउंड रिपोर्ट : मजुरांची ‘हायवे’ पायवाट आणि पोलिसांची नाकाबंदी !

118

लॉकडाऊन 2.0 नंतर अचानकच स्थलांतरीत मजुरांच्या संख्येत वाढ झाली. नागपूरवरून रोज हजारो मजुरांचे स्थलांतरण होताना दिसते. या हायवेने भूतकाळात कधीही इतकी पायपिट बघितली नसावी. इथून जाणा-या मजुरांमध्ये यूपी, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड येथे जाणा-या मजुरांची संख्या अधिक आहे. हे मजूर बेंगलोर, चेन्नई, इथून निघाले आहेत. पण सर्वाधिक संख्या आहे ती हैदराबादहून निघालेल्या मजुरांची. हैदराबादहून आपल्या गावाकडे निघणारे मजूर एक दोन दिवसात महाराष्ट्र बॉर्डरवर येत आहे. मात्र तिथून नागपूरला पोहोचायला काहींना 4-5 दिवस लागत आहे. तर काही मजूर 15 दिवस होऊऩही अद्याप पोहोचलेले नाही. याचे कारण म्हणजे तेलंगाणा आणि महाराष्ट्र पोलीस यांच्यातील फरक.

मजुरांनी दिलेल्या माहितीनुसार तेलंगणातील पोलीस स्वतःहून मजुरांना राज्याबाहेर काढत आहेत. तर याउलट महाराष्ट्रातील पोलीस वागत असल्याची तक्रार मजूर करीत आहेत. मजुरांना घेऊन जाणा-या ट्रकची अडवणूक करणे, त्यांना दंड ठोठावणे तर काही प्रसंगी ट्रकचालकांना पोलिसांनी मारहाण केली असल्याचे मजूर आणि ट्रक ड्रायव्हर सांगत आहे. परिणामी ट्रक चालक महाराष्ट्रातून मजूरांना घेऊन जाण्यास धजावत आहे.

नागपूर येथील भंडारा जबलपूर हायवेवरील चौकात सध्या शेकडो मजूर ट्रकची वाट बघताना दिसते. रोज हजारो मजूर इथून इतर राज्यात जात आहेत. हा चौक सध्या स्थलांतरीत मजुरांसाठी महत्त्वाचा ठरलेला आहे. इथून एका रस्ता जबलपूरला दुसरा भंडारा-रायपूर तिसरा हैदराबाद व चौथा नागपूरला जातो. मजूर सध्या इथून जाणा-या ट्रकला हात दाखवत उभे असलेले दिसतात. एखाद्याला दया आली तर तो ट्रक थांबवतो व पुढे घेऊन जातो. इथे मोठ्या प्रमाणात धाबे आहेत. या धाब्यावर ट्रक ड्रायव्हर जेवण करतात आराम करतात व पुढे जातात. त्यामुळे इथे हायवेवरील सर्वाधिक गर्दी आहे.

काही तास वाट बघायची, ट्रक थांबले तर ठिक, अन्यथा पायीच पुढे निघायचे असा इथे उभ्या असलेल्या मजुरांचा शेड्युल आहे. महिला आणि छोट्या मुलांना सोबत घेऊन अनेक मजुरांचे कुटुंब आणि गृप इथे वाट पाहताना दिसते. एका गृपने तर पुढे जाण्यासाठी तब्ब्ल 24 तासांपासून वाट बघत असल्याचे सांगितले.

सोमवारी संध्याकाळची वेळ होती. गोरखपूरला जाणारे काही पुरुष मजूर अचानक एका ट्रकच्या मागील ट्रॉलीवर चढले व बसले. 40 ते 50 लोक असावेत. ट्रक पुढे निघणार असे कळल्याबरोबर त्या ट्रकवर अचानक मजुरांनी धावा बोलला. मात्र ट्रक पुढे निघायला तयार नव्हता. कारण हेच की पोलीस मारहाण करतात, त्रास देतात. फाईन मारतात. मजुरांनी तुम्ही सांगून बघा अशी विनंती केली मात्र त्याला विचारल्यावर ‘आप तो बोलके चले जाओगे, मार तो हमे खाना पडता है’ असे उत्तर ड्रायव्हरने दिले. पुढे त्या ट्रकने त्यांना नेले की नाही किंवा ते मजूर त्या ट्रकमध्ये गेले की पायी गेले हे माहिती नाही.

