Home > मॅक्स रिपोर्ट > ...तर मेंढ्यासोबत आमचं पोट कायमच लॉकडाऊन होईल!

...तर मेंढ्यासोबत आमचं पोट कायमच लॉकडाऊन होईल!

...तर मेंढ्यासोबत आमचं पोट कायमच लॉकडाऊन होईल!
X

राज्यातील एकही व्यक्ती उपाशी राहणार नाही याची दक्षता घेण्याचा प्रयत्न सरकारतर्फे केला जात असताना, राज्यातील मेंढपाळ मात्र, शासनाच्या सेवा सुविधांपासून नेहमी प्रमाणे दूरच आहेत. गेल्या दीड महिन्यांपासून देशात लॉकडाऊन जाहीर केला आहे. मात्र, या मेंढपाळांकडे कुणीच लक्ष दिलं नसल्याचं मेंढपाळ सांगत आहे. आमचे प्रतिनिधी निखिल शहा यांनी या मेंढपाळांशी बातचित केली.

मेंढ्या कुणी विकत घेइनात, त्यामुळे आमच्या जेवणाचे वांदे झाले असून पावसाळ्यापूर्वी मेंढपाळांचा प्रश्न मार्गी न लागल्यास आमच्यासमोर आत्महत्येचा एकमेव पर्याय उरेल. अशी संतापजनक प्रतिक्रिया या मेंढपाळानं दिली आहे.

तसा तर राज्यातील मेंढपाळ कित्येक वर्षापासून सरकार, सरकारी सुविधा यापासून वंचित राहिलेला आहे. स्वत:चं गाव सोडून शेकडो मैल मेंढ्या चाऱण्यासाठी हा समाज घराबाहेर पडतो. डोक्यावरचं आभाळ हेच त्याच्यासाठी छप्पर आणि पायाखालची जमीन त्याचा आधार. रानावनात मेंढ्या चारायच्या जागा मिळलं तिथं उशाला दगड घेऊन झोपायचं.

आता लॉकडाऊन सुरु झाल्यानं मेंढ्याना एका गावातून दुसऱ्या गावात जाणं अशक्य झालं आहे. गावकरी मारहाण केल्याच्या घटना समोर आल्य़ापासून दुसऱ्या गावात जाण्य़ाची भीती वाटते. मेंढ्याचा वाडा एकाच गावात किती दिवस राहणार? आणि गावात तर आता माणसांना खायला अन्न राहिलं नाही तिथं जित्राबाचं काय? असा सवाल या मेंढपाळानं उपस्थित केला आहे.

गाव लागलं तर एखादं मेंढरु विकायचं आणि आपलं पोट भागायचं. मात्र, लॉकडाऊनमुळं मेंढर कोणी विकत घेत नाही. अशी व्यथा बुलडाणा जिल्ह्यातील मेंढपाळानं मॅक्समहाराष्ट्र शी बोलताना व्यक्त केली.

या परिस्थितीवर लवकरात लवकर मार्ग काढावा अशा भावना खामगाव तालुक्यातील हिवरखेड येथील मेंढपाळांनी व्यक्त केल्या आहेत.

हिवरखेड येथील मेंढपाळ गोपाळराव हटकर यांनी मॅक्समहाराष्ट्र शी बातचित करताना "आम्ही अनेक पिढ्यांपासून शेळी-मेंढी पालनाचा व्यवसाय करीत असून, हे संकट गंभीर आहे. या काळात मेंढपाळांना अन्न धान्याची सक्षम व्यवस्था व कायम स्वरूपाची वीमा योजना सुरु करणं गरजेचं आहे" अशी प्रतिक्रिया दिली आहे.

'आमची समदी इक्री-ठिक्री (मेंढरांची विक्री) बंद असून,या कोरूना मुळं खाटकं (व्यापारी) ही वाड्यावर येईनातं. जी येत हाईत ती अर्ध्या किमतीला मिंढी इकात घेत हाईत" असे म्हणत मेंढपाळ नारायण शिंगाडे यांनी लॉकडाऊनमुळे मेंढरांच्या खरेदी विक्रीवर विपरीत परिणाम होऊन, मेंढपाळांना बसत असलेल्या आर्थिक फटक्यावर चिंता व्यक्त केली आहे.

तरूण मेंढपाळ मंगेश शिंगाडे यांनी "मेंढरांच्या विक्री साठीचे हैद्राबाद येथील बाजार चालू होणे गरजेचे" असल्याचे मत व्यक्त केले. तर सुधाकर हटकर यांनी "मागील वर्षी अतिवृष्टी मुळे मृत झालेल्या मेंढरांची भरपाई अजून मिळालेली नसतांना, लॉकडाऊन मधील नुकसान भरपाई सरकार कसे करेल? अशी संतप्त प्रतिक्रिया दिली.

यावर सविस्तर बोलतांना मेंढपाळपुत्र आंदोलनाचे सौरभ हटकर यांनी सरकारने तातडीच्या उपाय योजना म्हणून मेंढरांची विक्री पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेळी-मेंढी लोकर उत्पादक महामंडळा तर्फे करण्यात यावी. अशी मागणी केली.

काय आहे मेंढपाळांच्या मागण्या? पायखुरी आणि तोंडखुरी चे शासकीय लसीकरण तातडीने करण्यात यावे, मेंढपाळांना मूळ गावी परतण्यासाठी शासनाने परवानगी द्यावी.

राज्यभरातील लॉकडाऊन मध्ये येणाऱ्या अडचणींसाठी तालुका स्तरावर दक्षता समिती स्थापन करावी. पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांना त्यात सामाविष्ट करून,त्यांच्या वर तालुक्यामधील मेंढपाळांना येणाऱ्या अडचणींवर निर्णय घेण्याचे अधिकार द्यावेत.

जर शासनाकडे पुरेसं मनुष्य बळ नसेल, तर मेंढपाळपुत्र आंदोलनाचे कार्यकर्ते कोव्हीड योद्धे म्हणून राज्यभरातील मेंढपाळांची निगा राखतील, तसे अधिकार सरकारने मेंढपाळपुत्र आंदोलनाला द्यावेत.

अशा मागण्या यावेळी या मेंढपाळांनी मॅक्स महाराष्ट्र सोबत बोलताना केल्या आहेत.मागील वर्षी अतिवृष्टी मुळे मृत पडलेल्या हजारो मेंढरांचा ग्राऊंड रिपोर्ट मॅक्स महाराष्ट्रने केला होता. त्या रिपोर्ट च्या प्रभावामुळे राज्यातील प्रशासन हादरून जागे झाले होते. सध्याची परिस्थिती बिकट आहे. त्यामुळं जर सरकार ने वेळीच मेंढपाळांच्या समस्येकडे लक्ष दिलं नाही तर मेंढ्या सोबतच या मेंढपाळाचं पोट देखील कायमच लॉकडाऊन होईल.

Updated : 17 May 2020 2:45 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top