Home > मॅक्स रिपोर्ट > सहा दिवसांत सहा सफाई कामगारांचा गुदमरून मृत्यू

सहा दिवसांत सहा सफाई कामगारांचा गुदमरून मृत्यू

सफाई कामगारांचे काम करतांना होणारे मृत्यु अजूनही थांबलेले नाहीत. मागील सहा दिवसांमध्ये सहा सफाई कर्मचाऱ्यांचा सेफ्टी टँक स्वच्छ करतांना गुदमरून मृत्यु झाला आहे. स्वच्छता करतांना सुरक्षेची साधनं नसल्याचं या घटनातून समोर आलंय. याआधीही अशा घटना घडल्या, मात्र वेळीच त्यापासून धडा न घेतल्यानं हे प्रकार दुर्देवान अजूनही घडत आहेत.

३ मे रोजी नालासोपारा इथं ३ कर्मचाऱ्यांचा गुदमरून मृत्यु नालासोपारा पश्चिमेकडील निले-मोरेगावजवळील आनंद व्ह्यू या इमारतीतील सेप्टिक टँकमध्ये गुदमरून तीन कामगारांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी सहकंत्राटदार अबु समाद अबु सिद्दीक शेख, मूळ कंत्राटदार रमेश भोरा यांच्यासह सोसायटीच्या सदस्यांविरोधातही कलम ३०४ नुसार मृत्युस कारणीभूत असल्याचा ठपका ठेवत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ३ एप्रिलला दुपारी चार वाजण्याच्या सुमारास सुनील चवरिया, बिका बुबक आणि प्रदीप सरवटे हे तिनही स्वच्छता कामगार सोसायटीतल्या सेप्टिक टँकच्या स्वच्छतेसाठी टाकीत उतरले. त्यावेळी टाकीत विषारी गॅस तयार झाल्यानं गुदमरून तिघांचा त्यात मृत्यु झाला होता.

९ मे ठाण्यात तीन सफाई कामगारांचा गुदमरून मृत्यु

ठाण्यातील घोडबंदर रोडवरील ढोकाळी नाक्याजवळील प्राईड रेसिडेन्सी लक्झरिया सोसायटीच्या सेफ्टी टँकची स्वच्छता करतांना अजय बुम्बक (२२ वर्षे), अमन भादड (वय २४ वर्षे) आणि अमित पिव्हाल (वय २० वर्षे) यांचा श्वास गुदमरल्यानं टाकीतच मृत्यु झाल्याची घटना घडलीय. या दोघांना वाचवायला गेलेल्या अजय आणि विजय या दोघांनाही श्वसनाचा त्रास सुरू झाल्यानं त्यांनाही शासकीय रूग्णालयात उपचारार्थ हलवण्यात आलंय.

दरम्यान, वारंवार घडणाऱ्या या घटनांसाठी सफाई कामगारांच्या संघटनांनी संबंधित सोसायट्यांनीही सफाईचं कंत्राट देतांना कंत्राटदार सक्षम आहे का, त्याच्याकडे कुशल कामगार आहेत का, कामगारांसाठी सुरक्षेची साधनं आहेत का याकडे दुर्लक्ष केलं आहे. त्यामुळं सोसायटीच्या सदस्यांवरही गुन्हे दाखल करण्याची मागणी भारतीय सफाई मजदूर संघटनेचे उपाध्यक्ष राजेंद्र चंदेलिया यांनी केलीय.

कामगारांनो, जीव धोक्यात घालू नका...

नाशिकमध्येही ३ मार्च २०१९ रोजी एका सफाई कर्मचाऱ्याचा सफाई दरम्यान गुदमरून मृत्यु झाल्याची घटना घडली होती. अशा घटना वारंवार घडूनही त्याकडे संबंधित सोसायटी, कंत्राटदार यांच्याकडून सातत्यानं होणार दुर्लक्ष आणि त्यांच्यावर जरब बसावी अशा कारवाईचा अभाव यामुळं या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढच होतेय. सफाई कामगारांनीही जीव धोक्यात घालून सफाई करतांना सुरक्षेची पुरेसी साधनं असल्यावरच कामं केली पाहिजेत, असा मतप्रवाह पुढे येतोय.

Updated : 11 May 2019 1:00 PM GMT
Next Story
Share it
Top