या हायवेवर वेगवेगळ्या प्रकारचे स्थलांतरीत मजूर पाहायला मिळतात. कुणी फक्त कुटुंब घराकडे ठेऊन स्वतः कामासाठी घराबाहेर पडलेले आहेत. कुणी मजुरीला मदत होते म्हणून बायकोला सोबत घेऊन व मुलांना घरी आईवडिलांकडे ठेवून जाणारे आहेत. तर कुणी बायको मुलासह आलेले आहेत. यातील अधिकाधिक लोक बिल्डिंगच्या कामासाठी आलेले दिसले. उऩ्हाळ्याची चाहूल लागल्याने आईसक्रिम कंपनीत कामाला असणारे मजूरही बरेच भेटले.

कडक उन्हात दिवसभर चालून त्यांच्या कपड्यावर मीठ उतल्याचे दिसते. रस्त्याने जाताना कुठे नदी आली तर तिथे ते आंघोळ करतात. कपडे धुतात आणि पुढे जातात. कोरोनाबद्दल विचारलं तर ही महामारी आहे व यात सर्दी, खोकला होऊन लोक मरतात असे सांगतात. त्यासाठी मास्क लावावे लागते हे ही ते सांगतात. मास्क वाटप करणा-यांकडून त्यांना मास्क मिळाले आहे. काही लोक मास्क ऐवजी रुमाल बांधतात तर काहींनी स्वतःजवळचे मास्क त्यांच्या मुलांसाठी राखून ठेवले आहेत.

पहिले लॉकडाऊन जे 14 एप्रिल पर्यंत होते. त्यावेळी मजुरांची स्थलांतर करण्याची संख्या कमी होती. पहिलं लॉकडाऊन संपेपर्यंत मजुरांनी वाट बघितली. लॉकडाऊऩ संपल्यानंतर पुन्हा काम सुरू होईल या आशेवर ते होते. मात्र दुसरे लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर मजूर हिम्मत हरले. लॉकडाऊन पर्यंतच्या कामाचे काही ठेकेदारांनी पैसे दिले तर काहींनी नाही. जे काही पैसे होते ते लॉकडाऊऩच्या काळात संपले होते. शिवाय लॉकडाऊन संपल्यावर काम सुरू होईल याची काहीच शास्वती नसल्याचे ठेकेदाराने सांगितल्यावर मात्र मजुरांनी पायीच गावी परत जाण्याचा निर्णय घेतला.

परतीचा प्रवास…

आहे त्या परिस्थितीत परत निघायचं त्यांनी ठरवलं. काहींनी शक्य तेवढे सामान सोबत घेतले. तर काहींनी केवळ कपडे बॅगमध्ये भरून इतर सामान तिथेच ठेऊन परतीचा मार्ग पत्करला. काही मजुरांनी घरी असलेले धान्य आणि काही आवश्यक ते भांडेही घेतले, जिथे मुक्काम होईल तिथे जेवण बनवण्यासाठी. ज्या मजुरांकडे काही पैसे शिल्लक आहेत ते ट्रकवाल्यांना पैसे देऊन निघत आहे. हैदराबाद ते नागपूरपर्यंतचे आठशे ते हजार रुपये त्यासाठी घेतले जात असल्याचे काही मजुरांनी सांगितले. तर ज्यांच्याकडे पैसेच नाही ते पायी निघाले. रस्त्यात ट्रकला हात दाखवून लिफ्ट मागायची आणि जिथपर्यंत ते सोडून देणार तिथपर्यंत जायचे व पुढे पुन्हा पायी. असा त्यांचा प्रवास सुरू आहे.

सरकार मजुरांची व्यवस्था करत असताना ते तिथेच का थांबले नाही असा प्रश्न मनात येऊ शकतो. मात्र खिशात एक पैसा शिल्लक नाही. रेशन कार्ड नाही, पुढे काम सुरू होण्याची काहीच शास्वती नाही. त्यामुळे त्यांनी हा मार्ग निवडला. एका तरुण मजुरांनी सांगितले की तो घरी तीन दिवस उपाशी होतो. जेव्हा गावी परत जाण्यासाठी तो घराबाहेर निघालो तेव्हा तीन दिवसानंतर पहिल्यांना हायवेवर जेवण मिळाल्याचे त्याने सांगितले.

