Home > मॅक्स रिपोर्ट > संविधान बचाव रॅली की, नेत्यांचे फोटोसेशन?

संविधान बचाव रॅली की, नेत्यांचे फोटोसेशन?

संविधान बचाव रॅली की, नेत्यांचे फोटोसेशन?
X

एकेकाळी राजकीय मैदान गाजवलेल्या देशातील ‘मास लीडरांना’ आता नव्या चेहऱ्यांची गरज का पडते आहे? अल्पेश ठाकुर, हार्दिक पटेल यांना महाराष्ट्रात बोलावून त्यांच्यासोबत “सेल्फी मैने लेली आज” असे म्हणायची वेळ महाराष्ट्रातील जाणत्या राजापासून कॉंग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांंवर आली आहे का? अल्पेश ठाकुर, हार्दिक पटेल यांच्यासारख्या नव नेतृत्वासोबत फोटो काढण्याची स्पर्धा पाहता महाराष्ट्रातील जाणत्या नेत्यांचा “स्वत:वर भरोसा नाय का?” असा प्रश्न संविधान रॅलीचे फोटो सेशन पाहिल्यानंतर सर्व सामान्य जनतेला पडल्याशिवाय राहणार नाही.

२०१४ च्या निवडणुकीत झालेला पराभव आणि आपण केलेल्या कामांची पूर्ण जाणीव असल्याने कॉंग्रेस राष्ट्रवादीचे नेते सध्या न्यूनगंडाने पछाडलेले आहेत. त्यामुळे आपली जनमाणसाशी तुटलेली नाळ पुन्हा जोडण्यासाठी त्यांनी देशातील नव्या पीढीचा आधार घेतला आहे का? असा देखील सवाल या निमित्ताने उपस्थित होतो.

जनतेला पुन्हा आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी हे नेते आता कन्हैया कुमार, उमर खालिद, हार्दिक पटेल, अल्पेश ठाकूर अशांच्या कुबड्या घेऊन उभे राहण्याचा प्रयत्न करीत आहेत. असंच काहीसे चित्र या रॅलीत पाहायला मिळाले.

मसिहाच्या शोधात कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे नेते

या रॅलीच्या सुरूवातीलाच मोठा गोंधळ उडाला तो शेवटपर्यंत सुरूच राहिला. रॅलीचा मुख्य उद्देश काय आहे? हे विसरून कॉंग्रेस, राष्ट्रवादींचे नेते हार्दिक आणि अल्पेश ठाकूरसोबत फोटोसेशन करण्यात गर्क असल्याचे पाहायला मिळाले. विशेष बाब म्हणजे या रॅलीचे आयोजन करणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टींना देखील काय चालले हे शेवटपर्यंत कळाले नसावे.

रॅलीत काय साध्य झाले?

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, जदयू नेते शरद यादव, जम्मु कश्मिरचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिल कुमार शिंदे, पाटिदार समाजाच्या आंदोलनाचे नेते हार्दिक पटेल, अल्पेश ठाकुर, डी राजा, प्रफुल्ल पटेल, दिनेश त्रिवेदी, राजू शेट्टी, अजित पवार, सुप्रिया सुळे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, राधाकृष्ण विखे पाटील, धनंजय मंंुडे, जितेंद्र आव्हाड, यांच्यासह अनेक दिग्गज नेते एकत्रित येऊन देखील या रॅलीत काय साध्य झाले? हा मोठा प्रश्न आहे.

ज्या कारणांसाठी हे नेते एकत्र आले ते साध्य झाले का? की फक्त मीडियासमोर येऊन फोटोसेशन करण्याइतपत या रॅलीचा उद्देश होता का? संविधान धोक्यात असताना दिल्लीत रॅली न काढता मुंबईत रॅली काढण्याचा उद्देश काय? संविधान बचाव रॅलीचे संविधान बचाव अभियान होणार का? की मुंबईत निघालेली रॅली शेवटची रॅली असणार? त्यानंतर संविधानाचे काय? असे एक ना अनेक प्रश्नाची उत्तर या रॅलीतून अनुत्तरीतच राहतात.

Updated : 27 Jan 2018 10:12 AM GMT
Next Story
Share it
Top