या स्थलांतरीत मजुरांचे काही गृप आहेत. तर काही गृप चालताना तयार झालेत. चेन्नईवरून निघालेला एक तरुण एकटाच निघाला तो पुढे एका गृपमध्ये सामिल झाला. वडील छोट्या मुलाला खांद्यावर घेऊन चालतो तर महिला डोक्यावर सामानाचे ओझे वाहते. अनेक तीन चार वर्षांचे मुलं पण पायी चालत आहे. एकाचा खांदा दुखल्यावर दुसरं कुणीतरी छोटे मुलं बघून इतरांच्या मुलांनाही स्वतःच्या खांद्यावर घेऊन एकमेकांना मदत करीत प्रवास करीत आहे.

काही मजुरांचा बाईक आणि सायकलने प्रवास


ज्या मजुरांकडे बाईक किंवा सायकल आहे ते त्यांचे वाहन घेऊन निघाले. एका मजुरांच्या गृपमध्ये चार बाईक होत्या, पण लोक जवळपास चौपट ते पाचपट होते. अशावेळी त्यांनी एक युक्ती लढवली. त्या चार बाईकवर आधी लोकांना काही अंतरावर सोडायचे, तो पर्यंत इतर लोक पायी चालणार. 25-30 किलोमीटर अंतरावर त्यांना सोडले, की परत जाऊन पायी येणा-या लोकांना बाईकवर बसवून पुन्हा त्यांना आणायचे. ही क्रिया गावी पोहोचत पर्यंत राहणार.

हैदराबादच्या दोन तरुणांनी जे पैसे आले त्या पैशात दोन नवीन सायकल विकत घेतल्या व ते दोघेही सायकलने आग्र्याला जाण्यासाठी निघाले. ते ही कुठल्यातरी कंपनीत काम करायचे. घरी खाली हात जावे लागणार याचे त्यांना दु:ख आहे पण किमान घरी तरी पोहोचता येणार याचा आनंद ही आहे. रोज 100 किलोमीटरचा प्रवास करत असल्याचे त्यांनी सांगितले.

मंगळवारी सायकलने ग्वालियरला जाणा-या तीन मजुरांची भेट झाली. ते चेन्नईहून निघाले होते. 15 एप्रिलला ते निघाले होते. 13 दिवसात त्यांनी नागपूर गाठले होते. 4 मे ला मुलीचे लग्न असल्याने लवकरात लवकर परत पोहोचायचे असल्याचे ते सांगत होते. ते मुलीच्या लग्नाआधी पोहोचेल की नाही माहिती नाही कारण सारखी सायकल चालवून आता पाय साथ देत ऩसल्याचे ते सांगत होते. ते लवकरात लवकर निर्विघ्ण घरी पोहोचावे अशीच अपेक्षा आपण करू शकतो.


लॉकाडाऊन 1.0 च्या वेळी जिल्ह्याच्या बॉर्डर सिल करण्यात आल्या होत्या. त्यामुळे काही पायी जाणा-या लोकांनी शेतातून वाट काढून वाट धरली होती. आता पायी जाणा-या लोकांना काही त्रास नाही, मात्र प्रत्येकाला ट्रकने जाता येत नसल्याने पायी जावं लागत आहे. रस्त्यावर अऩेक लोकांनी जेवणाची व्यवस्था केल्याने दोन वेळेचे जेवण त्यांना मिळत आहे. काही ठिकाणी उन्हामुळे जेवण खराब झाल्याचेही काहींनी सांगितले. उन्हाळा असल्याने तहाण जास्त लागते. त्यामुळे पेट्रोलपंप धाबे जिथे पाणी मिळेल तिथून पाणी भरायचे आणि पुढे चालायचे.

नागपूरमध्ये स्थलांतरीत मजुरांच्या राहण्याची व्यवस्था असतानाही ते पुढे का निघत आहे हा देखील प्रश्न मनात येऊ शकतो. मात्र लॉकडाऊनमुळे मजूर पुरते खचले आहेत. त्यांना घराची ओढ लागली आहे. ते सांगतात की तसेही ते घराबाहेर कामानिमित्त गेले होते. पावसाळ्यात काम संपले की ते परत गावी जायचे. त्यामुळे आता कामच नाही तर थांबून काय फायदा. एक मजूर सांगत होता की गावात थोडीबहुत शेती आहे. तिथे जाऊन शेती करणार. तर एक महिला म्हणाली की ‘महामारी का क्या भरोसा. अगर इस महामारीमे मर भी गये तो कमसे कम गाव मे तो मरना नसिब होगा.’

या लोकांना लवकरात लवकर घरी पोहोचायचे आहे. त्यांना लवकरात लवकर पोहोचण्याचा सर्वात सोपा पर्याय म्हणजे ट्रकने प्रवास करणे होय. वेळ पडली तिथे हे मजूर संपूर्ण कुटु्ंबासह पायी चालत आहे. तेलंगणाच्या पोलिसांबाबत मजूर सांगतात की तिथल्या पोलिसांनी स्वतःहून ट्रक थांबवून या मजुरांना बाहेर बॉर्डरबाहेर काढले. मात्र महाराष्ट्रात ट्रकवरून उतरवून देणे, ट्रकवाल्यांना मारहाण करणे. मजुरांना त्रास देणे असे प्रकार सहन करावे लागले असे हे सांगत आहे.

एक मजूराच्या कुटंबाने केवळ दोन दिवसात हैदराबादहून महाराष्ट्रात प्रवेश केला मात्र महाराष्ट्रात आल्यावर नागपूरला पोहोचायला तब्बल एक आठवडा लागल्याचे त्यांनी सांगितले त्यावरून ते रोज किती पायी चालले असावे व ट्रकची त्यांनी लिफ्टसाठी किती वाट बघितली असावी याचा अंदाज येतो.

रोज 30 ते 50 किलोमीटर मजूर चालत आहेत. सारखे चालल्यामुळे त्यांचे पाय सुजले आहे. एका मजुराने ‘पैरकी दवाई है क्या?’ असे विचारले होते. महिलांची परिस्थिती आणखी वाईट आहे. तेलंगाणामध्ये एका टोलवर मेडिकल कॅम्प लागलेला होता तिथल्या डॉक्टरांनी पेनकिलर दिल्याचे काही मजुरांनी सांगितले.

महाविकास आघाडी सरकारने स्थलांतरीत मजुरांच्या राहण्याची व्यवस्था केली आहे. मात्र महामारीत त्यांना घराची गावाची ओढ लागलेली आहे. त्यामुळे ते इथे थांबायला तयार नाही. सरकारकडूनही या मजुरांना इतर कोणतीही मदत नको. केवळ पोलिसांनी मजुरांसोबत सहकार्याची भूमिका घ्यावी अशी त्यांची माफक अपेक्षा आहे. ट्रकवालेही मजुरांना कोणताही मोबदला न घेता हायवेवरून घेऊऩ जाण्यास तयार आहेत. मात्र केवळ पोलिसांच्या भितीने ते मजुरांना बसून घेऊन जाण्यास धजावत आहेत. अनेक ट्रक त्यांच्या डोळ्यासमोरून रिकामे जात आहेत. पण मजुरांना काहीही करता येत नाही. काही ट्रक ड्रायव्हर बॉर्डर क्रॉस केल्यावर बसवतो असे बोलत आहेत. असं नाही की महाराष्ट्रातील पोलीस सहकार्य करीत ऩाही. असे अनेक पोलीस आहेत ज्यांनी मजुरांच्या जेवणाची व्यवस्था केली आहे तसेच ट्रक थांबवून त्यांना जाण्यासाठीही मदत केल्याचे मजूर सांगतात.

नागपूरहून रोज हजारो मजूर हायवेवरून प्रवास करीत आहेत. नागपूर हा गृहमंत्र्यांचा जिल्हा आहे. त्यांच्या जिल्ह्यातून प्रवास करताना मजुरांना त्रास सहन करावा लागत आहे. कदाचित अनिल देशमुख यांनी पोलिसांना काठ्यांना तेल लावून सज्ज राहा म्हटल्याने दोन राज्यातील फरक दिसून येत असावा. मात्र देशमुख साहेब तेल काठीला नाही तर डोक्याला लावायसाठी असते. काही तेल तर डोकं ही शांत करते. त्यामुळे तेलाचा वापर हा केवळ डोक्यासाठीच व्हावा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून ब-याच अपेक्षा आहेत. मजुरांना दुसरी कोणतीह मदत नको. त्यांना लवकरात लवकर राज्याबाहेर पडण्यास मदत करावी. ते जर लवकर बाहेर निघाले तर राज्यासाठीही ही एक चांगली गोष्ट होईल.

– निकेश जिलठे, मुक्त पत्रकार
9096133400
photo and video – Snehal Wankhede